बिहारच्या आमदारांची गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

आमदार प्रा. (डॉ.) वीरेंद्र यादव, आमदार कुमार नागेंद्र, आमदार सर्वेश कुमार यांच्यासह अधिवक्ता वसिष्ठ यादव यांची उपस्थिती

आमदार प्रा. (डॉ.) वीरेंद्र यादव यांचा सत्कार करतांना धर्मप्रचारक संत सद्गुरु नीलेश सिंगबाळ (डावीकडे)

रामनाथी (फोंडा) : बिहार येथील जनता दल (संयुक्त) पक्षाचे आमदार प्रा. (डॉ.) वीरेंद्र यादव, त्यांचे बंधू अधिवक्ता वसिष्ठ यादव, राष्ट्रीय जनता दलाचे आमदार कुमार नागेंद्र आणि अपक्ष आमदार सर्वेश कुमार, तसेच त्यांचे कुटुंबीय यांनी १ जुलै या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. बिहारच्या विधान परिषदेतील हे सर्व आमदार आहेत. सनातनचे साधक श्री. निषाद देशमुख यांनी त्यांना आश्रमात चालणारे राष्ट्र, धर्म, अध्यात्म आणि संशोधन आदी कार्याची माहिती दिली. सर्वांनी आश्रमातील कार्याची माहिती जिज्ञासेने जाणून घेतली.

या प्रसंगी धर्मप्रचारक संत सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी प्रा. (डॉ.) वीरेंद्र यादव यांचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सत्कार केला. तेव्हा त्यांच्यासह अन्य मान्यवरांनी नम्रपणे ‘आम्ही देवाच्या दारी आलो आहोत. खरेतर आम्ही आमचे तन-मन अर्पण करून तुम्हाला साहाय्य करायला हवे, तर उलट आपणच आमचा सन्मान करत आहात’, अशी भावना व्यक्त करून केवळ आश्रमातील प्रसाद आणि ग्रंथ स्वीकारले.

आश्रम पाहिल्यानंतर मान्यवरांनी ‘आम्ही सर्व जण एकाच कॉलनीमध्ये (संकुलात) रहातो. तिथे आमच्या घरांपैकी एका घराला तुम्ही तुमचा आश्रम करा. यासाठी आम्ही शक्य तेवढे साहाय्य करू. आश्रम आणि सनातन संस्था यांचे कार्य सांगून तुम्ही आम्हाला कृतीप्रवण केले’, असे सांगितले आणि वाराणसी येथील सेवाकेंद्राला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच त्यांनी बिहार येथे रहात असलेल्या परिसरात व्याख्यानाचे आयोजन करण्यास सांगितले.

पृथ्वीवर असा एखादा आश्रम असू शकतो, अशी आम्ही कधी कल्पनाही केली नव्हती ! – उत्स्फूर्त अभिप्राय

आश्रम पाहून ‘पृथ्वीवर असा एखादा आश्रम असू शकतो, अशी आम्ही कधी कल्पनाही केली नव्हती’, असे उत्स्फूर्त उद्गार त्यांनी या वेळी काढले. आश्रमात लाद्यांवर उमटलेले ‘ॐ’ हे दैवी चिन्ह पाहिल्यावर ‘ही दिव्य अनुभूती आहे’,  असेही ते म्हणाले.

मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

१. आमदार प्रा. (डॉ.) वीरेंद्र यादव – आश्रम पाहून अंतःकरणापासून प्रभावित झालो. जगाला सुंदर बनवण्याची साधना येथे सांगितली जाते. आश्रमाचे व्यवस्थापन सर्वोत्तम आणि अनुकरणीय आहे.

२. आमदार कुमार नागेंद्र – येथे आल्यावर एक वेगळ्या प्रकारची अनुभूती आली. गोव्यात सनातन (धर्माच्या) संदर्भात जे कार्य होत आहे, ते प्रेरणायोग्य आहे. वैज्ञानिक पद्धतीने ग्रंथ आणि घटना यांच्या संदर्भात संशोधनाच्या माध्यमातून जे कार्य चालू आहे, ते पुष्कळ प्रभावशाली आहे.

