राजीव मल्होत्रा : सांप्रत काळातील एक परखड विद्वान आणि हिंदुत्वाचे अपराजेय प्रहरी !

गेली अनेक दशके हिंदु धर्म आणि त्यान्वये हिंदू यांना पाश्चात्त्य जगतात हिणवले जात होते. त्यांच्या विरोधात नीच कथानके रचून त्यांच्यावर ‘अमानवी’, ‘रानटी’ अशा नानाविध विशेषणांनी चिखलफेक करण्यात येत असे. अशा वातावरणात अमेरिकेत राहून हिंदु धर्माच्या वैचारिक पुनरुत्थानाचे सांप्रत काळातील जनक म्हणून श्री. राजीव मल्होत्रा उभे राहिले. हिंदूंना त्यांच्या धर्माचे महत्त्व सांगून अत्यंत कष्टाने हिंदुविरोधकांची षड्यंत्रे त्यांनी उघड केली. गेली ३ दशके त्यांनी धर्मासाठी अतीविशाल वैचारिक कार्य करून ठेवले आहे. त्याचाच मागोवा घेण्याचा ‘सनातन प्रभात’चा या लेखनप्रपंचातून एक इवलासा प्रयत्न !

श्री. राजीव मल्होत्रा

विशेष सदर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वाेच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. त्यांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणार्‍या ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ या सदराद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल. या उदाहरणांतून आपल्या मनातील चिंता दूर होऊन उत्साह निर्माण होईल ! – संपादक

१. तंत्रज्ञान क्षेत्रातील नामांकित व्यावसायिक ते धर्मनिष्ठ योद्धा !

श्री. राजीव मल्होत्रा यांचा ‘यशस्वी तंत्रज्ञान अभियंता नि व्यावसायिक’ ते ‘हिंदु संस्कृतीचा प्रचारक’ येथपर्यंतचा प्रवास तितकाच विलक्षण आणि प्रेरणादायी आहे. वर्ष १९५० मध्ये जन्मलेले आणि देहलीतील ‘सेंट स्टीफन्स कॉलेज’मधून भौतिकशास्त्रात शिक्षण घेतलेले मल्होत्रा पुढे अमेरिकेतील सिराक्यूस विद्यापिठात संगणकशास्त्र शिकले.

लुधियानामधील बालपणापासून १७ वर्षांच्या किशोरवयात आणि २६ वर्षांच्या उत्साही तरुणापर्यंत – तरुण राजीवच्या विविध छटा !

मल्होत्रा यांनी अनेक देशांमध्ये तब्बल २० हून अधिक माहिती तंत्रज्ञान (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) आस्थापनांची स्थापना केली. अफाट नेतृत्वक्षमता असलेले मल्होत्रा ‘फॉर्च्युन १००’ आस्थापनांचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी म्हणून कार्य करत होते. १९९० च्या दशकाच्या आरंभी ते त्यांच्या व्यावसायिक कारकीर्दीच्या शिखरावर होते. एखाद्याला वाटेल की, त्यांनी इतक्या लहान वयात सर्वकाही मिळवले; परंतु तेव्हा मल्होत्रा यांनी कुणी विचार करू शकणार नाही, असे एक अत्युच्च नि अलौकिक ध्येय गाठण्याचा निर्धार केला. वर्ष १९९४ मध्ये वयाच्या अवघ्या ४४ व्या वर्षी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन ‘हिंदु संस्कृती आणि तत्त्वज्ञान’ यांच्या संशोधनाला पूर्णवेळ वाहून घेतले. हाच क्षण त्यांचा ‘वैचारिक योद्धा नि क्षत्रिय’ (An intellectual kshatriya) म्हणून उदयाचा ठरला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतांना श्री. राजीव मल्होत्रा

त्याच वर्षी त्यांनी न्यू जर्सीमधील प्रिन्स्टन येथे ‘इन्फिनिटी फाऊंडेशन’ नावाच्या संस्थेची स्थापना केली. या संस्थेने यंदाच एप्रिल २०२५ मध्ये ३० वर्षे पूर्ण केली असून एका दिव्य वातावरणात त्याचा सोहळा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमानिमित्त पंतप्रधान मोदी यांनीसुद्धा अत्यंत हृद्य शुभेच्छा दिल्या. ३ दशकांच्या या प्रदीर्घ प्रवासात अडचणी होत्या; तरीही या संस्थेने धर्मकार्यार्थ निःस्वार्थ, समर्पित आणि सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत.

(भेट देण्यासाठी चित्रावर क्लिक करा)

संस्थेची भूमिका आरंभीपासूनच स्पष्ट होती : प्राचीन भारतीय परंपरांचे विकृतीकरण रोखणे आणि ‘हिंदु’ भारताने जागतिक संस्कृतीस दिलेले योगदान अधोरेखित करणे !

मल्होत्रा यांना समजले होते की, २१ व्या शतकातील हिंदुत्वाच्या लढाया तलवारींनी नव्हे, तर विद्वत्तेने, माध्यमांनी आणि चर्चेने लढल्या जातील. त्यांनी भारतीय ज्ञान परंपरेवर आधारित शास्त्रशुद्ध अभ्यासाला प्रोत्साहन देण्यासाठी निधी एकत्रित करण्यास आरंभ केला. गेल्या तीन दशकांत ‘इन्फिनिटी फाऊंडेशन’ने जागतिक पातळीवर संशोधन, शिक्षण आणि समुदाय प्रकल्प यांसाठी ४०० हून अधिक ‘ग्रँट्स’ (देणग्या) दिल्या आहेत.

Rajiv Malhotra Invites You To 30 Years of Infinity Foundation! Join our Grand Celebration!

मल्होत्रा यांनी दीर्घकालीन हिंदु पुनरुत्थानासाठी संस्थात्मक पाया घातला आणि भारतीय दृष्टीकोनांना मुख्य प्रवाहातील शिक्षणसंस्थांमध्ये स्थान मिळवून दिले. एका चरित्रलेखात म्हटल्याप्रमाणे – ‘त्यांनी धर्म आणि भारत यांविषयी नव्या, सडेतोड भूमिका मांडून ‘मुख्य प्रवाहातील विचारसरणी’ला हादरवून सोडले.’

२. ‘इन्फिनिटी फाऊंडेशन’चे ध्येय : पाश्चात्त्य विचारसरणींना थेट आव्हान !

इन्फिनिटी फाऊंडेशन ही मल्होत्रा यांच्या बौद्धिक प्रयोगांची कर्मभूमी बनली. मल्होत्रा यांच्या व्यतिरिक्त यात कुणीच पूर्णवेळ कार्यकर्ता नसतांनाही या संस्थेने स्वतःची प्रभावी उपस्थिती सिद्ध केली. तिचे उद्दिष्ट ठाम आणि ठळक होते – ‘हिंदु धर्माचे विकृतीकरण रोखणे आणि भारताच्या जागतिक योगदानाचे दस्ताऐवजीकरण करणे.’

हे ही पहा → Ten Contemporary Dharma Warriors: 1. Rajiv Malhotra

Explores the deliberate misrepresentations of Hindu culture by certain intellectuals and introduces the countermovement led by scholars like Rajiv Malhotra.

पाश्चात्त्य विचारसरणींसमोर पराभव पत्करण्याऐवजी मल्होत्रा यांनी त्यांच्या चौकटीतच संशोधन आणि अध्यापन यांसाठी निधी देत भारतीय परंपरांना त्यांच्याच भाषेत सादर करणे चालू केले. त्यामुळे शिक्षणक्षेत्रात अनेकांना त्रास झाला. धर्मशास्त्रज्ञांना मात्र ही संस्था हिंदु धर्मासाठी ‘एक दक्ष प्रहरी’ वाटली. मल्होत्रा यांनी भारतीय-अमेरिकन देणगीदार आणि विचारवंत यांना ‘गृहसंघ’ (home team) सिद्ध करण्याचे आवाहन केले. यातून त्यांनी ‘भारतीय अभ्यास’ हा परकीय दृष्टीकोनातून नव्हे, तर स्वदेशी दृष्टीतून पहाण्यास प्रोत्साहन दिले.

या स्पष्ट ध्येयामुळे त्यांच्या कार्याला ठोस दिशा मिळाली असून अनेक भारतीय तरुण आणि प्रवासी हिंदूंना त्यांनी प्रेरित केले आहे. ‘इन्फिनिटी फाऊंडेशन इंडिया’त मल्होत्रा हे युवा अभ्यासकांना सक्रीय मार्गदर्शन करत आहेत. संस्थेने ‘स्वदेशी इंडॉलॉजी परिषदा’ आणि ‘वैचारिक क्षत्रिय व्यासपीठ’ असे उपक्रम हाती घेतले – हे अशा व्यासपिठांपैकी आहेत, जिथे उदयोन्मुख अभ्यासक पाश्चात्त्य विचारसरणींसमोर पुराव्याद्वारे आव्हाने उभी करतात.

या उपक्रमांद्वारे मल्होत्रा वैचारिक योद्ध्यांचे (‘इन्टेलेक्च्युल वॉरियर्स’चे) सैन्य घडवत आहेत, जे संशोधनात निपुण आणि सांस्कृतिक अभिमानाने भारलेले आहे. यामुळे हिंदु संस्कृतीची बाजू शिक्षणसंस्था आणि प्रसारमाध्यमे यांमध्ये दृढपणे मांडता येत आहे.

३. ब्रेकिंग इंडिया : अंतर्गत आणि बाह्य धोके उघड करणारा ग्रंथ !

श्री. राजीव मल्होत्रा यांच्या कार्याचा समग्र आढावा घेतांना त्यांच्या परिवर्तनकारी ग्रंथांचा उल्लेख अपरिहार्य आहे. या प्रत्येक ग्रंथाने ‘हिंदु’ भारताच्या सांस्कृतिक आत्म्याच्या रक्षणासाठीच्या युद्धातील एक निर्णायक आघाडी हाताळली आहे. त्यांपैकी सर्वप्रथम आणि सर्वाधिक गाजलेला ग्रंथ म्हणजे ‘ब्रेकिंग इंडिया’ (वर्ष २०११), जो अरविंदन् नीलकंदन् यांच्या सहलेखनात प्रकाशित झाला.

या क्रांतीकारी ग्रंथात श्री. मल्होत्रा यांनी उघड केले की, भारतातील अंतर्गत भेगांना परकीय ‘हस्तक्षेप’ आणि ‘विचारसरणी’ कशा खतपाणी घालत आहेत. ‘ब्रेकिंग इंडिया’ने स्पष्ट केले की, जागतिक पातळीवरचे संघटित जाळे भारताच्या एकात्मतेला कमकुवत करत आहेत, विशेषतः द्रविड चळवळींसारख्या विभागीय प्रवाहांद्वारे देशाला जातीय आणि प्रांतीय रेषांमध्ये विभागण्याचा प्रयत्न चालू आहे.

या पुस्तकात पुरावे देण्यात आले की, परदेशी संस्था, बहुधा शैक्षणिक आणि धार्मिक पटलांद्वारे, या विभागीय (विभाजनकारी) ओळखींना बौद्धीक अधिष्ठान अन् आर्थिक पाठबळ देत आहेत,  ज्या भारताच्या अखंडतेला विरोध करणार्‍या आहेत. या पुस्तकातील मांडणीमुळे ‘ब्रेकिंग इंडिया फोर्सेस’ (भारताला तोडणार्‍या शक्ती) ही संज्ञा देशभक्तांच्या भाषेत रूढ झाली, जी अशा अंतर्गत आणि बाह्य शक्तींना सूचीत करते, ज्या भारताला सांस्कृतिक पातळीवर विभागण्याचा प्रयत्न करत आहेत.

पुस्तक प्रसिद्ध होऊन एक दशक उलटताच अभ्यासकांनी लिहिले की, हे पुस्तक ‘आपल्या काळापेक्षा दशकभर पुढे’ होते आणि आजच्या २०२० च्या दशकात त्या धोक्यांचे स्पष्ट दर्शन होत आहे.

Snakes In The Ganga – Breaking India 2.0 | Rajiv Malhotra, Vijaya Viswanathan, Vibhuti Jha

(सौजन्य : Jaipur Dialogues)

एका दशकानंतर श्री. मल्होत्रा यांनी त्याच विषयावर ‘स्नेक्स इन द गंगा : ब्रेकिंग इंडिया २.०’ (वर्ष २०२२) या ग्रंथातून अधिक सखोल प्रकाश टाकला. हा ग्रंथ विजया विश्वनाथन् यांच्या सहलेखनात झाला. ‘ब्रेकिंग इंडिया’मध्ये जिथे उघड जाळे आणि भेगा यांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले होते, तिथे ‘स्नेक्स इन द गंगा’मध्ये त्याच धोक्याचा अधिक धूर्त अन् छुपा चेहरा उघड करण्यात आला आहे.

या ग्रंथात नमूद करण्यात आले आहे की, पाश्चात्त्य शैक्षणिक विचारसरणी, अतिरेकी तत्त्वज्ञान आणि भारतातीलच काही सत्ताधारी घटक यांच्यात एक कट कारस्थानी युती सिद्ध झाली आहे, जी भारताच्या नव्या पद्धतीने होणार्‍या वसाहतीकरणाला चालना देत आहे. हार्वर्ड विद्यापीठ आणि इतर ‘आयव्ही लीग’ विद्यापिठे (अमेरिकेच्या पूर्वाेत्तर भागातील ८ प्रथितयश विद्यापिठे) या नव्या योजनेच्या केंद्रस्थानी आहेत, जसे ब्रिटीश काळात ऑक्सफर्ड विद्यापीठ होते.

अगदी ब्रिटीश वसाहतवादाच्या काळातील धक्कादायक पुनरावृत्तीप्रमाणे ‘स्नेक्स इन द गंगा’ दाखवते की, भारतातील अनेक धनाढ्य आणि स्वयंसेवी संस्था या ‘अजेंड्या’ला (धोरणाला) निधी पुरवत आहेत. पश्चिमेच्या शिक्षण संस्थांनी भुरळ घातलेल्या या भारतीय उद्योगपती आणि संस्था यांनी हार्वर्डमधील उपक्रमांना निधी पुरवला आहे, ज्या ठिकाणी भारतीय अभ्यासकांना ही धोकादायक विचारसरणी शिकवली जाते.

‘स्नेक्स इन द गंगा’मधील हे खुलासे अतिशय खळबळजनक आहेत आणि श्री. मल्होत्रा यांची ‘हिंदु संस्कृतीचे प्रहरी’ म्हणून ओळख या ग्रंथलेखनाने अधिक सशक्त झाली आहे. या ग्रंथाच्या माध्यमातून मल्होत्रा यांनी हिंदुविरोधी मानसिकता आणि नववसाहतवादी विचारांवर आघात केला आहे, तोही जागतिक उच्चभ्रू वर्गाच्या (‘इलीट क्लास’च्या) केंद्रबिंदूवर !

हे पुस्तक भारतियांना त्यांच्या पवित्र गंगेतील नव्या ‘सर्पां’ची, म्हणजे ‘समाजात झिरपणार्‍या अपायकारक विचारसरणी आणि परकीय चौकटी’ यांची जाणीव करून देण्याचे आवाहन करते.

४. ‘बीईंग डिफरंट’ : पाश्चात्त्य सार्वत्रिकतेला भारतीय आव्हान !

बाह्य धोक्यांना उघडकीस आणतांनाच श्री. राजीव मल्होत्रा यांनी हिंदु संस्कृतीच्या आत्मसन्मानाचे पुनरुत्थान करण्यातही तेवढेच जोमाने योगदान दिले आहे. ‘Being Different : An Indian Challenge to Western Universalism’ (वेगळेपणा असणे : पाश्चिमात्य सार्वत्रिकतेला भारतीय आव्हान) (वर्ष २०११) नावाच्या त्यांच्या एका महत्त्वपूर्ण ग्रंथात पाश्चात्त्य विचारसरणीची स्वतःच्या दृष्टीकोनाची सार्वत्रिकता आणि इतर संस्कृतींना स्वत:त विलीन करण्याची नीच प्रवृत्ती याचा सखोल आढावा घेण्यात आला आहे.

मल्होत्रा यांचे कोणते पुस्तक प्रथम वाचावे ?

‘सनातन प्रभात’ने मल्होत्रा यांना विचारले, ‘तुमच्या साहित्याचा अभ्यास आणि हिंदु धर्मावर चाललेल्या जागतिक कथानकाची योग्य माहिती मिळवण्यासाठी कोणते पुस्तक प्रथम वाचले पाहिजे ?’ मल्होत्रा उत्तरले, ‘‘बीईंग डिफरंट’ने आरंभ करा – हळूहळू वाचा आणि सखोल वाचा !’’

या पुस्तकात श्री. मल्होत्रा यांनी धर्मपरंपरा (हिंदु, बौद्ध, जैन, शीख) आणि पाश्चात्त्य धार्मिक अन् लौकिक तत्त्वज्ञान यांची तुलनात्मक समीक्षा केली आहे. ते सांगतात की, भारताचे आध्यात्मिक तत्त्वज्ञान मूलतः वेगळे आहे; ते केवळ अब्राह्मिक अथवा पाश्चात्त्य संकल्पनांचे रूपांतर नाही. ‘बीईंग डिफरंट’ हे भारतीय परंपरांना त्यांच्या स्वतःच्या चौकटीतून समजून घेण्याचा आग्रह धरते, त्यांना पाश्चात्त्य चौकटीत जिरू देण्याऐवजी !

श्री. मल्होत्रा चेतावणी देतात की, योग, ध्यान यांसारख्या अनेक हिंदु संकल्पना पाश्चात्त्य जगतात विलीन करून त्यांचे धर्मपरंपरेशी असलेले मूळ संदर्भ काढले गेले आहेत आणि त्या ‘पाश्चात्त्य नवकल्पना’ म्हणून पुन्हा मांडल्या जात आहेत, ज्यामुळे मूळ परंपरेचा र्‍हास झाला आहे. या पुस्तकात ते एकतर्फी सहिष्णुतेपेक्षा ‘परस्पर सन्मान’ या मूल्याचा आग्रह धरतात, तसेच प्रक्षोभक नि संरक्षणात्मक उपाययोजना सुचवतात.

या पुस्तकामुळे अनेकांना (हिंदूंना) आपल्या ‘वसाहतवादी दृष्टीकोना’चा पुनर्विचार करायला लावला आणि ‘वेगळेपणाची भीती’ न बाळगता हिंदु अस्मितेचा अभिमानाने स्वीकार करावा, असा आत्मविश्वास दिला.

५. हिंदु पुनरुत्थानासाठी नवा शब्दसंग्रह !

श्री. राजीव मल्होत्रा यांच्या वैचारिक कार्याचा एक विशेष पैलू म्हणजे त्यांनी आधुनिक हिंदु संवादात सादर केलेली विशिष्ट संकल्पनांची आणि शब्दांची मांडणी. या शब्दांनी हिंदूंना सांस्कृतिक संघर्षात येणार्‍या संकटांची अचूक व्याख्या करून उत्तर देण्याची भाषा दिली. यातील काही या लेखात आधीच चर्चेत आले आहेत : ‘ब्रेकिंग इंडिया फोर्सेस’, ‘सिपॉय’, ‘डायजेशन’, ‘वेस्टर्न युनिव्हर्सलिझम् (पाश्चिमात्य सार्वत्रिकता)’ इत्यादी. या कल्पनांना नाव देऊन मल्होत्रा यांनी त्या भावनांना मूर्त स्वरूप दिले ज्या अनेकांना जाणवायच्या; पण स्पष्ट शब्दांत सांगता येत नव्हत्या.

५ अ. ‘ब्रेकिंग इंडिया फोर्सेस’ : त्यांच्या वर्ष २०११ च्या पुस्तकातून उगम पावलेला हा शब्द आज भारतात अंतर्गत विघटन करणार्‍या, वेगवेगळ्या विचारसरणींच्या, राष्ट्रविरोधी शक्ती यांना उद्देशून सामान्य वापरात आला आहे. या शब्दाने हिंदूंना भान दिले की, अनेक वेळा निष्पाप वाटणार्‍या उपक्रमांमागे देशाच्या एकात्मतेला धोका असतो.

५ आ. ‘सिपॉय’ (इंग्रजांसाठी लढणारे भारतीय सैनिक) : या ऐतिहासिक संज्ञेला मल्होत्रा यांनी नव्या अर्थाने वापरले. पूर्वी इंग्रजांसाठी लढणार्‍या भारतीय सैनिकांप्रमाणेच आजचे काही बुद्धीजीवी, प्रभावशाली मंडळी जाणूनबुजून किंवा अजाणतेपणाने  हिंदु धर्मविरोधी किंवा भारतविरोधी विचार पसरवतात, हे ते स्पष्ट करतात. या शब्दाने शिक्षित वर्गात आत्मपरीक्षणाला आरंभ झाला.

५ इ. ‘डायजेशन’ : हा त्यांचा कदाचित् सर्वांत खोलवर आणि तात्त्विक शब्द. हिंदु संकल्पना पाश्चिमात्य संस्कृतीत आत्मसात करून मूळ हिंदु संकल्पनेचा नाश होणे, याला मल्होत्रा ‘डायजेशन’ म्हणतात. योगाचा केवळ शरीर व्यायामाच्या स्वरूपात प्रचार हे त्याचे उत्तम उदाहरण. श्री. मल्होत्रा यांच्या मतानुसार हिंदु धर्माची खुली नि सर्वव्यापक रचना त्याला अन्य संस्कृतींत पचवण्यास (हिंदु धर्माचा नाश करण्यास) कारणीभूत ठरू शकते. यावर मल्होत्रा यांनी रक्षणात्मक उपायही सुचवले. आज या संज्ञा भारतातील सामाजिक-राजकीय चर्चेत सहजपणे वापरल्या जातात, हे श्री. मल्होत्रा यांच्या प्रभावाचे द्योतक आहे.

६. समजले न गेलेले विचारवंत आणि नव्या पिढीचे ‘गुरु’ !

श्री. राजीव मल्होत्रा यांच्या परखड शैलीमुळे आणि शिक्षण संस्थांमधील व्यवस्थात्मक दोषांवर केलेल्या कठोर टीकेमुळे त्यांना अनेकदा विरोध सहन करावा लागला आहे. साम्यवादी आणि उदारमतवादी विचारसरणीचे लोक त्यांच्यावर ‘हिंदुत्वनिष्ठ’ असल्याचा आरोप करतात (जो ते अभिमानाने स्वीकारतात) किंवा त्यांच्या विचारांना ‘अत्यंत एकांगी’ म्हणतात. श्री. मल्होत्रा यांनी हे अपेक्षितच मानले होते. त्यांनी एकदा म्हटले, ‘जर मी केवळ लोकांना बरे वाटावे, असेच लिहिले असते, तर मी माझ्या कामाशी गद्दारी केली असती.’

कॅनडाच्या ‘हिंदु चेंबर ऑफ कॉमर्स’कडून राजीव मल्होत्रा यांना ‘ग्लोबल हिंदु पुरस्कार २०२२’ प्रदान करण्यात आल्याचा क्षण !

त्यांचे लेखन पश्चिमी पूर्वग्रहांना आणि हिंदूंच्या आत्मसंतुष्टतेला आव्हान देते. म्हणूनच ते अनेक वेळा एकटेच वाटतात; पण तरीही त्यांनी नवीन सीमा ओलांडून मार्ग दाखवला आहे.

हिंदु तरुणांमध्ये आणि जागतिक हिंदु समुदायात त्यांना गुरुप्रमाणे मानले जाते. ते विद्यापिठांमध्ये, समुदाय व्यासपिठांवर, ‘पॉडकास्ट’ना बोलावले जातात आणि त्यांच्या व्याख्यानांना सहस्रो विद्यार्थ्यांची गर्दी होते. त्यांचे १ सहस्रांहून अधिक व्हिडिओ व्याख्याने ऑनलाईन उपलब्ध आहेत.

पुणे येथे ‘सभ्यतांचा अभ्यास आणि इन्डॉलॉजी’ क्षेत्रातील त्यांच्या विलक्षण कार्यासाठी राजीव मल्होत्रा यांना ‘भीष्म पुरस्कार’ प्रदान करण्यात आल्याचा क्षण !

समाजशास्त्रज्ञ प्रेमा कुरियन यांनी म्हटले आहे की, ‘श्री. राजीव मल्होत्रा हे पाश्चिमात्य शिक्षणव्यवस्थेमध्ये ‘युरोसेन्ट्रिझम’ला (‘युरोपच सर्व जगाचा मध्य असून तेथील संस्कृतीच सर्वश्रेष्ठ आहे’, या कथानकाला) आव्हान देणार्‍या अमेरिकास्थित हिंदु चळवळीचे अग्रदूत आहेत.’

वर्ष २०१७ मध्ये वॉशिंग्टन येथील भारताच्या दूतावासात व्याख्यान देतांना राजीव मल्होत्रा. (व्याखानाचा विषय होता – ‘मनोविज्ञान क्षेत्रातील भारताचे (अप्रकाशित) योगदान’) हे व्याख्यान आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अधिकृत शासकीय कार्यक्रमाचा भाग होते. याला प्रचंड प्रतिसाद लाभला. यानंतर प्रश्नोत्तर सत्र झाले आणि भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने मल्होत्रा यांचा अधिकृत स्वागत समारंभ झाला.

त्यांनी एक प्रभावी विचारसरणी निर्माण केली, जिथे अभिमानाने हिंदु दृष्टीकोन मांडला जाऊ शकतो. त्यांच्या प्रेरणेने अनेक भारतीय विद्यार्थी ‘होम टीम’मध्ये सहभागी होण्यासाठी धार्मिक अध्ययनात प्रवेश घेत आहेत. ही एक नव्या युगाची वैचारिक संरचना आहे, जी पुढच्या पिढ्यांसाठी आदर्श ठरेल, एक प्रभावी वैचारिक योद्ध्यांची (‘इन्टेलेक्चुअल वॉरियर्सं’ची) परंपरा !

७. कृत्रिम बुद्धीमत्तेच्या माध्यमातून मानवी मनावर अधिराज्य निर्माण करण्याचा मानस : सनातन

सत्यासाठी तंत्रज्ञानाचे हिंदुकरण करणारी क्रांती !

