Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav : सनातन संस्थेच्या कार्यामुळे भारतीय संस्कृती पहाण्यासाठी पर्यटक गोव्यात येतात ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव

गोमंतकात निनादला सनातन राष्ट्राचा शंखनाद !

गोवा सरकारच्या वतीने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा विशेष सन्मान

२० सहस्र हिंदूंच्या उपस्थितीत रंगला हिंदूविरांचा मेळा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, कथावाचक पू. देवकीनंदन ठाकूर, पद्मश्री सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांच्या दिव्य उपस्थितीत शुभारंभ !

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचीही महोत्सवाला उपस्थिती !

डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा

फोंडा, गोवा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले नगरी) १७ मे (वार्ता.) : पूर्वी गोव्यात लोक समुद्र, तसेच अन्य गोष्टी पहाण्यासाठी येत होते; याउलट गोव्यात सनातन संस्थेचे कार्य चालू झाल्यावर नागरिक भारतीय संस्कृती आणि मंदिरे पहाण्यासाठी गोव्यात येतात. गोवा भोगभूमी नसून ही देवभूमी आहे. सनातन संस्कृती आणि शंखनाद महोत्सव यांमुळे येथील अर्थकारण अन् सांस्कृतिक पर्यटन वाढेल.

गेल्या २५ वर्षांपासून सनातन संस्था हिंदु धर्माचा प्रसार करण्याचे मोठे कार्य करत असून संस्थेने केलेली आध्यात्मिक ग्रंथनिर्मिती युवक यांना प्रेरणा देणारी आणि पुढील १०० वर्षांपर्यंत दिशादर्शक आहे. सनातन संस्थेचे कार्य समाजासाठी दीपस्तंभाप्रमाणे आहे, असे गौरवोद्गार गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि सनातन संस्थेचा रौप्य महोत्सव या दुग्धशर्करा योगाच्या निमित्ताने फोंडा, गोवा येथील अभियांत्रिकी मैदानावर भव्य आणि दिव्य सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचा उद्घाटन समारोह संपन्न झाला. त्या वेळी ते बोलत होते.

गोवा सरकारच्या वतीने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा सन्मान !

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा सन्मान करताना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८३ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने गोवा सरकारच्या वतीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांचा सन्मान केला. मुख्यमंत्र्यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना शाल आणि भेटवस्तू दिली. या वेळी त्यांनी ‘हा सन्मान गोवा सरकार आणि सर्व मंत्रीमंडळ यांच्या वतीने आहे’, असेही सांगितले.

दीपप्रज्वलन करताना डावीकडून श्री. अभय वर्तक, केंद्रीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, पद्मश्री सद्गुरू ब्रह्मेशानंद स्वामीजी, सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, पू .(सौ.) कुंदा आठवले, डॉ. सुरेश चव्हाणके, पू. देवकीनंदन ठाकूरजी, गोव्याचे मंत्री श्री. सुदिन ढवळीकर, श्री. दामू नाईक व श्री यदुवीर कृष्ण दत्त चामराज वाडियार

देशाचे रक्षण करणार्‍या सैन्याप्रती कृतज्ञता !

‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तानला धडा शिकवणार्‍या भारतीय सैन्य दलांच्या राष्ट्रीय संरक्षण निधीसाठी काही निधी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हस्ते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे सोपवण्यात आला.

सहस्रो साधक आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी फुलून गेली नगरी !

सुवर्णमय भव्य स्वागतकमान, विशाल सभामंडप आणि जागोजागी दिव्य प्रतिके लेवून सजलेली ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले नगरी’ देश-विदेशांतून आलेले सहस्रो साधक आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी फुलून गेली होती. गुरुभेटीच्या ओढीने जमलेले हे विष्णुभक्त भगवंताच्या असीम कृपेने न्हाऊन निघाले !

व्यासपिठावर उपस्थित मान्यवर !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि उपस्थित संत अन् मान्यवर यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून या दिव्य महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी तपोभूमी, कुंडई येथील ‘दत्त पद्मनाभ पिठा’चे पद्मश्री सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी, मथुरा (उत्तरप्रदेश) येथील ‘विश्व शांती चॅरिटेबल ट्रस्ट’चे संस्थापक अध्यक्ष तथा प्रसिद्ध कथावाचक पू. देवकीनंदन ठाकूर, मैसूर (कर्नाटक) येथील वाडीयार राजघराण्याचे युवराज तथा खासदार श्री. यदुवीर कृष्णदत्त चामराज वाडीयार, ‘सनातन संस्थे’चे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, तीर्थरूप डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्री. श्रीपाद नाईक, गोव्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर, गोवा राज्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष श्री. दामू नाईक, ‘सुदर्शन न्यूज’चे मुख्य संपादक डॉ. सुरेश चव्हाणके, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस आणि श्री. अभय वर्तक, तसेच सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त श्री. वीरेंद्र मराठे आदी व्यासपिठावर उपस्थित होते.

शंखनादासह गणेशस्तवन आणि वेदमंत्रपठण यांनी आरंभ !

त्रिवार शंखनाद आरंभ करण्यात आला !

आरंभी त्रिवार शंखनाद करण्यात आला. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागाच्या समन्वयक सुश्री तेजल पात्रीकर आणि सौ. अनघा जोशी यांनी श्री गणेशाचा श्लोक म्हणून या सोहळ्यात गणेशाचे आवाहन केले. त्यानंतर सनातन वेदपाठशाळेतील पुरोहितांनी वेदमंत्रपठण केले.

संतांचा सन्मान आणि मान्यवरांचा सत्कार !

वेदमंत्रपठण झाल्यानंतर उपस्थित संत आणि मान्यवर यांचा सन्मान करण्यात आला. सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांचा सन्मान हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सदगुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी, पू. देवकीनंदन ठाकूर यांचा सन्मान सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांनी, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्री. श्रीपाद नाईक यांचा सत्कार श्री. वीरेंद्र मराठे यांनी, तर सनातन संस्थेचे पू. पृथ्वीराज हजारे यांनी गोव्याचे मुख्यमंत्री श्री. प्रमोद सावंत यांचा सत्कार केला. वीजमंत्री श्री. सुदिन ढवळीकर यांचा सत्कार श्री. चेतन राजहंस यांनी केला. गोवा राज्याचे समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, तसेच श्री. भाजप प्रदेशाध्यक्ष श्री. दामू नाईक आणि श्री. यदुवीर कृष्णदत्त चामराज वाडियार यांचा सत्कार सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी केला. डॉ. सुरेश चव्हाणके यांचा सत्कार सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी केला.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरित्रग्रंथाचे लोकार्पण !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवलेजी का संक्षिप्त चरित्र’ या हिंदी भाषेतील चरित्रग्रंथ आणि त्याचे ‘ई-बुक’ यांचे लोकार्पण उपस्थित संत आणि मान्यवर यांच्या हस्ते या वेळी करण्यात आले. या ग्रंथामध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या दैवी कार्याचा सचित्र परिचय देण्यात आला आहे.

अध्यात्म हीच सनातन राष्ट्राची संकल्पना ! – यदुवीर कृष्ण दत्त चामराज वाडीयार, युवराज तथा खासदार, मैसूर राजघराणे, कर्नाटक

