आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (१०.९.२०२५)

मुंबई महामार्गांवर भीषण अपघात !

ठाणे – मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग आणि मुंबई-नाशिक महामार्ग या २ मार्गांवर झालेल्या अपघातांत ९ सप्टेंबरला तिघांचा मृत्यू झाला. समृद्धी महामार्गावर मुंबईच्या दिशेने उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून येणार्‍या ट्रकने जोरात धडक दिली, यात ट्रकचालक आणि त्याचा सहकारी यांचा मृत्यू झाला. तर दुसर्‍या अपघातात डिझेल भरल्यावर रस्त्यावर उभ्या असणार्‍या वाहनाला पाठीमागून येणार्‍या ट्रकने धडक दिली.


काटई निळजे उड्डाणपुलावर खड्डे  !

ठाणे – कल्याण शिळफाटा रस्त्यावरील काटई निळजे येथील उड्डाण पुलाचे काम अंतीम टप्प्यात असतांना उद्घाटन करून तो खुला करण्यात आला होता. २ महिन्यांतच या पुलावर मोठे खड्डे पडले आहेत. ‘खड्ड्यांमुळे कोणतीही हानी होण्यापूर्वीच हे खड्डे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने बुजवावेत, अन्यथा या पुलावर आंदोलन करू’, अशी चेतावणी ठाकरे गटाकडून देण्यात आली आहे.


घर मालकीच्या वादात वृद्धाचा मृत्यू !

४ जणांना अटक

मुंबई – कांदिवली येथे रहाणार्‍या यादव आणि जोगेश्वरी येथे रहाणार्‍या चौहान कुटुंबियांमध्ये कांदिवली येथील घराच्या मालकीवरून वाद होता. या वादातून दोन गटांत प्रचंड हाणामारी झाली. यात घायाळ झालेल्या ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी ४ जणांना अटक केली.


कंटेनर यार्डमध्ये चोरी !

पनवेल – पनवेल-जे.एन्.पी.टी. महामार्गावर असणार्‍या २ कंटेनर यार्डमध्ये  चोरीच्या घटना घडल्या आहेत. तब्बल साडेआठ लाख रुपयांचा माल चोरट्यांनी पळवला. रात्रीच्या वेळी तोंडाला कापड बांधून चोरटे कंटेनर यार्डमध्ये शिरून चोर्‍या करत असल्याचे पोलिसांनी केलेल्या अन्वेषणात समोर आले आहे.(कायद्याचा धाक संपल्याचे लक्षण ! – संपादक)


लाचलुचपत प्रकरणात २ महिलांना अटक !

रायगड – शासकीय शुल्क भरल्यानंतरही ठेकेदार श्रेयस म्हात्रे यांच्याकडे साहायक संशोधक अधिकारी दक्षता आणि गुणनियंत्रण जिल्हा प्रयोगशाळा कार्यालयात अहवाल प्राप्तीसाठी १५ सहस्र रुपयांची लाच मागण्यात आली होती. सोनल नाडकर आणि संजना धाडवे यांना लाचेची रक्कम घेतांना अटक करण्यात आली. (पोलिसांनी अशा लाचखोरांची सर्व संपत्तीच जप्त करायला हवी ! – संपादक)