श्री. राजीव मल्होत्रा आणि त्यांचे सहकारी ‘Ask Rajiv’ (राजीव यांना विचारा) नावाचे ‘एआय चॅटबॉट’ विकसित करत आहेत, जे सनातन धर्माविषयी प्रामाणिक, तंतोतंत आणि धर्मसुसंगत माहिती देईल. मुख्य प्रवाहातील माध्यमांद्वारे पसरवली जाणारी चुकीची माहिती यामुळे खोडून काढता येईल.

Ask Rajiv

अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सनातन तत्त्वज्ञान यांचा संगम साधत त्यांनी ‘इन्फिनिटी फाऊंडेशन’ला कृत्रिम बुद्धीमत्ता आणि जागतिक धार्मिक चर्चेच्या अग्रभागी पोचवले आहे. त्याच वेळी ते ‘भारतीय मानसशास्त्र’ या नव्या शास्त्रशाखेवर अभ्यास आणि प्रकाशन करत आहेत. हे शास्त्र भारतीय ज्ञानप्रणालींवर आधारित असून पाश्चात्त्य मानसशास्त्रांना धर्मसंगत पर्याय देण्याची क्षमता बाळगते.

८. ‘संस्कृत’ भाषेसाठीचा संघर्ष : हिंदुद्वेषी यंत्रणेचा पर्दाफाश !

हिंदु तत्त्वज्ञानाचे रक्षण करत असतांनाच श्री. मल्होत्रा यांनी ओळखले की, भाषा आणि ग्रंथ यांवर नियंत्रण हे संस्कृतीच्या संघर्षाचे एक अत्यंत महत्त्वाचे रणांगण आहे. हे सर्वांत ठळकपणे प्रकट झाले, ते संस्कृत भाषा आणि प्राचीन ग्रंथ यांवर चाललेल्या चर्चांमध्ये.

पाश्चात्त्य ‘इंडॉलॉजिस्ट’ यांनी (भारताच्या इतिहासाचा अभ्यास करणार्‍यांनी) संस्कृतला ‘मृत’, ‘जातीयवादी’ आणि ‘दडपशाहीचे साधन’ म्हणून मांडले. ‘The Battle for Sanskrit’ (संस्कृतसाठीचे युद्ध) (वर्ष २०१६) या ग्रंथात श्री. मल्होत्रा यांनी अमेरिकेतील (कु)प्रसिद्ध इंडॉलॉजिस्ट शेल्डन पोलॉक आणि त्यांच्या विचारसरणीवर तीव्र टीका केली. ते म्हणाले की, मार्क्सवादी दृष्टीकोन वापरून पोलॉक यांच्यासारखे संशोधक संस्कृत ग्रंथांचे चुकीचे अर्थ लावत आहेत, जे पारंपरिक भारतीय विद्वान कधीही स्वीकारणार नाहीत.

जर हे आव्हान दिले गेले नाही, तर अशा विकृत अर्थांचेच जागतिक प्रमाण मानले जाईल, अशी चेतावणी त्यांनी दिली. त्यांनी ‘संस्कृत युद्धे’ हा शब्दप्रयोग लोकप्रिय केला, म्हणजे बाह्य लोकांची टीकात्मक भूमिका आणि अंतःस्थांची संस्कृत प्रतिष्ठेची भूमिका यांच्यातील संघर्ष !

यातून ‘हिंदुफोबिया’ (हिंदु धर्मावर शिक्षणक्षेत्रात चालणारे पूर्वग्रह) ही संकल्पना व्यापक स्तरावर प्रसिद्ध झाली. याचा पुढचा भाग म्हणजे ‘Sanskrit Non-Translatables : The Importance of Sanskritizing English’ (भाषांतर होऊ शकत नाही, असे संस्कृत शब्द : इंग्रजीला संस्कृतमय करण्याचे महत्त्व) (वर्ष २०२०) हा ग्रंथ. यात त्यांनी असे ५४ संस्कृत शब्द आणि संकल्पना मांडल्या, ज्यांचे अचूक इंग्रजी भाषांतर शक्य नाही – उदा. धर्म, कर्म, योग, प्राण.

