त्वचा, केस आणि डोळे यांची काळजी कशी घ्याल ?

आपले नाक, डोळे, शरिराची ठेवण कशी असेल, हे आपल्या हातात नसते, ते देवदत्त असते. त्यामागे जनुकीय जडणघडण आणि जन्मजात प्रकृती असते. नंतर मात्र आपण ते कसे ठेवतो, हे आपल्या हातात असते. तुमचे स्वास्थ्य हे तुमचे स्वच्छ डोळे, आरोग्यपूर्ण केस, नितळ त्वचा, मजबूत दात यांतून प्रतीत होत असते. पडलेले उदास तोंड, वाटेल ते खाल्ल्याने, व्यायाम नसल्याने उडालेली झोप आणि त्यातून त्वचेवर दिसणारे दुष्परिणाम हे हितकारक नक्कीच नाहीत. वजन पटकन वाढण्याकडे काहींचा कल असतो, काहींची त्वचा पटकन खराब होते. हे सगळे सांगण्यामागे ‘बॉडी शेमिंग’ (शरिराच्या ठेवणीवरून चेष्टा करणे) किंवा तत्सम काहीच उद्देश नसून आरोग्याचे प्रतिबिंब असणारे आपले शरीर आपल्याला शेवटपर्यंत झेलता यावे, यासाठीच्या उपायांचे विविध पैलू सांगायचा प्रयत्न आहे. यातील बर्‍याचशा गोष्टी या नंतर हाताळण्यापेक्षा आधीच टाळलेल्या चांगल्या !

‘दिसण्यात काय आहे ?’, हे वाक्य लिहायला अतिशय सुंदर असले, तरी जर आरोग्य नीट असेल, तर ऊर्जा नीट रहाते. ती ऊर्जा कामाच्या वा व्यवसायाच्या ठिकाणी तुमच्या दिसण्यातून प्रकट होते. त्यावरून तुमचा उत्साह, तुमची ऊर्जा आणि बुद्धी चांगली असेल, याविषयी समोरच्यालाही खात्री होत असते.


१. खाण्यात आंबट, खारट, तिखट आणि शिळे पदार्थ न्यूनतम असावेत. यात लोणची, हिरवी मिरची, ठेचा, शेंगदाणा चटणी, मसालेदार आणि तेलकट भाज्या, टोमॅटो, चिंच हे पदार्थ येतात.

२. तीक्ष्ण आणि उष्ण गोष्टी टाळाव्यात. यामध्ये पुष्कळ गरम पाण्याने अंघोळ करणे किंवा गरम पाण्याने पुष्कळ वेळ अंघोळ करणे टाळावे. प्रतिदिन उन्हातून जावे लागत असल्यास गॉगल, स्कार्फ (डोके झाकण्यासाठी कापड) हमखास घालावे. आसपासचे, घरातील वातावरण चांगले ठेवायचा प्रयत्न करावा. चिडक्या व्यक्तींपासून स्वतःला लांब ठेवावे.

३. डोक्याला शांतता आवश्यक. नामस्मरण, ध्यान या गोष्टींनी नक्कीच मनस्तापदायक छोट्या छोट्या घटनांकडे दुर्लक्ष करायला साहाय्य होते.

४. ‘पाणी कमी प्या, हवे तितकेच प्या’, असे सांगतांना तहान लागल्याकडे कामाच्या नादात आणि वातानुकूलित यंत्रामुळे (‘एसी’मुळे) दुर्लक्ष तर होत नाही ना, याकडेही लक्ष द्यायला हवे. वातानुकूलित यंत्रामुळे हवेतील आर्द्रता शोषून घेतली जाते. शरिरातील पाणी यामुळे हळूहळू न्यून होते, जे थंडीमुळे आपल्याला जाणवत नाही. बाहेरील थंड वातावरणाने पाणी पिण्याची आवश्यकताही न्यून होते. अशाने पाणीच न्यून प्यायले जाते. बर्‍याचदा व्यावसायिक आस्थापनांमध्ये असलेल्या चहा-कॉफी बनवण्याच्या यंत्रामुळे ही पेय अधिक प्रमाणात प्यायली जातात. या सर्वांमुळे शरिरात कोरडेपणा वाढीस लागतो आणि त्याचे प्रतिबिंब केस अन् त्वचा यांवर सगळ्यात आधी दिसते. यासाठी ‘ह्युमिडीफायर’ (आर्द्रता वाढवणारे उपकरण) लावणे, अत्यावश्यकता नसल्यास ‘एसी’ बंद ठेवणे, प्रतिदिन अभ्यंग असे काही उपाय आहेत.

वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये

५. केस, त्वचा आणि डोळे यांसाठी शरिरात योग्य तेवढा स्नेह असणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी खाल्ला गेलेला आहारातील स्नेह भाग योग्य ठिकाणी पोचणे महत्त्वाचे आहे, अन्यथा त्याचे केवळ चरबीमध्ये रूपांतर होते. या सगळ्यासाठी व्यायाम अत्यावश्यक आहे.

६. शरिराला ‘लोशन’ (त्वचेसाठी वापरले जाणारे औषधी मिश्रण) न लावता छोट्या बाटलीत खोबरेल ठेवून ते प्रतिदिन हाताला आणि पायाला लावले, तर थंडीतही त्वचा स्निग्ध रहाते, हा स्वानुभव आहे.

७. मनुका, लाह्या, मखाणे, डाळिंब, फळे, दूध, तूप, लोणी, ताजे रुचकर आणि वेळच्या वेळी जेवण हा नेहमीचाच ठाऊक असलेला; पण न केला जाणारा उपाय खरेच आवश्यक.

८. वार्षिक चाचण्या करून वजनवाढ, त्वचा, केस अनारोग्य यामागचे दुसरे काही कारण नाही ना, याची खातरजमा करावी. हिमोग्लोबीन न्यून असल्याने केस गळणे, थायरॉईड, मासिक पाळीच्या समस्येमुळे वजनवाढ आणि मधुमेहामुळे दातात किटण जमा होऊन दात खराब होणे, अशी लक्षणे साधारण दिसतात.

९. सगळ्यात शेवटचे आणि महत्त्वाचे म्हणजे या सगळ्यासाठी रसायन अन् विशिष्ट अवयवांच्या आरोग्यासाठी उपयोगी अशा अनेक वनस्पती, तसेच उपाय आयुर्वेदात आहेत. मूळ प्रकृतीनुरूपच केस त्वचा यांचे आरोग्य थोडे डळमळीत असेल, तर वैद्यांचा सल्ला घेऊन अशी औषधे चालू केल्यास लाभ होतो.

– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे.