जेवण म्हणून ‘सॅलड’ खात आहात ?

‘सॅलड’

‘मी दीड महिना ‘डिटॉक्स डाएट’ करत होते (शरिरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यासाठी घेण्यात येणारा आहार), ज्यात मी प्रतिदिन पनीर, भरपूर कच्च्या भाज्या आणि ‘सॅलड’ खात होते. त्या दिवसात माझी पचनशक्ती सगळ्यात खराब होती.’ प्रतिदिन १ ते १.३० घंटा ‘फिजिकल ट्रेनिंग’ (शारीरिक प्रशिक्षण) करणार्‍या एका खेळाडूचे शब्द ! आणि हे एकच उदाहरण नाही, अनेक आहेत.

वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये

आपले शरीर हे गणितीय पद्धतीत चालत नाही. त्यात इतके असंख्य घटक एका वेळी कार्यरत असतात की, अजूनही त्यातील अनेक गोष्टींविषयी आपण माणूस म्हणून अनभिज्ञ आहोत. त्यामुळे सगळ्या शरिराचा साकल्याने एक विश्व म्हणून विचार करणे, हे प्राथमिक विकार आणि आरोग्य यांसाठी ‘सिद्धांत वापरून औषध देणे’ उपयोगी ठरते. येथेच आयुर्वेद हा चिकित्सा दृष्टीकोनात वरचढ ठरतो.

‘सॅलड’ ही भोजनाला पर्याय (मील रिप्लेसमेंट) म्हणून खायची गोष्ट नाही. रूची वाढवण्यासाठी ‘कोशिंबीर’ म्हणून खायची गोष्ट आहे. अधिक खाल्ले, तर वातूळ आहे. गाजर, काकडी, मोड आलेली कडधान्ये यांमुळे झालेले त्रास हे पोटातून चालू होऊन सर्व शरिरात लक्षणे वाढवत नेतात. मुळात कच्चे खाणे, हे गवत खाणार्‍या प्राण्यांचे जेवण आहे, ज्यांच्यात ते पचवण्यासाठी आवश्यक ‘एन्झाईम’ ‘सेल्यूलेज’ असते, माणसात ते नसते. माणसामध्ये ‘सॅलड’ किंवा कुठल्याही कच्च्या भाज्या पोटात पाण्यामुळे फुगतात. जर त्या व्यक्तीचे आतड्याचे चलनवलन नीट नसेल, तर ते फुगून अडकून बसते. यामुळे घशाशी येणे, ढेकर, जळजळ, वायू अडकून पोट दुखणे, ही लक्षणे दिसतातच. त्यासह अर्धशिशी (मायग्रेन)सारखे दुखणे, पोट साफ न होणे ही लक्षणेही दिसतात. वजन न्यून करण्यासाठी व्यायाम, अग्निवर काम आणि आहार मात्रेचा विचार म्हणजेच आजच्या भाषेत ‘पोर्शन कंट्रोल’ हे विचार महत्त्वाचे !

अमेरिका किंवा पाश्चात्य देशांत भाज्या खाण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करावे लागते; कारण तिथे भारतासारखी धान्ये, कडधान्ये, कोंड्यासकट असलेली पोळी, भाकरी हे पदार्थ आहाराचा ‘अविभाज्य भाग’ म्हणून नसतात. हल्ली आपल्याही नसतात, हे सोडून द्या ! जर आपला आहार चौरस असेल आणि थोडा तरी व्यायाम असेल, तर तंतू (फायबर) खाण्यासाठी वेगळे काही प्रयत्न करायला नको आणि जर तो नसेल, तर केवळ कच्चे खाऊन वेगळा काही फरक पडणार नाही. त्यामुळे नुसते तेवढे करून पचन बिघडून घ्यायची आवश्यकता नाही.

– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे.