दैनिक ‘लोकसत्ता’च्या २० ऑगस्टच्या अंकात डॉ. दाभोलकरांच्या स्मृतीदिनानिमित्त वसंत देशमाने यांचा ‘प्रबोधनाच्या लढ्याचा अर्ध्वयू – डॉ. नरेंद्र दाभोळकर’ या मथळ्याखाली लेख छापून आला. डॉ. दाभोलकरांचे समर्थक असल्याने साहजिकच त्यांनी त्यांचे कार्य, व्यक्तीमत्त्व यांविषयी तोंडभरून कौतुक केले, तसे समर्थकाने करणे स्वाभाविकही आहे; पण ते करतांना आपण त्यांची तुलना कुणाकुणाशी करतो, याचे भान देशमाने यांना राहिले नाही. अतिशयोक्तीची सीमा पार करत त्यांनी डॉ. दाभोलकरांना ‘महात्मा’, ‘संत’ असे म्हणत त्यांच्याच विचारांना मूठमाती दिली. देशमाने यांनी त्यांच्या लेखात मांडलेली काहीच उदाहरणे पुढे देत आहे.

तथाकथित बुद्धीवंताची बौद्धिक दिवाळखोरी !
१. ‘ज्ञानेश्वर माऊलीस समाधी का घ्यावी लागली ? तुकाराम महाराजांना वैकुंठास घेऊन जाणारे विमान खरेच आले होते काय ? विचारी माणसाच्या मनात कधी मधी उद्भवणार्या या प्रश्नांना उत्तरे नाहीत. ती मिळालीच, तर प्रस्थापितांना ती सोयीची नसतात.’
खंडण : असा या लेखाचा प्रारंभ. मुळात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम हे उच्च कोटीचे संत होते, तर त्यांना किमान ‘संत ज्ञानेश्वर’ आणि ‘संत तुकाराम’ असे म्हणण्याची साधी तसदी दाभोलकर समर्थकांना घ्यावीशी वाटली नाही, यातूनच त्यांचा संतांप्रती असलेला आदर दिसून येतो अन् यांना म्हणे समाजात परिवर्तन करायचे आहे ! देशमाने यांनी उपस्थित केलेला हा प्रश्नच मुळी वारकरीद्रोही आहे. समाधी घेणे, वैकुंठगमनासाठी विमान येणे, या उच्च आध्यात्मिक अनुभूती नास्तिकतावाद्यांना काय समजणार ?
त्याही पुढे जाऊन या उदाहरणांचा दाखला देत त्याचा संदर्भ दाभोलकरांच्या हत्येशी जोडणे, ही तथाकथित बुद्धीवंताची बौद्धिक दिवाळखोरीच.
हत्यांच्या कारणाचा साक्षात्कार कसा आणि कुठे झाला ?
२. ‘जवळपासच्या काळातच पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश अशा प्रतिभावान व्यक्तींनाही प्रश्न विचारण्याच्या एकमेव गुन्ह्यासाठी आपापला जीव गमवावा लागला’, असे लेखात पुढे लिहिले आहे.
खंडण : विविध पोलीस यंत्रणांनी त्यांच्या अन्वेषणाच्या वेळी किंवा यातील केवळ एकच प्रकरण निकाली लागल्याने त्या प्रकरणाशी संबंधित न्यायालयाने दिलेल्या निकालात ‘या’ कारणामुळे हत्या झाली’, असा काडीमात्र उल्लेख नाही. तरी देशमानेंना या चारही हत्या ‘प्रश्न विचारण्यामुळे’ झाल्या, असा साक्षात्कार कसा, कधी आणि कुठे झाला ?, हा अन्वेषणाचा विषय आहे. असो. यातून त्यांना ‘विवेकवाद’ किती समजला आहे, हे मात्र दिसून येते.
जातीयवाद पसरवणारे देशमाने !

