केंद्र सरकारचे ‘ऑपरेशन सिंदूर’ला पूर्ण स्वातंत्र्य होते ! – Army Chief Gen Upendra Dwivedi

सैन्यदलप्रमुख जनरल अनिल द्विवेदी

चेन्नई (तमिळनाडू) – ‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे बुद्धिबळ खेळण्यासारखे होते; कारण आम्हाला शत्रू काय प्रतिक्रिया देईल आणि आम्ही काय करणार ?, याचा काहीच अंदाज नव्हता. हा एक ‘ग्रे झोन’ (संदिग्धता असणे) होता. ग्रे झोन म्हणजे पारंपरिक युद्ध नक्कीच नव्हते, तर ही गोष्ट पूर्णपणे वेगळी होती. सैन्याने पारंपरिक मोहिमांपेक्षा हटके भूमिका घेतली. यासाठी सरकारने आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. आम्ही त्यांना चेकमेट करत होतो, जीव धोक्यात घालून शत्रूची अधिकाधिक हानी करण्याचा प्रयत्न करत होतो. हेच तर जीवन आहे, अशा शब्दांत भारताचे सैन्यदलप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ची अधिकृत माहिती दिली. ते आयआयटी मद्रास येथे ‘अग्नीशोध’ – इंडियन आर्मी रिसर्च सेल’च्या उद्घाटनाच्या वेळी बोलत होते. ‘ऑपरेशन सिंदूर – आतंकवादाविरुद्धच्या भारताच्या लढाईतील एक नवीन अध्याय’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी ऑपरेशन सिंदूर हे एक सुनियोजित, गुप्तचर-आधारित ऑपरेशन असल्याचे वर्णन केले, जे सैद्धांतिक पालटाला प्रतिबिंबित करते.

संरक्षणमंत्र्यांनी पाकला धडा शिकवण्याचे ठामपणे ठरवले होते !

जनरल द्विवेदी म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरची सिद्धता २३ एप्रिलपासून चालू झाली. त्या वेळी तीनही सैन्यदलाच्या प्रमुखांनी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी निर्णायक कारवाई करणे आणि पाकिस्तानला धडा शिकवणे आवश्यक आहे, असे ठामपणे ठरवले. संरक्षण मंत्री म्हणाले की, ‘हे फार झाले, आता कारवाई आवश्यक आहे.’ त्या वेळी तीनही सैन्यदलांच्या प्रमुखांच्या मनातसुद्धा हाच विचार होता. आम्हाला राजनाथ सिंह यांनी म्हटले की, ‘तुम्ही ठरवा काय करायचे.’ हाच विश्वास आमच्यासाठी अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा होता अन् आम्ही असे प्रथमच अनुभवले. यामुळे सैनिकांचे मनोबल वाढते. आम्ही नियोजन केले आणि आतंकवाद्यांची ठिकाणे उद्ध्वस्त केली. यात मोठ्या संख्येने आतंकवादी मारले गेले.

उरी आणि बालाकोटपेक्षा वेगळे होते ‘ऑपरेशन सिंदूर’ !

‘ऑपरेशन सिंदूर’ उरी आणि बालाकोट सारख्या मोहिमांपेक्षा वेगळेच होते.

‘ऑपरेशन उरी’ हे एक स्पष्ट संदेश देण्यासाठी राबवण्यात आले. त्यात आतंकवाद्यांचे ‘लाँच पॅड्स’ उद्ध्वस्त झाले. वर्ष २०१९ मधील बालाकोट येथील आक्रमण हे प्रत्युत्तर होते. पाकिस्तानमधील आतंकवादी प्रशिक्षण केंद्रांना लक्ष करण्यात आले, तर ऑपरेशन सिंदूर त्यापेक्षा अधिक व्यापक होते. शत्रूच्या घरात घुसून तिथले आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे छोटेसे नाव संपूर्ण देशाला कसे जोडते ?, हे महत्त्वाचे आहे. ही अशी गोष्ट आहे, जी संपूर्ण देशाला प्रेरणा देते; म्हणूनच संपूर्ण देश म्हणत होता की, ‘तुम्ही हे का थांबवले ?’ हा प्रश्न विचारला जात होता आणि त्याचे पूर्ण उत्तर देण्यात आले आहे.  जर तुम्ही पाकिस्तानी नागरिकांना विचारले की, ‘तुम्ही जिंकलात कि हरलात ?’, तर तो सांगेल ‘आमचा सैन्यदलप्रमुख ‘फील्ड मार्शल’ झाला.