भाव आणि परिपूर्णता यांचा सुरेख संगम असलेल्या अन् साधकांना आध्यात्मिक स्तरावर अविरत घडवणार्‍या मी अनुभवलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ !

‘मी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ध्वनीचित्रीकरणाशी संबंधित सेवा करतो. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या सहवासात सेवा करण्याची संधी मिळत आहे. त्यांच्याकडून ‘सेवा, तसेच व्यष्टी आणि समष्टी साधना कशी करावी ?’, यांसाठी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन मिळत आहे. त्यामुळे आम्हाला साधना आणि सेवा करण्यातील आनंद मिळत आहे. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्या सहवासात असतांना मला जाणवलेले त्यांच्यातील दैवी तत्त्व, त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या मार्गदर्शनातून शिकायला मिळालेली सूत्रे’ यांविषयी येथे लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. 

१. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांची तत्त्वनिष्ठता !

श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्यात तत्त्वनिष्ठता एवढी आहे की, त्या स्वतःच्या संदर्भातही तेवढ्याच तत्त्वनिष्ठ असतात. याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

१ अ. साधकांना त्या त्या वेळी चुका सांगण्याचे महत्त्व सांगतांना स्वतःकडून चूक झाल्यास तीही दाखवून देण्यास सांगणार्‍या तत्त्वनिष्ठ श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई ! : एकदा एक साधक पाहुण्यांना चित्रीकरण कक्ष (‘स्टुडिओ’) दाखवण्यासाठी त्यांना चित्रीकरण कक्षात घेऊन आला होता. तेव्हा त्या साधकाने ‘ऑनलाईन एडिटिंग’ जेथे चालते, तो कक्षही पाहुण्यांना दाखवला आणि तो तिथेच थांबून पाहुण्यांशी बोलत राहिला. त्यामुळे तेथे असलेल्या साधकांना त्यांची सेवा करता आली नाही. हे सूत्र मी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताईंना सांगितले. तेव्हा त्यांनी मला विचारले, ‘‘त्या साधकाला त्याची ही चूक सांगितलीस का ?’’ मी म्हटले, ‘‘नाही; कारण त्याला चूक सांगण्याआधी ती तुम्हाला सांगूया’, असे मी ठरवले.’’ तेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई म्हणाल्या, ‘‘त्या साधकाला लगेच चूक सांगायला हवी; कारण साधकांचा सेवेचा वेळ महत्त्वाचा आहे. त्या साधकाच्या ठिकाणी मी स्वतः जरी असेन आणि माझ्याकडून अशी चूक होत असेल, तरी तू ती चूक मलाही सांगितली पाहिजेस.’’ त्यांनी असे सांगितल्यावर मला त्यांच्यातील तत्त्वनिष्ठता जाणवली.

 

श्री. मेहुल राऊत

१ आ. भावनेच्या स्तरावर नाही, तर गुरुतत्त्वाचा विचार करायला प्रवृत्त करणार्‍या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई ! : एकदा ‘एका सेवेत साधनेचा दृष्टीकोन कसा ठेवायचा ?’, यासाठी मला श्रीसतशक्ति (सौ.) बिंदाताई यांचे मार्गदर्शन हवे होते. श्रीसतशक्ति (सौ.) बिंदाताई यांची व्यस्तता अधिक असल्याने याविषयी ‘काही दिवसांनी विचारूया’, असा मी भावनिक स्तरावर विचार केला आणि त्यांना काही विचारले नाही. त्यानंतर समयमर्यादा टळून गेली आणि मी ती सेवा पूर्ण करायची वेळ आली. तेव्हा मी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्याकडे मार्गदर्शनासाठी गेलो. तेव्हा त्यांनी मला विचारले, ‘‘आता एवढ्या तातडीने याविषयी जाणण्याची वेळ का आली ?’’ तेव्हा मी त्यांना ‘माझी भावनिक स्तरावर झालेली विचारप्रक्रिया सांगून ‘माझ्याकडून घाई करण्याची चूक झाली’, असे सांगितले. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘मी व्यस्त असते’, असा भावनिक विचार न करता सेवेसाठी जे आवश्यक आहे, ते त्या त्या वेळी विचारून घेणे ईश्वराला अपेक्षित आहे. तुम्हाला वेळेत दृष्टीकोन मिळावेत, सेवेतील अडचणी वेळेत सुटून सेवा पूर्ण व्हावी, यासाठीच माझा वेळ आहे आणि तीच माझी सेवा आहे. त्यामुळे माझी व्यस्तता पहाण्यापेक्षा ‘गुरूंना काय अपेक्षित आहे’, ते पहायला हवे होते ! यापुढे साधकांकडून गुरुतत्त्वाचा विचार झाला पाहिजे. भावनिक स्तरावर माझा विचार करायचा नाही. समष्टीला आपल्यामुळे कोणतीही अडचण येता कामा नये, तरच ‘देवाला अपेक्षित असे प्रयत्न आपण करत आहोत’, असे म्हणता येईल.’’

१ आ १. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी सांगितलेल्या व्यापक दृष्टीकोनातून साधकाला स्वतःच्या चुकीच्या विचारांची जाणीव होणे : मी सेवेत जरा जरी व्यस्त असलो आणि तेव्हा साधक काही अन्य सेवा घेऊन आले, तर मला ‘मी व्यस्त आहे. मला साधकांनी समजून घेतले पाहिजे’, असे वाटते. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी सांगितलेले वरील सूत्र ऐकल्यावर ‘त्या एवढ्या व्यस्त असतात. त्यांना सर्वत्रचे साधक साधनेच्या अनुषंगाने सूत्रे विचारत असतात, त्यामुळे त्यांचा व्याप मोठा आहे; पण तरीही त्या सांगतात की, ‘माझी व्यस्तता पहाण्यापेक्षा ‘गुरूंना काय अपेक्षित आहे’, ते पहा !’ यातून त्यांचा सेवेविषयीचा दृष्टीकोन किती व्यापक आहे’, ते मला शिकायला मिळाले. खरेतर वरील प्रसंगात माझ्या चुकीमुळे विलंब झाला होता; पण श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांना त्याचे वाईट वाटत होते. यातून त्यांच्यातील ‘इतरांचा विचार करणे आणि तत्त्वाला धरून सतत कार्यरत असणे’, हे गुण माझ्या लक्षात आले.


सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर यांच्याप्रमाणेच श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यातही दैवी पालट अनुभवता येणे

श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्या शरिराभोवतीची ‘आऊटलाईन’ एका विधीच्या चित्रीकरणात अस्पष्ट दिसत होती, त्यातील एक क्षण (वर्ष २०२३)

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या देहात झालेले पालट’ याविषयीच्या संशोधनाची सेवा चालू होती. तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितले होते, ‘‘जसा व्यक्तीचा आध्यात्मिक स्तर वाढतो, तशी तिच्या शरिराभोवतीची रेखा (‘आऊटलाईन’) स्पष्ट (‘शार्प’) न दिसता हळूहळू अस्पष्ट (‘ब्लर’) होत जाते.’’ गुरुदेवांच्या संदर्भात चित्रीकरण करतांना आम्ही हे पाहिले होते आणि अनुभवलेही होते. एकदा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई उपस्थित असलेल्या एका विधीचे चित्रीकरण करायचे होते. चित्रीकरण झाल्यावर आम्ही ते पहात होतो. एका ठिकाणी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई आणि त्यांच्या बाजूला पुरोहित, असे दृश्य होते. त्या दृश्यात पुरोहितांच्या शरिराभोवतीची ‘आऊटलाईन’ (रेखा) स्पष्ट दिसत होती; पण श्रीसतशक्ति (सौ.) बिंदाताई यांच्या शरिराभोवतीची ‘आऊटलाईन’ (रेखा) स्पष्ट दिसत नव्हती. त्यामुळे ‘छायाचित्रकाचा (व्हिडिओ कॅमेर्‍याचा) ‘फोकस’ व्यवस्थित आहे ना ? किंवा तांत्रिकदृष्ट्या काही चुकले नाही ना ?’, याची आम्ही निश्चिती केली; परंतु तसे काही झाले नव्हते. तरीही त्यांच्या शरिराभोवतीची ‘आऊटलाईन’ स्पष्ट दिसत नव्हती. त्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी सांगितलेला ‘व्यक्तीचा आध्यात्मिक स्तर वाढतो, तशी तिच्या शरिराभोवतीची ‘आऊटलाईन’ अस्पष्ट होत जाते’, हा भाग आठवला.
गुरुदेवांप्रमाणेच श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्यातही आध्यात्मिक स्तरावरील दैवी पालट होत असून ते आम्हाला अनुभवता आले.
– श्री. मेहूल राऊत, पाटणतळी, फोंडा, गोवा. (३.९.२०२५)
मूळ छायाचित्रे सुस्पष्ट पहाण्यासाठी वाचकांनी ‘सनातन प्रभात’च्या संकेतस्थळावरील  https://surl.li/edlszi  या मार्गिकेला भेट द्यावी.

२. ‘सेवेचा कक्ष व्यवस्थित कसा ठेवावा ?’ याविषयी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी सांगितलेली काही सूत्रे !

चित्रीकरण विभागाच्या अंतर्गत चित्रीकरण कक्ष (स्टुडिओ), साहित्य ठेवायची खोली, नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम), ‘ऑडिओ’ रूम (ध्वनीविषयक सेवेची खोली), आदी सेवांचे विविध कक्ष आहेत. एरव्ही चित्रीकरण झाल्यावर हे कक्ष आवरून ते व्यवस्थित ठेवण्याची सेवा नियमित चालू असते. एके दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई चित्रीकरण कक्षात आल्या होत्या. तेव्हा त्या आम्ही सेवा करतो, त्या कक्षात आल्या आणि त्यांनी तेथील काही त्रुटी लक्षात आणून दिल्या. नंतर त्यांनी खोल्या व्यवस्थित ठेवण्याविषयी मार्गदर्शन केले. त्यातील काही सूत्रे पुढीलप्रमाणे होती.

अ. खाली भूमीवर कोणतेच साहित्य नसावे. भूमी नेहमी मोकळी असावी. 

आ. खिडकीमधून नेहमी सूर्यप्रकाश येणे अपेक्षित आहे. 

इ. एकूण साहित्यामधील प्रत्येक वस्तूची रचना व्यवस्थित असावी.

ई. कक्षात आल्यावर दाब न जाणवता प्रसन्न वाटले पाहिजे.

‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांचा मिळत असलेला सत्संग, त्यांच्याकडून शिकायला मिळणारी सूत्रे, त्यांनी दिलेल्या साधनेच्या दृष्टीकोनांमुळे आमच्यात होत असलेले सकारात्मक पालट, तसेच त्यांच्याकडून मिळणारे चैतन्य’, यांविषयी मी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी आमच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी आम्हाला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्या रूपात एक आध्यात्मिक उत्तराधिकारी दिल्याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता !’

– श्री. मेहूल राऊत, पाटणतळी, फोंडा, गोवा. (३.९.२०२५)

सेवा भावपूर्ण, परिपूर्ण आणि ऐकण्याच्या स्थितीत राहून करण्याची शिकवण देणार्‍या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई !

श्री. मेहूल राऊत यांच्याकडून विषय समजून घेतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ (वर्ष २०२३)

१. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांना सेवेतील एक सूत्र लिहून दिल्यावर सूत्रांची मांडणी व्यवस्थित नसल्याची त्यांनी करून दिलेली जाणीव आणि ‘भावपूर्ण सेवा कशी करावी ?’ याविषयी केलेले मार्गदर्शन ! : एकदा ध्वनीचित्रीकरण सेवेतील काही साहित्याच्या संदर्भात निर्णय घ्यायचा होता. तो घेण्यापूर्वी ‘मी साधनेच्या दृष्टीने त्याकडे कसे पहायला हवे ?’, याविषयी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी मी त्यांना त्याविषयी लिहून दिले. ते लिखाण वाचून त्यांनी मला त्यातील काही उणिवा दाखवून दिल्या. सेवेच्या सूत्रांविषयीची मांडणी पूर्णतः अव्यवस्थित होती. त्यामुळे त्यांना ती सूत्रे समजून घेण्यास पुष्कळ वेळ द्यावा लागला आणि पुनःपुन्हा मला त्याविषयी विचारून घ्यावे लागले. त्या वेळी त्यांनी मला एक प्रश्न विचारला, ‘‘ही सूत्रे लिहून देतांना तुझ्या मनात काय होते ?’’ तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘याविषयी तुम्हाला लिहून देऊया आणि सेवा लवकर पूर्ण करूया, म्हणजे माझी एक सेवा पूर्ण होईल’, असा विचार माझ्या मनात होता.’’ यावर ताई म्हणाल्या, ‘‘सेवेत भाव असेल, सेवा देवाला अपेक्षित अशी करण्याचे विचार असतील, तसेच सेवा परिपूर्ण आणि ‘देवाच्या चरणी अर्पण व्हावी’, अशी धडपड असेल, तर त्यात उणिवा राहिल्या नसत्या; कारण तेव्हा देवाचे साहाय्य मिळाले असते. तू दिलेले लिखाण वाचल्यावर तुझ्या मनातील प्रक्रिया किंवा तुझ्या सेवेतील अव्यवस्थितपणा लक्षात येत होता. आता ज्या त्रुटी सांगितल्या आणि जे सूत्र सांगितले, त्यानुसार प्रयत्न कर अन् पुन्हा त्या सेवेविषयी मला लिहून दे.’’

त्या क्षणी मला वाईट वाटले की, ‘मी किती मोठी चूक केली. यामुळे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताईंचा वेळ वाया गेला.’ नंतर मी ‘देवाच्या चरणी सेवा अर्पण होऊ दे’, अशी प्रार्थना करत त्या सेवेविषयी पुन्हा लिहून दिले. त्यानंतर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंनी त्वरित मला ‘साधनेच्या दृष्टीने त्या सेवेकडे कसे पहायचे ?’, याविषयी मार्गदर्शन केले. त्यांच्याकडून मला पुष्कळ शिकता आले.

२. ‘कोणत्याही सेवेचा साधनेच्या अनुषंगाने परिपूर्ण अभ्यास कसा करायचा ? आणि देवाचे साहाय्य कसे घ्यायचे ?’, याविषयी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी सांगितलेली मौलिक सूत्रे ! : ‘सेवेचा अभ्यास कसा करावा ?’, याविषयीही एका प्रसंगात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी मार्गदर्शन केले. आम्ही एकत्र सेवा करणार्‍या साधकांनी लिखित स्वरूपात त्यांना एका सेवेचा अभ्यास दिला होता. तो वाचून त्यांनी एक प्रश्न विचारला. त्यांनी जो प्रश्न विचारला, नेमका त्याच सूत्राचा आमचा अभ्यास झाला नव्हता. त्यामुळे आम्हाला त्याचे उत्तर देता आले नाही. तेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी आम्हाला त्याचा अभ्यास करून येण्यास सांगितले.

या प्रसंगात मी त्यांना शिकण्याच्या दृष्टीने विचारले, ‘‘सेवेचा अभ्यास लिहून दिला. त्याविषयी सेवेतील अन्य साधकांकडून निश्चितीही करून घेतली होती; पण तुम्हाला जो प्रश्न पडला, तो आम्हाला पडला नाही आणि त्यामुळे त्याचे उत्तर आमच्याकडे नव्हते. आमचा अभ्यास न्यून पडला. अभ्यासाविषयी नेमकी कशी विचारप्रक्रिया असायला हवी ?’’ यावर त्यांनी सांगितले, ‘‘कुठल्याही सेवेचा अभ्यास करतांना सर्व बाजूंनी विचार करणे आणि सर्व सूत्रांची निश्चिती करणे आवश्यक असते. त्या विषयाच्या संदर्भात तज्ञ व्यक्तीचे मत घ्यावे आणि ‘काही रहात नाही ना ?’, याची निश्चितीही करावी. या समवेतच ‘देवाला प्रार्थना करणे, शरण जाणे आणि ‘काही त्रुटी राहू नयेत’, यासाठी सतत देवाच्या अनुसंधानात रहाणे’, हे सर्व टप्पे करणे आवश्यक आहे. हे सर्व देवाला अपेक्षित असे झाल्यास देवाने करून घेतलेल्या अभ्यासामुळे आपल्या मनाला समाधान मिळते. नंतर तो अभ्यास देवासमोर मांडावा. पुढे देव त्याविषयी जो निर्णय घेईल, तो ‘ईश्वरेच्छा’ म्हणून स्वीकारावा.’’