३. देशमाने पुढे लिहितात, ‘१३ व्या शतकात होऊन गेलेल्या ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचे फक्त मराठी भाषांतर केले असते, तरी ते फार मोठे ऐतिहासिक कार्य ठरते; पण ज्ञानेश्वरांनी गीतेचे रूपांतर करून ‘भावार्थ दीपिका’ रचली. आपण पूज्य आणि पवित्र मानतो ती ज्ञानेश्वरी हीच. हा भावार्थ सांगताना ‘विनाशाय च दुष्कृताम्’मध्ये हिंसेचे समर्थन करणार्या गीतेतून ‘जे खळांची व्यंकटी सांडो, तयां सत्कर्मी रति वाढो’, असे अहिंसेचे अमृत ज्ञानेश्वरांनी श्रोत्यांना दिले आहे.’
खंडण : हा लेख किती विखारी आहे, हेच या ओळींतून लक्षात येते. देशमानेंनी ‘हिंसेचे समर्थन करणार्या गीतेतून’ असे लिहित ‘भगवद्गीते’ला हिंसक म्हणत ‘संत ज्ञानेश्वर यांनी अहिंसा तीही ‘बहुजनांना’ शिकवली’, असा पद्धतशीरपणे जातीयवाद आणि बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न केला आहे. तो ‘लोकसत्ता’च्या संपादकांना कळला नसेल, एवढे कुबेर (दैनिक ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर) दूधखुळे नाहीत. खरेतर देशमाने आणि ‘लोकसत्ता’चे संपादक यांच्यावर गुन्हाच नोंदवायला हवा, इतके भयानक असे हे लिखाण आहे.
… अध्यक्षपदाची निवडणूक तरी जिंकून दाखवावी !
४. ‘डॉक्टरकी मिळवल्यानंतर डॉ. नरेंद्र यांना वैद्यकीय क्षेत्रातच मानाचे स्थान मिळवणे सहज शक्य होते. तेथे त्यांना खोर्याने पैसा ओढता आला असता’, ‘डॉ. दाभोलकर यांना त्याच क्षेत्रात वाटचाल करूनही भरपूर माया आणि अत्युच्च पदांचा लाभ झाला असता’, ‘आमदार, खासदार होणेही अवघड नव्हते’, असे लिहिले आहे.
खंडण : कदाचित् केजरीवालांसारख्या तथाकथित समाजसुधारकांना मुख्यमंत्रीपद मिळाले, तसे श्रद्धा निर्मूलनाचे कार्य विविध मुखवट्यांखाली करणार्यांना आमदार-खासदार होण्याची स्वप्ने पडू लागली असतील. एखाद्या उपक्रमासाठी जेमतेम २० लोक येणे मुश्कील, यांनी त्यांच्या दुफळी माजलेल्या संघटनेच्या अध्यक्षपदाची निवडणूक तरी जिंकून दाखवावी, म्हणजे आपण किती पाण्यात आहोत, ते त्यांना कळेल.
गैरव्यवहार करणारे समाजाला ‘सत्यनिष्ठा’ शिकवणार ?
५. ‘गांधीवरील डॉक्टरांची ही भक्ती त्यांच्या सर्वसमावेशकतेतून, सत्यनिष्ठेतून, निस्पृहतेतून, साधेपणातून, अहिंसकतेतून, सहनशीलतेतून, निर्भयतेतून आणि संयमशील तरीही प्रभावी युक्तीवादातून वारंवार प्रतिबिंबित झाली आहे’ इति.
खंडण : येथेही ‘गांधीवरील’ असे म्हणत गांधींनाही एकेरीत आणणारे हे स्वतःला ‘पुरोगामी’ म्हणवतात ! आणि गांधींनाही दाभोलकरांच्या रांगेत बसवतात.
‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’च्या लेखा परीक्षणातून लाखो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार करणारे समाजाला ‘सत्यनिष्ठा’ शिकवणार; नक्षलवादी कारवायांत अंनिसचे कार्यकर्ते सापडत आहेत, त्यांतून हे ‘अहिंसकता’ शिकवणार; केवळ हिंदूंच्या सणांच्या वेळी पर्यावरणप्रेम, निसर्गप्रेम उफाळून येणारे ईदला ‘पर्यावरणपूरक बकरी ईद साजरी करा’, ‘थडग्यांवर चादरी चढवण्यापेक्षा गरिबांना दान करा’, ‘चर्चमध्ये मेणबत्त्या जाळून प्रदूषण करण्यापेक्षा गरिबांचा अंधःकार दूर करा’, अशा मोहिमा घेण्याची धमक नसणारे ‘निर्भयता’ शिकवणार आणि ‘हे राम’ म्हणणार्या दैववादी श्रद्धाळू गांधींची ‘भक्ती’ अंधश्रद्धा निर्मूलनवाले नास्तिकतावादी दाभोलकर करणार, यापेक्षा हास्यास्पद विनोद काय !
देशमाने हे ‘दाभोलकरांचे मोठे अंधभक्त’ !
६. ‘खरेतर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या व्यक्तीमत्त्वात ज्ञानेश्वरांची प्रज्ञा, तुकारामांचे धैर्य, गांधीजींची प्रांजळता, डॉ. आंबेडकरांची बुद्धीमत्ता आणि न्यायमूर्ती रानडे ते प्रबोधनकार ठाकरेंपर्यंतच्या एकूण एक समाजसुधारकांच्या शिकवणुकीचे सार सामावलेले होते. १३ व्या शतकात जन्म घेणारे ज्ञानदेव जर २० व्या शतकात जन्माला आले असते, तर त्यांनी तेच केले असते जे दाभोलकरांनी केले.’
खंडण : आज ही कम्युनिस्ट (साम्यवादी) – काँग्रेसी मंडळी भाजपच्या कार्यकर्त्यांनाच नव्हे, तर हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रनिष्ठ नागरिकांनाही ‘मोदीभक्त’ म्हणून हिणवतात; पण देशमाने हे किती मोठे ‘दाभोलकरांचे अंधभक्त’ आहेत, हे त्यांच्या वरील लिखाणातून कळते, म्हणजे दाभोलकर इतके श्रेष्ठ होते की, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, म. गांधी, संविधानकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जणू मिश्रण म्हणजेच दाभोलकर ! नशीब दाभोलकर नास्तिक होते म्हणून, नाही तर वसंतरावांनी त्यांना श्रीकृष्ण, श्रीराम, महादेव, ब्रह्मदेव इथपर्यंतही नेऊन ठेवले असते. संत किंवा राष्ट्रपुरुष यांच्या विचारांनुसार जर खरच कुणी कार्य करत असेल, तर ‘त्यांचा आदर्श घेऊन कार्य करत आहेत’, असे म्हणणे आणि थेट त्यांच्याच पंक्तीत नेऊन बसवणे, यातील ‘विवेक’ श्रद्धा निर्मूलनकर्त्यांना कसा समजेल, असो !
आर्थिक गैरव्यवहार हा कोणता आदर्श ?
७. ‘कदाचित ‘साधना’चे (मासिक ‘साधना’) संपादकत्व सांभाळतांना अनुसरलेल्या सानेगुरुजींच्या सोज्वळ संवेदनशीलतेचा वारसा ते जपत असावेत. गणेशोत्सवास त्यांनी कधीच विरोध केला नाही. त्यांचा विरोध प्रदूषणाला आणि पर्यावरणाच्या हानीला होता.’
खंडण : हे आणखी एक थोतांड. यातूनही पुन्हा दाभोलकरांना सानेगुरुजींच्या जागी बसवण्याची वसंतरावांची (उठाठेव) भक्ती. ज्या ‘साधना’चे संपादकत्व सांभाळले, त्याला विज्ञापनांद्वारे मिळणार्या पैशांचा हिशोब आर्थिक ताळेबंदात कधीच दाखवला नाही. अशा अनेक आर्थिक गैरव्यवहारांसाठी सातारा सह-धर्मादाय आयुक्तांनी ‘अंनिस ट्रस्टवर ‘प्रशासक’ का नेमू नये ? तसेच ट्रस्टचे ‘विशेष लेखापरीक्षण’ करण्यात यावे’, असे ताशेरे ओढले आहेत. ‘विदेशी योगदान नियमन कायदा’ (एफ्.सी.आर्.ए.) याच्या अंतर्गत ‘कोणत्याही वृत्तपत्राला विदेश निधी स्वीकारता येत नाही’, असे असतांनाही बेकायदेशीरपणे विदेशातून निधी मिळाल्याने अंनिसचे नाव केंद्र सरकारने कारवाई करत ‘एफ्.सी.आर्.ए.’च्या सूचीतून वगळले होते, हाच का सानेगुरुजींचा आदर्श !
‘सोज्वळ संवेदनशीलता’ ही गणेशोत्सवाच्या वेळी जलप्रदूषण होते, या वेळी असते. मग ती वर्षभर मैलापाणी कोणतीही प्रक्रिया न करता नदीत सोडतात, त्या वेळी कुठे जाते ? भूमी कमी पडत चालल्या; म्हणून बांधकाम व्यावसायिक लोक नदीकाठच्या भागात राडारोडा टाकून नदीपात्र न्यून करत चालले आहेत, तेव्हा कुठे जाते ? जसे गणेशमूर्ती विसर्जन होते, तसे ‘ताबूत विसर्जन’ही होते, त्या वेळी अंनिसवाले ‘विवेक’ कुठे गहाण ठेवतात ? वायूप्रदूषण नको; म्हणून ‘होळी लहान करा’, असे म्हणणार्या अंनिसवाल्यांची ख्रिसमसपासून ३१ डिसेंबरपर्यंत वाजणार्या फटाक्यांमुळे आणि ३६५ दिवस वाहनांमुळे होत असलेल्या प्रचंड वायूप्रदूषणाविषयी बोलण्यासाठी श्वास का लागतो ? आणि हो, आरती, घंटानाद, मिरवणुका यांमुळे ध्वनीप्रदूषण होते, तर पहाटेच्या वेळी निरामय शांतता असतांना कर्णकर्कश भोंग्यातून दिली जाणारी ‘बांग’ मात्र सुमधूर आणि निद्रापूरकच असते, असे मानणे, ही एक ‘अंधश्रद्धा’च नाही का ?
…हा तर दाभोलकरांचे ‘दैवतीकरण’ करण्याचा प्रयत्न !
८. ‘डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी देव अन् धर्म या संकल्पना कधीच नाकारलेल्या नाहीत. ते कदाचित अज्ञेयवादी असतील; पण नास्तिक नव्हते.’
खंडण : असे लिहिल्याने देशमाने खरच दाभोलकरांना ओळखत होते का कि त्यांनी पैसे घेऊन त्यांच्यासाठी लेख लिहिला ?, असा प्रश्न पडतो; कारण दाभोलकरांच्या ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’चे मूळ नावच ‘मानवीय नास्तिकतावादी मंच’ असे होते; परंतु या नावाने समाजात हात-पाय पसरणे कठीण होते, धंदा चालत नाही, हे लक्षात आल्यावर ‘अंधश्रद्धा निर्मूलना’च्या गोंडस नावाखाली नवीन संघटना स्थापून कार्य चालू करणारे दाभोलकर ‘नास्तिक’ नव्हते ! असे म्हणण्यापेक्षा ‘ते श्रद्धाळूच होते’, असेच लिहायचे बाकी राहिले आहे. दाभोलकरांचे ‘दैवतीकरण’, ‘श्रद्धामंडन’ आणि ‘भक्ती’ करण्याचा वसंतरावांचा प्रयत्न, हा दाभोलकरांच्या विचारांची खर्या अर्थाने हत्या करणारा आहे, हे त्यांना समजेल, तेव्हा खरी दाभोलकरांना श्रद्धांजली मिळेल, अन्यथा तिला ‘अंध’श्रद्धांजली म्हणावे लागेल.
– श्री. संदीप शिंदे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.८.२०२५)
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !