महिला आयोगाकडून महिलांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा पिंपरीमधील एका महिलेचा आरोप !

सासरी छळ होत असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंद !

पिंपरी (पुणे) – विवाहात मोटार, १५ तोळे सोने, महागड्या वस्तू देऊनही पैशांसाठी पती, सासू, दीर, मावस सासू आणि सासरे यांनी छळ केला. काठी, पट्टा, हाताने मारहाण केली. मारहाणीचे पुरावे असलेला भ्रमणभाष हिसकावून घेतला. पोलीस ठाण्यात नोंद केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी धमकी दिली जात आहे. याविषयी २ महिन्यांपूर्वी महिला आयोगाकडे तक्रार दिली. त्याची नोंद घेतली नसल्याचा दावा एका महिलेने पत्रकार परिषदेमध्ये केला. या वेळी महिलेचे आई-वडील उपस्थित होते.

पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन ५ जानेवारी आणि १५ जानेवारी २०१८ या दिवशी तक्रारीचे अर्ज केले. त्या वेळी दोन्ही कुटुंबांना एकत्रित बोलावून समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तो अयशस्वी झाला. ३ मार्च २०१८ या दिवशी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला. अखेर २४ मार्च २०१८ या दिवशी तक्रार प्रविष्ट करण्यात आली. (पीडित महिलेला केवळ तक्रार प्रविष्ट करण्यासाठी वारंवार अर्ज करावे लागतात, हे संतापजनक आहे ! – संपादक) ती तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात आहे, असा आरोप महिलेने केला. (तक्रार मागे घेण्यासाठी दबाव का टाकला गेला ? हे शोधणे आवश्यक आहे. असे असेल तर महिलांना आधार कुठून मिळणार ? – संपादक) याविषयी ‘राज्य महिला आयोगा’च्या ‘व्हॉट्सअप’वर पत्र पाठवले होते. अध्यक्षांच्या स्वीय साहाय्यकाच्या (मदतनीस) संपर्कात होते. त्यांनी वेगवेगळी कारणे सांगून तक्रारींकडे दुर्लक्ष केले, असाही आरोप केला आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर म्हणाल्या, ‘‘महिला आयोगाचे १० ‘व्हॉट्सअप’ क्रमांक आहेत. त्यापैकी कोणत्या क्रमांकावर तक्रार केली ? अनेकदा ‘व्हॉट्सअप’वरील तक्रारी खोट्या असतात. त्यांनी रितसर तक्रार करावी. कारवाई केली जाईल.’’

संपादकीय भूमिका 

असे होत असेल, तर हे गंभीर आहे. महिला आयोगाकडून अशा प्रकारे पीडित महिलांना वागणूक देणार्‍यांवर अंकुश ठेवणे आवश्यक !