आला पावसाळा… पथ्य पाळा !

आजच्या लेखात पावसाळ्यात पाळावयाचे काही नियम सांगणार आहे. पावसाळा हा ओलावा आणणारा आणि त्यामुळेच अग्नी न्यून करणारा आहे. हा वातप्रकोपाचा काळ असल्याने संधीवात, शारीरिक दुखणी आणि सांध्यांचे आजार ही दुखणी डोके वर काढतात. यासह शरीर याच ऋतूमध्ये पित्त साठवायला प्रारंभ करते. शरिरातील अग्नी नीट ठेवणे आणि वात वाढू न देणे, या गोष्टींकडे लक्ष दिले असता पावसाळा नीट जातो.

१. प्रातर्विधी नंतर दिवसाचा प्रारंभ आले, सुंठ, गवती चहा घालून केलेल्या चहाने किंवा काढ्याने करू शकता.

२. पोट साफ होण्याकडे लक्ष असावे. पोट साफ असले की, वात वाढत नाही आणि पित्तही प्रमाणात रहाते. पावसाळा हा पित्त साठण्याचा काळ असल्याने पित्ताचीही काळजी घ्यायला लागते. पोट साफ रहाण्यासाठी त्रिफळा चूर्ण किंवा कुठलेच चूर्ण किंवा गोळ्या न घेता शक्यतो स्निग्ध अनुलोमक घ्यावे. यामध्ये दूध-तूप किंवा गरम पाणी-तूप अथवा अल्प प्रमाणात एरंडेल वा मनुका घेऊ शकता. तेही प्रतिदिन घ्यायची आवश्यकता नाही, केवळ ज्यांना त्रास आहे त्यांनी घ्यावे.

वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये

३. पावसाळ्यात अग्नी मंद आणि बाहेर थंडावा असल्याने चमचमीत अन् मसालेदार पदार्थ खायची इच्छा होते आणि खाल्लेही जातात; पण हे पदार्थ पुष्कळ अतीप्रमाणात खाल्ले जाणार नाहीत, हे बघावे.

४. जेवणात उकड काढून केलेली भाकरी किंवा पुष्कळ तूप घातलेली पोळी असावी. पालेभाज्या आणि उसळी टाळाव्यात. मूग, मसूर त्यातल्या त्यात चालेल. फळभाज्या खाव्यात.

५. कोशिंबिरी शक्यतो टाळाव्यात. खायच्याच असल्यास तूप जिर्‍याची फोडणी देऊन लिंबू किंवा डाळिंब टाकून, अल्प प्रमाणात आणि शक्यतो दुपारी खाव्यात.

६. रात्रीच्या जेवणात भात-आमटी किंवा मिरे पावडर घालून सूप घेता येईल. जेवणाची वेळ उशिराची, म्हणजे रात्री ८ नंतरची असेल, तर पोळी कमी घ्यावी. रात्री ताक टाळावे. ताकात आले किसून टाकून फोडणी देऊन प्यावे. दिवसासुद्धा ताक प्यायचे असल्यास जिरे-मिरे पावडर घालून प्यावे. दही पूर्णच टाळावे.

७. तोंडाला चव यावी म्हणून, पुदिना-आले चटणी, अल्प तिखट, खोबरे-लसूण चटणी, कढीपत्ता चटणी आणि नारळ चटणी खाता येईल. यासह मोरावळा, कोहळेपाक हाही चालू शकेल.

८. व्यायाम न्यून करावा. साधारणपणे काखेत आणि कपाळावर थोडा घाम आला की, थांबवावा. पावसाळ्यात शारीरिक शक्ती न्यून असल्याने व्यायामाने वात अधिक वाढू शकतो.

९. अंगाला प्रतिदिन तेल लावावे. कोमट तीळ तेल उत्तम आहे.

१०. जेवल्यावर पोट जड होत असेल, तर आल्याचे पाचक किंवा सुंठ-गुळाची छोटी गोळी किंवा सुंठ-खडीसाखर बनवून खावी.

११. घरातसुद्धा पायात मोजे असावे. कान, छाती, पाय यांचे थंडीपासून रक्षण करावे. दुचाकीवर पावसाळ्यात फिरणे झाले असता, आले, सुंठ किंवा गरम पाणी प्यावे. चारचाकी वाहनामध्ये शक्यतो ‘हिटर’ लावावा.

१२. सध्याच्या काळात ओला किंवा ओलसर मास्क वापरू नका. बाहेरून आल्यानंतर की, थोड्या वेळाने गरम पाणी प्या. ओले केस लगेच कोरडे करा.

१३. आयुर्वेदातील बस्ती आणि अभ्यंग या चिकित्सा आताच्या काळात उपयुक्त असतात. अशा आणि या धर्तीवर उष्ण अन् स्निग्ध आहारविहार ठेवला असता, पावसाळा प्रकृतीपूर्ण जातो.

१४. संध्याकाळी धूपन अवश्य करावे.

कोणते पदार्थ खाऊ शकतो ? 

अ. न्याहरी (नाश्ता) : उपमा, घावन, थालीपीठ – लोणी, उकड, आंबील, कटलेट , आंबोळी, डाळ-तांदूळ खिचडी, कधी तरी पोहे, शेवयांचा उपमा; कांदा, मेथी, गाजर, कोथिंबीर घालून केलेला धपाटा – लोणी, गव्हाच्या कण्यांची खीर वा उपमा, शिरा

आ. जेवण : पोळी, ज्वारी किंवा तांदूळ यांची भाकरी, गोड ताक, भात, आमटी (नुसते वरण टाळावे), तूप; भाज्यांमध्ये दुधी भोपळा, पडवळ, लाल भोपळा, सर्व फळभाज्या, मूग, मसूर, लसूण, आले, कांदा या चालू शकतात.

इ. रात्रीचे जेवण : भात आमटी, मूगाची खिचडी, सूप-भात, सोलकढी-भात, पराठा-तूप चटणी, मिक्स घावन, लोणी भाकरी-भाजी, धपाटा.

– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे. (९.६.२०२५)