आजीची भाजी रानभाजी – कमजोरी दूर करणारी कुर्डू !

रानभाज्या आणि रानमेवा यांची ओळख करून देणारी ‘आजीची भाजी रानभाजी’ ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, आत्मा, रत्नागिरी यांच्या सौजन्याने जिल्हा माहिती कार्यालयाने चालू केलेल्या या मालिकेत आज आपण ‘कुर्डू’ या भाजीची माहिती वाचणार आहोत.       

(भाग २३)

याआधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/948945.html

कफ, वात आणि  पित्तशामक अशी कुर्डू !

याला कुर्डू ‘पांढरा कोंबडा’, ‘मोरपंख’ असेसुद्धा स्थानिक नावाने ओळखले जाते. सांधेदुखी जाण्यासाठी, अशक्तपणा दूर होण्यासाठी, थकवा न्यून होण्यासाठी, मूतखडा बाहेर काढण्यासाठी, दाताचे विकार नाहीसे करण्यासाठी याचा लाभ होतो. तोंडाचे विकार, स्त्रियांच्या तक्रारी, अतीरक्तस्राव, मूत्रपिंडाच्या तक्रारी, अशा अनेक व्याधींवर ही वनस्पती उपयुक्त आहे. कुर्डू ही वनस्पती त्रिदोषनाशक, म्हणजे कफ, वात आणि पित्तशामक आहे. या वनस्पतीच्या फुलांमध्ये काळे आणि चमकदार बीज असते. हे बीजसुद्धा आयर्वेदामध्ये अतीउपयुक्त मानले जाते.

श्री. प्रशांत आनंदराव सातपुते

आपल्याला वारंवार लघवी होत असेल, लघवी करतेवेळी दुखत असेल, जळजळ होत असेल, तर या बियांचे चूर्ण २ ग्रॅम आणि खडीसाखर २ ग्रॅम याप्रमाणे दिवसातून २ वेळा घेतल्यास समस्या दूर होतात. बियांची पावडर आणि अर्धा चमचा मध एकत्र करून घेतल्यास सकाळ-संध्याकाळ उपाशीपोटी सेवन केल्यास मूतखड्याचा त्रास नाहीसा होण्यास साहाय्य होते. कुर्डूच्या पानांची भाजी दिवसातून एकदा असे ४ ते ५ दिवस खाल्ल्यास पोट एका दमात साफ होऊन पोटातील घाण बाहेर काढणारा हा आयुर्वेदातील सर्वोत्तम उपाय आहे. ज्यांना झोप येत नसेल, तर याची भाजी अवश्य खावी. त्यांना शांत झोप लागेल. कच्चे पान जरी धुऊन खाल्ले, तरी कमजोरी अथवा थकवा नाहीसा होईल.

१ अ. भाजी करण्याची पद्धत : कढईत तेल गरम करून लसूण, मिरची फोडणीला टाकावी. हिंग, हळद, कांदा घालून परतून घ्यावा. एखादा बारीक चिरलेला टोमॅटो आणि कुर्डूची निवडलेली भाजी त्यामध्ये घालावी. झाकण ठेवून थोडा वेळ शिजू द्यावे. थोड्या वेळाने चवीपुरते मीठ घालून ही परतून घ्यावी. ३-४ मिनिटांनी ओले खोबरे घालून गॅस बंद करा.

– श्री. प्रशांत सातपुते, जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी.