वाचनमहत्त्वम् । (अर्थ : वाचनाचे महत्त्व)

कु. प्रार्थना महेश पाठक

उपस्थितानां गुरुजनानां वन्दनं कृत्वा अहं प्रार्थना महेश पाठक अद्य भवद्भिः सह ‘वाचनमहत्त्वम्’ इति विषये वक्तुम् इच्छामि ।
अर्थ : उपस्थित गुरुजनांना वंदन करून मी कु. प्रार्थना महेश पाठक आज आपल्यासोबत ‘वाचनाचे महत्त्व’ या विषयावर बोलू इच्छिते.

वाचनं ज्ञानदं बाल्ये तारुण्ये शीलरक्षकम् ।
वार्धक्ये दुःखहरणं हितं सद्ग्रन्थवाचनम् ।।

अर्थ : वाचन हे बालपणी ज्ञान देणारे, तारुण्यात चारित्र्याचे रक्षण करणारे, वृद्धपणी दुःख दूर करणारे असते. सद्ग्रंथांचे वाचन हितकारक असते.

शिक्षायाः एकं महत्त्वपूर्ण सोपानं वाचनं इति अस्ति । पठनस्य अनेकाः पक्षाः सन्ति । यथा पुस्तकपठनम्, पाठ्येतर-पठनम्, चित्रपठनम्, इत्यादयः । वाचनवत् भावात्मकं जगत् अन्यत्र अनुभवितुं न शक्नुमः ।

अर्थ : वाचन ही शिक्षणातील महत्त्वाची पायरी आहे. वाचनाची अनेक अंगे आहेत. जसे पुस्तकवाचन, पाठ्येतर वाचन, चित्रवाचन इत्यादी. वाचनासारखे भावात्मक जग कुठेही अनुभवू शकत नाही.

अधुना वाचनस्य महत्त्वं किम् ? किमर्थं पठितव्यम् ? एतादृशाः प्रश्नाः अस्माकं मनसि उत्पद्यन्ते । वैज्ञानिके युगे गूगलस्य साहाय्येन वयं कतिपयेषु क्षणेषु कस्मिन् अपि विषये ज्ञानं प्राप्तुं शक्नुमः । अतः अद्य कोऽपि ज्ञानं प्राप्तुं पुस्तकवाचनं न करोति । तथापि वाचनसंस्कृतिरक्षणम् अस्माकं कर्तव्यम् अस्ति इति न विस्मरेम । वाचनसंस्कृतेः प्रसारार्थं महतः वाचकस्य डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाममहोदयस्य जन्मदिनं १५ ऑक्टोबर ‘वाचनप्रेरणादिवस’रूपेण आचर्यते ।

अर्थ : आता वाचनाचे महत्त्व काय ? कशासाठी वाचावे ? असे प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात. वैज्ञानिक युगात गूगलच्या साहाय्याने कितीतरी क्षणांत कोणत्याही विषयावरील ज्ञान मिळवू शकतो. त्यामुळे सध्या कुणीही ज्ञान मिळवण्यासाठी पुस्तक वाचन करत नाही; परंतु वाचनसंस्कृतीचे रक्षण करणे, हे आपले कर्तव्य आहे, हे आपण विसरता कामा नये. वाचनसंस्कृतीच्या प्रसारासाठी महान वाचक डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन १५ ऑक्टोबर हा ‘वाचनप्रेरणादिन’ म्हणून साजरा केला जातो.

पुस्तकानां वाचनेन अस्माकं ज्ञानं वर्धते । उत्तमं वाचनं अस्माकं व्यक्तिमत्त्वं प्रभावशाली, मनः संस्कारशीलं, बुद्धिः प्रगल्भा च करोति । वाचनं खलु सामर्थ्यदायी साधनम् । अतः यदि वयं भावविश्वं समृद्धं कर्तुम् इच्छामः तर्हि अस्माभिः पठितव्यम् ।

अर्थ : पुस्तकांच्या वाचनाने आपले ज्ञान वाढते. उत्तम वाचन आपले व्यक्तीमत्त्व प्रभावशाली, मन संस्कारशील आणि बुद्धी प्रगल्भ करते. वाचन हे खरोखर सामर्थ्यदायी साधन आहे; म्हणून जर आपल्याला भावविश्व समृद्ध करण्याची इच्छा असेल, तर आपण वाचायला हवे.

अधुना वयं सर्वे छात्राः स्मः । छात्रेभ्यः वाचनं कथम् उपयुक्तम् ? विद्यार्थीदशायां अस्माकं विचारान् संस्कारान् च विकसन्ति । उत्तमं वाचनं कूर्मः चेत् अस्माकं विवेकबुद्धिः वर्धित्वा चारित्र्यं पवित्रं भवति । छात्रैः दिशाहीनेन भ्रमणेन, कुक्रीडया तथा च अपभाषणेन कालक्षेपः मा कर्तव्यः अपितु ते वाचनं आश्रयेयुः । वाचनेन समयस्य सम्यक् उपयोगः भवति । वाचनस्य विविधाः लाभाः सन्ति । ते लाभाः न केवलं वर्तमाने उपयुक्ताः अपितु भविष्यकालेऽपि उपयुक्ताः तदर्थं अस्माभिः पठितव्यम् ।

अर्थ : सध्या आपण सर्वजण विद्यार्थी आहोत. विद्यार्थ्यांना वाचन कसे उपयुक्त आहे ? विद्यार्थीदशेत आपले विचार आणि संस्कार विकसित होतात. उत्तम वाचन असेल, तर आपली विवेकबुद्धी वाढून चारित्र्य पवित्र होते. विद्यार्थ्यांनी दिशाहीन फिरणे, अपायकारक खेळ, वाईट बोलणे यांनी वेळ वाया घालवू नये, तर त्यांनी वाचनाचा आश्रय घ्यावा. वाचनाने वेळेचा चांगला उपयोग होतो. वाचनाचे विविध लाभ आहेत. ते लाभ केवळ वर्तमानातच नव्हे, तर भविष्यकाळातही उपयुक्त आहेत. त्यासाठी आपण वाचन करायला हवे.

जनाः मन्यन्ते यत् पठनं केवलं पुस्तकानामेव भवति, परन्तु वाचनं वैविध्यपूर्णमस्ति । प्रकृतौ वस्तूंना अवलोकनमपि पठनमेव । मनुष्यस्य मनसि आगताः विचाराः मुखपठनेन अवधारयितुं शक्यते । यदि भवान् नैकरूपेण वाचनं कर्तुम् इच्छति तर्हि उत्तमम् अवलोकनम् आवश्यकम् । एतस्य कृते एकाग्रता महत्त्वपूर्णा अस्ति ।

अर्थ : वाचन केवळ पुस्तकांचे असते, असे लोकांना वाटते; परंतु ते वैविध्यपूर्ण असते. निसर्गातील वस्तूंचे अवलोकन हेही वाचनच आहे. मनुष्याच्या मनात आलेले विचार त्याचा चेहरा वाचून ठरवणे शक्य होते. जर तुम्हाला अनेक प्रकारे वाचन करण्याची इच्छा असेल, तर उत्तम निरीक्षण आवश्यक आहे. यासाठी एकाग्रता महत्त्वाची आहे.

एतादृशं वाचनं नैकानां महताम् जनानां प्रेरणास्थानं भवति । स्वामी विवेकानन्दमहोदयः, स्वा. सावरकरमहोदयः, लोकमान्य तिलकमहोदयप्रभृतयः महाजनाः उत्तमाः वाचकाः आसन् । प.पू. गोळवलकर (गुरुजी)महोदयः चत्वारिंशत् सहस्राधिकानि पुस्तकानि अपठत् । अतः ते महत् देशकार्यं कर्तुम् अशक्नुवन् । ते न केवलं पठन्ति स्म, अपितु तदनुसारं वर्तन्ते स्म ।

अर्थ : अशा प्रकारचे वाचन अनेक महान लोकांचे प्रेरणास्थान आहे. स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक यांसारखे महान लोक उत्तम वाचक होते. प.पू. गोळवलकर गुरुजींनी ४० सहस्र पुस्तके वाचली; म्हणून ते मोठे देशकार्य करू शकले. ते केवळ वाचत नसत, तर त्यानुसार वागत असत.

क्रियाहीनं वाचनं अस्माभिः पाण्डित्यस्य अहङ्कारम् एव ददाति, परन्तु पठनानुसारं कर्म यदि वयं कूर्मः तर्हि अस्माकं जीवनं सुखी, समृद्धं च भविष्यति इत्यत्र न संशयः । एकं सुभाषितम् अहं स्मरामि ।

अर्थ : कृती न करता नुसते वाचन आपल्याला विद्वत्तेचा अहंकारच देते; परंतु वाचल्याप्रमाणे कृती केली, तर आपले जीवन सुखी, समृद्ध होईल, यात शंका नाही. मला एका सुभाषिताचे स्मरण होते.

अज्ञेभ्यो ग्रन्थिनः श्रेष्ठा ग्रन्थिभ्यो धारिणो वराः ।
धारिभ्यो ज्ञानिनः श्रेष्ठा ज्ञानिभ्यो व्यवसायिनः ।।

– मनुस्मृति, अध्याय १२, श्लोक १०३

अर्थ : अशिक्षितांपेक्षा ग्रंथांचे अध्ययन करणारा श्रेष्ठ, त्यापेक्षा ज्याची ग्रंथाची धारणा चांगली आहे तो श्रेष्ठ ! ग्रंथ धारकापेक्षा ग्रंथाचे यथार्थ ज्ञान झालेला श्रेष्ठ आणि ग्रंथाचे ज्ञान ज्याच्या वर्तनात उतरले, तो त्याच्यापेक्षा श्रेष्ठ !

पठने आनन्दं प्राप्नुमः यदा वयं एतस्य सुभाषितस्य अनुसरणं कर्तुं प्रयत्नशीलाः भवेम इति उक्त्वा अहं अत्र विरमामि । धन्यवादः ।

अर्थ : जर आपण या सुभाषिताचे अनुसरण करण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याला वाचनामध्ये आनंद प्राप्त होईल, असे सांगून मी येथे थांबते. धन्यवाद !

– कु. प्रार्थना महेश पाठक (वय १३ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), पुणे (२.८.२०२५)