संस्कृतस्य माहात्म्य ।

देववाणी संस्कृतचे अद्वितीयत्व !

१. संस्कृत भाषेचे वैभव !

भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाणभारती ।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम् ।।

अर्थ : सर्व भाषांमध्ये देववाणी संस्कृत ही प्रमुख भाषा असून ती मधुर आणि दिव्य आहे. तिच्यातील काव्य मधुर आहे आणि त्यातही सुभाषित अधिक मधुर आहे.

खरोखर संस्कृत भाषेचे वैभव काय वर्णावे ! सर्व भाषांमध्ये प्रमुख, प्राचीन आणि अत्यंत सुमधुर अशी ही संस्कृत भाषा ! देवांची (गीर्वाणभारती) म्हणून ती अत्यंत दिव्य आहे. तिच्यातील काव्य मनाला आनंद देणारे आहेच; पण त्याहीपेक्षा या भाषेतील सुभाषिते अधिक सुंदर आहेत.

२. सुभाषिते बालपणीच पाठ करावीत !

संस्कृतातील सुभाषितांचा अमोल ठेवा बालवयातच पाठ करावा. संस्कार करणारी भाषा ती संस्कृत ! बालपणी स्मरणशक्ती अधिक तीव्र असते. समजूतदारपणा अल्प असतो; पण बालवयात सुभाषितातून झालेले संस्कार मोठ्या वयात समजूतदारपणा आल्यावर आयुष्यभर पुरतात.

३. सुभाषितांतून मिळणारे गुणरूपी अलंकार !

संस्कृत सुभाषितांतून जीवनाला आवश्यक असलेली मूल्ये व्यक्त झालेली आहेत. वेद, उपनिषदे, रामायण आणि महाभारत यांतील सुवचने मार्गदर्शक आहेत. आता हेच पहा !

हस्तस्य भूषणं दानं सत्यं कण्ठस्य भूषणम् ।
श्रोत्रस्य भूषणं शास्त्रं भूषणैः किं प्रयोजनम् ।।

अर्थ : दान करणे हे हातांचे भूषण, सत्य बोलणे हे कंठाचे भूषण आणि चांगले ऐकणे हे कानांचे भूषण असतांना बाकी अलंकारांचे काय काम ? जीवन जगण्यासाठी दान, सत्य, शास्त्र ऐकणे हेच अलंकार महत्त्वाचे ! याखेरीज इतर अलंकारांचा काय उपयोग !

सुभाषितांचे लयबद्ध पाठ शिकवल्याने उच्चाराची शुद्धता आपोआप होते. संस्कृत श्लोक पाठांतराने तोतरी मुलेही शुद्ध बोलू शकतात. अत्यंत शास्त्रशुद्ध वर्णमाला असलेल्या संस्कृत भाषेचे शब्दभांडार विपुल आहे.

४. ‘भारतस्य प्रतिष्ठे’

भारताची प्रतिष्ठा २ गोष्टींत आहे.

अ. संस्कृती
आ. संस्कृत भाषा

५. अखिल विश्वाची भाषा : संस्कृत !

‘संस्कृत भाषा ही भारताचीच नव्हे, तर अखिल विश्वाची भाषा आहे’, असे म्हटले, तर वावगे होणार नाही. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, दर्शनशास्त्रे, स्तोत्रे, कथा, नाटके, विविध प्रकारचे वाङ्मय संस्कृतमध्ये आहे. इतकेच काय गणित, विज्ञान, खगोलशास्त्र, आयुर्वेद इत्यादी संस्कृत ग्रंथांचे पाश्चात्त्य लोकांनी भाषांतर केले आहे. मूळ भारतात असलेल्या संस्कृत भाषेतील ज्ञानाचा खजिना परदेशी लुटत आहेत. आम्ही भारतीय मात्र या उत्तम ग्रंथांचा आस्वाद न घेता पाश्चात्त्य भाषेतील ग्रंथांतून ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत.

६. संस्कृत सर्वांची भाषा आहे !

संस्कृत भाषेकडे आम्ही एक अवघड क्लिष्ट भाषा म्हणून पहातो; पण ज्ञानलालसा असेल, तर कोणतीही भाषा अवघड नसते. ‘ही विशिष्ट वर्गाची भाषा आहे’, हा संस्कृतच्या संदर्भातील गैरसमज आहे. आदिकवी वाल्मीकि, कवी कालिदास, महाभारतकार महर्षि व्यास, श्रीहर्ष राजा भोज हे सारे समाजातील विविध वर्गांमधून जन्माला आले होते.

तात्पर्य, ही सर्वांची भाषा आहे. व्यवहारात या भाषेचा उपयोग करण्यासाठी शासनकर्त्यांनी आम्हाला संधी दिली नाही. मुसलमान शासनकर्त्यांनी आम्हा भारतियांवर उर्दू-फारशी भाषा लादली, तर इंग्रजांनी इंग्रजीचे वर्चस्व प्रस्थापित केले, ते आजपर्यंत आहेच !

७. संस्कृत आणि ध्वनी

वेद हे अपौरुषेय आहेत. वेदोक्त मंत्रांचे सामर्थ्य आता पाश्चात्त्यांनाही पटले आहे. संस्कृत भाषेतील उच्चारांमुळे शरिरातून ध्वनीची उत्पत्ती होते. ब्रह्मांडात ध्वनी व्यापलेला आहे, तो ध्वनी म्हणजे नादब्रह्म होय. ब्रह्मांडाची उत्पत्ती या नादध्वनीमधून झालेली आहे. शरिरातील अणि ब्रह्मांडातील ध्वनी यांचा मेळ संस्कृत श्लोकांच्या उच्चारणामुळे होतो, तेव्हा शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा समतोल सांभाळला जातो. संस्कृतचे ध्वनी सृष्टी आणि व्यक्तीमत्त्व यांचा मेळ घालून देतात. ॐकाराच्या नादामुळे कित्येक रोग ठीक होतात. मंत्रातील ध्वनीची स्पंदने सर्वत्र पसरतात. त्यामुळे पर्यावरणाचाही समतोल साधला जातो. प्रदूषण नाहीसे होते; म्हणूनच पाश्चात्त्य लोक निसर्गोपचाराकडे वळलेले दिसतात. मन:शांतीसाठी भारतियांना संस्कृतमधील मंत्र हा उत्तम उपाय आहे.

८. संगणकासाठी संस्कृत उपयोगी भाषा !

२१ व्या शतकामधून जात असतांना ‘संगणकासाठी संस्कृत अत्यंत उपयोगी भाषा आहे’, हे सिद्ध झाले आहे. द्विवचनाचा उपयोग केवळ संस्कृतात केला जातो, तसेच एका शब्दाचे अनेक अर्थ, उदाहरणार्थ द्विज = ब्राह्मण, द्विज = पक्षी इत्यादी. गुजराती, हिंदी, मराठी आणि बंगाली अशा अनेक भाषांची जननी ‘संस्कृत’ आहे. त्यामुळे संस्कृत ही मृत भाषा न समजता काळाप्रमाणे तिचा व्यवहारात उपयोग करावा. ‘हरि ॐ’ किंवा ‘नमो नम: ।’, ‘सुप्रभातम्’ इत्यादी नित्याच्या व्यवहारात हिचा उपयोग केला, तर संस्कृत भाषेला निश्चितच मानाचे स्थान लाभेल.

शेवटी म्हणावेसे वाटते, ‘आ नो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतः ।’ (ऋग्वेद, मण्डल १, सूक्त ८९, ऋचा १), म्हणजे ‘आमच्याकडे सर्व बाजूंनी कल्याणकारी विचार येवोत. (आम्हाला) कल्याणकारक असे विचार सर्व बाजूंनी आमच्याकडे येवोत, आमची भरभराट आणि रक्षण करणारे देव आमच्या सन्निध सदैव राहोत.’

लेखिका : प्रा. (सौ.) श्यामला कुलकर्णी, वसई

(साभार : मासिक ‘धर्मभास्कर’, मार्च २०१५)