हे सर्व ऐकल्यावर माझी बुद्धीने सेवा करण्याची जी स्थिती होती, ती न्यून झाली आणि ‘साधनेच्या अनुषंगाने अभ्यास कसा करायचा असतो ?’, हे मला शिकायला मिळाले. त्यामुळे अभ्यासातील समाधान मिळू लागले आणि जो निर्णय होईल, तो स्वीकारता येऊ लागला. आता मनात कोणतीही अपेक्षा रहात नाही. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताईंनी सांगितलेल्या सूत्रांप्रमाणे मी अभ्यास करू लागलो. त्यांनी सांगितलेली सूत्रे आता मनात रुजल्यावर संपूर्ण प्रक्रियाच आनंददायी झाली आहे. हे केवळ श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्यामुळेच शक्य झाले.

३. ‘कुणीही सुचवलेला विचार, हा ‘परिपूर्ण सेवेसाठी देवानेच दिलेला विचार आहे’, असा भाव ठेवण्यास श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंनी सांगणे : एका साधकाने श्रीसतशक्ति (सौ.) बिंदाताई यांच्याकडे एका सेवेविषयीचे त्याचे विचार मांडले. तेव्हा ताईंनी मला त्या साधकाचा विचार सांगितला. त्या म्हणाल्या, ‘‘तुमचा अभ्यास झाला असेल; पण ‘त्या साधकाच्या माध्यमातून देव आपल्याला काहीतरी सांगत आहे’, या भावाने त्या सूत्राचा अभ्यास करा.’’ तेव्हा मी त्यांना म्हटले, ‘‘सेवेच्या सध्याच्या टप्प्याला मला हे स्वीकारता आले नसते; पण तुम्ही सेवा आणखी चांगली होण्यासाठी पूर्ण प्रयत्नरत असता आणि सर्व सहज स्थितीमध्ये स्वीकारता. यामध्ये तुमची नेमकी विचारप्रक्रिया कशी असते ?’’ त्यावर त्या म्हणाल्या, ‘‘एका टप्प्याला आपल्याला ठाऊक असते की, सगळा अभ्यास झाला आहे; परंतु तरी कुणाकडून काही नवीन सूत्र आले, तर अशा वेळी लक्षात घ्यायचे की, ‘अजूनही देव आपल्याला काही सांगत आहे.’ समोरच्या साधकाने जे व्यक्त केले किंवा सुचवले, त्याची नोंद घेणे आवश्यक असते; कारण काही वेळेला काही सूत्रे आपल्याकडून सुटू शकतात आणि देव त्यासाठी असे कुणाच्याही माध्यमातून आपल्याला साहाय्य करत असतो. त्या साधकाचाही त्या सेवेप्रती भाव असतो. त्यामुळे त्याची विचारप्रक्रिया, दृष्टीकोन आदी आपण समजून घेतले पाहिजेत. यामुळे आपले काही अपूर्ण रहात असेल, तर ते परिपूर्ण होण्यास साहाय्य मिळते. त्यामुळे कुणीही सुचवलेला विचार किंवा सूचना ही आपल्या सेवेला परिपूर्ण करण्याची, तसेच आपल्या सेवेत काही राहिले नाही, याचे समाधान मिळण्याची प्रक्रिया पूर्ण करते. त्यामुळे त्या वेळी त्या सूत्रांचा अभ्यास करणे, ही आपली साधना आहे.’’ हा दृष्टीकोन मिळाल्यावर माझी विचारप्रक्रिया पालटली आणि साधकांच्या सूचना किंवा सूत्र स्वीकारण्याचा भाग वाढला.

– श्री. मेहूल राऊत, पाटणतळी, फोंडा, गोवा. (३.९.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक