‘याला जेवतांना काही ना काही गोड लागतेच‘ किंवा ‘हिला स्वीट फूड क्रेव्हिंगस् (गोड खाण्याची इच्छा) पुष्कळ आहेत’, अशी तक्रार अनेक आया करत असतात. लहान मुलांचे ‘स्वीट फूड क्रेव्हिंग’ आणि ते पुरवल्याने त्यांच्यामध्ये अनाठायी वजनवाढ हे दिसू शकतेच, त्यासह जंत वाढणे, पोषण योग्य ठिकाणी न पोचणे, त्यातून उद्भवणारे अधिक किंवा न्यून वजन, केस पांढरे होणे, अंगावर पांढरे डाग, शिंका, आळशीपणा, वारंवार नाक गळणे असे निरनिराळे त्रास चालू होतात. याला आळा घालण्यासाठी पुढील काही उपाय मी रुग्णांना सुचवते –

१. आयुर्वेद निदान आणि औषधे यांनी कृमीनाशन उपाय वैद्यांच्या सल्ल्याने करून घेणे. आयुर्वेदानुसार कृमी न्यून करण्यासाठी जंतांना बाहेर काढणे, त्यांची वाढ रोखणे आणि ते परत होऊ नयेत, यांसाठी शरिरात विरोधी वातावरणनिर्मिती करणे अशा पद्धतींत औषधोपचार केले जातात. अशाने ही गोड खाण्याची इच्छा न्यून झालेली दिसते. त्यानंतर गोड पदार्थ प्रमाणात ठेवणे, हे आपले उत्तरदायित्व !

२. ज्यांची मुले आता लहान आहेत, त्यांच्यासाठी सांगायचे, तर जेवतांना गूळ-तूप, तूप-साखर, दूध-साखर-पोळी यांची सवय लावूच नका. भाजी खात नाही; म्हणून बर्याचदा अशा पदार्थांचा समावेश जेवणात होतो. हे पदार्थ तोंडी लावणे; म्हणून दिले न जाता भाजीचा पर्याय म्हणून हे दिले गेले, तर त्यावर मुलांचे अवलंबून रहाणे वाढू लागते आणि सोपा आवडीचा पर्याय म्हणून त्यासाठी धांगडधिंगा करून पालकांना ते द्यायला लावले जातात.
३. साखरेला पर्याय म्हणून गूळ किंवा चॉकलेटला पर्याय म्हणून नियमित स्वरूपात गूळ नको (सेंद्रिय असला तरीही) ! मुळात गुळाचे गुणच कफ आणि कृमी वाढवणारे आहेत. त्यामुळे कशालाही पर्याय म्हणून दिला, तरी आपली जी गोड खाण्याची समस्या आहे, ती रहातेच; कारण हे सगळे पदार्थ एकाच वर्गात येतात. मुले भरपूर खेळत असतील, बाकी खाण्याच्या तक्रारी नसतील, दोन्ही वेळा भाजी-पोळी, वरण-भात खात असतील, तर खजूर, गूळ, पीठ वगैरे घालून खाऊच्या वेळी पौष्टिक लाडू द्यायला हरकत नाही.

४. भेट देतांना ‘चॉकलेट’ किंवा ‘केक’ न देता फळे किंवा सुकामेवा अधिकाधिक प्रमाणात दिल्यास सवय लागणार नाही. मुले स्वावलंबी होऊन आपापले खाईपर्यंत किमान त्यांना काय खावे ? काय खाऊ नये ? ही थोडी जाणीव त्यांच्यात झिरपेल.
५. आपण ज्या पद्धतीचे पदार्थ खातो, त्या चवीवर वाढणारे बॅक्टेरिया पोटात वाढीस लागतात. ‘हेल्दी गट’चा (निरोगी पोट) सध्या पुष्कळ बोलबाला आहे. गोड खाण्याविषयी बोलायचे, तर नुसते गोड सतत आणि अधिक खाण्याने ‘प्रोटिओबॅक्टेरिया’ वाढीस लागतो, ज्यामुळे आपोआप भाजी, धान्य असे पदार्थ पचवायला उपयोगी असा ‘बॅक्टेरॉयडीटीस’ (bacteroidetes) नावाची लाभदायी जिवाणूंची प्रजाती न्यून होते. त्यामुळे जे पचायला हवे, ते पचत नाही. ते खायची इच्छा न्यून होते आणि नको ते खाण्याकडे कल वाढू लागतो. एका विशिष्ट चवीवर वाढणारे जीवाणू पोटात वाढीस लागले की, त्याच पद्धतीचे खाणे खाण्याची इच्छा मेंदूपर्यंत पोचवली जाते; ज्याला आपण ‘फूड क्रेव्हिंग’ म्हणतो. अशाने तोच विशिष्ट पदार्थ अथवा चव खाण्याची अनिवार इच्छा मुलांना होत रहाते. सध्या यावर भरपूर संशोधन चालू आहे.
६. हे पदार्थ खायची सवयच मुळात न लावणे आणि जर सवय लागली असेल, तर काही काळासाठी आपले मन घट्ट करून मुलांचे मन मारणे, हट्टाच्या दबावाखाली न येणे, घरात हे पदार्थच न आणणे, संध्याकाळी खेळायला पाठवणे, वैद्यांकडून अग्नीवर्धन, कृमीनाशन औषधे घेऊन पोटातला अग्नी नीट करणे, म्हणजेच आताच्या भाषेत ‘द हेल्दी मायक्रोबायोम’ (The healthy microbiome), म्हणजे सूक्ष्मजीवांचा समुदाय वाढवणे, हे पर्याय रहातात.
७. प्रकृतीनुसार एखाद्याचा कल एखाद्या विशिष्ट चवीकडे असू शकतो; पण आपापल्या प्रकृतीनुसार चव आणि खाण्याचा समन्वय शरिरात साधत राहिला की, आरोग्य एका किमान स्तरावर सांभाळले जाते, हे नक्की ! मी नेहमी सांगते तसे ‘आवड कधीतरी जपावी, निवड मात्र कायम असावी !’
– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे.
आहारात साखर, तेल अल्प करा आणि व्यायामावर भर द्या ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
स्तनदुखी आणि स्तनातील गाठी : कारणे अन् आयुर्वेदाचा दृष्टीकोन
‘धूम्रपान करणे’ याचा साधकाच्या कुंडलिनी चक्रांवर अत्यंत प्रतिकूल परिणाम होणे
आयुर्वेदातील वात, पित्त आणि कफ समजून घ्या !
‘धूम्रपान करणे’ याचा साधकाच्या कुंडलिनीचक्रांवर अत्यंत प्रतिकूल परिणाम होणे
वातावरणात पालट होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुढचे १५ दिवस पाळायचे ५ नियम !