स्वातंत्र्यवीर सावरकर आणि विद्यमान भारत सरकार यांची राजनीती !

१५ ऑगस्ट या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण काँग्रेसच्या काळात स्वत्व, स्वाभिमान, राष्ट्रवाद कस्पटासमान; भारतात चांगले राजकारणी आणि विद्वान यांचे झालेले संशयास्पद मृत्यू, अधम लोकांसाठी शस्त्राचारावाचून अन्य कोणताही पर्याय नसणे, इस्लामी साम्राज्य स्थापन करण्याची मुसलमानांची मनीषा आणि सत्य, अहिंसा अन् असहकार यांनी देश स्वतंत्र करता येत नाही’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/946261.html                                                               

काश्मीरसाठीची कलमे रहित करून काश्मीर वाचवले !

राज्यघटनेतील कलम ३७० मुळे जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा दिला होता. त्यामुळे आतंकवाद्यांसाठी काश्मीर हे भारतात येण्याचे प्रवेशद्वार झाले. पाकिस्तानने आतंकवाद पोसला. चीन, अमेरिका आणि युरोप यांनी सर्व प्रकारचे साहाय्य पाकिस्तानला केले. त्यामुळे देशातील बहुसंख्य हिंदु समाजाला काश्मीर येथून काढता पाय घ्यावा लागला. देशाच्या स्वातंत्र्याचे आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याच्या हेतूने विद्यमान भारत सरकारने ३७० आणि ‘३५ अ’ ही कलमे हद्दपार करून जम्मू-काश्मीर राज्य वाचवले.

वस्तू आणि सेवा कर पद्धतीमुळे तिजोरीतील रक्कमेत वाढ !

मोदी यांनी ‘जी.एस्.टी. (वस्तू आणि सेवा कर)’ ही करपद्धत अस्तित्वात आणली, त्यामुळे देशाच्या तिजोरीत कमालीची वाढ झाली. पूर्वी कररूपात सरकारी तिजोरीत जमा होणारा पैसा हा केवळ २० ते २५ टक्के एवढाच होता. ‘जी.एस्.टी.’ लागू केल्यामुळे सरकारी तिजोरीत जमा होणार्‍या पैशांची रक्कम ८० टक्क्यांपर्यंत वाढली. त्यामुळेच आपल्याला विविध क्षेत्रांत भरभराट करता आली. मुख्यत्वेकरून सैन्यदल अधिक सक्षम करता आले. ‘मेक इन इंडिया’वर (भारतात उत्पादन करणे) जोर देता आला. वस्तूंची खरेदी करतांना अधिकाधिक जनता ‘डिजिटल पेमेंट’मध्ये करू लागली. परिणामी कर चुकवण्याचे प्रमाण घटले.

श्री. दुर्गेश परुळकर

आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा अधिकाधिक उज्ज्वल !

अनेक गोष्टींमध्ये आपला देश स्वावलंबी झाला. विशेषतः शस्त्रास्त्र निर्मितीमध्ये आपण मोठी झेप घेतली आहे. आर्थिकदृष्ट्या आपण जगात चौथ्या क्रमांकावर आहोत. युरोप खंडाचा विचार करता जर्मनी हा एकमेव देश असा आहे की, ज्याचा ‘जीडीपी’ (सकल देशांतर्गत उत्पन्न) आपल्याहून अधिक आहे. युरोपातील उरलेल्या देशांचा ‘जीडीपी’ आपल्यापेक्षा न्यून आहे. आर्थिकदृष्ट्या  विचार करता आपण आज जगात चांगले स्थान प्राप्त केले आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाची प्रतिमा अधिकाधिक उज्ज्वल होत चालली आहे. ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशन’ (ओआयसी) या संघटनेची स्थापना वर्ष १९६९ मध्ये झाली. जगातील एकूण ५७ मुसलमान देश या संघटनेचे सभासद आहेत. भारतात मुसलमानांची संख्या अधिक असूनही या संघटनेचे सदस्यत्व पाकिस्तानने विरोध केल्यामुळे भारताला देण्यात आले नाही. असे असले, तरी वर्ष २०१९ मध्ये ‘ओआयसी’ या संघटनेने भारताला विशेष निमंत्रण देऊन भारताचा सन्मान केला. पाकिस्तानने प्रथम त्याला विरोध केला होता; पण पाकिस्तानच्या विरोधाला न जुमानता अन्य इस्लामी देशांनी भारताचा सन्मान केला. आजही जगातील अनेक इस्लामी देश भारताच्या बाजूचे आहेत. अयोध्येत प्रभु श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होऊन मंदिर उभे राहिले; पण जगातील एकाही इस्लामी राष्ट्राने भारताला दोषी ठरवले नाही.

राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन जगात मैत्रीपूर्ण संबंध !

भारत आता पूर्वीचा राहिलेला नाही, हे जगाला कळून चुकले आहे. वीर सावरकर यांनी सांगितल्याप्रमाणे ‘राष्ट्रहिताच्या आड येणारा जगातील प्रत्येक देश आपला शत्रू आहे. आपल्याशी मैत्रीपूर्ण व्यवहार करून परस्परांचा लाभ करू पहाणारा कोणताही देश भारताचा मित्र मानला पाहिजे. जगातील सगळेच देश आपापल्या स्वार्थाचा विचार करतात, त्यामुळे भारतानेसुद्धा स्वतःच्या स्वार्थाचा विचार केला, तर त्यात अयोग्य असे काही नाही.’ वीर सावरकर यांच्या या विचाराला अनुसरूनच नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन जगात मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले, ही कौतुकास्पद गोष्ट आहे. असे मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करतांना भारताने सातत्याने अनेक देशांना साहाय्याचा हात दिला आहे.

तुर्कीये येथे भूकंप होऊन जीवित आणि वित्त हानी झाली म्हणून भारताने साहाय्याचा हात दिला. तथापि तुर्कीयेने त्याविषयी कृतज्ञतेचा भाव बाळगला नाही.  ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी तुर्कीयेने पाकिस्तानला शस्त्रपुरवठा केला, तसेच ड्रोनही पुरवले. म्हणून भारताने तुर्कीयेला धडा शिकवायचे ठरवले.

सायप्रस आणि ग्रीस यांना साहाय्य करून पाकप्रेमी तुर्कीयेला घेरणे !

सायप्रस आणि ग्रीस हे तुर्कीयेचे शेजारील देश आहेत. सायप्रसची ३३ टक्के भूमी तुर्कीयेने हडपली आहे. अलीकडेच ‘जी ७’च्या शिखर परिषदेला मोदी कॅनडात गेले होते. त्यानंतर त्यांनी क्रोएशिया आणि सायप्रस या दोन देशांना भेट दिली. सायप्रसने मोदींना निमंत्रण देतांना विनवले होते की, प्रतिनिधी मंडळासह आमच्या देशाला भेट द्या. त्याप्रमाणे मोदी १०० अधिकार्‍यांचे प्रतिनिधी मंडळ घेऊन सायप्रसला गेले. या भेटीत विविध सूत्रांवर सविस्तर चर्चा होऊन अनेक करारांवर स्वाक्षर्‍याही झाल्या. परस्परांना साहाय्य कसे करता येईल ? याविषयी चर्चा झाली. सायप्रस हा युरोपियन युनियनचा सदस्य असलेला देश आहे. वर्ष २०२६ मध्ये युरोपियन युनियनचे अध्यक्षपद सायप्रसला प्राप्त होणार आहे. त्यामुळे भारतासाठी सायप्रस युरोपियन युनियनचे प्रवेशद्वार ठरत आहे. कोणत्याही देशाशी मैत्री करतांना भारत केवळ आर्थिक लाभाचा विचार करून मैत्री करत नाही, तर आपल्यापेक्षा लहान असलेल्या देशांना स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी, त्यांचा विकास व्हावा, या हेतूने मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करत आहे. त्याचसमवेत भारताने निर्माण केलेली शस्त्रास्त्रे खरेदी करण्यासाठी नवीन बाजारपेठ भारत निर्माण करत आहे. सायप्रस आणि ग्रीस या दोन्ही देशांनी भारतीय बनावटीची शस्त्रास्त्रे खरेदी करण्यास होकार दिला आहे. सायप्रस आणि ग्रीस या दोन देशांशी भारताशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाल्यामुळे तुर्कीयेची डोकेदुखी वाढणार आहे. पाकिस्तानला पाठिंबा देऊन तुर्कीये भारताशी वैर साधत आहे. त्याचप्रमाणे भारताने सायप्रस आणि ग्रीस या दोन देशांना सर्व प्रकारचे साहाय्य करून तुर्कीयेला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

मुसलमानबहुल देशांनी मोदी यांचा सर्वोच्च नागरिक पुरस्काराने सन्मान करणे

मध्यपूर्व क्षेत्रात तुर्कीयेला स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे. सौदी अरब तुर्कीयेला ती संधी उपलब्ध करून देणार नाही. तुर्कीयेला जगातील सर्व इस्लामी देशांचे नेतृत्व करायचे आहे. त्या दृष्टीने त्याची धडपड चालू आहे. तुर्कीये हा शिया मुसलमानांचा देश आहे. सौदी अरब हा सुन्नी मुसलमानांचा देश आहे. शिया मुसलमानांपेक्षा सुन्नी मुसलमानांची जगात संख्या अधिक आहे. सौदी अरब सर्व इस्लामी देशांचे नेतृत्व करणारे राष्ट्र आहे. सौदी अरबमुळे तुर्कीयेला सगळ्या इस्लामी देशांचे नेतृत्व करण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार नाही. सौदी अरब आणि भारत यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सौदी अरबने सर्वोच्च नागरी सन्मान केला. संयुक्त अरब अमिरात, बाहरीन, अपगाणिस्तान, पॅलेस्टाईन, कुवेत यांसारख्या अनेक मुसलमानबहुल देशांनी नरेंद्र मोदी यांचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. मोदी यांचा झालेला हा सन्मान, म्हणजे भारताचा सन्मान आहे. तुर्कीयेला धडा शिकवण्यासाठी प्रत्यक्ष युद्ध करण्याची आवश्यकता नाही. तुर्कीयेच्या बाजूला असलेल्या सायप्रस आणि ग्रीस या दोन देशांशी आर्थिक व्यवहार वाढवणे, भारतनिर्मित अव्वल दर्जाची शस्त्रास्त्रे पाठवणे, या दोन्ही देशांचा आर्थिक विकास साधणे, अशा गोष्टी भारत करू शकतो.

 तुर्कीयेला धडा शिकवण्यासाठी भारताने अनेक पावले उचलणे !

तुर्कीयेने भारताशी केलेले वैर आता तुर्कीयेला भोगावे लागणार आहेत. भारतातील अनेक विमानतळांची देखभाल करण्याचा ठेका तुर्कीयेच्या खासगी आस्थापनाने घेतला आहे. हे खासगी आस्थापन तुर्कीयेचे राष्ट्रपती एर्दाेगन यांच्या मुलीचे आहे. तुर्कीयेने भारताशी वैर साधल्यामुळे भारताने त्या आस्थापनावर बंदी घातली आहे. भारतातून तुर्कीयेला जाणार्‍या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. भारतातील अनेक जणांचे विवाह (डेस्टिनेशन वेडिंग) तुर्कीयेमध्ये होत होते. त्यातही आता घट झाली आहे. तुर्कीयेने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी पाकला केलेले साहाय्य तुर्कीयेला अशी महागात पडत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे भारताच्या सैन्यशक्तीचा अनुभव जगाने घेतला आहे, तसेच भारताची शस्त्रास्त्र निर्मिती क्षेत्रातील शक्ती जगाला थक्क करत आहे. स्वतंत्र तंत्रज्ञानाच्या बळावर भारताची प्रगती जगाने अनुभवली आहे. त्यामुळे जगातील मोठमोठ्या देशांच्या पंक्तीत त्यांच्या मांडीला मांडी लावून भारत बसला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने स्वत:चा दबदबा निर्माण केला आहे. त्यामुळे अनेक देश भारताशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाल्याचा अभिमान बाळगत आहेत.

भारताकडून सायप्रसला जाण्यासाठी स्वतंत्र ‘कॉरिडॉर’ची निर्मिती !

तुर्कीये आणि सीरिया या दोन देशांच्या जवळ एका बेटावर सायप्रस देश वसला आहे. भारताने सायप्रसला जाण्यासाठी एक ‘कॉरिडॉर’ (प्रशस्त मार्ग) निर्माण केला आहे. त्याचे नाव आहे ‘इंडिया मिडल ईस्ट युरो इकोनॉमिक कॉरिडॉर’ ! त्यामुळे भारताला युरोपात थेट सामान पोचवता येणार आहे. तेथील बाजार भारतासाठी उपलब्ध होऊ शकतो. हमासने इस्रायलवर आक्रमण केले ते वर्ष २०२३ मध्ये. त्यामागचे कारण ‘इंडिया मिडल ईस्ट युरो इकोनॉमिक कॉरिडॉर’च्या कामात बाधा निर्माण करणे, हा होता. शत्रूचे बळ कमकुवत करण्यासाठी भारत प्रयत्न करत आहे आणि त्यात भारताला यश येत आहे. कोणत्याही संकटांना सामोरे जाण्याचे धैर्य भारताने गेल्या १० वर्षांत संपादन केले आहे. तुर्कीयेच्या हालचालींना आळा घालण्यासाठी तुर्कीयेवर सैनिकी आक्रमण करण्याची भारताला आवश्यकता राहिली नाही. भारत स्वतःचा आर्थिक व्यवहार वाढवण्यात आणि अव्वल दर्जाची शस्त्रास्त्रे निर्मिती करण्यामध्ये प्रगती करत चाललेला आहे. जगासाठी भारत ही जशी मोठी बाजारपेठ आहे, तसे जगातील अनेक देश भारतासाठी बाजारपेठ म्हणून उपलब्ध आहेत. प्राचीन काळातही भारताचा जगातील विविध देशांशी व्यापारी संबंध होता. भारतातील अनेक वस्तू विविध देशांमध्ये विकल्या जात होत्या. भारताचे ते गतवैभव भारताला पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी मोदी कार्यरत झालेले आहेत, असे आपण म्हणू शकतो.

(क्रमशः १८ ऑगस्टच्या दैनिकात)

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (२५.७.२०२५)