BRICS Against Trump : अमेरिकेच्या कर युद्धाविरुद्ध ‘ब्रिक्स’ देश एकवटणार !

ब्राझिलचा पुढाकार

(ब्रिक्स म्हणजे ब्राझिल, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथियोपिया, इंडोनेशिया, इराण आणि संयुक्त अरब अमिरात या १० उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचा समूह)

ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प

ब्राझिलिया (ब्राझिल) – डॉनल्ड ट्रम्प यांनी ब्राझिलवर लादलेल्या अतिरिक्त ५० टक्के आयात करावरून ब्राझिलने ‘ब्रिक्स’ देशांची ऑनलाइन बैठक आयोजित केली आहे. ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांनी व्यापारी करविरोधी उपाययोजना, तसेच सामान्य व्यापार चलन यांवर चर्चा करण्यासाठी ही बैठकी बोलावली आहे. लुला दा सिल्वा म्हणाले की, आमच्यासाठी लोकशाही, व्यावसायिक आदर आणि बहुपक्षीयता महत्त्वाची आहे. अमेरिका जो जुगार खेळत आहे, तो तिच्यासाठीच घातक ठरणार आहे.

लुला दा सिल्वा यांनी मांडलेली सूत्रे !

१. ब्राझिल जागतिक व्यापार संघटना, तसेच अन्य राजनैतिक मार्गांनी अमेरिकेसमवेतचा वाद सोडवण्याचा प्रयत्न करेल. असे असले, तरी डॉनल्ड ट्रम्प यांच्याशी थेट चर्चा होणार नाही.

२. समान व्यापार चलनाविषयी आम्ही कटीबद्ध आहोत. यामुळे डॉलरवरील जागतिक अवलंबित्व अल्प होईल.

३. डॉलरची हानी करायची नाही; परंतु ‘ब्रिक्स’मध्ये व्यापारासाठी आपण वेगळे चलन वापरावे, असे आम्हाला वाटते.

तथापि ट्रम्प यांनी चेतावणी दिली होती की, ब्रिक्स देशांनी समान व्यापार चलन निर्माण केल्यास त्यांच्यावर १०० टक्के कर आकारला जाईल.

संपादकीय भूमिका

अमेरिका आणि तिच्या विकसित देशांच्या ‘जी ७’पेक्षा ‘ब्रिक्स’चे जगात महत्त्व वाढत चालले असल्याने ट्रम्प यांना आता धडा शिकवणे आवश्यकच आहे !

(जी-७ म्हणजे कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन आणि अमेरिका या ७ विकसित देशांचा गट)