केरळमधील ‘जिवंत हुतात्मा’ सदानंदन मास्टर !

श्री. सदानंदन मास्टर यांची राज्यसभेवर नियुक्ती !

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केरळमधील संघ कार्यकर्ते सदानंदन मास्टर यांची नुकतीच राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती केली. केरळमधील साम्यवाद्यांच्या रक्तरंजित राजकारणाचे आणि नृशंस हिंसेचे जिवंत उदाहरण म्हणजे सदानंदन मास्टर !

लेखिका सौ. शेफाली वैद्य

त्यांची कहाणी त्यांच्याच तोंडून ऐकण्यासारखी आहे. काही वर्षांपूर्वी जेव्हा भाजपने त्यांना केरळमधून लोकसभेची उमेदवारी दिली होती, तेव्हा साप्ताहिक ‘विवेक’साठी मी त्यांची मुलाखत घेऊन त्यांच्यावर हा लेख लिहिला होता. तोच लेख आज पुन्हा येथे देत आहे. महत्त्वाचे म्हणजे ही आहे सदानंदन मास्टर यांची कहाणी त्यांच्याच शब्दात सांगितलेली !

१. कसे वळले सदानंदन मास्टर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे ?

श्री. सदानंदन मास्टर

‘मी कन्नूर जिल्ह्यामधील मट्टनूर जवळच्या एका छोट्या गावात वाढलेला मुलगा. माझे वडील साम्यवादी पक्षाचे कार्यकर्ते होते. माझा मोठा भाऊ साम्यवादी पक्षाच्या युवा शाखेचे काम करायचा. साहजिकच लहानपणापासून मलाही साम्यवादी विचारांचेच बाळकडू मिळालेले. त्यात कन्नूर जिल्हा, म्हणजे केरळमधील साम्यवादाची प्रयोगशाळा. कन्नूरमधील पिनराई या गावात पहिल्यांदा केरळमध्ये साम्यवादी विचार रुजला. सध्याचे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् हे याच गावचे. त्यांच्यावर राजकीय हिंसाचाराचे आरोपही आहेत. कन्नूरमध्ये दुसर्‍या कुठल्याही विचारसरणीला पाय रोवू द्यायचा नाही, हे साम्यवादी पक्षाने ठाम ठरवलेले. त्यामुळे तेथील कुणीही रहिवासी राष्ट्रीय विचारांकडे आकृष्ट होतांना दिसला की, त्याच्याविरुद्ध, त्याच्या कुटुंबाविरुद्ध पद्धतशीरपणे मोहीम काढली जायची. आधी राजकीय आणि सामाजिक बहिष्कार, मग पदोपदी कामात अडवाअडवी अन् सगळ्यात शेवटी नृशंस हिंसाचार, अशी सगळी शस्त्रे वापरून विरोधी विचारांचा बीमोड करणे, हे केरळमधील साम्यवाद्यांचे धोरणच आहे. तरीही अशा भयानक परिस्थितीमध्येही कन्नूरमध्ये संघकार्याची स्थापना झाली. साम्यवाद्यांच्या दादागिरीला कंटाळलेले आणि साम्यवादी विचारांमधील फोलपणा उमजू लागलेले माझ्यासारखे काही तरुण संघविचारांकडे वळायला लागले. प्रारंभीला संघ गावागावांत रुजवण्यासाठी कार्यकर्त्यांनी घेतलेले असीम कष्ट आम्हाला दिसतच होते.

मी महाविद्यालयामध्ये असतांना ‘स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया’ (एस्.एफ्.आय.)चे काम करायचो; पण तोपर्यंत मला कळून चुकलेले होते की, साम्यवादी विचारसरणीत भारताला भेडसावणार्‍या प्रश्नांची उत्तरे मिळणे शक्य नाही. याच कालावधीत गावात काम करणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही कार्यकर्त्यांशी माझी ओळख झाली. त्यांची देशकार्याविषयीची तळमळ, भारताला सतावणार्‍या प्रश्नांची उत्तरे येथील मातीतच शोधणारी संघाची विचारसरणी याचा माझ्या मनावर नकळतच परिणाम होत गेला आणि मी त्याकडे आकृष्ट झालो. अधून मधून शाखेवर जायला लागलो. माझ्या वडिलांनी मला संघविचारांकडे वळण्यापासून परावृत्त करायचा प्रयत्न केला खरा; पण त्यात फार शक्ती नव्हती; कारण तोपर्यंत ते स्वतःही साम्यवादी पक्षाच्या विचारसरणीला थोडेसे कंटाळले होते; परंतु माझ्या जिवाला काही धोका होऊ नये; म्हणून ते मला अडवत होते. मी संघविचारांकडे वळलेला बघून एस्.एफ्.आय.मध्ये माझ्यासह काम करणारे मित्र पुष्कळ अस्वस्थ झाले. त्यांनी माझे मन वळवायचा पुष्कळ प्रयत्न केला; पण साम्यवाद्यांची अरेरावी, त्यांचा हिंसेकडे असलेला कल, कुठलाही विरोधी विचार निर्घृणपणे चिरडण्याची त्यांची वृत्ती यांमुळे माझा पुरताच भ्रमनिरास झाला होता. मी स्वतःला पूर्णपणे संघकार्याला वाहून घेतले.

२. संघ कार्यकर्त्यांनी उभारलेला बस थांबा साम्यवादी गुंडांनी तोडण्याचा प्रयत्न करणे

आमच्या गावात संघ कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन श्रमदानाने एक बस थांबा उभारला होता. तो बस थांबा केरळवर राज्य करणार्‍या साम्यवाद्यांच्या नाकर्तेपणाचा एक प्रतीक होता. जे सरकार करू शकले नाही, ते संघ शक्तीने साध्य करून दाखवले होते. त्यामुळे तो बस थांबा साम्यवादी कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत सलत होता. ८ सप्टेंबर १९९३ या दिवशी साम्यवाद्यांनी कन्नूरमध्ये बंद पुकारला होता. त्या दिवशी काही साम्यवादी गुंडांनी झुंडीने येऊन तो बस थांबा तोडायला प्रारंभ केला. खबर कळताच आम्ही संघ कार्यकर्तेही तिथे पोचलो. दोन्ही गटांमध्ये मारामारी झाली. मलाही बेदम मारहाण झाली. आम्ही केलेला प्रतिकार साम्यवाद्यांना आवडला नाही. मी साम्यवादी विचारांची कास सोडून संघविचारांकडे वळल्यामुळे मी त्यांच्या डोळ्यांत पुष्कळच सलत होतो. ‘मला जन्मभर लक्षात राहील, असा धडा शिकवलाच पाहिजे’, असे साम्यवाद्यांना वाटत होते. ती संधी त्यांना लवकरच मिळाली.

राष्ट्रवादी विचारांकडे कार्यप्रवण झाल्याने सदानंदन मास्टर यांचे साम्यवाद्यांनी करवतीने दोन्ही पाय कापणे !

कृत्रिम पाय बसवलेले सदानंदन मास्टर

संपूर्ण केरळ राज्य सदानंदन मास्टर यांना आज ‘जिवंत हुतात्मा’ म्हणून ओळखते. चष्मा लावलेले, जवळजवळ ६ फूट उंच, वयाच्या६१ व्या वर्षीही बलदंड शरीरयष्टी टिकवून असलेल्या सदानंदन मास्टर यांच्याकडे बघून वाटतही नाही की, त्यांचे दोन्ही पाय गुडघ्यापासून कापलेले आहेत. गेली ३१ वर्षे सदानंदन मास्टर हे कृत्रिम पाय लावून वावरतात; पण त्यांच्या उत्साहात, काम करण्याच्या शक्तीत जराही पालट नाही. त्यांचे विद्यार्थी त्यांना ‘माशे’ म्हणून ओळखतात. आपल्या या लाडक्या शिक्षकासाठी सदानंदन मास्टर यांचे विद्यार्थी काय वाट्टेल ते करायला सिद्ध आहेत, इतके मास्टरजी विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहेत.

वर्ष १९९४ मध्ये जेव्हा सदानंदन मास्टर यांना त्यांचे दोन्ही पाय गमवावे लागले, तेव्हा ते केवळ ३० वर्षांचे होते. त्यांना अपघात झाला नव्हता किंवा कुठला आजारही झाला नव्हता. सदानंदन मास्टर यांचे पाय केरळमधील साम्यवादी गुंडांनी अत्यंत क्रूरपणे करवत वापरून गुडघ्यांपासून कापून टाकले होते, तेसुद्धा भर बाजारात. सदानंदन मास्टर यांचा गुन्हा एकच होता, साम्यवादी विचारांची परंपरा असलेल्या कुटुंबात जन्मूनही त्यांनी राष्ट्रवादी विचारांकडे वळण्याचे धाडस केले होते. साम्यवादी वडिलांचा मुलगा संघविचारांनी प्रभावित होऊन स्वयंसेवक झाला होता, तेही केरळच्या कन्नूर जिल्ह्यात, जो जिल्हा केरळमधील साम्यवादी हिंसाचाराचा मूळ स्रोत आहे. या जिल्ह्यातील गावेच्या गावे अशी आहेत, जिथे केवळ एकाच राजकीय विचारसरणीचा, म्हणजे साम्यवादाचा प्रभाव चालतो. दुसर्‍या कुठल्याही विचारप्रणालीचे वारे जरी इथे फिरकले, तरी अत्यंत क्रूर अशी हिंसा वापरून त्या विचारसरणीच्या लोकांचा समूळ बीमोड करण्यात येतो आणि तरीही राष्ट्रवादी विचार केरळमध्ये संघाच्या रूपाने रुजत आहे, वाढत आहे. सदानंदन मास्टर हे त्या रुजत्या वाढत्या राष्ट्रवादाचे मूर्तीमंत प्रतीक आहेत.

– सौ. शेफाली वैद्य

३. साम्यवादी गुंडांनी सदानंदन मास्टर यांच्यावर केलेले क्रौर्य

मला अजूनही तो दिवस अगदी जसाच्या तसा आठवतो.२५ जानेवारी १९९४ ची संध्याकाळ. तेव्हा मी केवळ ३० वर्षांचा होतो. माझ्या बहिणीचे लग्न काही दिवसांवर आले होते. त्या संदर्भात काही बोलणी करायला; म्हणून मी माझ्या काकांकडे गेलो होतो. मी आनंदात होतो. माझेही लग्न ठरले होते, माझ्याच बी.एड्.च्या वर्गात शिकणार्‍या वनिता नावाच्या मुलीसह. आम्ही दोघांनी प्रेमाच्या आणा-भाका घेतल्या होत्या. दोघांचेही शिक्षण संपले होते आणि दोघांनी मिळून संसाराची उज्ज्वल स्वप्ने बघितली होती. आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे, याची आम्हा दोघांनाही कल्पना नव्हती. माझे काम आटोपून मी बसने रात्री ८ वाजता माझ्या गावात परतलो. माझ्या घराजवळच्या बस थांब्यावर मी उतरलो. ‘ते’ साम्यवादी पक्षाचे भाडोत्री कार्यकर्ते माझी वाटच पहात होते. त्यातील काही माझ्या गावातीलच होते. मी त्यांना चांगला ओळखतही होतो; पण ते द्वेषाने अंध झाले होते. मला घेरून त्यांनी जेरबंद केले. काहींनी आजूबाजूला गावठी बाँब फेकले. आजूबाजूचे तुरळक लोक घाबरून पळाले. त्या लोकांनी मग मला भूमीवर पकडून ठेवले आणि करवतीने माझे दोन्ही पाय गुडघ्यापासून खाली कापून काढले. त्या प्राणांतिक वेदना मी अगदी आजही विसरू शकत नाही. एवढे करून ते साम्यवादी गुंड थांबले नाहीत, त्यांनी माझे दोन्ही कापलेले पाय दूर चिखलात फेकून दिले आणि माझ्या रक्ताळलेल्या गुडघ्यांना शेण फासले. शस्त्रक्रिया करून माझे पाय परत जोडले जाऊ नयेत; म्हणून त्यांनी घेतलेली ती खबरदारी होती. त्यांचे काम झाल्यावर मला तिथे बस थांब्यावर रक्ताच्या थारोळ्यात तडफडत सोडून ते निघून गेले. अतीरक्तस्रावाने आणि वेदनेने मी इतका क्लांत झालो होतो की, मला ओरडण्याचेही त्राण राहिले नव्हते. मी तसाच तिथे बेवारस जनावरासारखा पडून राहिलो जवळजवळ अर्धा घंटा, खबर कळून पोलीस तिथे येईपर्यंत !

PM salutes spirit of Sadanandan Master & many other BJP workers who stand against communist violence

४. सदानंदन मास्टर यांचे पाय कापल्यानंतरची स्थिती

पोलीस आले, तेव्हा मी ग्लानीत होतो. पोलीस आणि इतर संघ कार्यकर्ते यांनी मिळून मला शहरात मोठ्या रुग्णालयात नेले. एकाने दूर फेकलेले माझे पाय समवेत घेतले. ते परत जोडता येतील म्हणून नव्हे, तर माझे पाय कसे कापून टाकले, हे डॉक्टरांना कळावे म्हणून. दुसर्‍या दिवशी मी शुद्धीवर आलो, तेव्हा माझ्या गुडघ्यांना पांढरे शुभ्र बँडेज बांधलेले होते आणि खाली ? खाली काहीच नव्हते. कालपर्यंत मी धडधाकट होतो अन् आज दोन्ही पायांनी पांगळा झालेलो होतो. त्याच दिवशी वनिता, म्हणजे माझी होणारी पत्नी मला भेटायला रुग्णालयात आली. तिचा चेहरा पार विदीर्ण झाला होता. माझ्याजवळ होते नव्हते तेवढे धैर्य एकवटून मी तिला सांगितले की, मी तिला तिच्या वचनातून मोकळे करत आहे. तिने माझ्यासारख्या एका पांगळ्याशी आता लग्न करू नये. तिच्या आई-वडिलांनीही तिला हेच सांगितले; पण तिने मानेनेच खुणावून ‘नाही’ म्हणून सांगितले.

मी जवळजवळ ६ मास रुग्णालयात होतो. पुष्कळ कठीण दिवस होते ते. माझे आयुष्य मला निरर्थक वाटत होते. मी कधीही कुणाचेही वाईट केलेले नसतांना हा भोग माझ्याच वाट्याला का यावा ? हे मला कळत नव्हते. मला नैराश्याने ग्रासले होते; पण संघाचे कार्यकर्ते नित्य नियमाने माझ्या भेटीला यायचे. मला सतत बोलते ठेवून माझ्या मनाची उभारी टिकवून ठेवायचे. एकटा असलो की, शाखेत शिकवलेली गाणी गुणगुणत माझे मनोधैर्य वाढवायचा प्रयत्न करायचो. वनिता या सर्व काळात सतत माझ्यासह होती. वनिताचा दुर्दम्य विश्वास आणि प्रेम, माझ्या कुटुंबियांनी केलेली सेवा अन् संघाच्या कार्यकर्त्यांनी केलेली अथक साथ यांमुळे मी माझ्या नैराश्यातून बाहेर आलो. डॉक्टरांनी मला ‘जयपूर फूट’ (कृत्रिम पाय) बसवला. मी हळूहळू परत चालायची सवय करू लागलो. पुष्कळ दुखायचे. पहिल्यांदा कृत्रिम पाय बसवतांना कातडी सोलवटायची. प्रत्येक पाऊल उचलतांना अपरिमित वेदना व्हायच्या; पण हळूहळू सवय झाली. मी परत माझ्या पायावर उभा राहिलो आणि कुणाच्याही साहाय्याविना ४ पावले चाललो, तो दिवस केवळ माझ्यासाठीच नव्हे, तर वनिता अन् संघातील सर्वजण यांच्यासाठी पुष्कळ आनंदाचा दिवस होता.

५. सदानंदन मास्टर यांचे सध्याचे जीवन

आज जवळजवळ ३१ वर्षे मी कृत्रिम पाय लावून वावरत आहे. दिवसाला सलग १८ घंटे काम करत आहे. मिळेल त्या वाहनाने, होईल तसा प्रवास करत आहे. घंटोन्‌घंटे शाळेत उभे राहून शिकवले. किंबहुना मला पाय नाहीत, ही जाणीवच मी विसरून गेलो. वनिताचे आणि माझे लग्न झाले. आम्ही एक छोटे घरकुलही उभारले. आम्हाला एक मुलगीही आहे. मी अजूनही संघाचे काम करतो. माझ्या कुटुंबातील लोकांनाही आता राष्ट्रीय विचारांचे महत्त्व पुरेपूर उमजले आहे. साम्यवादी विचारांमधील फोलपणा आता त्यांना पुरताच कळला आहे. इतकेच काय, ज्या लोकांनी माझ्यावर आक्रमण केले होते, त्यातील काही लोक आता संघाकडे वळले आहेत.

C Sadanandan Master: A symbol of steadfastness

Once a victim of brutal political violence that left him permanently disabled, C Sadanandan Master has now been nominated to the Rajya Sabha — a moment that marks not just personal triumph, but a tribute to resilience – Ratan Sharda

ज्यांनी माझे पाय कापले, त्यांपैकी काही जणांनी नंतर येऊन माझी क्षमा मागितली. माझा त्यांच्यावर राग नाही; कारण दोष त्यांचा नाही. ज्या विचारापोटी द्वेषाने आंधळे होऊन त्यांनी माझ्यावर हे भयंकर आक्रमण केले, त्या विचाराचाच हा दोष आहे. मी आज कोवळ्या मुलांना शिकवतो. त्यांना हा घाऊक द्वेष आंदण देण्याची माझी इच्छा नाही. संघ देशावर प्रेम करायला शिकवतो. एखाद्या व्यक्तीचा किंवा समाजधारेचा द्वेष करायला नाही. कुठल्या तरी परकीय देशात उगम पावलेली विदेशी विचारधारा शिकण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी या देशावर, या मातीवर प्रेम करायला शिकावे. येथील प्रश्नांना या मातीतच उत्तरे शोधायला शिकावे, एवढीच माझी इच्छा आहे.

६. …तरीही राष्ट्रप्रेमाची ज्योत केरळमध्ये सदैव तेवत राहील !

पिनराई विजयन् मुख्यमंत्री झाले, तेव्हापासून केरळमध्ये साम्यवाद्यांचा हिंसाचार परत एकवार उफाळून आला आहे. ज्या राज्याचा मुख्यमंत्री स्वतःच एखाद्या राजकीय खुनाच्या प्रकरणात आरोपी असेल, त्या राज्यात हिंसा झाली नसती, तरच नवल !

साम्यवाद्यांच्या रक्तरंजित राजकारणाचे आणि नृशंस हिंसेचे जिवंत उदाहरण म्हणजे सदानंदन मास्टर !

केरळमध्ये राष्ट्रीय विचारांच्या लोकांपुढे फार मोठी आव्हाने आहेत. एकीकडे रक्तरंजित लाल हिंसाचार, तर दुसरीकडे इस्लामी मूलतत्त्ववाद राज्यात हळूहळू मूळ धरत आहे, तसेच केरळच्या काही भागांत ख्रिस्ती धर्मप्रसारकांचा अनिर्बंध संचार आहे. तरीही राष्ट्रप्रेमाची ज्योत केरळमध्ये सदैव तेवत राहील; कारण ही आद्यशंकराचार्यांची जन्मभूमी आहे. संघ, राष्ट्रीय विचार यांचा प्रभाव केरळमध्ये हळूहळू; पण निश्चितपणे वाढत आहे. मला खात्री आहे की, काही वर्षांत परिस्थिती जरूर पालटेल.’

– सौ. शेफाली वैद्य, हिंदुत्वनिष्ठ लेखिका, पुणे.