३. सौ. मिन्टी कुमारी (आमदार कुमार नागेंद्र यांची पत्नी) – आश्रम पाहून आनंदाची अनुभूती आली. सहजता, स्वच्छता आणि सकारात्मकता अनुभवली. सूक्ष्म जगतासंबंधीचे प्रदर्शन पुष्कळ चांगले आहे.

४. अधिवक्ता वसिष्ठ यादव – आश्रमात आल्यावर पवित्रतेचा भाव मनात निर्माण झाला. येथील व्यवस्थापन आणि येथे रहाणार्‍यांचे अध्यात्माप्रतीचे समर्पण पाहून मला प्रेरणा मिळाली. सूक्ष्म जगतासंबंधीचे प्रदर्शन पाहून स्वतःच्या आचरणात पवित्रता आणण्याची प्रेरणा मिळाली. असा आश्रम बिहार आणि अन्य राज्यांमध्ये झाला, तर चांगले होईल.

५. आमदार सर्वेश कुमार – ‘अलौकिक ! जीवनाला परिवर्तित करणारी संस्था ! स्वच्छता, संस्कार आणि जीवनाला दिशा देणारी ही सक्षम संस्था आहे.

६. अमिता सिन्हा (आमदार सर्वेश कुमार यांची पत्नी) – मला आश्रम पाहून पुष्कळ चांगले वाटले. मी येथून पुष्कळ काही शिकून जात आहे. मी स्वतः (साधनेचे) प्रयत्न करीन. पुन्हा गोव्यात आल्यावर येथे अवश्य येईन. आश्रमातील (साधकांचा) सेवाभाव मला पुष्कळ चांगला वाटला.

‘सनातन प्रभात’ची माहिती घेतांना आमदार सर्वेश कुमार, आमदार प्रा. (डॉ.) वीरेंद्र यादव, आमदार कुमार नागेंद्र आणि अन्य यांना माहिती देतांना श्री. निषाद देशमुख (उजवीकडे)

क्षणचित्रे

१. काटकसरीने जीवन जगण्याचा केला निर्धार : ‘आश्रमातील साधक पालन करत असलेली सुव्यवस्था, स्वच्छता आणि साधनेचे प्रयत्न आदी आम्हीही आमच्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करू. ‘काटकसरपणा हा देवाचा गुण आहे; कारण उपभोगाला काही सीमा नाही’, याची सुस्पष्ट जाणीव आश्रम बघून झाली. त्यामुळे आम्ही पण काटकसरीने जीवन जगण्याचा प्रयत्न करणार. आश्रमात राहून पूर्णकालीन साधना करणारे साधक महात्माच असल्याचे जाणवते’, असेही आश्रम पहातांना ते म्हणाले.

२. गोव्यात हिंदु धर्म आणि संस्कृती जोपासणारा एवढा चांगला आश्रम : आमदार प्रा. (डॉ.) वीरेंद्र यादव, आमदार कुमार नागेंद्र, आमदार सर्वेश कुमार आणि अधिवक्ता वसिष्ठ यादव, तसेच त्यांचे कुटुंबीय ३ दिवस गोव्यात आले होते. ते म्हणाले की, ‘आरंभी २ दिवस समुद्रकिनारे आणि चर्च पाहून आम्हाला कंटाळा आला होता. ‘तिसरा दिवस गोव्यात कसा काढायचा ?’, असा प्रश्‍न आम्हाला पडला होता; परंतु आश्रमात आल्यावर आम्हाला पुष्कळ चांगले वाटले. देवच आमच्यासाठी जे आवश्यक होते, त्या वातावरणात म्हणजे आश्रमात घेऊन आला. गोवा म्हणजे बाह्यतः समुद्रकिनारे आदी आहे; परंतु गोव्यात हिंदु धर्म आणि संस्कृती जोपासणारा एवढा चांगला आश्रम आहे, हे येथे आल्यावर कळले’, असेही आश्रम पहिल्यानंतर मान्यवर म्हणाले.