निरोगी जीवनासाठी व्यायाम : लेखांक क्र. ८१
‘मानदुखीविषयी वेगळे काही सांगायला नको. आपल्यापैकी अनेकांना कधीतरी ‘मानेचे दुखणे’ जाणवले असेलच. काही जणांना अधिक तीव्रतेचे त्रास झाले असतील, तर काहींना लहान-सहान दुखणे होऊन बरेही झाले असेल; पण याविषयी आणखी जाणून घेतले, तर असलेला त्रास न्यून करणे, तसेच पुढे होणारे त्रास टाळणे शक्य होऊ शकेल.
आपली मान, म्हणजे डोके आणि शरीर यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. आपल्या सामान्यतः सर्वच शारीरिक क्रिया मानेमुळेच व्यवस्थित चालू आहेत. मानेतून श्वासनलिका, अन्ननलिका आणि रक्तवाहिन्या जातात. त्याचप्रमाणे मानेतून महत्त्वाच्या नसांच्या माध्यमातून मेंदूचा शरिराशी संपर्क रहातो. त्यामुळे मानेला आलेली कोणतीही अडचण केवळ हालचालीपुरती मर्यादित न रहाता तिचा इतर अवयवांवरही परिणाम होऊ शकतो.

जगभरात मानदुखी ही एक सामान्य; पण महत्त्वाची समस्या मानली जाते. वर्ष २०१९ मध्ये प्रत्येकी १ सहस्र लोकांमागे अनुमाने २७ लोकांना मानेचा त्रास झाल्याची नोंद आहे. वर्ष २०१२ मध्ये अमेरिकेत केवळ मानदुखीमुळे अडीच कोटी लोकांनी कामावरून सरासरी ११ दिवस सुटी घेतली होती, तर भारतात मानदुखीचे प्रमाण ४३.३ टक्के आहे. ‘अधिक वेळ संगणकासमोर बसणे, सतत भ्रमणभाष पहाणे, चुकीच्या पद्धतीने झोपणे’, अशा सवयींमुळे ही समस्या वाढत आहे. मानदुखीमुळे होणार्या वेदनांचा परिणाम केवळ शरिरावर होत नसून कामकाज, उत्पादकता आणि मानसिक आरोग्य यांवरही होतो.
(भाग १)

१. मानदुखीची कारणे

१ अ. चुकीच्या स्थितीत (‘पोश्चर’मध्ये) रहाणे : मानेच्या दुखण्याची अनेक कारणे असू शकतात. यांमध्ये ‘चुकीच्या पद्धतीने बसणे, सतत भ्रमणभाष किंवा संगणक यांकडे वाकून पहाणे आणि मानेला ताण देणार्या सवयी’, ही सामान्य कारणे आहेत. चित्रात दाखवल्याप्रमाणे आपली मान शरिराच्या जितकी पुढे वाकते, तितका तिच्यावरील ताण अनेक पटींनी वाढतो. (चित्र १)
१ आ. अपघात होणे : अपघातामुळे होणार्या दुखापती, उदा. गाडीचे झटके बसणे, खेळतांना घसरून पडणे इत्यादींमुळे मानेत वेदना निर्माण होऊ शकतात.
१ इ. वयानुसार होणारी झीज : वयोमानानुसार मानेच्या हाडांची झीज होणे, हे स्वाभाविक आहे. काही वेळा या झिजलेल्या हाडांवर ‘बोन स्पर (आकाराबाहेर वाढलेली हाडे)’ तयार होतात. ती नसांवर दाब देऊ शकतात. काही वेळा झीज झाल्यामुळे मणक्यांतून बाहेर पडणार्या नसांवर दाब पडतो. यांमुळे वेदना, सुन्नपणा किंवा जडपणा जाणवू लागतो. काही वेळा ‘मुंग्या येणे किंवा भाजल्यासारखे होणे’, असेही अनुभव येतात. मानेच्या मणक्यांच्या झालेल्या झिजेलाच ‘स्पॉन्डीलोसिस’ (Spondylosis), असेही म्हणतात.

१ ई. मानेच्या मणक्यातील गादी सरकणे (स्लिप डिस्क) : आपला पाठीचा कणा एकाखाली एक असलेल्या मणक्यांनी बनलेला असतो. दोन मणक्यांमधील घर्षण टाळण्यासाठी जेलसारख्या पदार्थाची गादी असते. चुकीच्या पद्धतीने बसणे किंवा वजन उचलणे यांमुळे ही गादी सरकते. ती सरकल्याने मागे असलेल्या नसांवर दाब पडतो आणि वरीलप्रमाणे नस दबल्याची लक्षणे दिसू लागतात. (चित्र २)
१ उ. स्पायनल कॅनल स्टिनोसिस : मज्जारज्जू ज्या भागातून जातो, तेथील मार्ग अरुंद झाल्यास मज्जारज्जूवर दाब पडून वर उल्लेखल्याप्रमाणे लक्षणे दिसू लागतात. वरील दोन्ही आजारांच्या परिणामस्वरूप आजार उद्भवू शकतो. तीव्रता अधिक असल्यास ‘हाताने काम करतांना थांबावे लागणे, एका मर्यादेपलीकडे हाताचा वापर करता न येणे’, अशी लक्षणे दिसू लागतात.
१ ऊ. मानसिक त्रास : मनाचा शरिरावर पुष्कळ प्रमाणात आणि खोलवर प्रभाव पडत असतो. बर्याच वेळा त्याचे प्रगटीकरण ताणाच्या रूपात झाल्यास मानेचे स्नायू घट्ट होतात. त्यामुळे प्रत्यक्षात कोणताही आजार नसतांना मानेला वेदना जाणवतात. मानसिक ताण असतांना आपण नकळत मान घट्ट धरून बसतो. त्यामुळेही स्नायूंवर ताण येतो. स्नायूंवरील हा ताण आरंभी जाणवत नाही; पण कालांतराने मानेचे स्नायू घट्ट होऊन दुखू लागल्यावर त्याची जाणीव होते. महत्त्वाचे म्हणजे ‘झिजलेल्या हाडांमुळे किंवा सरकलेल्या गादीमुळे प्रत्येकालाच वेदना होतात’, असे नसते. काहींना अशा स्थितीतही त्रास जाणवत नाही, तर काहींना फार त्रास होतो. यावरून वेदना केवळ शारीरिक स्थितीवर नाही, तर मनोवृत्तीवरही अवलंबून असतात; पण हा भाग वैद्यांनाच चांगला लक्षात येतो.’
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– श्री. निमिष म्हात्रे, भौतिकोपचार तज्ञ (फिजिओथेरपिस्ट), फोंडा, गोवा. (१३.८.२०२५)
Islam Friendly Gym : केरळम्मध्ये ‘इस्लाम फ्रेंडली’ व्यायामशाळेवरून वाद
स्तनदुखी आणि स्तनातील गाठी : कारणे अन् आयुर्वेदाचा दृष्टीकोन
‘धूम्रपान करणे’ याचा साधकाच्या कुंडलिनी चक्रांवर अत्यंत प्रतिकूल परिणाम होणे
आयुर्वेदातील वात, पित्त आणि कफ समजून घ्या !
‘धूम्रपान करणे’ याचा साधकाच्या कुंडलिनीचक्रांवर अत्यंत प्रतिकूल परिणाम होणे
वातावरणात पालट होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुढचे १५ दिवस पाळायचे ५ नियम !