Justice Rohinton Nariman : (म्हणे) ‘पूजा स्थळ कायदा कठोरपणे लागू केला पाहिजे, म्हणजे मंदिरांसाठी पुन्हा खटले प्रविष्ट (दाखल) होऊ नयेत !’

सर्वाेच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रोहिंटन नरीमन यांचे हिंदुद्वेषी विधान

सर्वाेच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रोहिंटन नरीमन

नवी देहली – सर्वाेच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रोहिंटन नरीमन यांनी श्रीराममंदिर प्रकरणाविषयी आक्षेपार्ह विधान केले आहे. केरळची राजधानी थिरूवनंतपूरम् येथील एका कार्यक्रमात बोलतांना नरीमन यांनी श्रीरामजन्मभूमी प्रकरणात हिंदूंना न्याय देणार्‍या निर्णयावर टीका करतांना ही ‘न्यायाची थट्टा’ असल्याचे म्हटले. त्यांनी मंदिरांच्या पुनर्प्राप्तीसाठी कायदेशीर मागणी करणार्‍या हिंदूंना ‘राक्षसी डोकी’ असे संबोधले. पूजा स्थळ कायदा (प्लेसेस ऑफ वर्शिप कायदा) कठोरपणे लागू केला पाहिजे, जेणेकरून मंदिरांसाठी पुन्हा खटले दाखल होऊ नयेत, अशी त्यांची मागणी होती. त्यांच्या भाषणातून असा सूर उमटला की, धर्मनिरपेक्षतेसाठी हिंदूंनी स्वतःचे दावे सोडून शांत राहिले पाहिजे.

निकाल देण्यापूर्वी प्रार्थना करणे चुकीचे !

प्रेस क्लबमध्ये आयोजित कार्यक्रमात एका व्यक्तीने भारतातील माजी सरन्यायाधिशांनी निर्णय घेतांना दैवी हस्तक्षेपाविषयी केलेल्या उल्लेखावर नरीमन यांचे मत विचारले. हे विधान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या त्या वक्तव्याशी संबंधित होते, ज्यात त्यांनी सांगितले होते की, वर्ष २०१९ मधील श्रीराममंदिर प्रकरणाच्या निर्णयाच्या वेळी मार्गदर्शनासाठी त्यांनी प्रार्थना केली होती. यावर नरीमन म्हणाले की, दैवी हस्तक्षेप असो वा गोवंश हस्तक्षेप किंवा इतर काही, न्यायाधिशाने प्रार्थनेवर आधारित निर्णय दिला, तर तेशपथेचे उल्लंघन ठरते. न्यायाधिशाने केवळ राज्यघटना आणि कायद्याची चौकट,  यांत राहूनच निर्णय घ्यायला हवेत.

धार्मिक राजवटीत बंधुत्व असूच शकत नाही !

‘सांस्कृतिक अधिकार आणि कर्तव्यांचे संरक्षण’ या विषयावर भाषण करतांना नरीमन म्हणाले की, राज्यघटनेच्या मूळ गाभ्यातील बंधुत्व साध्य करण्यासाठी धर्मनिरपेक्षता आवश्यक आहे. ४२ व्या दुरुस्तीपूर्वीच राज्यघटनेत धर्मनिरपेक्षतेची तत्त्वे होती. बंधुत्वाकडे वाटचाल करायची असेल, तर धर्मनिरपेक्षतेला पर्याय नाही. धार्मिक राजवटीत बंधुत्व असूच शकत नाही. (इस्लामी धार्मिक राजवटीत बंधुत्व नसते, हे जगाने पाहिले आहे आणि पहात आहे. याउलट हिंदूंच्या धार्मिक राजवटीत बंधुत्व असते; कारण हिंदू ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ (संपूर्ण पृथ्वी आपले कुटुंब आहे) या विचारांनीच आचरण करतात. त्यामुळे नरीमन यांचे म्हणणे हिंदूंविषयी असू शकत नाही ! – संपादक)

संपादकीय भूमिका

अशा निवृत्त न्यायमूर्तींनी पूर्वी दिलेले निर्णय कशा प्रकारचे असतील ?, याची कल्पना येते. त्या निकालांचा पुनर्विचार करण्याची कुणी मागणी केली, तर ती चुकीची ठरू नये !