US Boys More Religious : अमेरिकेत जेन-झी मुलांचा धर्माकडे मुलींपेक्षा कल वाढला !

पुराणमतवादी रिपब्लिकन पक्षाची सत्ता आल्यापासून झाले परिवर्तन

(जेन-झी पिढी म्हणजे अशी मुले ज्यांचा जन्म वर्ष १९९७ ते २०११ या १५ वर्षांच्या कालावधीत झाला.)

वॉशिंग्टन (अमेरिका) – अनेकदा असे म्हटले जाते की, स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक धार्मिक असतात; पण अमेरिकेत ही धारणा पालटत आहे. ‘गॅलप’च्या वर्ष २०२४-२५ च्या विश्लेषणानुसार अमेरिकेतील ४२ टक्के तरुण पुरुषांनी धर्माला जीवनात ‘अतिशय महत्त्वाचे’ म्हटले. याच कालावधीत तरुण स्त्रियांचे प्रमाण २९ टक्के राहिले. प्रथमच पुरुष स्त्रियांपेक्षा पुढे राहिले. गेल्या २ वर्षांत हे परिवर्तन प्रथमच पहायला मिळत आहे. याचे कारण म्हणजे पुराणमतवादी विचारांचा रिपब्लिकन पक्ष पुन्हा सत्तेवर येणे होय. त्यांची ‘मागा’, म्हणजेच ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ (अमेरिकेला पुन्हा महान बनवा) ही मोहीम असून ती ‘व्हाईट सुप्रिमॅसिस्ट क्रिश्चॅनिटी’ (गोर्‍या ख्रिस्त्यांचे वर्चस्व) यावर केंद्रीभूत आहे.

१. तज्ञांच्या मते, यामागे केवळ श्रद्धाच नाही, तर ओळखीचे राजकारण आणि रुढीवादी विचार हेही मोठे कारण आहे. पुरुष धर्माला वैचारिक ओळखीचा भाग मानत आहेत.

२. ‘पब्लिक रिलिजियन रिसर्च इन्स्टिट्यूट’नुसार वर्ष २०१३ मध्ये २९ टक्के तरुण स्त्रिया स्वतःला कोणत्याही धर्माशी संबंधित मानत नव्हत्या. वर्ष २०२५ मध्ये हेच प्रमाण आता ४३ टक्के झाले आहे. याचे कारण म्हणजे धार्मिक संस्थांमधील पुरुषप्रधान विचार आणि भेदभाव होय.

३. त्याचसमवेत महिलांच्या भूमिकेविषयीची जुनी विचारसरणी, तसेच धार्मिक संस्थांमध्ये महिलांचा मर्यादित सहभाग यांसारख्या कारणांमुळे अनेक तरुण महिलांनी धर्मापासून अंतर राखण्यास आरंभले.

भारतात ६४ टक्के तरुण महिला अधिक धार्मिक !

‘प्यू रिसर्च सेंटर’च्या वर्ष २०२१ च्या अहवालानुसार ६४ टक्के भारतीय महिला प्रतिदिन प्रार्थना करतात, तर पुरुषांमध्ये हे प्रमाण ५६ टक्के आहे.