श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी घेतले नृसिंहवाडी (जिल्हा कोल्हापूर) येथे श्री नृसिंह सरस्वती यांचे आणि शिरोळ (जिल्हा कोल्हापूर) येथे श्री दत्त भोजनपात्र यांचे दर्शन !

    श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

कोल्हापूर : सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी येथे श्री नृसिंह सरस्वती यांचे १० जुलै २०२५ या दिवशी दर्शन घेतले. यानंतर याच दिवशी तेथूनच जवळ असलेल्या शिरोळ (जिल्हा कोल्हापूर) येथील श्री दत्त भोजनपात्र मंदिरात जाऊन भोजनपात्राच्या पाषाणावर श्री नृसिंह सरस्वती यांच्या हाताचा ठसा उमटला आहे, त्याचे श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी दर्शन घेतले.

या वेळी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी ‘भारतासह संपूर्ण विश्वात हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर होऊ दे, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभू दे अन् सर्वत्रच्या साधकांचे रक्षण होऊन त्यांनाही चांगले आरोग्य लाभू दे’, अशी प्रार्थना केली.

शिरोळ (जिल्हा कोल्हापूर) येथील श्री दत्त भोजनपात्र मंदिराविषयीची माहिती !

१. श्री दत्त भोजनपात्र मंदिराचा प्राचीन इतिहास आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्या हाताच्या बोटांचा ठसा उमटणे

भोजनपात्राच्या पाषाणावर श्री नृसिंह सरस्वती यांच्या हाताचा उमटलेला ठसा

‘एका स्त्रीला पुष्कळ देवधर्म करूनही पुत्रप्राप्ती होत नव्हती; म्हणून एक दिवस ती एका सत्पुरुषाकडे गेली. त्यांनी तिला सांगितले, ‘‘मागील जन्मी तिने एका सावकाराकडून ऋण (कर्ज) घेतले होते, जे तिने फेडले नाही. त्यामुळे तो तिच्या गर्भाच्या रूपाने त्याचे ऋण फेडत आहे; म्हणून तिला संतानप्राप्ती होत नाही.’’ त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी तिला दत्त महाराजांचे वास्तव्य असणार्‍या औदुंबर वृक्षाची सेवा करायला सांगितली. त्यानुसार तिने नियमितपणे औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालून उपासना चालू केली. एक दिवस तिला स्वप्नात दिसले की, तिच्या पाठी एक पिशाच्च लागलेला आहे. ‘तिच्या गर्भाने त्याची भूक भागेनाशी झाली आहे. त्यामुळे तो तिला खाणार आहे’, असे त्याने सांगितले. त्यानंतर ती धावत पळत औदुंबर वृक्षाच्या ठिकाणी जाऊन लपली. तिच्या मागोमाग पिशाच्चही तेथे गेला. घाबरलेल्या स्त्रीने दत्त महाराजांचे स्मरण केले. तेव्हा त्यांनी प्रकट होऊन पिशाच्चाला थांबण्याची आज्ञा केली. त्यांनी त्याला सांगितले, ‘तू हिला त्रास देऊ नकोस. तुला मुक्ती हवी असेल, तर हिचा पिच्छा सोड.’ त्याने तिला सोडण्यास नकार दिला. तो म्हणाला, ‘मागील जन्मी हिने माझ्याकडून ऋण घेतले होते. ते तिने दिले पाहिजे.’ त्या वेळी तिच्याकडे तेवढे धनही नव्हते. दत्तमहाराजांनी ‘तिच्या ऐपतीप्रमाणे ती ब्राह्मणाला दान देईल. त्यातून तुझी मुक्तता होईल’, असे सांगितले. या स्त्रीमुळे या पिशाच्चाला दत्त महाराजांचे दर्शन झाले होते. त्यामुळे तो महाराजांना म्हणाला, ‘हिच्या घराकडे जो कुणी वक्रदृष्टीने पाहील, त्याला तो क्षमा करणार नाही.’ त्यानंतर दत्त महाराजांनी त्या झाडाची उंबरे त्या स्त्रीच्या ओटीत घातली आणि आशीर्वाद दिला.

कालांतराने तिला मुलगा झाला. त्याची मुंज झाली. एक दिवस त्याला ज्वर आला आणि त्यात तो मृत पावला. तिची दत्त महाराजांवर दृढ निष्ठा होती. मुलावर अंत्यसंस्कार न करता त्या सायंकाळी ती मुलाला घेऊन नृसिंहवाडीला गेली. तेथील पादुकांसमोर त्या मुलाला ठेवले आणि काकुळतीने म्हणाली, ‘महाराज, खरेच जर माझी भक्ती चांगली असेल, तर तुम्ही यातून मार्ग काढा. नाहीतर मी येथे डोके आपटून जीव देणार.’ तिने पादुकांवर पुष्कळ डोके आपटले. त्याने पादुका रस्तबंबाळ झाल्या आणि तिला मूर्च्छा आली. पहाटे तिला स्वप्न दृष्टांत झाला. व्याघ्रचाम्र पांघरलेले आणि हातात त्रिशूळ घेतलेले महाराज प्रकट झाले. तिने त्यांना तिची व्यथा सांगितली. त्यांनी मुलाला तीर्थ पाजले आणि त्याच्या तोंडात हाताने वायू सोडला. तिला जाग आली, तेव्हा तो मुलगा उठून बसला होता. या मुलाची २७ वी पिढी या श्री दत्तगुरु भोजनपात्र मंदिरात पुजारी म्हणून सेवा करत आहे. या घटनेला अनुमाने ७५० वर्षे झाली.

कालांतराने हा मुलगा मोठा झाला. त्यानंतर ४०-४५ वर्षांनी या भागात श्री नृसिंह सरस्वती आले. त्यांच्या नित्यक्रमानुसार ते त्या पंचक्रोशीतील गावांमध्ये (५ कोस दूर असणारी गावे) भिक्षा मागायचे. एक दिवस ते या मुलाच्या घरी भिक्षेसाठी आले. त्या स्त्रीला साक्षात् श्री नृसिंह सरस्वती महाराज दारात आल्याचे दिसले. तिने त्यांना आत बोलावून बसण्यास आसन दिले. महाराजांनी तिला भोजनासाठी काहीतरी वाढण्यास सांगितले. ती म्हणाली, ‘तिचे पती भिक्षेसाठी बाहेर गेले आहेत, ते आले की, अन्न शिजवून वाढते.’ महाराजांना प्रचंड भूक लागली होती. तिच्याकडे एका वाडग्यात थोडी जोंधळी असल्याचे तिला आठवले. त्या पाट्यावर वाटून तिने पातळ कण्या केल्या; पण वाढण्यासाठी तिच्याकडे पात्र नव्हते. ‘ज्या पात्रात आपण जेवतो, ते पात्र संन्याशाला देऊ नये’, असे म्हणतात. त्यांनी ते अंतर्ज्ञानाने जाणले. त्यांनी तेथील पाषणावर कण्या वाढण्यास सांगितले. तिने तो पाषाण औक्षण करून अभिमंत्रित केला आणि त्यावर कण्या वाढल्या. जेवण केल्यावर महाराज प्रसन्न झाले. जातांना ते ‘तुझ्या घरी आणि या गावीही कधी न्यून पडणार नाही’, असा आशीर्वाद देऊन गेले.

पती घरी परतल्यावर तिने घडलेली सर्व घटना सांगितली. तो म्हणाला, ‘‘तू किती भाग्यवान आहेस. तुला साक्षात् यति महाराजांचे दर्शन झाले !’’ रात्री त्याला महाराजांनी दृष्टांत दिला आणि सांगितले, ‘रात्री मी तुझ्या घरी आलो होतो. मी विदुराच्या घरच्या कण्या खाल्ल्या. हा केवळ पाषाण नाही, तर त्यावर मी हाताचा ठसा ठेवून गेलो आहे.’ त्यांचा हा ठसा प्राण, अपान, व्यान, उदान, समान आणि ब्रह्म आहे. हे भोजनपात्र या देवालयात आहे. (ही कथा ‘गुरुचरित्रा’तील १९ आणि २० व्या अध्यायात दिली आहे.)

श्री नृसिंह सरस्वती यांच्या मुखवट्याचे दर्शन घेतांना श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

२. श्री दत्त भोजनपात्र मंदिरातील वार्षिक उत्सव

या मंदिराची व्यवस्था पहाणार्‍या पुजार्‍यांनी अधिक माहिती देतांना सांगितले की, या ठिकाणी दत्तजयंतीचा वार्षिक उत्सव असतो. हा १० दिवसांचा असतो. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचा जन्मकाळाचा उत्सव होतो. या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभांचाही जन्मकाळ उत्सव साजरा होतो. पूर्वी जुन्या वाड्यासारखे हे मंदिर होते. त्याचा सर्वप्रथम छत्रपती शाहू महाराजांनी जीर्णाेद्धार केला. त्यानंतर महाराणी ताराराणी यांनीही या मंदिराचा जीर्णाेद्धार केला. अलीकडे वर्ष २००४ मध्ये या मंदिराचा जीर्णाेद्धार करण्यात आला आहे.

३. शिरोळ गावाचे माहात्म्य

शिरोळ ही साधू, संत आणि सत्पुरुष यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची कर्नाटककडे स्वारी निघाली होती, तेव्हा त्यांचा मुक्काम कुरुंदवाडी आणि शिरोळ येथील नदीकिनारी होता. याच गावात शिवकालीन तोफ उडवली जाते. या मंदिराच्या ठिकाणी दसर्‍याला सीमोल्लंघनाचा मोठा उत्सव असतो. गावाच्या सर्व पालख्या येतात. यात दत्त मंदिराची मानाची पालखी असते. त्यानंतर अंबाबाई, भवानी, रेणुकामाता आदी सर्व पालख्या माळ्यावरील दसरा चौकात जातात. तेथे तोफेचे शमीपूजन केले जाते आणि त्यानंतर तोफेच्या तीन सलामी होतात. तो आवाज अद्यापही ४ किलोमीटरपर्यंत ऐकू येतो. त्यानंतर माळावरील बुवाफन महाराज मंदिरात तोफांच्या २ सलामी होतात. अशा प्रकारे ५ तोफा प्रतिवर्षी उडवल्या जातात.

या गावात ७० टक्के वारकरी संप्रदाय आहे. त्यामुळे ही वारकर्‍यांचीही भूमी आहे. येथे सर्व लोक एकोप्याने असतात. वर्ष २००५ मध्ये महापूर आला होता. तेव्हा ३० गावांतील १ लाख लोकांसह त्यांची जनावरेही शिरोळ येथे आली होती. त्या सर्वांची रहाण्याची व्यवस्था करण्यात आली. कुणालाही अन्न-पाणी अल्प पडले नाही. कोणतीही रोगराई आली नाही. कुणीही दगावले नाही. यावरून लोकांनी या ठिकाणी भाव आणि भक्ती ठेवली, तर त्याचे फळ हे निश्चित मिळते, यात शंका नाही.’