RTI Report Engine Failures : भारतात गेल्या ५ वर्षांत ६५ विमानांचे इंजिन उड्डाणाच्या वेळी बंद पडले !

माहिती अधिकारातून उघड झाली माहिती !

नवी देहली – माहितीच्या अधिकाराखाली नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने दिलेल्या माहितीमध्ये गेल्या ५ वर्षांत भारतातील ६५ विमानांचे इंजिन उड्डाण करतांना किंवा हवेत असतांना बंद पडले. याचा अर्थ प्रत्येक महिन्याला किमान एका विमानाचे इंजिन बंद पडते. या सर्व प्रकरणांमध्ये वैमानिक एकाच इंजिनवर विमान उतरवू शकले आणि जवळच्या विमानतळावर पोचू शकले.


या माहितीत पुढे म्हटले आहे की, १ जानेवारी २०२४ ते ३१ मे २०२५ या १७ महिन्यांत ११ विमानांमधून ‘मेडे’ कॉल आले होते. यामध्ये तांत्रिक बिघाडाची माहिती देऊन आपत्कालीन स्थितीत विमान उतरवण्याची मागणी करण्यात आली होती. यांपैकी ४ विमाने भाग्यनगरमध्ये उतरली.

‘मेडे कॉल’ म्हणजे काय ?

मेडे हा फ्रेंच भाषेतील शब्द आहे. याचा अर्थ ‘मला वाचवा’ असा होतो. हा कॉल सहसा रेडिओद्वारे विमान वाहतूक नियंत्रण कक्षाला किंवा जवळच्या इतर विमानतळांना पाठवला जातो. याचा वापर तात्काळ साहाय्य मागण्यासाठी केला जातो, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीला तोंड देता येईल.

संपादकीय भूमिका

जर असे घडत होते, त्यावर उपाययोजना का काढण्यात आली नाही ?, याची माहितीही समोर आली पाहिजे !