परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले म्हणजे ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सगुण रूपात अवतरलेले सच्चिदानंदस्वरूप निर्गुण’ !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अशी अवस्था आहे की, त्यांना वरचे वर ओढत आहेत. (परमेश्वर त्यांना सर्वाेच्च स्थितीत स्थिर करत आहे.) आध्यात्मिक पातळी १०० टक्क्यांच्या वर गेली, म्हणजे वर खेचले जातो. परात्पर गुरु डॉक्टरांचे परमेश्वरी तत्त्वात विलीन होण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. त्याचप्रमाणे ते सगुणासाठीही कारक आहेत (त्यांना हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीही कार्यरत असणे आवश्यक आहे); म्हणून ते ऋषिमुनी होऊन साधकांच्या आवश्यकतेच्या पूर्तीसाठी सर्व संतांकडून प्रयत्न करून घेत आहेत. या कार्यासाठी ते खाली खेचले जात आहेत (त्यांना सगुणातही रहावे लागत आहे).

१. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी परात्पर गुरु डॉक्टरांना सगुणात यावे लागणे

परात्पर गुरु पांडे महाराज

समाधी लावतांना वासना ठेवावी लागते. शेजारी पेढा इत्यादी ठेवतात. मला हा पेढा खायचा आहे; म्हणून समाधी अवस्थेतून उतरावे लागते. तसे परात्पर गुरु डॉक्टरांचे आहे. सगुणाच्या कार्यासाठी (हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी) परात्पर गुरु डॉक्टरांना जीवदशेत यावे लागते.

२. कलियुगातील विकृत परिस्थितीला सत्प्रवृत्त करण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले सगुण स्थितीत बद्ध झालेले असणे

जीवदशेत येऊन सगुणाच्या कार्यासाठी मार्गदर्शन
डावीकडून श्री. प्रकाश सुतार, श्री. सुदीश पुथलत (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) आणि श्री. भूषण केरकर (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) यांच्याशी संवाद साधतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉक्टरांची स्थिती त्रिशंकूसारखी झाली आहे. वर एकजण त्यांना खेचत आहे. (ते परमेश्वरी तत्त्वात विलीन होत आहेत.) चैतन्यमहाप्रभु तत्त्वात विलीन होण्यासाठी समुद्रात जात होते. तेव्हा कुणीतरी त्यांना ओढून आणत असे. शेवटी दरवाजा बंद करून भगवंताच्या मूर्तीपाशी बसून ते तिच्यात विलीन होऊन गेले. ज्ञानेश्वर महाराज विलीन झाले नाहीत, त्यांनी समाधी घेतली. मुक्ताबाई, श्रीराम इत्यादींनी नदीत जाऊन जलसमाधी घेतली; पण परात्पर गुरु डॉक्टरांचे वेगळे आहे. ते कार्यवशात बद्ध झाले आहेत. कलियुगाची अशी परिस्थिती कधीच झाली नव्हती. एवढ्या आत्यंतिक विकृत परिस्थितीला सत्प्रवृत्त करण्याचे, उत्क्रांती करण्याचे अवघड कार्य त्यांच्याकडे आलेले आहे आणि ते शांततेने, नकळत करायचे आहे. जे कार्य परात्पर गुरु डॉ. आठवले सूक्ष्मातून करत आहेत, ते कुणालाच कळत नाही.

३. सूक्ष्मात चालू असलेल्या युद्धासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी जगामधील चैतन्याचे स्रोत श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या माध्यमातून खुले करणे

सूक्ष्मातील पाच लोकांमध्ये आतापर्यंत (वर्ष २०१७ पर्यंत) सूक्ष्मातील युद्ध झाले, हे कुणालाच माहिती नाही; परंतु ते झाले आहे. त्यामुळे आजची परिस्थिती भीषण आहे. सगुणातील युद्ध चालू आहे. ते सुद्धा सूक्ष्मातून चालू आहे; म्हणून जगामध्ये जे चैतन्याचे स्रोत आहेत, ते सद्गुरु अंजली गाडगीळ यांच्याकडून (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक उत्तराधिकारी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या माध्यमातून) ते खुले करत आहेत. अथर्ववेदाच्या ९ व्या कांडामध्ये सांगितले आहे की, चैतन्याचे कोणकोणते स्रोत भगवंताने निर्माण केले आहेत ?

