प्रेमळ, सेवेची तळमळ आणि साधकांना साहाय्य करणारे वणी (जिल्हा यवतमाळ) येथील श्री. लोभेश्वर टोंगे (वय ७१ वर्षे) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

वणी (यवतमाळ) – कार्यपद्धतीचे पालन आणि भावपूर्ण सेवा करणारे येथील सनातनचे साधक श्री. लोभेश्वर टोंगे (वय ७१ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली, हे आनंदवृत्त सनातन संस्थेचे पू. अशोक पात्रीकर यांनी १० जुलै या गुरुपौर्णिमेच्या मंगलमय दिवशी दिले. या वेळी श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन श्री. टोंगे यांचा त्यांनी सत्कार केला. श्री गुरुपूजनानंतर पू. पात्रीकरकाकांनी सर्वांना मार्गदर्शन केले. या वेळी ही घोषणा करण्यात आली. आध्यात्मिक पातळी घोषित केल्यावर सर्व साधकांनी भावावस्था अनुभवली. पू. पात्रीकरकाकांचाही भाव जागृत झाला होता.

मनोगत व्यक्त करतांना श्री. टोंगे म्हणाले, ‘‘माझ्या आध्यात्मिक प्रगतीत वणी येथील सर्व साधकांचा सहभाग आहे. त्यांच्यामुळेच मला हा क्षण अनुभवायला मिळाला आहे, यासाठी श्री गुरुचरणी कृतज्ञ आहे. मला श्री गुरूंची कृपा संपादन करण्यासाठी सर्वांचे साहाय्य लाभले, त्यासाठी मी सर्वांप्रती कृतज्ञ आहे.’’

श्री. लोभेश्वर टोंगे

आनंदी आणि चुकांविषयी संवेदनशील असलेले ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. लोभेश्वर टोंगे (वय ७१ वर्षे) !

पू. अशोक पात्रीकर

१. ‘श्री. टोंगेकाका नेहमी आनंदी असतात.

२. प्रसारातील सेवा आनंदाने करणे : काका प्रसारसेवा, अर्पण मिळवणे, दैनिक ‘सनातन प्रभात’चे अंक प्रतिदिन बसस्थानकावर जाऊन घेऊन येणे आणि त्यांचे वितरण करणे, या सर्व सेवा आनंदाने करतात. ते साधकांना साहाय्य करतात.

३. चुकांविषयी संवेदनशीलता : काकांना ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या वेळी काही साधकांविषयी प्रतिक्रिया आल्या. काकांना त्याची खंत वाटून त्यांनी २ दिवस अल्पाहार आणि एक वेळचा महाप्रसाद न घेण्याचे प्रायश्चित्त त्वरित घेतले.

४. ‘काकांच्या साधनेत वाढ झाल्यामुळे त्यांचा आध्यात्मिक त्रास न्यून झाला आहे’, असे जाणवणे : काकांना तीव्र आध्यात्मिक त्रास आहे. पूर्वी अन्य साधकांनी प.पू. डॉक्टरांचे नाव उच्चारले, तरी काकांना आध्यात्मिक त्रास होत असे. मी सत्संगात प.पू. डॉक्टरांची काही सूत्रे सांगत असतांनाही त्यांना त्रास होत असे. ‘काकांची साधना वाढल्यामुळे आता त्यांना होणारा आध्यात्मिक त्रास न्यून झाला आहे’, असे मला जाणवते.’

– (पू.) अशोक पात्रीकर (सनातनचे ४२ वे (समष्टी) संत, वय ७५ वर्षे), अमरावती (१९.६.२०२५)

श्रीकृष्णाची प्रतिमा भेट देऊन श्री. लोभेश्वर टोंगे (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना पू. अशोक पात्रीकर

‘वणी, जिल्हा यवतमाळ येथील श्री. लोभेश्वर टोंगे यांची तेथील साधकांच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

१. सौ. कविता शत्रुघ्न अस्वले

अ. ‘श्री. टोंगेकाका प्रत्येकाशी बोलतांना साधनेच्या संदर्भातील सूत्रे सांगतात.

