इंद्रायणी-चंद्रभागा नदीप्रदूषण, वारकरी संप्रदायावर होणारे आघात यांसह अनेक विषयांवर जागृती आणि संयुक्त कृती !

आषाढी वारीच्या निमित्ताने वारकरी संप्रदायासह हिंदु जनजागृती समितीचे हिंदु धर्मकार्यासाठी संयुक्त अभियान !

श्री. अजय केळकर, कोल्हापूर

वारकरी संप्रदायाचे धर्मकार्य आणि राष्ट्रनिष्ठा ही महाराष्ट्राची खरी ओळख आहे. गेली अनेक शतके वारकरी संप्रदाय नैतिक मूल्ये, संस्कृतीरक्षण आणि देशभक्ती यांची शिकवण देत आला आहे. आजच्या काळातही धर्म, संस्कृती आणि राष्ट्र यांच्या हितासाठी वारकरी समाज अग्रभागी आहे.

वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात असूनही अद्याप पंढरपूर आणि आळंदी येथील तीर्थक्षेत्रांना म्हणाव्या अशा सुविधा नाहीत. याचसमवेत वारीत होणारी घुसखोरी, संतांच्या श्लोकांचा चुकीचा अर्थ लावून लोकांची दिशाभूल करणे यांसह अन्य प्रश्नांचा वाचा फोडणे यांसाठी आषाढी वारीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीचे वारकरी संप्रदायासह हिंदु धर्मकार्यासाठी संयुक्त अभियान राबवले. यात प्रत्यक्ष भेटी, पत्रकार परिषद, निवेदन, जागृती, व्याख्याने घेऊन इंद्रायणी-चंद्रभागा नदीप्रदूषण, आळंदी येथे प्रस्तावित असलेले पशूवधगृह यांसह अनेक महत्त्वाच्या मागण्यांसाठी संयुक्त आवाज उठवण्यात आला. वारकरी संप्रदायातील प्रमुखांच्या भेटी घेऊन हे विषय त्यांच्यापर्यंत पोचवण्यात आले.

पीठाधीश महंत रामगिरी महाराज यांच्याशी चर्चा करतांना श्री. सुनील घनवट (डावीकडे)

१. प्रसिद्ध कीर्तनकार डॉ. रामकृष्ण लहवीतकर महाराज यांच्याशी विविध विषयांवर चर्चा झाल्यानंतर त्यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचे कौतुक केले. ‘‘हिंदु जनजागृती समिती, वारकरी, तसेच हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांसाठी स्तुत्य प्रयत्न करत आहे. समितीच्या कार्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे’’, असे त्यांनी सांगितले.

२. श्रीक्षेत्र गोदावरी धाम बेट, सरला येथील पीठाधीश महंत रामगिरी महाराज यांनी ‘‘समिती आणि वारकरी यांचे संयुक्त मेळावे घेऊ. यातून मोठ्या प्रमाणात वारकरी-भाविक यांचे प्रबोधन होईल’’, असे सांगितले.

३. ‘देवगड संस्थान’चे प्रमुख विश्वस्त ह.भ.प. भास्करगिरी महाराज यांचाशी चर्चा करतांना श्री. सुनील घनवट यांनी ‘‘डॉ. नरेंद्र दोभालकर, कॉ. पानसरे हत्या प्रकरणात डॉ. वीरेंद्र तावडे यांच्यासारख्या निरपराध हिंदुत्वनिष्ठांना गोवले जात आहे, त्यांना अन्याय्यरित्या वर्षानुवर्षे कारागृहात ठेवले जात आहे’’, या संदर्भात माहिती दिली.

४. देवगड संस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांनी ‘‘महाराष्ट्र शासनाने वारीचा मार्ग आणि तीर्थक्षेत्रे आळंदी, पंढरपूर, देहू, मुक्ताईनगर, पैठण) यांचा किमान ५ किलोमीटरचा परिसर कायमस्वरूपी ‘मद्य-मांसविक्रीमुक्त क्षेत्र’ म्हणून घोषित करावा आणि त्याची कठोर कार्यवाही करावी, यांसाठी प्रयत्न करायला हवेत’’, असे आवाहन केले.

श्री. अजय केळकर

महत्त्वपूर्ण उपक्रम !

१. २१ जून या दिवशी पुणे येथे समस्त वारकरी संप्रदाय, संस्थान, संघटना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. यात ‘वारकरी आता तीर्थक्षेत्र, देवता, संत, अभंग आणि पवित्र वारी यांचा अवमान आणि वारकर्‍यांच्या श्रद्धास्थानांवरील आघात तात्काळ थांबवा, शासनाने ठोस भूमिका घ्यावी’, अशी ठाम मागणी या वेळी करण्यात आली. या पत्रकार परिषदेसाठी ज्येष्ठ कीर्तनकार संतवीर ह.भ.प. बंडातात्या कराडकर, महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे सचिव ह.भ.प. नरहरि महाराज चौधरी, ‘अखिल भारतीय संत समिती’चे प्रदेश महामंत्री स्वामी भारतानंद सरस्वती महाराज, महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या कोकण प्रांताध्यक्ष ह.भ.प. भगवान महाराज कोकरे, राष्ट्रीय वारकरी परिषदेचे कार्याध्यक्ष ह.भ.प. बापू महाराज रावकर, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्रीक्षेत्र देहूचे माजी अध्यक्ष ह.भ.प. नितीन मोरे महाराज आणि ह.भ.प. वैभव महाराज मोरे, ‘संत सोपानकाका पालखी सोहळा दिंडी समाज’ अध्यक्ष ह.भ.प. राम महाराज कदम, ‘चिंतामणी प्रासादिक दिंडी’चे ह.भ.प. दत्तात्रय चोरगे महाराज, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट आणि अन्य संत-महंत उपस्थित होते.

आळंदी देवस्थानाचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ यांच्याशी चर्चा करतांना श्री. सुनील घनवट (उजवीकडे)

२. २३ जून या दिवशी सासवड येथे ‘वारकरी संत बैठकी’त वारकरी संप्रदायातील महाराजांनी क्षात्रतेजयुक्त भाषणे करून उपस्थितांचे प्रबोधन केले आणि हिंदूंना संघटित करून हिंदु राष्ट्र स्थापण्यासह वारीतील पुरो(अधो)गाम्यांची घुसखोरी रोखण्याचा निर्धार केला !

३. विविध दिंड्यांमध्ये वारकर्‍यांचे हिंदूसंघटनासाठी धर्मशिक्षण आणि धर्माचरणाची आवश्यकता, ‘हिंदु संस्कृती आणि आचरण’, ‘वारकर्‍यांच्या तीर्थक्षेत्रातील समस्या आणि त्यावर उपाय’, यांसह विविध विषयांवर प्रबोधन करण्यात आले.


अभियानाचे प्रत्यक्ष फलित !


दैनिक ‘सनातन प्रभात’ने केलेली जागृती,
वारकर्‍यांचे संघटन आणि हिंदु जनजागृती समितीचे आंदोलन यांमुळे मुख्यमंत्र्यांकडून आळंदीतील पशूवधगृह रहित केल्याची घोषणा !

आळंदी क्षेत्राच्या जवळ पशूवधगृह होऊ नये, हे सूत्र दैनिक ‘सनातन प्रभात’ने लावून धरले. याविषयी ‘सनातन प्रभात’ने वारकरी, हिंदुत्वनिष्ठ, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते यांना यात सहभागी करून घेतले, तसेच नागरिकांना पशूवधगृहाच्या विरोधात हरकती नोंदवण्याचे आवाहन केले. हिंदु जनजागृती समिती, विविध वारकरी संघटना यांनी या विरोधात आयुक्तांकडे तक्रार केली, ठिकठिकाणी निवेदने दिली. हिंदु जनजागृती समितीने या विरोधात वारकर्‍यांना संघटित केले. परिणामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘हे पशूवधगृह रहित करत आहोत’, अशी घोषणा केली; मात्र लेखी आदेश मिळेपर्यंत लढा चालूच राहील .