४. रज-तमाच्या आवरणामुळे झाकले गेलेले चैतन्याचे स्रोत उघडल्याने समाजाचे मन:परिवर्तन होईल !

गंगा नदी नसून ती चैतन्याचा स्रोत आहे. जे आवरणामुळे झाकले गेले आहे, ते परात्पर गुरु डॉक्टर उघड करत आहेत. चैतन्याच्या स्रोतांच्या प्रभावामुळे रज-तमाचे वातावरण नष्ट होईल आणि आपोआप समाजाचे मन:परिवर्तन होईल. हे युद्ध आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले जे करत आहेत, ते सगुणातून, संशोधनपर व्याख्यानांमधून दाखवत आहेत.

५. कृष्णाप्रमाणे परात्पर गुरु डॉक्टरांकडे दैवी बालके आकर्षित होणे

दैवी बालके आकर्षित होणे
बालसंत पू. वामन राजंदेकर यांना कौतुकाने खेळवतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

कृष्णातील ‘कृष्’ म्हणजे आकर्षित होणे आणि ‘ण’ म्हणजे अन्य. परात्पर गुरु डॉ. आठवले कृष्णासारखे असल्याने जी नवीन (दैवी) बालके येत आहेत, ती आपोआप त्यांच्याकडे येत आहेत.

६. सनातन धर्मराज्याची व्याख्या भगवंताकरिता भगवंताचे (ईश्वरी राज्य), भगवंताने केलेले राज्य, म्हणजे ‘भगवत्राज्य’ म्हणजेच ‘रामराज्य’ म्हणजेच, ‘सनातन धर्मराज्य !’

हिंदुत्वनिष्ठांच्या कार्याला प्रोत्साहन देणे
‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’ संघटनेचे पू. अधिवक्ता रवींद्र घोष यांची भेट घेतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

७. ईश्वरी राज्य कशासाठी ?

‘फॉर दी पिपल’(म्हणजे लोकांसाठी) नाही. ‘पिपल’ ही वृत्ती झाली. ही वृत्ती पालटणे, म्हणजेच ईश्वरी राज्य ! मनुष्याची वृत्ती पालटून ईश्वरी होणे, म्हणजे ‘नरा’चा ‘नारायण’ होणे. आता सर्वत्र विकृती, म्हणजे मनाची विकृती आली आहे. म्हणून तो आता मानव आहे. त्यामुळे आता असे प्रकार घडत आहेत. मानवाला ईश्वरी स्वरूपात प्रकट करणे, त्याला सत्प्रवृत्त करणे, सदाचारी करणे, हे काम आहे. ते म्हणजे ईश्वरी राज्य ! तेही नकळत, म्हणजे विरोध काहीच नाही.

८. परात्पर गुरु डॉ. आठवले चैतन्याच्या अंशाद्वारे कार्य करत असणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शक्ती ही दुसर्‍याच्या माध्यमातून कार्य करते. त्यामुळे हिंदु राष्ट्राचे कार्य होत आहे. ते थेट (स्वतः) करत नाहीत. ‘तुम्ही करा हे कार्य, तुम्ही नेपाळला जा, तुम्ही काश्मीरला जा, तुम्ही व्याख्याने घ्या’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांना सांगतात आणि ‘वा..! वा..! तुम्ही किती महान आहात, मी तर काहीच करत नाही’, असे म्हणतात.’

– परात्पर गुरु पांडे महाराज (वर्ष २०१७)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.