आतंकवादविरोधी पथकाने रा.स्व. संघाच्या ३ कार्यकर्त्यांची हत्या केली ! – मेहबूब मुजावर, आतंकवादविरोधी पथकाचे माजी अधिकारी

  • मालेगाव प्रकरणात आतंकवादविरोधी पथकाच्या माजी अधिकार्‍याचा आरोप !

  • सरसंघचालकांच्याही अटकेचा होता कट !

मुंबई – मालेगाव बाँबस्फोटाच्या प्रकरणात आतंकवादविरोधी पथकाच्या अधिकार्‍यांनी मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांना अटक करण्यास सांगितले होते. पथकाच्या अधिकार्‍यांनी संघाचे प्रचारक संदीप डांगे, रामजी कलसांगरा आणि दिलीप पाटीदार यांची क्रूरपणे हत्या केली, असा गंभीर आरोप आतंकवादविरोधी पथकाचे माजी अधिकारी मेहबूब मुजावर यांनी दैनिक ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीला दिलेल्या मुलाखतीत केला.

मुजावर पुढे म्हणाले की,

१. ‘हिंदु आतंकवाद’ सिद्ध करण्यासाठी आतकंवादविरोधी पथकाचे अतिरिक्त आयुक्त परमवीर सिंह यांनी मला काही पोलिसांची निवड करून एक टीम करण्यास सांगितली होती. मी मुंबई, नांदेड, लातूर आणि सोलापूर येथील ८ ते १० अधिकार्‍यांची एक टीम सिद्ध केली. परमवीर सिंह माझे प्रमुख असल्यामुळे मी सर्व माहिती त्यांना देत होतो.

२. मोहन भागवत यांना अडकवण्याच्या मोहिमेत मी ८ महिने काम केले; परंतु त्यांना अटक केली नाही. त्यामुळेच मला खोट्या प्रकरणात अडकवून कारागृहात टाकण्यात आले. त्या वेळी मोहन भागवत यांना अटक केली असती, तर संघ संपला असता.

३. साध्वी प्रज्ञासिंह आणि कर्नल पुरोहित यांना अडकवण्यासाठी आतंकवादविरोधी पथकाच्या अधिकार्‍यांनी ६०० किलो ‘आर्.डी.एक्स्.’ ठेवल्याचे खोटे कथानक सिद्ध केले. हे सर्व मी पुराव्यानिशी बोलत आहे. वर्ष २०१५-१६ मध्ये हे सर्व पुरावे मी न्यायालयात सादर केले आहेत.

४. या प्रकरणात संदीप डांगे, रामजी कलसांगरा आणि दिलीप पाटीदार यांना नाहक गोवण्यात आले. आधी संदीप डांगे आणि रामजी यांची हत्या करण्यात आली आणि दिलीप पाटीदार हा या हत्यांचा साक्षीदार बनेल; म्हणून नंतर त्याचीही हत्या करण्यात आली. या तिघांनाही फरार घोषित करण्यात आले. याची चौकशी झाल्यास सर्व प्रकार उघड होईल