पाकिस्तानचा कणा मोडणारे ‘ऑपरेशन सिंदूर’ !

‘२२ एप्रिल या दिवशी काश्मीरमधील पहलगाम येथे पाकपुरस्कृत जिहादी आतंकवाद्यांनी २८ निरपराध हिंदूंची धर्म विचारून हत्या केली. यात एक परकीय व्यक्तीही मृत्यूमुखी पडली. स्थानिक धर्मांधांचे साहाय्य आणि हिंदूंना संपवण्याचे षड्यंत्र यांचा परिपाक, म्हणजे पहलगाम आक्रमण होय. या आक्रमणाचा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सूड उगवतील आणि पाकिस्तानला कायमस्वरूपी धडा शिकवतील, हे प्रत्येक भारतियाला अपेक्षित होते. त्यांनाच नव्हे, तर जागतिक नेत्यांनाही याची कल्पना होती.

१. सर्वप्रथम स्थानिक घरभेदींवर कारवाई

सर्वप्रथम भारत सरकारने आपल्या देशातील घरभेदी, म्हणजेच राष्ट्रद्रोही लोकांचा शोध घेण्यास प्रारंभ केला. काश्मीरमध्ये सैन्य आणि निमलष्करी दल यांच्या अनेक  तुकड्या पाठवण्यात आल्या. आक्रमण करणार्‍या आतंकवाद्यांची शोधमोहीम चालू केली. यासमवेतच त्यांनी आतंकवाद्यांच्या स्थानिक समर्थकांचा शोध घेण्यास प्रारंभ केला. त्यांची अनधिकृत निवासस्थाने आणि मालमत्ता यांना बेचिराख केले. यासमवेतच शेकडो लोकांना चौकशीसाठी कह्यात घेतले. अनेक लोकांची बँक खाते पडताळली, तसेच समाजमाध्यमांतून होणार्‍या देवाण-घेवाणवरही बंधने घालून अन्वेषण चालू ठेवले. आतंकवादी  भारतीय असो किंवा पाकिस्तान समर्थक त्यांची केवळ घरेच पाडली नाहीत, तर त्यांच्या घरातील तळघर आणि खंदकही उद्ध्वस्त केले. या मोहिमेने वेग पकडला, तेव्हा मात्र काश्मिरी राजकीय पक्षांच्या प्रमुखांपासून काँग्रेस आणि पुरोगामी विचारधारेच्या पक्षांनी ‘महिला अन् निरपराध व्यक्ती यांवर सूड उगवू नका’, अशी ओरड चालू केली.

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

२. भारतीय सैन्य दलांकडून पाकिस्तानची दाणादाण

भारत सरकारने सिंधू जल वाटप करार स्थगित केला. पाकिस्तान तहानलेला रहावा आणि त्यांच्या शेतीला पाणी मिळणार नाही, याची व्यवस्था केली. यासमवेतच विविध देशातील पंतप्रधान आणि राष्ट्रप्रमुख यांच्याशी बोलणी चालू ठेवली. तिन्ही सशस्त्र दलांचे प्रमुख, केंद्रीय संरक्षणमंत्री, गृहमंत्री, पररष्ट्र्रमंत्री, पंतप्रधान यांच्या अनेक बैठका झाल्या. त्यात तिन्ही सैन्यदलप्रमुखांना पहलगाम आक्रमणाचा सूड घेण्याचे स्पष्टपणे आदेश दिले, तसेच त्यांना सक्त कारवाई करण्याची मोकळीक दिली. अवघ्या १५ दिवसांच्या आत भारताने स्वतःची सीमा रेषा न ओलांडता पाकिस्तानी आतंकवाद्यांची ९ तळे उद्ध्वस्त केली. त्यात २०० हून अधिक आतंकवादी ठार झाले. त्यानंतर पिसाळलेल्या पाकिस्तान्यांनी भारतीय शहरांवर आक्रमणे केली; मात्र भारताच्या ‘एस्-४००’ संरक्षण प्रणालीने ३०० हून अधिक ड्रोन नष्ट केली आणि आक्रमणेही परतवून लावली. त्यानंतर चिडलेल्या पाकिस्तानने भारताच्या नागरी वसाहतीवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र यांद्वारे  आक्रमणे करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्याला प्रत्युत्तर देतांना भारताच्या तिन्ही दलाच्या सैनिकांनी पाकिस्तानची हवाई दल यंत्रणा आणि अनेक विमानतळे उद्ध्वस्त केली. भारतीय नौदलाने कराची बंदर आणि हवाई दलाने पाकिस्तानच्या अनेक शहरांवर आक्रमणे केली. पाकिस्तानने भारतीय सैन्यांचा पराक्रम पाहिला आणि त्यांचे मनोधैर्य खचले. त्याने अमेरिकेचे पाय पकडले आणि भारताचे आक्रमण थांबवण्यास अमेरिकेला विनंती केली. दुर्दैवाने भारताने युद्धविराम घोषित केला; मात्र तोपर्यंत पाकिस्तानची अतोनात हानी झालेली होती.

३. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणार्‍यांना अटक

पाकिस्तानवरील सैन्य कारवाई थांबल्यावर भारताने पाकिस्तानसाठी हेरगिरी करणार्‍या अनेक देशद्रोह्यांना अटक केली. आतापर्यंत १२ हून अधिक हेरांना पकडून कारागृहात डांबले आहे. अनेक घुसखोर हे पाकिस्तानमधून भारतात प्रवेश करण्यापूर्वीच ठार मारले, तसेच सामाजिक माध्यमांतून पाकिस्तानचे समर्थन करणार्‍या १०० हून अधिक देशद्रोह्यांना अटक केली.

४. सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या विविध देशांना भेटी

भारताने सर्वपक्षीय शिष्टमंडळ स्थापन केले आहे. गेली ७७ वर्षे पाकिस्तान भारताची कशी हानी करत आहे, हे जगाला सांगण्यासाठी हे शिष्टमंडळ विविध देशांना भेटी देत आहे.

५. पाकिस्तानचा कायमस्वरूपी बंदोबस्त व्हावा, अशी सर्व राष्ट्रप्रेमी भारतियांची इच्छा !

भारताने पाकिस्तानला सर्व बाजूंनी उघडे पाडण्याचा आणि कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे धर्मांधांच्या मतांवर निवडून येणार्‍या आणि पाकिस्तानच्या तालावर नाचणार्‍या काश्मीरामधील राजकीय पक्षांच्या पोटात गलबलू लागले आहे. आजपर्यंत झालेले प्रत्येक जिहादी आक्रमण हे स्थानिक धर्मांधांच्या साहाय्याने झाले, हे सर्वश्रुत आहे. आतापर्यंत काँग्रेस आणि मुसलमानधार्जिणे पक्ष ‘निरपराध्यांना छळू नका’, याचे तुणतुणे वाजवत होती. या वेळी भारत सरकार आणि संरक्षण यंत्रणा कुणाचीही गय करायला सिद्ध नाही. असेच वातावरण ठेवले, तर पाकिस्तान नव्हे, तर चीन, बांगलादेश आणि तुर्कीये यांसारखे सर्व भारतद्वेष्टे देश सुतासारखे सरळ होतील, यात तीळमात्र शंका नाही. ही आरपारची लढाई आहे. यात या सर्वांचा कायमस्वरूपी बंदोबस्त व्हावा, हीच प्रत्येक भारतियांची इच्छा आहे.’ (२५.५.२०२५)

श्रीकृष्णार्पणमस्तु ।

– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय