पोटदुखीसाठी खावा पानांचा ‘ओवा’ आणि भात-वरणासमवेत खावी भाजी ‘सुरणा’ची !

आजीची भाजी रानभाजी

आदिवासी जमातीत दैनंदिन आहारात रानभाज्यांचा उपयोग करत असतात. ऋतूमानानुसार या रानभाज्या त्यांना सहज उपलब्ध होत असतात. रानभाज्यांची संपूर्ण माहिती त्यांना असते. या पारंपरिक अन्नाविषयीचे ज्ञान नव्या पिढीपर्यंत त्यांच्यामधून सहजरित्या पोचते. काही विशिष्ट सणादिवशी काही वनस्पतींचा वापर ते आहारात आवर्जूून करतात. यामधून त्यांची निसर्गाशी जुळलेली नाळ गडद होत जाते. भाज्यांचा रस्सा सिद्ध करण्यापासून, त्या उकळून, भाजून घेऊन खाद्यपदार्थ तयार केले जातात. अनुमाने १४ वनस्पती या मधुमेह, पोटदुखी, खोकला आदींवर औषधी म्हणून, तर काही वनस्पती गर्भवती आणि बालकांसाठी अतिशय उपयुक्त ठरल्या आहेत.

(भाग ४)

याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/939883.html

श्री. प्रशांत सातपुते

१. ओवा

ओवा

प्रथम पानांचा ओवा याविषयी माहिती घेऊ. या वनस्पतीच्या पानांचा ओव्यासारखा वास येतो. या वासावरून या रानभाजीचे नाव पानांचा ‘ओवा’ असे पडले आहे. या वनस्पतीची लागवड बागेत केली जाते. पिण्याच्या पाण्याला सुवासिक वास येण्यासाठी, तसेच औषधामध्ये हिच्या पानांचा वापर केला जातो. मानवी जीवनाप्रमाणे गुरांसाठी औषध म्हणूनही वापरतात. पोटदुखी, अपचन, पोटशूळ यांमध्ये ओव्याचे एखादे पान दिल्यास गुणकारी ठरते. दमा, जुनाट खोकला यांमध्येही पानांचा ओवा प्रभावी ठरतो.

१ अ. भाजी करण्याची पद्धत : एका पातेल्यात या वनस्पतीच्या खुडलेली पाने पेलाभर पाण्यात उकळून घ्यावीत. त्यानंतर त्यामधील पाणी निथळू द्यावे. कढईत फोडणीसाठी तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसूण, जिरे, तिखट, मीठ, हळद, टोमॅटो तळून घ्यावेत. नंतर त्यामध्ये भाजी टाकून शिजू द्यावी. कोथिंबीर टाकून भाजी खाण्यास सिद्ध होते.

१ आ. ओव्यांच्या पानांपासून भजीसुद्धा उत्तमरित्या बनवता येतात.

२. सुरण

सुरण

सुरण हा सर्वांच्या परिचयाचा आहे. सुरण हे कंद म्हणून जसे उपयुक्त आहे, तसे त्याचे मूळ आणि पानेही उपयुक्त आहेत. यात अ, ब, क ही जीवनसत्त्वे आहेत. हा कंद वायूनाश करतो, असे समजले जाते. आतड्यांच्या रोगात सुरणाची भाजी गुणकारी आहे. तसेच दमा, मूळव्याध, पोटदुखी, हत्तीरोग आणि रक्तविकार यांसाठी ही भाजी उपयुक्त ठरते.

२ अ. भाजी करण्याची पद्धत : एका पातेल्यात सुरण, चिंच आणि पेरू यांचा पाला अन् मीठ घालून उकळून घ्यावे. नंतर सुरणाचे तुकडे करून घ्यावेत. कढईमध्ये तेल गरम करून, त्यात बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसूण, जिरे, तिखट, मीठ, हळद आणि मसाला टाकून तळून घ्यावे. नंतर त्यात सुरणाचे तुकडे घालून शिजवून घ्या. वरून कोथिंबीर टाकून अशा प्रकारे सिद्ध झालेल्या भाजीचा आस्वाद घ्यावा.

– श्री. प्रशांत सातपुते, जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी.