मध्य रेल्वेमार्गावरील दिवा ते कोपर रेल्वे स्थानकांमधील घटना !

मुंबई – कसारा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणार्या लोकलगाडीतून प्रवास करणारे १३ प्रवासी खाली पडले. यातील ४ जणांचा मृत्यू झाला, तर उर्वरित ९ जण गंभीररित्या घायाळ झाले आहेत. ९ जून या दिवशी सकाळी ९.३० वाजता मध्य रेल्वेच्या दिवा ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. घायाळांवर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार चालू आहे. ५ पुरुष आणि २ महिला यांची प्रकृती स्थिर आहे, २ जणांना मेंदूशी संबंधित दुखापत झाल्यामुळे ज्युपिटर रुग्णालयात हलवण्यात आले आहे, तर एका पुरुषाचा मृत्यू झाला आहे. ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या ३ जणांचा मृत्यू झाला आहे.
मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, ‘‘कसार्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी लोकल प्रवाशांनी खच्चून भरली होती. काही प्रवासी डब्याच्या ‘फूटबोर्ड’वर (डब्यात चढण्यासाठीच्या लहान पायरीवर) उभे राहून प्रवास करत होते. त्याच वेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून डाऊन दिशेला जाणारी एक लोकल समोरून आली. दोन्ही लोकलगाड्या एकमेकांच्या बाजूने जात होत्या, तिथे २ रेल्वेरुळांमधील अंतर न्यून आहे. अनेक प्रवासी दरवाजात उभे होते. त्यांच्या पाठीवर बॅगा होत्या. हे प्रवासी दुसर्या लोकलला घासले गेले, त्यांच्या बॅगा दुसर्या लोकलवर आदळल्या. त्यामुळे दरवाजात उभे असलेले १३ प्रवासी खाली पडले. आम्हाला त्या लोकलमधील प्रवाशांनी आणि गार्डने दूरभाषद्वारे या घटनेची माहिती दिली. त्यानंतर आम्ही तातडीने प्रवाशांसाठी रुग्णवाहिका पाठवली. ९.५० वाजता रुग्णवाहिका आणि रेल्वेचे अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी आले. घायाळ झालेल्यांना रुग्णालयात नेण्यात आले.’’
धोकादायक वळणावरून जलद लोकल चालवणे अयोग्य !
मुंब्रा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शेख म्हणाले, ‘‘दिवा-मुंब्रा या दरम्यानचे वळण अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे या वळणावरून जलद लोकल चालवणे योग्य नाही. मध्य रेल्वे प्रशासन येथून जलद लोकल का चालवते ? तेच कळत नाही. कसार्यावरून येणारी गाडी प्रवाशांनी तुडुंब भरून आलेली असते. अशी भरधाव गाडी या वळणावरून चालवणे अत्यंत धोकादायक आहे.’’
अपघातानंतर ‘जाग’ आलेल्या मध्य रेल्वेचे तोंडदेखले निर्णय !
१. नवीन गाड्यांमध्ये ‘ऑटोमेटिक डोअर क्लोजर’ (दारे आपोप बंद होणारी यंत्रणा) असेल. (आधीच या गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी असते, आता वाराही येत नाही. अशा स्थितीत दरवाजे बंद झाल्यावर लोकांना श्वास घ्यायला हवा तरी मिळेल का ? याचा विचार रेल्वेने केला आहे का ? आणि अपघात झाल्यानंतर रेल्वेला अशा उपायोजना सुचतात का ? आधी रेल्वेचे प्रशासन झोपलेले असते का ? – संपादक)
२. सध्याच्या लोकलगाड्यांनाही ‘ऑटोमेटिक डोअर’ लावण्यासंदर्भात विचार केला जाईल.
३. कल्याण कसार्यापर्यंत तिसरी आणि चौथी लाईन, तर कुल्यार्र्पर्यंत पाचवी आणि सहावी लाईन नियोजित आहे. (याला अनेक वर्षे झाले असतांना ती अद्याप पूर्ण का झाली नाही ? याचे उत्तर रेल्वे प्रशासनाने दिले पाहिजे ! – संपादक)
४. ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत सहाव्या लाईनपर्यंत ‘अपग्रेड’ करणार. (हे होईपर्यंत मुंबईची लोकसंख्या आणखी किती वाढलेली असणार ? याचा विचार कुणी केला आहे का ? – संपादक)
५. सरकारी आणि खासगी कार्यालयांनी कामकाजाची एकच वेळ न ठेवता त्या वेगवेगळ्या ठेवाव्यात ! (हे अनेक वर्षांचे सूत्र आहे. यावर काय कृती झाली आहे, हे कोण सांगणार ? – संपादक)
बाहेरून येणार्या लोंढ्यांमुळे रेल्वेसेवा कोलमडली ! – राज ठाकरे

आपल्याकडे बाहेरून येणारे लोंढे असल्याने रेल्वे कोलमडली आहे. रेल्वेचा बोजवारा उडालेला आहे, वाहतुकीचा बोजवारा उडालेला आहे. लोकांना चालायला पदपथ नाहीत. वाहनांसाठी रस्ते नाहीत. मेट्रो, मोनो आणि बाकीच्या सोयी-सुविधांनी प्रश्न सुटणार नाही. लोकलमध्ये लोक आत कसे शिरतात, बाहेर कसे पडतात ? संध्याकाळच्या वेळेत मुंबई लोकलमधून प्रवास करून बघा. जर लोकलला दरवाजे बसवले, तर लोक आत गुदमरून मरतील. किती गर्दी असते, याची तुम्हाला कल्पना आहे का ? त्याची एक जागा बाहेर येण्यासाठी हवी आणि एक जागा आत येण्यासाठी हवी. माणसाची आपल्या देशात किंमतच नाही, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मध्ये रेल्वेवर झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली !

दुर्घटनेत ५ जणांच्या मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. घायाळ झालेल्यांना आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ही घटना नेमकी कशामुळे घडली ?, याची चौकशी रेल्वे विभागाने चालू केली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
घायाळांना वाचवण्याचा सवोतोपरी प्रयत्न करू ! – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जे घायाळ आहेत, त्यांना वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू. मृतांच्या वारसांना शासनाने ५ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य घोषित केले आहे. घायाळांना ५० सहस्र, १ लाख किंवा २ लाख रुपये दिले जातील, तसेच त्यांचे सर्व उपचार शासनाच्या माध्यमातून केले जातील, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
दिवा ते सी.एस्.एम्.टी. जलद लोकल चालू करा ! – शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची मागणी

लोकलमधील गर्दीचा भार न्यून व्हावा आणि अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दिवा ते सी.एस्.एम्.टी. जलद लोकल चालू करावी, अशी मागणी कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. कल्याणच्या पुढे तिसरी आणि चौथी मार्गिका सिद्ध करण्याचे काम चालू असून यासाठी भूमी अधिग्रहण केले जात आहे. लोकल फेर्या जेव्हा वाढतील, तेव्हा गर्दीचे व्यवस्थापन करणे सोपे जाईल. नव्या मार्गिका वाढवण्यासह १२ डब्यांच्या लोकल १५ डब्यांमध्ये परावर्तित करणे तितकेच आवश्यक आहे.
अन्य प्रतिक्रिया
दिनेश पैठणकर, निवासी नायब तहसीलदार, ठाणे – दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर आम्ही साहाय्यासाठी कार्यरत झालो. मृत आणि घायाळ यांचे नातेवाईक यांच्याशी संपर्क करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
खासदार नरेश म्हस्के, शिवसेना – घटना अत्यंत दुर्दैवी आहे. प्रशासनाने या अपघातामागील कारण शोधले पाहिजे. ही घटना गर्दीमुळे झाल्याचे दिसून येत आहे. प्रवाशांना कुणी धक्का दिला का ?, याचीही माहिती घ्यायला हवी.
माजी खासदार राजन विचारे (ठाकरे गट) – मुंबई ते कल्याण या मार्गावर लोकल न्यून पडत आहे. लोकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. लोकलमध्ये गर्दी असते. त्यामुळे लोकलच्या फेर्या वाढवल्या पाहिजे.
माजी खासदार किरीट सोमय्या, भाजप – ठाणे ते डोंबिवली परिसरातील लोकसंख्या ज्या गतीने वाढली, त्या गतीने आपण वाहतूक व्यवस्था वाढवू शकलो नाही; म्हणूनच देवेंद्र फडणवीस सरकारने मेट्रोच्या कामावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. रेल्वेचे सगळे डबे १५ डब्यांचे करून क्षमता वाढण्याचा प्रयत्न चालू आहे.
मुंब्रा येथील धोकादायक वळणाविषयी रेल्वे प्रशासनाला पत्रव्यवहार केला होता !
|
पत्रव्यवहाराच्या संदर्भात पुढे काय केले ? याविषयी रेल्वे प्रशासनाने त्यांची भूमिका स्पष्ट करावी !
मुंबई – मुंब्रा येथे एका धोकादायक वळणावर रेल्वे एका बाजूला झुकते, त्या वेळी ६ सहस्र प्रवासी रेल्वेतून प्रवास करत असतात. रेल्वेवर प्रचंड भार येऊन ती एका बाजूला झुकते. त्या वळणाविषयी याआधी आम्ही रेल्वे प्रशासनाला पत्रव्यवहार केला होता. अन्य वेळी साधारणतः ३ सहस्र ६०० प्रवासी असतात, असे रेल्वे प्रवासी संघटनेचे श्री. सिद्धेश देसाई यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘आम्ही दिवा ते ठाणे या दरम्यान रेल्वे संख्या वाढवा’, असे वारंवार सांगत आहोत. पंतप्रधानांनीसुद्धा ही मागणी मान्य केली; मात्र त्यावर रेल्वे प्रशासनाने कृती केली नाही. (याचे उत्तर रेल्वे प्रशासनाने दिले पाहिजे आणि पंतप्रधानांनीही यात लक्ष घातले पाहिजे, असेच जनतेला वाटते ! – संपादक) जे वळण निर्माण झाले आहे, त्यावर अभियंतेही काही करू शकत नाहीत.’’
बैठकीसाठी वेळ न दिल्यास प्रवासी संघटनांची आंदोलनाची चेतावणी !
‘प्रवासी संघटनांना गेल्या वर्षभरापासून भेटीची वेळ दिली गेलेली नाही. रेल्वेकडून रेल्वे आणि रेल्वे रुळ यांच्यावर खर्च न करता अमृत योजनेअंतर्गत स्थानकांवर अधिक खर्च केला जात आहे’, असा आरोप प्रवासी संघटनेचे प्रतिनिधी नंदकुमार देशमुख यांनी केला आहे. मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी बैठकीसाठी वेळ न दिल्यास आंदोलनाची चेतावणी संघटनेने दिली आहे.
संपादकीय भूमिकामुंबईच्या लोकलमध्ये प्रचंड गर्दी असते, जे जगजाहीर आहे. असे असतांना यावर मुळापर्यंत जाऊन विचार करून उपाययोजना काढण्याचा आतापर्यंत कोणत्या पक्षाने प्रयत्न केला नाही. आज घडलेली घटना पुन्हा घडणार नाही, याची शाश्वती देता येणार नाही आणि यावर सरकार कायमस्वरूपी उपाययोजनेकडे प्रयत्न करील, अशीही शक्यता नाही, हीच वस्तूस्थिती आहे ! |
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
गडचिरोलीतील खाण प्रकल्प रहित करावेत ! – आदित्य ठाकरे, नेते, ठाकरे गट
विधान परिषदेमध्ये महायुतीचे ५ उमेदवार बिनविरोध विजयी !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतांना पकडलेल्या युवकाची आत्महत्या