श्री. राजीव मल्होत्रा

ते सुचवतात की, अशा शब्दांचे ‘भाषांतर’ न करता इंग्रजीमध्ये ते तसेच स्वीकारले जावे, म्हणजे ‘Sanskritizing English’. या मार्गाने भारतीय ज्ञानसंपदा जागतिक भाषिक परिसंवादात जिवंत राहील. याचे कारण सांगतांना ते म्हणतात, ‘‘जो शब्दांच्या प्रयोगावर नियंत्रण ठेवतो, तो विचारप्रणाली घडवतो !’’ त्यामुळेच श्री. मल्होत्रा यांना वर्ष २०१८ मध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापिठात ‘मानद प्राध्यापक’ म्हणून आमंत्रित करण्यात आले, हे त्यांच्या संशोधनाच्या महत्त्वाचे लक्षण आहे.

९. वारसा : हिंदुत्वाच्या वैचारिक पुनरुत्थानाचे शिल्पकार !

श्री. राजीव मल्होत्रा यांचा वारसा त्यांच्या दोन दशकांच्या कार्यातून स्पष्ट दिसतो. २० वर्षांपूर्वी हिंदुत्व म्हणजे केवळ राजकीय किंवा रस्त्यावरील चळवळ समजली जात होती; पण त्यांनी त्याला वैचारिक पुनरुत्थानाचा आयाम दिला. त्यांनी दाखवले की, आजचे कुरुक्षेत्र हे विचारांचे आहे – विद्यापिठांत, विचारमंचांवर, माध्यमांत आणि प्रकाशन संस्थांत !

How Rajiv Malhotra Became the Voice of India’s Intellectual Reawakening! | Praveen Chaturvedi

आज ‘हिंदूफोबिया’ (हिंदुद्वेष) ही संज्ञा आंतरराष्ट्रीय व्यासपिठांवर मान्यता पावते, यामागे त्यांचे प्रयत्न आहेत. त्यांनी वर्ष २०२५ मध्ये ‘प्राच्यम् स्टुडिओज’ला दिलेल्या मुलाखतीत याला ‘सनातन धर्मावरील एक छुपे युद्ध’ म्हटले, जे शिक्षणसंस्था आणि प्रसारमाध्यमे यांतून चालते. ‘प्राच्यम्’चे संस्थापक कॅप्टन प्रवीण चतुर्वेदी (निवृत्त) यांच्याशी झालेल्या चर्चेत त्यांनी स्पष्ट केले की, काही आंतरराष्ट्रीय विचारसरणी आणि प्रसारमाध्यमे हिंदु संस्कृतीवर सूक्ष्म आक्रमणे करत आहेत; म्हणून हिंदूंनी स्वतःचे ‘सत्य कथानक’ परत लिहिणे आवश्यक आहे.

त्यांच्या कार्याचा सर्वांत प्रेरणादायी पैलू, म्हणजे त्यांनी ‘केवळ टीका’ करण्याऐवजी, ‘भविष्यासाठी बांधणी’ केली. ‘इंडियन सायन्स अँड टेक्नॉलॉजी सीरिज’ आणि भारतीय ज्ञानप्रणाली यांना शालेय अभ्यासक्रमात आणण्याचा उपक्रम, म्हणजे नवयुगातील वैचारिक संस्कृतीचा पाया ! त्यांचे लेखन स्वामी विवेकानंद, योगी अरविंद यांच्यासारख्या विचारवंतांच्या गौरवशाली वारसाशी सुसंगत आहे. आज ७४ व्या वर्षी ते हे दाखवून देतात की, ‘हिंदुत्वाचा योद्धा’ होण्यासाठी तलवार लागतेच, असे नाही, तर ज्ञानाचे लेखनही पुरेसे आहे.

A message from Rajiv Malhotra, The future of Infinity Foundation

त्यांच्या ग्रंथलेखनाने, धोरणात्मक देणग्यांनी आणि धाडसी मांडणीने हिंदु संस्कृतीच्या विचारसरणीस एक भक्कम किल्ला उभारला आहे.

‘सनातन प्रभात’सारखे जागरूक हिंदु प्रसारमाध्यम श्री. राजीव मल्होत्रा यांना एक खरेखुरे हिंदुत्वाचे शिलेदार मानते, ज्यांनी हिंदु धर्माला जागतिक व्यासपिठावर अभिमानाने उभे केले. त्यांच्या वैचारिक योगदानाचा प्रभाव अमूल्य आहे. त्यांनी दाखवले की, एक सामान्य माणूसही विचारांच्या साहसाने संपूर्ण युग घडवू शकतो !

🪷हिंदुत्वाचे शिलेदार या सदरामध्ये प्रसिद्ध होणाऱ्या मान्यवरांची माहिती वाचण्यासाठी इथे क्लिक करा !🪷