मालेगाव बाँबस्फोट खटल्यातील हिंदुत्वनिष्ठांसाठी निःस्वार्थपणे लढणारे हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर !

नुकताच मालेगाव बाँबस्फोट प्रकरणाचा निकाल लागला आणि ‘हिंदु आतंकवादा’च्या ‘नॅरेटीव्ह’चे (खोट्या कथानकाचे) पीडित ठरलेल्या हिंदुत्वनिष्ठांची निर्दाेष मुक्तता झाली. ९-९ वर्षे कारावासात राहून आणि १७ वर्षे आतंकवादाचा शिक्का कपाळावर मिरवत न्यायासाठी खेटे मारणार्‍या या हिंदुत्वनिष्ठांना अनेकांनी आपापल्या परीने साहाय्य केले. त्या साहाय्यकर्त्यांपैकी सगळ्यात अग्रणी नाव येते ते हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांचे ! अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी मालेगाव बाँबस्फोटाच्या खटल्यात १७ वर्षे आरोपींच्या वतीने नि:शुल्क काम पाहिले. विशेष म्हणजे या १७ वर्षांत अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी आरोपींकडून किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून वकिलीची ‘फी’ (शुल्क) सोडा, साधा प्रवास व्यय किंवा कागदपत्रांच्या झेरॉक्स (छायांकित प्रती) इत्यादींचा व्यय म्हणून एक रुपयाही घेतलेला नाही.

१. खटला संपण्यापूर्वीच २ आरोपींची निर्दाेष मुक्तता

मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात गोवण्यात आलेले सर्वश्री प्रवीण टक्कलकी, सुधाकर चतुर्वेदी, राकेश धावडे यांचे वकीलपत्र अधिवक्ता पुनाळेकर यांनी घेतले होते. त्यांपैकी सर्वश्री राकेश धावडे आणि प्रवीण टक्कलकी बाँबस्फोटाच्या आरोपातून खटला संपण्यापूर्वीच मुक्त झाले. त्याचे श्रेय अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनाच जाते.

अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात गोवण्यात आलेल्या हिंदुत्वनिष्ठांची उघडपणे केली पाठराखण !

अधिवक्ता संजीव पुनाळेकर

मालेगाव बाँबस्फोटाच्या खटल्याच्या कामकाजात अधिवक्ता संजीव पुनाळेकर अगदी आरंभीपासून होते. सातत्याने १७ वर्षे त्यांनी या खटल्यात ‘बचाव पक्षाचे अधिवक्ता म्हणून काम पाहिले. अधिवक्ता पुनाळेकर यांनी मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात अधिवक्ता’ म्हणून जे काही केले, तेच काम जर एखाद्या व्यावसायिक अधिवक्त्याने केले असते, तर त्याने केवळ शुल्कापोटी ३-४ कोटी रुपये कमवले असते; परंतु ‘हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ता मग तो कोणत्याही संघटनेचा असो, तो आधी हिंदुत्वनिष्ठ आहे आणि म्हणून तो आपला आहे’, याच धारणेने अधिवक्ता संजीव पुनाळेकर जगत आले आहेत, हे मी पाहिले अन् अनुभवले आहे.

मालेगाव बाँबस्फोटाचा निकाल लागेपर्यंत म्हणजे जवळजवळ १७ वर्षे त्या प्रकरणातील हिंदुत्वनिष्ठांना ‘आतंकवादी’ असा शिक्का कपाळावर मिरवत जगावे लागले. या प्रकरणातील अटकसत्र चालू असतांना अनेकांनी स्वतःचे धोतर सावरत पळ काढला आणि त्यांनी या संपूर्ण प्रकरणापासून अलिप्त रहात या प्रकरणात गोवण्यात आलेल्या हिंदुत्वनिष्ठांपासून अंतर राखले. गोवण्यात आलेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या पाठीशी उघडपणे उभे रहाणे लांबच; परंतु या प्रकरणामुळे ‘भगव्या आतंकवादा’चा बागूलबुवा उभा करून हिंदूंना ‘आतंकवादी’ ठरवण्याच्या तत्कालीन काँग्रेस सरकारच्या पापाविषयी बोलायलाही फार कुणी धजावले नाही. अशा काळातही अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात गोवण्यात आलेल्या हिंदुत्वनिष्ठांची उघडपणे पाठराखण केली. ‘मी ज्यांचे वकीलपत्र घेतले आहे, त्यांच्यापुरतेच मी काम पाहीन’, अशी कोती भूमिका त्यांनी कधीच घेतली नाही. ‘या प्रकरणात गोवण्यात आलेला प्रत्येक हिंदुत्वनिष्ठ माझा आहे’, याच भावनेने ते या प्रकरणात काम करत होते. ही गोष्ट या प्रकरणातील प्रत्येक हिंदुत्वनिष्ठ आजही मान्य करतो. मी स्वत: याचा साक्षीदार आहे.

– श्री. विक्रम भावे, हिंदु विधीज्ञ परिषद, मुंबई.

२. चतुर्वेदी यांना आतंकवादी पथकाने अवैधरित्या कह्यात ठेवणे 

श्री. विक्रम भावे

श्री. सुधाकर चतुर्वेदी यांना कह्यात घेतल्यानंतर आतंकवादविरोधी पथकाच्या (‘ए.टी.एस्.’च्या) पोलिसांनी लगेच न्यायालयासमोर उपस्थित केले नाही. त्यांना पोलिसांनी अवैधरित्या कह्यात ठेवले होते. याचे धडधडीत पुरावे आहेत. श्री. चतुर्वेदी यांची मुंबईच्या कलिना येथील न्यायसाहाय्यक प्रयोगशाळेत ‘ब्रेन मॅपिंग’ चाचणी (सत्य वदनासाठीची एक चाचणी) झाली होती. ही चाचणी ११ नोव्हेंबर २००८ या दिवशी करण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल श्री. चतुर्वेदी यांनी माहितीच्या अधिकारात मिळवला होता. या चाचणीत चतुर्वेदी यांना विचारण्यात आलेले सगळे प्रश्न मालेगाव बाँबस्फोट, लेफ्टनंट कर्नल पुरोहित आणि अन्य आरोपी यांच्याविषयीचेच होते; मात्र मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात श्री. सुधाकर चतुर्वेदी यांना अटक झाली, तीच मुळात २० नोव्हेंबर २००८ या दिवशी, म्हणजे ११ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर या काळात श्री. चतुर्वेदी यांना पोलिसांनी अवैधरित्या कह्यात ठेवल्याचे स्पष्ट होते.

३. पोलिसांनी सुधाकर चतुर्वेदी यांना ‘इंडिया बुल्स’ आस्थापनाच्या खासगी विमानाने भोपाळला नेणे आणि समीर कुळकर्णी यांना अटक करणे

श्री. सुधाकर चतुर्वेदी यांना २४ ऑक्टोबर २००८ या दिवशी ‘इंडिया बुल्स’ आस्थापनाच्या ७ आसनी ‘चार्टर’ विमानातून (विशेष खासगी विमान) भोपाळला नेण्यात आले होते. त्यांच्यासह सचिन कदम, राजन गोळे, विवेक वाकुंड, सुनील यादव, कृष्णा सावंत, संजय पाटील हे आतंकवादविरोधी पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी होते. श्री. चतुर्वेदी यांना त्यांच्या खर्‍या नावाने न नेता ‘संग्रामसिंग’ या नावाने त्या विमानातून नेण्यात आले होते. भोपाळ येथे गेल्यानंतर श्री. चतुर्वेदी यांना अन्य एक हिंदुत्वनिष्ठ श्री. समीर कुळकर्णी यांना दूरभाष करण्यास आणि ‘आहात तिथेच थांबण्यास सांगा’, असे आदेश पथकाच्या पोलिसांनी दिले. त्याप्रमाणे भेदरलेल्या श्री. चतुर्वेदी यांनी तसे केले. मग ‘ए.टी.एस्.’च्या पोलिसांनी श्री. समीर कुळकर्णी यांनाही तिथे जाऊन कह्यात घेतले. दुसर्‍या दिवशी, म्हणजे २५ ऑक्टोबर २०२५ या दिवशी पुन्हा त्याच ‘चार्टर’ विमानाने सगळे मुंबईला परत आले. श्री. सुधाकर चतुर्वेदी यांनी विमान प्राधिकरणाकडे या दोन दिवसांत त्या मार्गावर प्रवास केलेल्या ‘चार्टर’ विमानाची माहिती माहितीच्या अधिकारात मागितली. तेव्हा प्राप्त माहितीतून ‘इंडिया बुल्स’ आस्थापनाचे ७ आसनी चार्टर विमान, ‘ए.टी.एस्.’च्या अधिकार्‍यांची नावे, प्रवासाचे दिनांक हा सगळा तपशील प्राप्त झाला.

अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी सुधाकर चतुर्वेदी यांच्या जामिनासाठी स्वतःकडील पैसे भरणे

अधिवक्ता संजीव पुनाळेकर

श्री. सुधाकर चतुर्वेदी जवळजवळ ९ वर्षे कारागृहात होते. या कालावधीत त्यांना कारागृहात खर्चासाठी पैसे पाठवणे, वेळप्रसंगी त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक साहाय्य करणे या गोष्टी तर अधिवक्ता पुनाळेकर यांनी निरपेक्षपणे केल्याच; परंतु श्री. चतुर्वेदी यांना जेव्हा न्यायालयाने ५ लाख रुपयांचा जामीन संमत केला, तेव्हा त्यांच्यासाठी उत्तरप्रदेशातील जामीनदार शोधणे, त्याची आवश्यक ती कागदपत्रे सिद्ध करणे आणि त्याविषयीची न्यायालयात पूर्तता करणे या सगळ्या गोष्टींना बराच वेळ लागणार होता. तेव्हा श्री. सुधाकर चतुर्वेदी यांना जामिनाची पूर्तता करता यावी, यासाठी ‘५ लाख रुपये रोख भरून घेऊन त्यांची कारागृहातून मुक्तता करण्यात यावी’, असे आवेदन अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी न्यायालयात केले. त्यांचे आवेदन न्यायालयाने मान्य केले; परंतु आता अडचण अशी होती की, ५ लाख रुपये इतकी मोठी रक्कम कोण भरणार ? तेव्हाही अधिवक्ता पुनाळेकर यांनी क्षणाचाही विचार न करता स्वत:कडील ५ लाख रुपये न्यायालयात भरले आणि श्री. चतुर्वेदी यांची मुक्तता झाली. पुढे श्री. चतुर्वेदी यांच्या जामिनाची पूर्तता करण्यासाठी काही महिने लागले. तेवढा काळ अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांचे ५ लाख रुपये अडकून पडले होते; परंतु अधिवक्ता पुनाळेकर यांनी कधीही एका अक्षरानेही त्याविषयी त्यांच्याकडे विचारणा केली नाही. ‘हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यापेक्षा ५ लाख रुपये मोठे नाहीत’, अशीच भूमिका त्यांची सातत्याने राहिली आहे.

– श्री. विक्रम भावे

४. अधिवक्ता पुनाळेकर यांनी अत्याचार करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांना शिक्षा होण्यासाठी केलेल्या याचिकेवर अद्याप सुनावणी न होणे

या गंभीर गोष्टी समजल्यानंतर अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी श्री. सुधाकर चतुर्वेदी यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली, तीही विनामूल्य ! दुर्दैवाने खटला संपेपर्यंत ती याचिका सुनावणीला आली नाही; परंतु ‘३१ जुलै २०२५ या दिवशी लागलेल्या निकालानंतर आता तरी त्या याचिका सुनावणीला येतील अन् चतुर्वेदींवर अत्याचार करणार्‍या अधिकार्‍यांना शिक्षा होईल’, अशी आशा आपण बाळगू. ‘तसे झाले, तरच श्री. चतुर्वेदींना न्याय मिळाला’, असे खर्‍या अर्थाने म्हणता येईल. ही याचिका करण्यामागे अधिवक्ता पुनाळेकर यांचा हाच हेतू आहे, ‘श्री. चतुर्वेदी केवळ निर्दाेष सुटले, असे होऊन चालणार नाही. त्यांना यातना देणार्‍यांना शिक्षा होईल, तेव्हाच खरा न्याय होईल’, ही भावना त्यामागे आहे.

– श्री. विक्रम भावे, हिंदु विधीज्ञ परिषद, मुंबई.

संपादकीय भूमिका

खोटे आरोप असलेले हिंदुत्वनिष्ठ केवळ निर्दाेष सुटले, असे न होता त्यांना यातना देणार्‍यांना शिक्षा होईल, तेव्हाच खरा न्याय होईल !