
मुंबई, ठाणे आणि रायगड या महानगरांमध्ये रस्त्यांवर पडलेले मोठे खड्डे हे आता केवळ वाहतुकीची समस्या राहिलेली नाही, तर ते नागरिकांच्या आरोग्यासाठीही गंभीर धोका बनले आहेत. स्थानिक प्रशासनाची असक्षमता आणि भ्रष्ट कारभार यांमुळे हे खड्डे कायमस्वरूपी दुरुस्त होत नाहीत. त्यामुळे शहरांतील रस्त्यांवर पडलेले खड्डे तुम्हाला जणू एक नवी ‘खड्डा थेरपी’ (‘खड्ड्यांचा उपचार) देत आहेत. या ‘थेरपी’मुळे तुमच्या पाठीचा आणि कमरेचा व्यायाम विनामूल्य होत असून अल्प वयातच म्हातारपण आल्याचा अनुभव मिळत आहे ! त्यामुळे जीवनातील अनेक सुखदुःख लवकर समजून घेता येत आहेत. ‘स्थानिक प्रशासनाने नागरिकांना शारीरिक आणि मानसिक त्रस्त करण्यासाठी अनोखा आणि दूरदृष्टीचा उपाय शोधला आहे का ?’, असेच उपरोधिकपणे म्हणावे लागेल.

रस्त्यांवरील न संपणार्या खड्ड्यांमुळे लोकांना पाठ, कंबर आणि मणके यांच्या मोठ्या समस्या उद्भवत आहेत. यामुळे लोक आता ‘पेन किलर’ (दुखणे थांबवण्याची गोळी) वारंवार घेऊन शरीराची हेळसांड करू लागले आहेत. ‘खड्डे थेरपी’मुळे जणू प्रत्येक घर एक लहानसे चिकित्सालय बनले आहे ! रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणारे सततचे धक्के शरीराच्या मणक्यावर थेट परिणाम करतात. यामुळे कंबरदुखी, मानदुखी आणि पाठदुखी यांचे त्रास चालू होतात. अनेकदा हे त्रास इतके वाढतात की, चालणे आणि बसणेही कठीण होते. तरुण वयातच मणक्याचे विकार झाल्यामुळे त्यांची कार्यक्षमता अल्प होत आहे. यावर ‘फिजिओथेरपी’, औषधे आणि काही वेळा शस्त्रक्रियेचीही आवश्यकता भासते, ज्यामुळे मोठा आर्थिक भुर्दंड पडतो.
आजकालची युवा पिढी पुष्कळ वेगाने धावते. त्यांना आयुष्यातील अनेक गोष्टींचा अनुभव लवकर घ्यायचा असतो. मग म्हातारपणाचा अनुभव मागे कसा राहील ? म्हणूनच प्रशासन हा अनुभवही लवकर देत आहे का ? प्रशासनाने खड्ड्यांच्या माध्यमातून तरुणांना अल्प वयातच विविध आजारांचा अनुभव दिला आहे. यामुळे त्यांना एकतर आयुष्याचे गांभीर्य लवकर समजते किंवा ते अधिक त्रस्त तरी होतात. या खड्ड्यांच्या समस्येमुळे आता ‘तरुण’ आणि ‘म्हातारे’ यांच्यातील भेद अल्प झाला आहे ! स्थानिक प्रशासन अनेकदा खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेते; परंतु निकृष्ट कामे केल्यामुळे काही दिवसांतच रस्त्यांची परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ होते. अनेक ठिकाणी केवळ माती किंवा तात्पुरते डांबर टाकून खड्डे बुजवले जातात, जे पहिल्याच पावसात वाहून जातात. यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. नागरिकांच्या आरोग्याची कोणतीही पर्वा न करता, प्रशासकीय यंत्रणा केवळ कागदोपत्री कामे करून कर्तव्यपूर्तीचा देखावा करतात, हेच खरे !
– सौ. भक्ती नित्यानंद भिसे, पनवेल.
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !