श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याविषयी आंतरिक ओढ का वाटते ?’, याचे साधिकेने केलेले चिंतन, स्वप्नांत झालेले त्यांचे दर्शन आणि आलेल्या अनुभूती

‘काही दिवसांपूर्वी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करत असतांना माझ्या मनात विचार आले, ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याविषयी मला एवढी आंतरिक ओढ का आहे ? त्या माझा आदर्श का आहेत ? ‘त्यांना अपेक्षित असे घडावे’, असे मला का वाटते ?’ यांविषयी झालेले माझे चिंतन येथे दिले आहे. 

सौ. कीर्ती जाधव

१. लहानपणापासून श्री भवानीदेवीविषयी आंतरिक ओढ असणे आणि ‘तिची सेवा करण्याची इच्छा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताईंच्या रूपात पूर्ण झाली’, असे अनुभवणे

१ अ. बालपणापासून भवानीदेवीविषयी जिव्हाळा वाटून तिला प्रार्थना करणे : माझे माहेर ‘तुळजापूर’ हे आहे. मला लहानपणापासून भवानीदेवीविषयी आतूनच एक जिव्हाळा वाटत असे. साधनेत आल्यानंतरसुद्धा मी भवानीदेवीला प्रार्थना करत असे.

१ आ. श्री भवानीदेवीची सेवा करण्याची पुष्कळ इच्छा असतांना देवाने देवीस्वरूप अशा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्या सहवासात आणणे आणि शुद्ध अन् निर्मळ होण्याची इच्छाही पूर्ण होणे : मी पूर्णवेळ साधना करायला आरंभ केल्यावर हळूहळू देवाने मला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताईंच्या सहवासात आणले. महर्षींनी जीवनाडीपट्टीत उल्लेख केला आहे की, ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ साक्षात् देवीस्वरूप आहेत.’ त्या वेळी मला याचा उलगडा झाला. मी नेहमी देवीला सांगायचे, ‘देवी, मला तुझ्यासारखे सात्त्विक, शुद्ध आणि निर्मळ व्हायचे आहे.’ श्री भवानीदेवीने माझी प्रार्थना ऐकली. मला लहानपणापासून ‘देवीचे मंदिर स्वच्छ करावे, देवीचे गाव सुंदर करावे’, असे पुष्कळ वाटायचे. या माध्यमातून श्री भवानीदेवीची सेवा करण्याची माझी पुष्कळ इच्छा असायची. ‘श्री भवानीदेवीने साक्षात् देवीस्वरूप असलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताईंच्या रूपात स्थुलातून जन्म घेतला आहे’, असे मला वाटते. देवीची सेवा करण्याची, तिच्या सहवासात राहून शुद्ध आणि निर्मळ होण्याची माझी इच्छा देवीने अशा रितीने पूर्ण केली आहे.

आश्रमात आल्यापासून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ साधिकेवर आईप्रमाणे प्रेम करून तिला घडवत असणे

कु. कीर्ती पुजारी (आताच्या सौ. कीर्ती जाधव) यांची प्रेमाने विचारपूस करतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई (वर्ष २०१३)

मी रामनाथी, गोवा येथील आश्रमात आल्यापासून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ खरोखर मला घडवत आहेत. त्या माझ्यावर आईसारखेच प्रेम करतात. मध्यंतरी काही कालावधीमध्ये माझे साधनेचे प्रयत्न अल्प झाले; परंतु माझ्यावरील त्यांचे प्रेम कधीच उणावले नाही. त्यांनी ‘मी काय केले, तर माझे प्रयत्न अधिक वाढू शकतात ?’ याविषयी मला वेळोवेळी सांगून, तसेच इतरांचे सहाय्य देऊन मला त्यातून बाहेर काढले. त्या अजूनही मधेमधे माझ्या साधनेचा आढावा घेतात आणि विचारणा करतात. ‘मी साधनेत लवकर पुढे जावे’, अशी त्यांना पुष्कळ तळमळ आहे.

– सौ. कीर्ती प्रतीक जाधव, फोंडा, गोवा. (२.९.२०२५)

२. ‘साधनेचे प्रयत्न न्यून झाल्यास किंवा साधनेकडे दुर्लक्ष झाल्यास श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ स्वप्नात येऊन मार्गदर्शन करत आहेत’, यांविषयी आलेल्या अनुभूती

२ अ. स्वप्नात व्यष्टी साधना वाढवण्याविषयी मार्गदर्शन करणे : एकदा रात्री श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ माझ्या स्वप्नात आल्या. त्यांनी मला सांगितले की, ‘तुझी व्यष्टी साधना अल्प पडत आहे. तू प्रयत्न वाढव.’

२ आ. स्वप्नात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी ‘सेवेचे प्रयत्न कसे करावेत ?’ याविषयी सांगणे : एकदा एका सेवेत मी न्यून पडत होते. ‘त्या प्रसंगात नेमके काय करायला हवे ?’, हे मला कळत नव्हते. त्याच विचारांत मी रात्री झोपले. तेव्हा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई आणि १ संत माझ्या स्वप्नात आले. त्यांनी ‘मी त्या सेवेच्या दृष्टीने कसे प्रयत्न करू शकले असते ?’ हे सांगितले.

२ इ. मन अस्वस्थ असतांना झोपल्यावर साधिकेला स्वप्नात ‘ती एकटीच बसली आहे’, असे दिसणे, त्या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी ‘मी तुझ्या समवेत आहे’, असे म्हणून तिला आश्वस्त करणे : एके दिवशी माझे मन अस्वस्थ होते आणि तशा स्थितीतच मी झोपले. त्या दिवशी मला एक स्वप्न पडले. स्वप्नात बरेच साधक दिसत होते. त्या ठिकाणी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताईसुद्धा होत्या. नंतर ते सर्व साधक तिथून कुठेतरी दुसरीकडे गेले आणि मी एकटीच विचार करत बसले होते. तेव्हा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई कुठेही न जाता माझ्या समवेत तिथेच बसल्या. मी त्यांना विचारले, ‘तुम्ही इथे का बसला आहात ?’ त्या मला म्हणाल्या, ‘मी तुझ्या समवेत आहे. तू काळजी करू नकोस.’ सकाळी उठल्यावर मला हे स्वप्न आठवले आणि पुष्कळ चांगले वाटले. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई सतत माझ्या समवेत आहेत; परंतु मीच प्रयत्न करण्यात न्यून पडत आहे, मी प्रयत्न पुष्कळ वाढवायला हवेत’, याची मला जाणीव झाली.

काही वेळा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई स्वप्नात येतात आणि ‘त्या माझ्या समवेत आहेत’, याची प्रचीती देतात. त्यामुळे माझ्या प्रयत्नांना उभारी मिळते.

– सौ. कीर्ती प्रतीक जाधव, फोंडा, गोवा. (२.९.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक