
‘जो सनातन नहीं मिटा रावण की हुंकार से, जो सनातन नहीं मिटा कंस की फुंकार से, वह सनातन क्या मिटेगा आज की धर्मविरोधी शक्तीयों से ।’
वरील क्षात्रतेजयुक्त पंक्तींची आठवण मुंबई उच्च न्यायालयातील एका निर्णयाने पुन्हा एकदा झाली. सनातन संस्थेला ‘बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्या’च्या अंतर्गत (‘यूएपीए’अंतर्गत) ‘आतंकवादी संघटना’ घोषित करून तिच्यावर बंदी घालण्याची हिंदुद्वेषी मागणी याचिकाकर्ते विजय रोकडे यांनी वर्ष २०११ मध्ये उच्च न्यायालयात केली होती. ‘सनातन संस्थेचे सदस्य तरुणांना संमोहित करत असून त्यांचा आतंकवादी कारवायांमध्येही सहभाग आहे’, असे फुत्कारही या याचिकेत सोडण्यात आले होते. न्यायालयाने या ‘जनहित’ याचिकेच्या योग्यतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने याचिकाकर्त्यावर ती मागे घेण्याची नामुष्की ओढवली आहे. यामुळे समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्कर्षासाठी सेवाभावी वृत्तीने कार्य करणार्या सनातन संस्थेला लोकशाहीतील न्यायमंदिरी न्याय मिळाला. यापूर्वीही सनातनचे निर्दाेषत्व विधीमंडळ आणि न्यायपालिका या लोकशाहीच्या स्तंभांच्या ठायी सिद्ध झालेच आहे.
सनातन संस्थेला लक्ष्य करून हिंदु धर्म संपवण्याची सुपारी साम्यवादी, नास्तिकतावादी, शहरी नक्षलवादी आणि काँग्रेसवाले यांच्या टोळीने पुष्कळ पूर्वीपासून घेतली आहे. आजच्या भाषेत ज्याला ‘नॅरेटिव्ह’ (कथानक) म्हणतात, ते या टोळीने वर्ष २००९ मधील मडगाव स्फोट प्रकरणापासून ते नालासोपारा स्फोटकांच्या प्रकरणापर्यंत पद्धतशीरपणे रचले. त्याद्वारे त्यांनी मिळेल त्या मंचावरून सनातनची आणि पर्यायाने हिंदु धर्माची अपकीर्ती केली. त्यांना सुपारीबाज आणि हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमांनी साथ दिली. या टोळीच्या दावणीला बांधलेल्या प्रसारमाध्यमांनी सनातनवरील आरोपांची कधीही कुठलीही शहानिशा न करता सनातनविरुद्ध रकानेच्या रकाने भरले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, साम्यवादी पक्ष आदींनी कधी महाराष्ट्राच्या विधानसभेत, तर कधी गोवा किंवा कर्नाटक राज्यातून ‘सनातन’वर बंदीची मागणी करून सनातनविरोधी बागुलबुवा उभा केला. महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तर सनातन संस्थेवर थेट बंदी घालण्याचा प्रस्तावच केंद्रातील तत्कालीन काँग्रेस सरकारकडे पाठवला. ज्यांच्या निष्क्रीयतेमुळे वर्ष १९९२ च्या मुंबई दंगलीपासून वर्ष २००८ मधील मुंबई आक्रमणापर्यंत हिंदू होरपळले, त्या काँग्रेसने कधी कुठल्या इस्लामी संघटनेवर बंदी घालण्याची मागणी तर केलीच नाही, उलट कर्नाटकमध्ये बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या इस्लामी जिहादी संघटनेवरील बंदी उठवण्याचे सूतोवाच केले, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे सनातनसारख्या हिंदुत्वनिष्ठ संघटनेला लक्ष्य करून काँग्रेस स्वतःचे अपयश झाकण्याचा प्रयत्न करत राहिली. अर्थात् त्यांच्याच ‘बॉस’ने, म्हणजे तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बंदीसंदर्भात प्रतिकूलता दर्शवली ! सनातनचे कार्य महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांत अधिक आहे. एकेकाळी या तिन्ही राज्यांत काँग्रेसची सत्ता होती; पण तरीही काँग्रेस सनातनचा आवाज दाबू शकली नाही. त्यामुळे पिसाळलेल्या काँग्रेसने सनातनचा पिच्छाच पुरवला. ज्याप्रमाणे मोगलांच्या घोड्यांना पाण्यातही ‘संताजी-धनाजी’ दिसायचे, त्याप्रमाणे कुठल्याही घटनेत काँग्रेसला केवळ ‘सनातन संस्था’च दिसायची आणि त्या आधारे ते बंदीचे तुणतुणे वाजवायचे. यावरून या टोळीने हिंदु धर्म संपवण्याचे ‘नॅरेटिव्ह’ कशा प्रकारे रचले होते ?, हे लक्षात येते. तिने सनातन संस्थेला आतंकवादी ठरवण्याचा शब्दशः आटापिटा केला; पण प्रत्येक वेळी ईश्वराच्या आणि सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपाशीर्वादाने सनातन संस्थेचे निर्दाेषत्व सिद्ध होत राहिले. आता मुंबई उच्च न्यायालयातही ते अप्रत्यक्षपणे पुन्हा एकदा सिद्ध झाले. त्या अर्थाने हे ‘जैत रे जैत’ होय ! ‘जैत रे जैत’ या चित्रपटातील कथेचा आणि येथे दिलेल्या घडामोडींचा काही संबंध नसला, तरी प्रत्येक हिंदु मनातील विजयी भावनेचे शाब्दिक वर्णन याद्वारे केले आहे. हा सनातनचा केवळ कायदेशीर विजयच नाही, तर हिंदुद्वेषी टोळीचा दारूण पराभवही आहे. हा पराभव त्या पुरोगामी आणि बौद्धिक आतंकवादी प्रवृत्तींचा आहे, ज्यांना सनातन संस्था आतंकवादी वाटते.

हिंदु धर्माविरुद्ध युद्ध !
हे सर्व पाहिल्यावर प्रश्न पडतो की, या टोळीचे लक्ष्य नेहमी हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि त्यातही सनातन संस्थाच का असते ? सनातन संस्था ही आध्यात्मिक संस्था तर आहेच; पण त्यासह ती हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांच्यातील धर्माभिमान वाढवून हिंदु राष्ट्रासाठी त्यांचे प्रबोधन करत आहे. याचे अत्यंत सकारात्मक परिणाम देशात पदोपदी दिसत आहेत. यामुळे पुरोगामी टोळीचे हिंदु धर्म संपवण्याचे स्वप्न केवळ स्वप्नच रहाण्याची भीती त्यांच्या मनात आहे आणि हाच त्यांच्या सनातनविरोधाचा गाभा आहे. या देशात हिंदु धर्मावर बोलणे, त्याचे समर्थन करणे, त्याच्या रक्षणासाठी उभे रहाणे, हे अग्नीदिव्य असते. हे अग्नीदिव्य सनातनने पार केले; पण जळफळाट मात्र या टोळीचा झाला. हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य हे साक्षात् भगवंताचे कार्य आहे. कधीही, कितीही आणि कसाही विरोध केला, तरी सर्वशक्तीमान ईश्वरासमोर तो टिकतो थोडाच ! भगवान श्रीकृष्णाचा जन्मच होऊ नये, यासाठी कंसाने केलेले प्रयत्न असोत कि हिंदवी स्वराज्य स्थापन होऊ न देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिवावर उठलेले मोगल असो, भगवंत नेहमी सत्याच्याच बाजूने उभा रहातो आणि राहील, हेच त्रिकालाबाधित सत्य आहे. यावरून तरी सनातनविरोधकांनी बोध घ्यायला हवा. सनातन संस्था संपवून टाकण्याजोगी नाही. ती या पवित्र भारत भूमीतून उगम पावलेली आहे. तिचे साधक आणि हितचिंतक यांचा साधनाबळावर दृढ विश्वास अन् गुरुदेवांवर प्रचंड श्रद्धा आहे. ही संस्था कुठल्याही राजकीय पक्षाच्या तालावर नाचत नाही; पण तरीही दिवसेंदिवस तिचे कार्य वाढत आहे, हिंदूंमध्ये तिची लोकप्रियता वृद्धींगत होत आहे. हे सुपारीबाज टोळीच्या डोळ्यांत खुपत आहे. या संस्थेचे कार्य सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आणि पारदर्शक आहे. उद्देश स्पष्ट आणि समाजहितैषी आहे. जर पुरोगामी म्हणतात, त्याप्रमाणे सनातनमध्ये काही दोष असते, तर देशाची सुरक्षायंत्रणा, पोलीस, गुप्तचर यंत्रणा आणि सरकार गप्प बसले नसते, हे लक्षात घेतले पाहिजे. पुरोगाम्यांचे खरे युद्ध हिंदु धर्माविरुद्धचे आहे. त्यांनी आज सनातनला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला; परंतु तसे हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या संदर्भातपण होऊ शकते. असे होऊ द्यायचे नसेल, तर हिंदूंना हिंदूसंघटनाची वज्रमूठ करून उभे रहावे लागेल.
| हिंदु धर्म संपवण्याचे कारस्थान रचण्याचे पुरोगामी टोळीचे धाडस होणार नाही, अशी पत हिंदूंनी निर्माण केली पाहिजे ! |
संपादकीय : हरवलेले समाधान !
संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !
संपादकीय : सरकारची ऑनलाईन फसवणूक !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
संपादकीय : दैवी स्वरसाज हरपला !
संपादकीय : ‘गांधीवादा’ची कात टाकलेला भारत !