आरोग्याचा गाडा सावरणारा ‘आघाडा’

आजीची भाजी रानभाजी

विशिष्ट निगा अथवा खास शेती न करता उगवलेल्या भाज्यांना ‘रानभाज्या’ म्हणतात. जंगलात, शेताच्या बांधावर, माळरानात, लागवड न करता निसर्गतः या वाढत असतात. या वनस्पतींमध्ये खनिजे, महत्त्वाची मूलद्रव्ये, उपयोगी रसायने, औषधी गुणधर्म असतात. अशा रानभाज्यांची ओळख करून देणारी ‘आजीची भाजी रानभाजी’ ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या सौजन्याने जिल्हा माहिती कार्यालयाकडून चालू केलेली मालिका येथे दिली आहे. (भाग ५)

आघाडा

१. औषधी गुणधर्म आणि उपयोग

आघाडा वनस्पतीची मुळे, पाने, फुले, फळे औषधात वापरतात. हा कडू, तिखट, उष्ण, वायुनाशी, आम्लतानाशक, रक्तवर्धक, मूत्रजनक, मूत्राम्लतानाशक, पित्तसारक गुणधर्माचा आहे. ही वनस्पती भूक वाढवणारी असून वात, हृदयरोग, मूळव्याध, मूतखडा, पोटदुखी, जलोदर, अपचन, अमांश, रक्तरोग आदी रोग आणि विकारांत उपयुक्त आहे.

आघाड्याची राख वैद्यकीय द्रवात अग्रगण्य आहे. आघाड्याचा क्षार मज्जातंतू आणि हाडांना, तसेच रक्तकणांना उपयुक्त आहे. आघाडा वनस्पती वाळवून नंतर ती जाळून मिळवलेली राख पाण्यात मिसळतात. वस्त्रगाळ करून गाळलेले पाणी उन्हात सुकवतात. त्यापासून मिठासारखा क्षार जमतो. या क्षारामध्ये चुना, लोह, मीठ गंधक आदी घटक असतात. जेवणापूर्वी आघाडीचा काढा दिल्यास पाचकरस वाढतो, तर जेवणानंतर दिल्यास आम्लता न्यून होते. यकृतावर आघाड्याची क्रिया फार हितावह आहे.

आघाड्याच्या कोवळ्या पानांची भाजी करतात. ही भाजी पाचक असून लघवी साफ होण्यासाठी तिचा उपयोग होतो. या भाजीच्या सेवनाने हाडे मजबूत होतात. शरिरातील मेद न्यून करण्यासाठी आघाड्याची कोरडी भाजी उपयुक्त आहे. या भाजीने मुळव्याधीच्या तक्रारी न्यून होण्यास साहाय्य होते.

अ. भाजी करण्याची पद्धत १

श्री. प्रशांत सातपुते

आघाड्याची कोवळी पाने धुऊन चिरून घ्यावीत. कढईत तेल गरम करून, त्यात जिरे, चिरलेला कांदा, लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या घालाव्यात. चिरलेली मिरची घालावी. नंतर चिरलेली भाजी घालून मीठ घालावे. भाजी परतून झाकण ठेवावे. ती नीट शिजवून घ्यावी.

आ. भाजी करण्याची पद्धत २

दुसर्‍या पद्धतीत आघाड्याची पाने धुऊन चिरून घ्यावीत. कढईत तेल घेऊन लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या घालून फोडणी घ्यावी. नंतर चिरलेली भाजी तिखट, मीठ घालून चांगली वाफ येऊ द्यावी. भाजी अर्धवट शिजल्यावर डाळीचे पीठ हळूहळू घालून भाजी एकसारखी हलवावी. ती मोकळी होईल, मंद आचेवर शिजवून घ्यावी.

तर असा हा निरोगी आरोग्याचा गाडा सावरणारा ‘आघाडा’ आहे.

–  श्री. प्रशांत सातपुते, जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी.