दाभोलकरी हेकटपणा आणि अंधश्रद्धा निर्मूलनातील गोंधळ !

अंनिसचे दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि त्यांची टोळी आता (महाराष्ट्रात तरी) परिचित आहे, असे म्हणायला कुणाची हरकत नसावी. दाभोलकरांच्या हत्येनंतर त्यांना अधिक प्रसिद्ध मिळाली, असे म्हणण्यापेक्षा ‘अंनिसवाल्यांनी आणि दाभोलकर कुटुंबियांनी प्रसिद्धी मिळवण्यासाठी दाभोलकरांच्या हत्येचा चांगलाच लाभ उठवून घेतला’, हे म्हणणे अधिक योग्य ठरेल. अधिक स्पष्ट आणि खरे बोलायचे, तर ‘अंनिसवाले अन् दाभोलकर कुटुंबीय यांनी भ्रष्टाचाराने काळवंडलेली त्यांची तोंडे उजळवण्यासाठी दाभोलकरांच्या राखेचा वापर केला.’ असो.

‘स्विस एड’ (स्वित्झर्लंड येथील या संस्थेने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर भारताचा नकाशा दाखवतांना त्यात काश्मीर भारतात न दाखवता पाकिस्तानात दाखवला होता.) या संस्थेकडून कोट्यवधी रुपयांच्या देणग्या घेणे, ‘एफ्.सी.आर्.ए.’ (फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन ॲक्ट) कायद्याचा भंग करणे, लाखो रुपयांची मिळकत हिशोबात न दाखवणे, पन्नालाल राजपूतसारख्या ‘रॉकेल’ माफियाला अंधश्रद्धा निर्मूलन पुरस्कार देणे आणि टीका झाल्यावर तो परत घेणे, सहकारी संस्थांमध्ये लाखो रुपयांच्या मुदत ठेवी व्यक्तीगत नावे करून संस्थेच्या हिशोबात त्या न दाखवणे, अशा अनेक घोटाळ्यांविषयी धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयात त्यांच्या विरोधात अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत; परंतु आजच्या लेखात त्यांच्या आर्थिक घोटाळ्यांविषयी न बोलता त्यांच्या बौद्धिक गोंधळाविषयी अन् हेकटपणाविषयी पाहू.

१. अनुवांशिक बौद्धिक गोंधळ कि दाभोलकरी हेकटपणा ? 

काही वर्षांपूर्वीचा काळ असा होता की, स्वत:ला ‘सेक्युलर’ (निधर्मी), पुरोगामी, बुद्धीवादी इत्यादी म्हणवणे फार सोपे होते. हिंदु धर्म, हिंदुत्वनिष्ठ संघटना, हिंदूंच्या प्रथा, परंपरा, सण, व्रते, उत्सव यांच्यावर उघड टीका केली, हिंदूंच्या देवतांची टवाळी केली की, लगेच स्वत:चे पुरोगामीत्व सिद्ध करता येत असे. त्या काळात स्वत:ला विज्ञाननिष्ठ वगैरे म्हणवणारे दाभोलकर, त्यांचे कुटुंबीय आणि अंनिसवाले हिंदूंच्या देवता, सण, व्रते इत्यादींवर थेट टीका करत असत. वृत्तवाहिन्यांवरील चर्चांमध्ये तर स्वत: नरेंद्र दाभोलकर आणि त्यांचे कुटुंबीय यांनी ‘धर्म हीच अफूची गोळी’ असल्याचे जाहीरपणे सांगून त्यांच्या नसानसांत कार्ल मार्क्सचे रक्त भिनल्याचे दाखवून दिले होते.

सध्या हिंदूंमध्ये जागृती होत असल्याने ते तितकेसे सोपे राहिलेले नाही. हिंदू जागृत होत आहेत. त्यामुळे हिंदूंच्या मंदिरांतील परंपरा मोडून महिलांना गर्भगृहात प्रवेश देण्यासाठी काही भामट्यांनी आंदोलने केल्यावर अंनिसनेही त्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. तेव्हा हिंदुत्वनिष्ठांनी अंनिसला खुले आव्हान दिले होते, ‘मुसलमान भगिनींनाही मशिदीत आणि दर्ग्यात प्रवेश मिळावा, यासाठी आमच्या समवेत आंदोलनाला या.’ तेव्हा मात्र कार्ल मार्क्सचे वंशज असलेले अंनिसवाले ओरडू लागले, ‘आम्ही हिंदु असल्याने आम्ही आमच्या धर्मातील अंधश्रद्धा आधी नष्ट करणार.’ म्हणजे गंमत पहा. हिंदूंच्या विरोधात िकंवा हिंदु धर्माच्या विरोधात बोलतांना ‘धर्म हीच अफूची गोळी’ असते; पण इस्लाम किंवा मुसलमानांशी पंगा घेण्याची वेळ आली की, एका झटक्यात हे हिंदू होऊन जातात. हे यांचे अनुवांशिक ‘कन्फ्युजन’ (गोंधळ) आहे कि हेकटपणा ?

२. … हा तर दाभोलकरी हेकटपणा ! 

‘जी गोष्ट विज्ञानाच्या प्रयोगशाळेत सिद्ध करता येते, तेच आम्ही मानू. अन्यथा ती अंधश्रद्धाच’, असा दाभोलकरी हेकटपणा त्यांच्या अनुयायांतही दिसून येतो; पण अशा कितीतरी गोष्टी या जगात आहेत, ज्या विज्ञानाच्या प्रयोगशाळेत सिद्ध करता येत नाहीत; पण त्याचे अस्तित्व आपण मानतो. विज्ञानाने बनवलेल्या उपकरणांच्या आधारे आपण मनातील विचारांचा शरिरावर होणारा परिणाम पाहू शकतो; पण ते मन नेमके कसे आणि कुठे आहे, हे प्रयोगशाळेतही सिद्ध करता येणार नाही. मग मनाचे अस्तित्व मानायचे नाही का ?

३. प्रत्यक्ष पुरावा नसेल, तर परिस्थितीजन्य पुराव्याचा आधार घ्यावा लागणे

‘दाभोलकरी हेकटपणानुसार प्रयोगशाळेत सिद्ध करता येणारी गोष्टच मानायची, बाकी सगळ्या अंधश्रद्धा’, असे म्हणायचे झाले, तर ‘उद्या सूर्य उगवणार आहे का ?’, हे विज्ञानाच्या प्रयोगशाळेत सिद्ध करता येते का ? त्याचे उत्तर ‘नाही’ असेच आहे. मग उद्या सूर्य उगवणार नाही, असे म्हणणार का ?

कुठल्याही गोष्टीसाठी एक तर प्रत्यक्ष पुरावा असतो किंवा परिस्थितीजन्य पुरावा असतो. उदाहरणार्थ ‘अ’ ही व्यक्ती पाण्यात पडली आणि त्यामुळे भिजली. ही गोष्ट ‘ब’ने प्रत्यक्ष पाहिली, तर ‘अ’ ही व्यक्ती पाण्यात पडून भिजली, याला प्रत्यक्ष पुरावा आहे; पण ‘ब’ ला पाण्यात पडतांना कुणीही पाहिले नसले, तरी ‘ब’ भिजला आहे आणि त्याच्याजवळ पाण्याचा साठा (नदी/तलाव) आहे. याचा अर्थ ‘ब’ पाण्यात पडून भिजला, हा परिस्थितीजन्य पुरावा आहे.

मग उद्या सूर्य उगवणार आहे का ?, हे विज्ञानाच्या प्रयोगशाळेत सिद्ध करता येत नसले, तरीही गेली कोट्यवधी वर्षे सूर्य एकदाही उगवायचा थांबला नाही. त्यामुळे तो उद्याही उगवणारच आहे. हा परिस्थितीजन्य पुरावा झाला; पण सगळे काही विज्ञानाच्या प्रयोगशाळेतच सिद्ध करण्याचा हेकटपणा बनावट विज्ञानवादी करत असतात.

श्री. विक्रम भावे

४. विज्ञान किंवा मानवी बुद्धी यांच्या मर्यादा 

काही गोष्टी विज्ञानाच्या प्रयोगशाळेत सिद्ध करता येत नसल्या, तरीही आपण त्या मानतो. तिथेच आपण विज्ञानाच्या मर्यादाही मान्य करतो. येथे मूलभूत गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, मानवी मेंदूच्या मर्यादा याच विज्ञानाच्या मर्यादा असतात. याचे अगदी सोपे उदाहरण द्यायचे झाले, तर आज विज्ञान प्रजननाविषयी सांगू शकते, म्हणजे स्त्रीबीज आणि पुबीज यांचा संयोग होणे, गर्भधारणा होणे, गर्भाची वाढ होणे, नाळेद्वारे पोषण होणे, अपत्य जन्माला येणे या सगळ्या गोष्टी कशा होतात, हे विज्ञान आज तपशीलवार सांगू शकते. याचा अर्थ ‘मूल जन्माला कसे येते’, हेच विज्ञान सांगू शकते; पण ‘मुळात मूल जन्मालाच का येते ?’, या प्रश्नाचे उत्तर विज्ञानाकडे नाही. ते केवळ धर्म किंवा अध्यात्म यांच्याकडेच आहे.

५. सर आर्थर एडिंग्टन या अनेक पारितोषिक विजेत्या वैज्ञानिकाचे विज्ञानाच्या क्षमतेविषयीचे मत

इंग्लंडमध्ये सर आर्थर एडिंग्टन नावाचे प्रथितयश खगोल आणि भौतिक शास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांना एकदा एका पत्रकाराने प्रश्न विचारला, ‘विज्ञानाला धर्म किंवा अध्यात्म यांची किती माहिती असू शकते ?’ या प्रश्नाला उत्तर देतांना सर आर्थर एडिंग्टन म्हणतात, ‘समजा, अथांग समुद्रात एक जहाज चालले आहे, त्या जहाजात सहस्रो बटाट्याची पोती भरली आहेत, त्या सहस्रो पोत्यांपैकी एका पोत्यात एक बटाटा आहे, त्या बटाट्याच्या मध्यभागी एक अळी आहे, त्या अळीला समुद्राविषयी जेवढी माहिती असू शकते, तेवढीच माहिती विज्ञानाला धर्म किंवा अध्यात्म यांची असू शकते.’

अनेक पारितोषिक विजेत्या वैज्ञानिकाने दिलेल्या या उत्तरातून बरेच काही स्पष्ट होते. अंनिसवाले दाभोलकरी हेकटपणा बाजूला ठेवून या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या वैज्ञानिकाच्या मताचा अंतर्मुखतेने विचार करणार कि सर आर्थर एडिंग्टन यांना भोंदूबाबा ठरवणार ?

६. पुनर्जन्माला दुजोरा देणार्‍या पाश्चात्त्य डॉ. ब्रायन वाईज यांना अंनिसवाले भोंदूबाबा ठरवणार का ?

मृत्यूनंतर स्थूल शरीर सुटले, तरीही काहीतरी अस्तित्व शिल्लक रहाते. धर्म किंवा अध्यात्मशास्त्र त्याला ‘लिंगदेह’ म्हणते. अंनिसवाले मात्र या गोष्टीच मानत नाहीत. त्यांना अंधश्रद्धा ठरवून मोकळे होतात. विज्ञानाच्या प्रयोगशाळेत सिद्ध होत नाही; म्हणून ते मानायचे नाही, हा त्यांचा हेकटपणा असतो; पण त्यासह पुनर्जन्म किंवा लिंगदेह नसतोच, हेही आजवर विज्ञानाच्या प्रयोगशाळेने सिद्ध करून दाखवलेले नाही. डॉ. ब्रायन वाईज नावाचे प्रथितयश मानसोपचार तज्ञ, संमोहन उपचार तज्ञ आणि लेखक होऊन गेले. ते ‘अमेरिकन सोसायटी ऑफ सायकॅट्री’चे अध्यक्ष होते. त्यांनी ‘पुनर्जन्म’ या विषयावर प्रचंड संशोधन केले आहे. इंटरनेटवर त्यांच्या संशोधनाविषयी पुष्कळ माहिती उपलब्ध आहे आणि यूट्यूबवर त्याचे अनेक व्हिडिओही उपलब्ध आहेत. अंनिसवाले स्वत:चा हेकटपणा सोडून आणि झापडे काढून ठेवून अंतर्मुख होऊन त्याचा अभ्यास करणार कि डॉ. ब्रायन वाईज यांना भोंदूबाबा ठरवणार ?

७. ‘नोबेल’ पारितोषिक विजेत्या वैज्ञानिकाला अंनिसवाले भोंदूबाबा म्हणणार का ?

भौतिकशास्त्राचे ‘नोबेल’ पारितोषिक विजेते जर्मन वैज्ञानिक वर्नर हायझेनबर्ग यांनी बरेच संशोधन करून असा निष्कर्ष काढला, ‘विश्वातील पदार्थांचे अणूपेक्षाही सूक्ष्म कण विश्वात आहेत. (अध्यात्म सांगते ते सत्त्व, रज आणि तम ते हेच) त्या कणांना मानवी काळाचे बंधन नाही आणि त्या कणांना मृत्यूही नाही. मनुष्याच्या मृत्यूनंतर त्याच्यातील चैतन्य अशाच काही कणांच्या रूपात अस्तित्वात रहात असावे, हे शक्य आहे.’ तेव्हा विज्ञानाच्या मर्यादा लक्षात आलेला हा वैज्ञानिक म्हणतो, ‘प्राकृतिक विज्ञानाच्या पेल्यातील पहिले काही घोट तुम्हाला नास्तिक बनवतील; मात्र पेल्याच्या तळापर्यंत गेला, तर तिथे परमेश्वर तुमची वाट पहात असल्याचे लक्षात येईल.’ अंनिसवाल्यांनी प्राकृतिक विज्ञानाच्या पेल्यातील पहिले काही घोट आताशी घेतले आहेत, अजून त्यांना पेल्याच्या तळापर्यंत जायचे आहे, असे म्हणायचे का ? कि त्यांना जाणीवपूर्वक पेल्याच्या तळापर्यंत जायचेच नाही ? नोबेल पारितोषिक विजेत्या वर्नर हायझेनबर्ग यांचे हे विधान अंनिसवाले गांभीर्याने घेणार कि त्यांनाही भोंदूबाबा ठरवणार ?

८. मृत्यूनंतरचे जीवन आणि विज्ञानाच्या मर्यादा यांविषयी स्वानुभवाने सांगणार्‍या एबन अलेक्झांडर यांना अंनिसवाले भोंदू ठरवणार का ? 

अमेरिकेतील हावर्ड विद्यापिठात शिक्षण घेतलेले न्यूरोसर्जन (मज्जासंस्थेशी संबंधित तज्ञ) एबन अलेक्झांडर यांनी स्वत:च्या अनुभवाने ‘मृत्यूनंतरही काहीतरी आहे’, हे जाणले. त्याविषयी एबन अलेक्झांडर यांनी ‘प्रुफ ऑफ हेवन’ या नावाचे एक पुस्तकही लिहिले आहे. पूर्वी पुनर्जन्म न मानणारे हे बुद्धीवादी न्यूरोसर्जन कोमात गेले आणि कोमात गेल्यावर त्यांना जे अनुभव आले, ते कोमातून बाहेर आल्यानंतरही त्यांना स्मरत होते. कोमात असतांना एबन अलेक्झांडर यांना ठाऊक नसलेली त्यांच्या मूळच्या आई-वडिलांना (एबन हे दत्तक गेले होते) झालेली मुलगी, म्हणजे एबन यांची सख्खी बहीण त्यांच्या आत्म्याला भेटली, जिचा वर्ष १९९८ मध्ये मृत्यू झाला होता. इंटरनेटवर एबन अलेक्झांडर यांची मुलाखतसुद्धा प्रसिद्ध आहे. एकेकाळी बुद्धीवादी असलेले आणि पुनर्जन्म वगैरे गोष्टींवर विश्वास नसलेले हे न्यूरोसर्जन आज ‘पुनर्जन्म’ आणि ‘मृत्यूनंतरही काहीतरी आहे’, या गोष्टींवर विश्वास ठेवतात.

एबन यांनी घेतलेल्या अनुभवाला ‘निअर डेथ एक्सपिरिअन्स’ असे म्हणतात. त्यावरही अनेक शास्त्रज्ञांनी संशोधन केले आहे.

विशेष म्हणजे १०० हून अधिक रुग्णांवर संशोधन केल्यानंतर शास्त्रज्ञ या निष्कर्षाप्रत आले आहेत, ‘निअर डेथ एक्सपिरिअन्स’, म्हणजे ‘मृत्यूसमीप अनुभव’ हे माणसाच्या पूर्वस्मृती नसतात आणि त्याच्या कल्पनाही नसतात. अंनिसवाले हेकटपणा सोडून आणि झापडे काढून याचा अभ्यास करणार कि एबन अलेक्झांडर यांना भोंदूबाबा ठरवणार ?

९. बुद्धीवादाचे ढोंग सोडून अंनिसवाले बुद्धीदात्या ईश्वराला समजून घेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार का ? 

यापूर्वीच्या सूत्रांत आपण पाहिले की, मानवी मेंदूच्या, म्हणजे बुद्धीच्या मर्यादा याच विज्ञानाच्या मर्यादा असतात. याचा अर्थ जी गोष्ट मानवी मेंदूला किंवा बुद्धीला कळत नाही, उमजत नाही, ती गोष्ट विज्ञानालाही कळत नाही. धर्म, अध्यात्म, आत्मा या गोष्टी मानवी बुद्धीच्या आवाक्याबाहेरच्या आहेत आणि म्हणून त्या विज्ञानाच्याही आवाक्याबाहेरच्या आहेत. मग हा दोष किंवा या मर्यादा मानवी बुद्धीच्या नाहीत का ? एखादा आंधळा माणूस जर असे म्हणू लागला, ‘मला जग दिसत नाही, म्हणजे जगच अस्तित्वात नाही’, तर त्याचे हे म्हणणे जितके हास्यास्पद आहे, तितकेच हास्यास्पद विज्ञानाला किंवा मानवी बुद्धीला सर्वश्रेष्ठ मानणे ठरेल.

त्यामुळे मानवी बुद्धीला आणि पर्यायाने विज्ञानाला जे दिसत नाही, त्याचे अस्तित्वच नाकारण्याऐवजी ‘तो मानवी बुद्धीचा, म्हणजेच विज्ञानाचा दोष किंवा कमीपणा किंवा त्या मर्यादा आहेत’, हे प्रामाणिकपणे मान्य करून धर्म अन् अध्यात्म समजून घेण्याचा, बुद्धीदाता ईश्वर त्याला समजून घेण्याचा प्रयत्न स्वत:ला विज्ञाननिष्ठ म्हणवणार्‍यांनी केला, तर खर्‍या अर्थाने त्यांच्या जन्माचे सार्थक होईल. अन्यथा भविष्यात खरे ‘शास्त्रज्ञ’ जेव्हा धर्म आणि अध्यात्म यांचे श्रेष्ठत्व मान्य करून विज्ञानाच्याच परिभाषेत ते जगाला सांगतील, तेव्हा अंनिसवाल्यांसारखे ‘उथळ वैज्ञानिक भोंदू’ ठरवले जातील.

– श्री. विक्रम विनय भावे, हिंदु विधीज्ञ परिषद, मुंबई. (९.८.२०२५)