भारतीय संस्कृतीत महिलांना असलेले आदराचे स्थान !

सध्या चालू असलेल्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने…

हिंदु धर्मात भगवतीदेवीची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा करतात. एक म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदा ते चैत्र शुक्ल नवमीपर्यंतच्या काळात आराधना करतात, तिला ‘वासंतिक नवरात्र’ म्हणतात, तर आश्विन शुक्ल प्रतिपदा ते आश्विन शुक्ल  नवमीपर्यंतच्या काळात केलेल्या आराधनेला ‘शारदीय नवरात्र’ असे म्हणतात. शारदीय नवरात्र अधिक प्रचलित असल्यामुळे येथे तिच्याविषयी विवेचन केले आहे. आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘नवरात्र, ऐतिहासिक महत्त्व, व्रत करण्याची पद्धत, गरबा आणि कलियुगातील असुर (दुष्प्रवृत्ती)’, यांविषयी वाचले. आजच्या लेखात वाचकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे येथे देत आहोत.        (भाग ३)

या लेखाचा आधीचा/मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/960765.html

सनातन-निर्मित श्री लक्ष्मीदेवीचे चित्र

१. प्रश्न

भारतात महिलांच्या शिक्षणाची परंपरा १००-१५० वर्षांपूर्वी चालू झाली, असे सांगितले जाते, याविषयी तुमचे मत काय आहे ?

उत्तर 

अ. हिंदु संस्कृतीत महिलांना सर्वकाळ आदराचे आणि सन्मानाचे स्थान : जगभरातील सर्वांत जुनी आणि आदर्श अशी हिंदु संस्कृती आहे. तरीही आज काही ना काही कारण काढून हिंदु संस्कृती, हिंदुत्व, हिंदु धर्म यांना नावे ठेवण्याचा किंवा हीन दर्जा देण्याचा प्रयत्न केला जातो. हिंदु धर्मात महिलांना तुच्छ लेखणारा, महिलांवर अन्याय करणारा आहे, असा हेतूतः प्रचार केला जातो. प्रत्यक्षात हिंदु संस्कृतीत महिलांना सर्वकाळ आदराचे आणि सन्मानाचे स्थान आहे. आपल्या धर्मग्रंथात ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः । (संदर्भ : ‘मनुस्मृति’, अध्याय ३, श्लोक ५६)’, म्हणजे ‘जेथे स्त्रियांची पूजा होते, तेथे देवता रममाण होतात.’ हिंदु संस्कृतीत शिवाचे अर्धनारेश्वर रूप आहे, ज्यात शिव-पार्वती हे एकरूपच आहेत, अशी मान्यता आहे, तसेच महिलेमध्ये दुर्गादेवीचा, तर पुरुषांमध्ये शिवाचा अंश आहे, असे मानले गेले आहे. आज-काल स्त्री-पुरुष समानतेला जगभरात महत्त्व आले आहे, जगभरात स्त्री-पुरुष समानता आणण्याचा नारा दिला जातो; पण प्रत्यक्षात हिंदु संस्कृतीने महिलेला पुरुषांच्या बरोबरीने नाही, तर पुरुषांपेक्षाही श्रेष्ठ स्थान दिले आहे. हिंदूंमध्ये गौरी-शंकर, लक्ष्मी-नारायण, सीता-राम, राधे-श्याम अशी नावे प्रचलित आहेत. याचा अर्थ देवतांची नावे घेतांनाही त्यामध्ये प्रथम देवीच्या नावाचा उल्लेख केलेला आहे. असे असतांना आज मात्र पुढारलेपणाच्या नावाखाली किंवा स्त्री-पुरुष समानतेच्या नावाखाली महिला त्यांचे ‘महिला’ पण सोडू पहात आहेत. पुढारलेपणाच्या नावाखाली तंग आणि तोकडे कपडे घालून अंगप्रदर्शन करत आहेत. अर्थार्जनाच्या मागे लागतांना पुढील पिढी सुसंस्कारित करण्याचे दायित्व निभावण्यात मागे पडत आहेत. ‘स्त्रियांनी (समानतेला भुलून) पुरुष बनण्याचा अट्टहास करण्यापेक्षा पुरुषार्थ गाजवावा’, असे वडाळा महादेव (जिल्हा अहिल्यानगर) येथील गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांनी म्हटले आहे.

आ. भारतात तेजस्वी आणि कर्तृत्ववान स्त्रियांची परंपरा ! : ‘प्राचीन भारतातील कर्तृत्ववान महिला भारतात पुरुषसत्ताक पद्धत होती आणि त्याद्वारे महिलांवर अन्याय होत होता, स्त्रियांना चूल आणि मूल एवढाच अधिकार होता’, असा खोटा प्रचार साम्यवादी अन् पुरोगामी करतात. इतकेच नव्हे, तर भारतात महिलांच्या शिक्षणाची परंपरा १९ व्या शतकात, म्हणजे मागील १००-१५० वर्षांपूर्वी चालू झाली, असे सांगितले जाते; पण हे सत्य नाही. भारताचा लपवून ठेवलेला खरा इतिहास जाणून घेतल्यास कळते की, प्रत्यक्षात वैदिक काळापासून भारतात तेजस्वी आणि कर्तृत्ववान स्त्रियांची परंपरा आहे. भारतीय इतिहासास स्त्रिया केवळ ज्ञानीच नव्हत्या, तर त्या युद्धात विरांगना, उत्तम राज्यकर्त्या म्हणून नावाजलेल्या होत्या. आपल्याकडील गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा यांसारख्या विदुषी (विद्वान) वेद-शास्त्रामध्ये पारंगत होत्या. याज्ञवल्क्यऋषींनी त्यांची पत्नी मैत्रेयी हिला आत्मज्ञान दिले होते. विदुषी गार्गीही वेदशास्त्र पारंगत होती. गार्गी आणि याज्ञवल्क्य यांच्यामध्ये जी काही शास्त्रार्थ चर्चा झाली ती ‘बृहदारण्यक् उपनिषद्’ मध्ये देण्यात आली आहे. आपल्याकडे विद्येची देवता ‘सरस्वती’ आहे.

सौ. भक्ती डाफळे

इ. कैकेयीने राजा दशरथाला युद्धात साहाय्य करणे : विद्वत्तेच्या जोडीला प्राचीन काळी महिला राज्य कारभार, तसेच युद्धात सहभाग घेण्यासही सक्षम होत्या. रामायणातील इतिहासानुसार माता कैकेयीने श्रीरामाला वनवासात पाठवल्याची कथा सर्वांना ठाऊक असते; मात्र कैकेयीला हे वरदान राजा दशरथासमवेत युद्धात सहभागी झाली असतांना रथाची धुरा सांभाळल्याने दशरथाने दिल्याचे सांगितले जात नाही. याचाच अर्थ सहस्रो वर्षांपूर्वी रामायणाच्या काळात स्त्रिया पतीसमवेत युद्धात सहभागी होत असल्याचा आपला इतिहास असल्याचे यातून लक्षात येते, तसेच रामायणात ‘राम वनवासात निघाले, तेव्हा राजगुरु वसिष्ठऋषींनी सीता राज्यकारभार करण्यास कुशल आणि सक्षम असल्याने तिचाच राज्याभिषेक करावा, असे सुचवले होते; मात्र सीतेने रामासह वनवासात जाण्याची अनुज्ञा मागितल्याने तिने राज्यकारभार केला नाही’, असा उल्लेख वाल्मीकि रामायणात आहे.

ई. महिलांनी राज्यकारभार केल्याची अन्य उदाहरणे : महाभारतीय युद्धात काश्मीरचा राजा ठार झाल्यानंतर त्याची पत्नी यशोमती हिचा राज्याभिषेक स्वतः भगवान श्रीकृष्णाने केला होता. अर्जुनाची एक पत्नी चित्रांगदा मणीपूर राज्याची राणी होती. याच संदर्भात अलीकडच्या काळातील उदाहरण पहायचे म्हटले, तर शहाजीराजे कर्नाटकमध्ये असतांना राजमाता जिजाऊ यांनी पुणे जहागिरीचा राज्यकारभार सांभाळला. त्यांनी आदर्श माता होऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले.

छत्रपती राजाराम यांच्या पत्नी राणी ताराबाई यांनी कोल्हापूर संस्थानाचा राज्यकारभार उत्तमरित्या केल्याचे उदाहरण आहे. देशभरातील हिंदु मंदिरांचा जीर्णोद्धार करणार्‍या अहिल्याबाई होळकर पती निधनानंतर होळकर घराण्याच्या कर्त्या झाल्या होत्या. विरांगना राणी लक्ष्मीबाई या युद्धशास्त्रात पारंगत होत्या. देशप्रेमाने भारलेल्या राणी लक्ष्मीबाई तान्ह्या बाळाला पाठीशी बांधून इंग्रजांविरुद्धच्या लढाईत शत्रूवर तुटून पडल्या. भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी क्रांतीकारकांच्या लढ्यातही अनेक देशभक्त क्रांतीकारी विरांगना सहभागी झाल्या होत्या. कर्नाटकातील राणी चेन्नम्मासारखी देशभरातील पराक्रमी स्त्रियांची सहस्रो उदाहरणे आपल्याला देता येतील. यातून आपल्याला भारतीय हिंदु संस्कृतीतील स्त्रियांचे वीरत्व आणि पराक्रम लपवून कशा प्रकारे खोटे पसरवले गेले आणि हिंदु धर्माला कलंकित करण्याचे षड्यंत्र रचले गेले, हे लक्षात येते. यासाठी आपल्याला खरा इतिहास समजून घेतला पाहिजे.

उ. महिलांमधील आत्मतेज चेतवण्याची आवश्यकता ! : आजही शासन-प्रशासन, शेती-अर्थकारण क्रीडा, शिक्षण-साहित्य-विज्ञान आदी क्षेत्रांत महिला त्यांचे कर्तृत्व गाजवत आहेत; पण अशा सत्शील, धर्मपरायण, कर्तव्यनिष्ठ महिलांची संख्या नगण्य आहे. या संख्येत वृद्धी करायची असेल, तर आपल्या कुटुंबातील महिलांमध्ये राष्ट्र-धर्म प्रेमाची ज्योत प्रज्वलित करायला हवी. महिलांमध्ये असणारे तेज जागृत झाले की, काय अविश्वसनीय घटना घडू शकतात, याला इतिहास साक्षी आहे. महिलांमधील आत्मतेज आज चेतवण्याची आवश्यकता आहे.

(क्रमशः सोमवारच्या दैनिकात)

– सौ. भक्ती डाफळे, हिंदु जनजागृती समिती, सातारा.