संपादकीय : अशोकस्तंभामुळे धर्मांध चवताळले !

हजरतबल दर्ग्यात जमलेल्या मुसलमानांनी दगडांनी अशोकस्तंभाच्या आकृतीवर प्रहार करत त्याची मोडतोड केली

श्रीनगर येथील हजरतबल दर्ग्याचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले. या नूतनीकरणाच्या उद्घाटनाच्या दृष्टीने येथे एक शीलापट कोरण्यात आला आहे. या शीलापटावर अशोकस्तंभ असल्यामुळे येथे वाद निर्माण झाला आणि तेव्हा दर्ग्यात जमलेल्या मुसलमानांनी दगडांनी या अशोकस्तंभाच्या आकृतीवर प्रहार करत त्याची मोडतोड केली. या वेळी त्यांनी ‘नारा-ए-तकबीर अल्ला हू अकबर’ (अल्ला महान आहे) अशा घोषणा दिल्या. प्रथम मुसलमान पुरुषांच्या जमावाने दगडाने प्रहार केले आणि नंतर मुसलमान स्त्रियांच्या जमावाने अशोकस्तंभाची मोडतोड केली. ‘मशिदीमध्ये कोणताही पुतळा नको’, अशी मुसलमानांमध्ये धार्मिक मान्यता असल्यामुळे अशोकस्तंभ प्रदर्शित झाल्याने मुसलमानांचा जमाव प्रक्षुब्ध झाला’, असे सांगण्यात येते. ‘जम्मू आणि काश्मीर वक्फ बोर्डा’च्या अध्यक्षा डॉ. दरक्षण अंद्राबी यांच्या हस्ते २ दिवसांपूर्वीच दर्ग्याच्या नूतनीकरणाचे उद्घाटन करण्यात आले होते.

आता या घटनेचा विचार करता अशोकस्तंभ हा भारताच्या मानचिन्हांचा भाग असल्याने तो सर्वसाधारण प्रत्येक सरकारी शीलापटावर, कार्यक्रमाच्या फलकांवर आणि विज्ञापनांत असतो. त्यामुळे त्यात काही वावगे नाही. या दर्ग्याचे नूतनीकरण केल्यावर आणि त्याचे उद्घाटन झाल्यावर संबंधित मान्यवरांची नावे त्या शीलापटावर नमूद केलेली आहेत. त्यामुळे त्यावर आक्षेप घेण्यासारखे काही कारण नाही. तोडफोडीचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यावर संबंधितांवर टीका होण्यासह गुन्हे नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे. तरी यामुळे एक प्रश्न मनात निर्माण होतो. या दर्ग्याचे नूतनीकरण सरकारी खर्चाने झालेले म्हणजेच भारतातील नागरिक करदाते हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती यांच्या पैशाने झालेले आहे, ते त्यांना चालणार आहे, या पैशांद्वारे मशिदी, मदरसे उभारणे चालणार आहे; मुसलमानांना सवलती, सुविधा देणे चालणार आहे; मात्र त्याच्याशी संबंधित केवळ एक चिन्ह चालत नाही, त्यासाठी शिलापट विद्रूप करण्याची मजल कशी जाते ? तसेच मुसलमान पुरुषांनी पूर्ण तोडफोड केली असतांना पुन्हा मुसलमान स्त्रियांचा जमाव कसा जमतो ? आणि तोही पुन्हा तोडफोड करण्याची कृती का करतो ? यातून कोणता संदेश द्यायचा आहे ? यामागे राजकारण आहेच आणि त्यातून भारतविरोधही प्रकट करायचा आहे. भलेही याला धार्मिक रंग दिला जात असला, तरी यातून भारतविरोधच स्पष्टपणे लक्षात येतो. ३७० कलम हटवून सर्वसाधारण निवडणुका घेऊन लोकनियुक्त सरकार आले, तेथे अनेक पायाभूत सुविधा केल्या, तरीही काश्मीरमधील मुसलमानांची मानसिकता भारतविरोधीच आहे. पाकने केलेल्या कोणत्याही साहाय्याच्या वेळी असा विरोध प्रदर्शित झालेला कुणी पाहिला आहे का ? ही भारतविरोधी मानसिकता असून आतंकवाद्यांना साहाय्य करणारे अनेक ‘स्लीपर सेल’ तेथे कार्यरत आहेत, हे लक्षात येते. काही दिवसांपूर्वीच पाकला धडा शिकवण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ पार पडले. त्यापूर्वी पहलगाम येथील आतंकवाद्यांनी भारतीय पर्यटकांची हत्या केल्यानंतर सैन्य आणि पोलीस यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शोधमोहीम घेण्यात आली होती. त्यामध्ये ३ सहस्रांहून अधिक संशयित वाटणार्‍या घरांची पडताळणी केली होती आणि आतंकवाद्यांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली होती. अनेक संशयितांना कह्यात घेण्यात आले. हा रोष नागरिकांमध्ये असण्याची शक्यता आहे, त्याचप्रमाणे स्थानिक राजकारणही यामध्ये आहे. दोन्ही सत्ताधारी आणि विरोधक या वेळी मात्र एकच सूर आळवत आहेत अन् तो म्हणजे ‘या चिन्हाची येथे आवश्यकता होती का ? त्यामुळे धार्मिक भावना दुखावू शकतात.’ याविषयी राज्यपाल मनोज सिन्हा यांनी ‘हे चिन्ह भारताच्या एकतेचे आणि सार्वभौमतेचे प्रतीक आहे, त्याच्या मोडतोडीमुळे राष्ट्रीय भावना दुखावल्या गेल्या आहेत’, असे सांगितले. स्वत: सत्ताधारी ओमर अब्दुल्ला यांनी या तोडफोडीचे समर्थन केले आहे. म्हणजे तेथे विरोधक, सत्ताधारी आणि स्थानिक जनता या सर्वांचीच भारतविरोधी मानसिकता स्पष्ट होते.

हजरतबल दर्गा आणि वाद !

हजरतबल दर्गा हा नेहमी वादाचा केंद्रबिंदू राहिला आहे. १६ व्या शतकात दाराशुकोह यांनी भूमी घेऊन या ठिकाणी या दर्ग्याची निर्मिती केली होती. या दर्ग्याचे वैशिष्ट्य म्हणजे ‘हजरत’ म्हणजेच महंमद पैगंबर यांच्या दाढीचा एक केस येथे जतन करण्यात आला आहे. जगात हा केस या ऐतिहासिक दर्ग्यात आहे. हा केस वर्ष १९६३ मध्ये येथून गायब झाला होता. त्यामुळे मुसलमानांनी देशभर दंगलसदृश परिस्थिती निर्माण केली होती. नंतर हा केस पुन्हा येथे आढळला. अशा प्रकारे ३-४ वेळा वादाची परिस्थिती निर्माण झाली होती. पैगंबर यांचा केस येथे ठेवला असल्याने जगभरातून मुसलमान येथे येतात. हा केस केवळ पैगंबर यांच्या जन्माच्या दिवशीच सर्वांना पहाण्यासाठी ठेवतात. प्रसिद्ध दाल सरोवराच्या शेजारीच हा दर्गा आहे. ही माहिती येथे देण्याचे कारण म्हणजे या दर्ग्याची ऐतिहासिक आणि अन्य माहिती कळावी अन् त्या दृष्टीने येथील परिस्थितीही लक्षात यावी. म्हणजेच या दर्ग्याशी मुसलमानांच्या धार्मिक आणि आता राजकीय पक्षांचा रोख पहाता राजकीयही भावना जोडलेल्या आहेत.

या काश्मीर खोर्‍यातच हिंदूंची प्रसिद्ध मंदिरे आणि धार्मिक ठिकाणे आहेत. वर्ष १९९० च्या दशकात धर्मांध मुसलमानांनी अनेक मंदिरे, श्रद्धास्थाने यांची तोडफोड केली आणि ती जाळली. शंकराचार्याचे मंदिर असो कि देवीचे मंदिर असो तेथील मूर्तींची तोडफोड केली. त्या मंदिरांविषयी धार्मिक भावना दुखावल्या म्हणून हिंदूंनी प्रतिकार केला असता, तर काय परिस्थिती झाली असती. त्यांपैकी कित्येक मंदिरे अजूनही भग्नावस्थेत आहेत, ती सरकार कधी बांधून देणार आहे ? अमरनाथ यात्रेत मुसलमान आतंकवादी अडथळे निर्माण करतात, विघ्ने आणतात, हिंदूंना यात्रा करण्यापासून परावृत्त करतात, त्यांचा विरोध स्थानिक मुसलमान केव्हा करतात का ? धार्मिक भावनांचा विचार केला, तर हिंदूंसाठी मंदिर उभारण्याची चर्चा जरी केली, तरी स्थानिक मुसलमानांचा त्याला विरोध असतो. ‘असे मंदिर झाल्यास ते आम्ही तोडून टाकू’, अशी सार्वजनिक धमकी दिली जाते. ‘काश्मीरमध्ये हिंदु मंदिर आम्हाला आवडत नाही’, असे सांगितले जाते. अनेक हिंदु घरे, मालमत्ता या आता धर्मांधांच्या कह्यात आहेत. हिंदूंवर अत्याचार करून आणि छळाबळाने त्या मिळवलेल्या आहेत अन् वर पुन्हा हिंदूंनाच दम दिला जातो. ही हिंदुविरोधी आणि राष्ट्रविरोधी मानसिकता ठेचण्यासाठी केंद्र सरकार काय प्रयत्न करणार आहे ? ‘लाथोंके भूत बातोंसे नही मानते’, अशी हिंदीत म्हण आहे, ज्यांना जी भाषा कळते, त्या भाषेत जर समजावले नाही, तर परिस्थिती डोईजड होते, हे सरकारने जाणून त्या प्रमाणात धर्मांधांवर कारवाई करणे अपेक्षित आहे.

हजरतबल दर्ग्यात झालेल्या अशोकचिन्हाच्या विटंबनेच्या प्रकरणी सरकारने कठोर कारवाई करून राष्ट्रभावना जपाव्यात !