Bangladeshi Visa Rejections : सत्तांतरानंतर बांगलादेशींना मिळत नाही व्हिसा !

(व्हिसा म्हणजे एखाद्या देशात प्रवेश करण्याची, एखादा देश सोडून जाण्याची किंवा एखाद्या देशातून प्रवास करण्याची अनुमती देणारी अधिकृत कागदपत्रे किंवा शिक्का.)

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशाच्या नागरिकांना व्हिसा मिळण्यास अनेक अडचणी येत असल्याचे समोर आले आहे. अनेक देशांनी व्हिसा देणेच बंद केले आहे. गेल्या वर्षी झालेल्या बांगलादेशातील रक्तरंजित सत्तापालटानंतर ही स्थिती निर्माण झाली आहे.

१. या संदर्भात ऑस्ट्रेलियातील आंतरराष्ट्रीय ऑनलाईन नियतकालिक ‘द डिप्लोमॅट’च्या अहवालात सविस्तर म्हटले आहे की, भारतापासून इंडोनेशिया, व्हिएतनामपासून थायलंड आणि अगदी ताजिकिस्तानसारखा देश, जे पूर्वी एका घंट्यात ई-व्हिसा देत होते, ते आता बांगलादेशींना व्हिसा नाकारतात, उशीर करतात अथवा निर्बंध लादत आहेत. हे आता सर्वसामान्य झाले आहे. याचा फटका लाखो बांगलादेशींना बसत आहे.

२. बांगलादेशातील अंतरिम सरकार यासाठी मानव तस्करी आणि पूर्वीच्या सत्तेच्या अपयशाला उत्तरदायी धरत आहे; मात्र राजनैतिक तज्ञांच्या मते खरी कारणे मुत्सद्दीपणातील निष्क्रियता, राजकीय अस्थिरता आणि सरकारची वैधता नसणे, ही आहेत.

भारताकडून बांगलादेशींसाठी पर्यटक व्हिसा बंदच !

ऑगस्ट २०२४ मधील सत्तांतरानंतर भारताने बांग्लादेशींना पर्यटक व्हिसा देणे बंद केले आणि एक वर्ष उलटल्यानंतरही हा प्रतिबंध कायम आहे. एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या काळात भारतात आलेल्या सुमारे १ कोटी परदेशी पर्यटकांपैकी २१ लाखांहून अधिक बांगलादेशी होते. (एका वर्षाच्या कालावधीत भारतात पर्यटनाच्या नावाखाली अधिकृतरित्या एवढे बांगलादेशी आले, तर लोकसंख्याशास्त्रीय असमतोल करण्यासाठी अनधिकृतरित्या किती बांगलादेशी घुसले असतील, याचा विचारही करवत नाही ! – संपादक)

इंडोनेशियाने ‘ऑन अरायव्हल’ व्हिसा देणे थांबवले !

‘द डिप्लोमॅट’च्या अहवालानुसार इंडोनेशियाने मानव तस्करीचा हवाला देत बांगलादेशींना ‘ऑन अरायव्हल’ व्हिसा देणे (आधी न देता गंतव्य देशाच्या विमानतळावर पोचल्यावरच व्हिसा दिला जाणे) थांबवले आहे. जूनमध्ये इंडोनेशियाच्या उप परराष्ट्रमंत्र्यांच्या ढाका भेटीनंतरही या विषयावर काही प्रगती झाली नाही. थायलंड जो पूर्वी एका आठवड्यात ई-व्हिसा देत असे, आता बांगलादेशी नागरिकांच्या अर्जांची प्रक्रिया करण्यास ४० ते ५० दिवस घेत आहे. व्हिएतनामने बांगलादेशींना पर्यटक व्हिसा देणे बंद केले आहे.

मध्य-पूर्व आणि युरोप येथील अडचणी !

अहवालानुसार संयुक्त अरब अमिरातने बांगलादेशींना दिल्या जाणार्‍या व्हिसाची संख्या अल्प केली आहे. प्रतिदिन सरासरी ३० ते ५० लोकांनाच व्हिसा मिळतो.  इटलीमध्ये ६० सहस्रांहून अधिक बांगलादेशींचे व्हिसा अर्ज प्रलंबित आहेत.

युनूस सरकार अपयशी !

महंमद युनूस

अहवालात ठळकपणे सांगण्यात आले आहे की, या घडामोडी बांगलादेशी पारपत्राच्या घटत्या जागतिक मानाचा पुरावा आहेत. वर्ष २०२५ मध्ये यूनुस असे राष्ट्रप्रमुख आहेत, ज्यांच्या देशाच्या प्रत्येक नाकारलेल्या व्हिसासमवेत बांगलादेशाची आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा खालावत आहे. राष्ट्रप्रमुख म्हणून त्यांचे कर्तव्य आहे लोकशाही पद्धती पुन्हा प्रस्थापित करणे आणि राजकीय स्थैर्य आणणे, जेणेकरून बांगलादेश आत्मविश्‍वासाने पुढे जाईल, त्याच्या नागरिकांना परदेशातील सीमारेषांवर अपमान सहन करावा लागणार नाही आणि पारपत्रावरील विश्‍वास टिकून राहील.

संपादकीय भूमिका

यातून बांगलादेशाची जगाच्या दृष्टीने लायकी लक्षात येते !