आ. ते प्रत्येक परिस्थिती आनंदाने स्वीकारतात.

इ. काकांनी ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या काळात आणि रेल्वेने प्रवास करत असतांनाही सारणी लिखाण पूर्ण केले.’

२. श्री. लहू खामणकर (वय ६९ वर्षे)

२ अ. कुटुंबियांना साधनेत साहाय्य करणे : ‘श्री. टोंगेकाका कुटुंबातील सर्वांची (पत्नी सौ. गिरिजा टोंगे (वय ६३ वर्षे) आणि मुलगा श्री. प्रफुल्ल यांची) साधना व्हावी, यासाठी प्रयत्नरत असतात.

२ आ. सेवेची तळमळ : काका प्रत्येक सेवा परिपूर्ण आणि भावपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करतात. ते कार्यपद्धतीचे तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न करतात. एकदा एका साधकाला दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अंकाचा गठ्ठा बसस्थानकावरून आणण्यास अडचण आली होती. त्या वेळी काकांची प्रकृती ठीक नव्हती, तरीही काकांनी ती सेवा केली. ते साधकांना सर्वतोपरी साहाय्य करतात.

२ इ. पूर्वीच्या तुलनेत ‘काकांचा चेहरा अधिक तेजस्वी झाला आहे’, असे मला जाणवते.

२ ई. काका साधनेविषयी बोलत असतांना त्यांची आणि ऐकणार्‍याचीही भावजागृती होते.’

३. सौ‌. सुनंदा हरणे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ५४ वर्षे)

३ अ. सेवेची तळमळ : ‘काकांना कोणत्याही सेवेसाठी कधीही बोलावले, तरी काका नियोजित वेळेच्या आधीच येतात. ते नियोजित सेवेव्यतिरिक्त सेवा असल्यास त्याही सेवा पूर्ण करतात. वर्ष २०२४ मध्ये मी ‘गुरुपौर्णिमेच्या आयोजनाचे दायित्व कोण घेऊ शकते ?’, असे विचारल्यावर काकांनी लगेच दायित्व स्वीकारले आणि सेवा परिपूर्ण केली.

३ आ. प्रांजळ : ते मला स्वतःच्या मनाची प्रक्रिया मनमोकळेपणाने आणि प्रांजळपणे सांगतात.

३ इ. साधकांना आधार देणे : काका साधकांना त्यांच्या स्थितीनुसार योग्य असा आध्यात्मिक दृष्टीकोन देतात. त्यामुळे साधकांना त्यांचा आधार वाटतो.

३ ई. काका प्रत्येक सेवा पुढाकार घेऊन करतात.

३ उ. काकांचा सेवा करतांना कृतज्ञताभाव आणि शरणागतभाव सतत जागृत असतो.’

४. सौ. गीता बंडूजी रोडे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ५६ वर्षे)

४ अ. प्रेमभाव : ‘काका सहसाधकांशी अतिशय प्रेमाने बोलतात. त्यांनी कधीही साधकांना दुखावले नाही.

४ आ. व्यष्टी साधनेचे गांभीर्य : काका मला व्यष्टी साधनेचा आढावा देतात. ते व्यष्टी साधनेचे प्रयत्न नियमित करतात. काकांमध्ये अंतर्मुखता असल्यामुळे ते स्वतःकडून होणार्‍या चुकांचे निरीक्षण करतात. ते आढाव्यात स्वतःच्या चुका प्रांजळपणे सांगतात.

४ इ. काका ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।’, असे लिहिलेली केशरी टोपी घालून सेवा करतात. तेव्हा ‘टोपीच्या माध्यमातून काकांकडे चैतन्याचा स्रोत येत आहे’, असे मला जाणवते.

४ ई. ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवानंतर काका सतत भावावस्थेत असतात’, असे मला वाटते.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १८.६.२०२५)

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.