जुन्या इमारतींचा प्रश्न !

स्वराज्याची चौथी राजधानी म्हणून सातारा शहराला इतिहासामध्ये विशेष महत्त्व प्राप्त आहे. आजही शहरामध्ये जुने वाडे, इमारती अस्तित्वात आहेत. त्यांतील काही इमारती राजपथावर असून त्या अत्यंत जुन्या झाल्या आहेत. नुकताच सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.

श्री गणेशमूर्तींच्या आगमनापूर्वी सातारा नगरपालिकेने जुन्या झालेल्या धोकादायक इमारती रिकाम्या करण्यासाठी इमारतीच्या मालकांना नोटीस पाठवली होती; मात्र प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही या इमारतीच्या मालकांनी नगरपालिकेच्या नोटिसीला केराची टोपली दाखवली. २ वर्षांपूर्वी श्री गणेशमूर्ती मिरवणुकीतील ‘डिजे’च्या दणदणाटामुळे राजपथावरील एक इमारत कोसळून एका व्यक्तीला प्राण गमवावे लागले होते. आता मिरवणुकीच्या मार्गावरील ६ इमारतींना नगरपालिकेने धोकादायक ठरवून संबंधित मालकांना नोटीस पाठवली आहे. याचा अर्थ काम पूर्ण झाले, असे म्हणता येणार नाही. सातारा शहरातील १६ हून अधिक ज्येष्ठ नागरिक संघटनांनी एकत्र येत ‘डिजे’वर बंदी घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले होते; मात्र त्याचा फारसा परिणाम झाला नाही. मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश पायदळी तुडवत आणि जिल्हा पोलीस प्रशासनाची बंधने झुगारून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून डिजे अन् ‘लेझर बीम लाईट’ यांचा उपयोग मिरवणुकांमधून केला गेला. पोलिसांनीही नाममात्र कारवाई करत काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे नोंद केले; मात्र मंडळांना कायद्याचा धाक नाही, हे वास्तव नाकारता येणार नाही. इमारतींच्या संदर्भातही ‘कुणाचा तरी जीव गेल्यानंतर सातारा नगरपालिका इमारतीच्या मालकांवर कारवाई करणार का ?’, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. ‘डॉल्बी’विषयी पालकमंत्री कडक भूमिका घेतील’, असे अनुमान ज्येष्ठ नागरिक संघटनांनी वर्तवले होते; मात्र उच्च न्यायालयाच्या निर्देशांचा निर्वाळा देत पालकमंत्र्यांनी या प्रकरणात हात झटकले. शहरातील काही जागृत पत्रकारांनी सामाजिक भान राखत डॉल्बीच्या विरोधात आवाज उठवला; मात्र त्यांनाही अतीउत्साही कार्यकर्त्यांकडून धमक्यांचे दूरभाष आणि संदेश येण्यास प्रारंभ झाला.

प्रतिवर्षी गणेशोत्सव आला की, धोकादायक आणि जुन्या इमारतींचा प्रश्न पुढे येतो; मात्र यावर ठोस उपाययोजना होतांना दिसत नाही. यामध्ये नगरपालिकेतील अधिकारी आणि धोकादायक असलेल्या इमारतींचे मालक यांच्यामध्ये काही ‘अर्थ’पूर्ण संबंध आहेत का ? अशी शंका नागरिकांना येत आहे. प्रतिवर्षी केवळ कागदी घोडे नाचवणार्‍या नगरपालिकेला सूज्ञ नागरिकांनी या संदर्भात खडसावणे आवश्यक आहे. अन्यथा प्रशासन नावाचा पांढरा हत्ती जनतेच्या पैशावर पोसायचा कशाला ?

– श्री. राहुल देवीदास कोल्हापुरे, सातारा