श्री. यदुवीर कृष्ण दत्त चामराज वाडीयार

विश्वातील सर्वांत प्राचीन परंपरेचे आपण रक्षक आहोत. आपली मूळ सभ्यता ही सनातन धर्मामध्ये विदित आहे. आपल्याला आर्थिक, सैनिकी आणि आध्यात्मिक स्तरावर भविष्य निश्चित करायचे आहे. अध्यात्म हाच आपला मूळ गाभा आहे आणि तीच आपल्या सनातन राष्ट्राची संकल्पना आहे. हा पंथाधारित देश नसून आपल्या सभ्यतेची ओळख आहे. विजयनगर साम्राज्य हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. सनातन राष्ट्र ही राजकीय सत्ताव्यवस्था नसून आध्यात्मिक सेवाभावाने केलेली व्यवस्था आहे. सनातन राष्ट्राची संकल्पना ही आधीपासून व्याप्त आहे. सनातन राष्ट्र विविधतेला नाकारत नाही, तर आपल्याकडे वाद-प्रतिवादाची परंपरा आहे. हाच तर सनातन धर्माचा आत्मा आहे. सनातन राष्ट्र अमर असून ते सर्वसमावेशक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘सबका साथ सबका विकास’, असे म्हणतात. याचाच अर्थ सर्वांच्या विकासासह सर्वांच्या परंपरेलाही समाविष्ट करावे. यानेच वर्ष २०४७ मधील विकसित भारताचे स्वप्न खर्‍या अर्थाने पूर्ण होईल.

विश्वकल्याणकारी सनातन राष्ट्राच्या स्थापनेसाठीच हा शंखनाद ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

सनातन संस्था मागील २५ वर्षे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली गोमंतकाच्या पवित्र परशुराम भूमीतून सनातन राष्ट्रासाठी आदर्श आणि संस्कारी पिढी घडवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त रामराज्यस्वरूप आदर्श राष्ट्र निर्माण करण्याचा सामूहिक संकल्प करण्यासाठी हा ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ आहे. सध्या भारतासमोरील आव्हाने पाहिली, तर ‘सनातन धर्मियांचे अस्तित्व आणि सनातन धर्माचे संरक्षण’ अत्यंत महत्त्वाचे आहे. पहलगाममध्ये आतंकवाद्यांनी पर्यटनासाठी आलेल्या हिंदूंची त्यांचा धर्म विचारून हत्या केली. काशी-मथुरा या आमच्या दैवतांसाठी न्यायालयात जाऊन याचना करावी लागणे, हे हिंदूंसाठी लज्जास्पद आहे. ‘ब्रेकिंग इंडिया फोर्सेस’कडून गोमाता, गंगा, मंदिरे, देवता, धर्मग्रंथ’ आदी सनातन मानबिंदूंवर सातत्याने आघात होत आहेत. राष्ट्राचे सनातनत्व टिकवून ठेवण्यासाठी, तसेच गोमाता, गंगा, गायत्री, मंदिरे, वेदादी धर्मग्रंथ आदींना पुनर्वैभव प्राप्त करून देणे आवश्यक आहे. ‘धर्मेण जयति राष्ट्रम् ।’ म्हणजे ‘सनातन धर्मामुळे राष्ट्र विजयी होते’, हे या महोत्सवाचे ब्रीद आहे. आमचे राष्ट्र सदैव विजयी होण्यासाठी सनातन धर्माची आवश्यकता आहे आणि त्यासाठीच हा शंखनाद आहे.

सनातनच्या कार्यामुळे समाजातील गोव्याची मलिन प्रतिमा पालटली ! – पद्मश्री सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी, दत्त पद्मनाभ पीठ, तपोभूमी, कुंडई

पद्मश्री सद्गुरु ब्रह्मेशानंद स्वामी, गोवा

गेल्या काही दिवसांपासून देशात गुरुदेवांच्या या महोत्सवाची चर्चा चालू आहे. या व्यासपिठावर मांडण्यात आलेली हिंदु राष्ट्राची संकल्पना अवश्य पूर्ण होईल. भारत हिंदु राष्ट्र होईल. सनातन धर्म टिकला, तर राष्ट्र टिकेल आणि सनातन धर्मामुळे भारताला गौरव प्राप्त होईल. विश्वास आणि शांती टिकून रहाण्यासाठी भारत सनातन राष्ट्र रहाणे आवश्यक आहे. आज गोव्याची समाजात जी मलिन प्रतिमा होती, ती दूर होऊन एक सात्त्विक परशुरामभूमी म्हणून गोव्याची ओळख सनातनच्या कार्यामुळे निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो प्रभाव आज जगात निर्माण केला आहे, त्याप्रमाणे आज राष्ट्र, धर्म आणि संस्कृती वाचवण्याची आवश्यकता आहे. हे हिंदूंनी आत्मसात केले, तरच समाजात शांती आणि हिंदु सुरक्षित रहातील. हनुमान, श्रीराम, श्रीकृष्ण यांच्या हातात आयुधे आहेत. ही आयुधे धर्माच्या रक्षणासाठी आहेत. आम्हाला शांती हवी आहे. आज हिंदु जागा न झाल्यास उद्याचा दिवस आपला रहाणार नाही. केवळ राजकारणावर अवलंबून न रहाता धर्म आणि संस्कृती यांचे रक्षण करण्याचे दायित्व हिंदूंचेही आहे. सर्व समाजाने सनातनच्या राष्ट्र आणि धर्म कार्यात सहभागी होण्याची आवश्यकता आहे. आम्हीही या कार्यात सहभागी आहोत, सनातनच्या साधकांसमवेत आहोत. या कार्याला आमचेही आशीर्वाद आहेत.

सनातनचे साधक सनातनचा महिमा संपूर्ण विश्वात करतील !

पद्मश्री सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी सनातनच्या साधकांचे कौतुक करतांना म्हणाले, ‘‘ज्याप्रमाणे सैनिक सीमेवर राष्ट्रासाठी लढत आहेत, त्याप्रमाणे सनातनचे साधक गावागावांत जाऊन धर्मशिक्षण देऊन सनातन धर्माच्या रक्षणासाठी प्रयत्नरत आहेत. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म जयंत आठवले यांचे आशीर्वाद आणि त्यांच्या नेतृत्वात सनातनचे सर्व साधक देव, देश आणि धर्मासाठी समर्पित आहेत.’’

महोत्सवाला उपस्थित संत, मान्यवर आणि भाविक

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हिंदुत्वाचे नेतृत्व केल्यामुळे मला त्यांचा गर्व आहे !

सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी

पद्मश्री सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी म्हणाले, ‘‘गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हिंदुत्वाचे नेतृत्व केल्याविषयी मला त्यांचा गर्व आहे. डॉ. सावंत हे युवा प्रतिभासंपन्न असे मुख्यमंत्री आहेत. ते भाजप पक्षातून ६ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. श्री. श्रीपाद नाईक यांचेही कार्य अतुलनीय आहे.’’

सनातन संस्थेने गोव्याला वेगळी ओळख दिली ! – गोव्याचे ऊर्जामंत्री सुदीन ढवळीकर

श्री. सुदीन ढवळीकर

सनातन संस्थेने आगळावेगळा सोहळा आयोजित केला आहे. मला अभिमान आहे की, माझ्याच मतदारसंघात राष्ट्र आणि हिंदु धर्म सांभाळणार्‍या २ संस्था आहेत. सनातन संस्था बांदिवडे पंचायतीमध्ये, तर सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांची संस्था कुंडई पंचायतीमध्ये आहे. सनातन संस्था आणि सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी या दोन्ही संस्थांनी गोव्याला वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न केला. ४५० वर्षे गोव्यावर विदेशी संस्कृतीचे आक्रमण झाले; मात्र ते रोखले गेले. राष्ट्र जर पुढे जायचे असेल, तर धर्मातील लोकांनी एकत्र आले पाहिजे, यासाठी ही संस्था कार्यरत आहे.

सनातन संस्था आणि गुरुदेवांनी मला दैवी बळ दिले आहे. मी एकाच पक्षात २५ वर्षे आहे. आपल्या सर्वांना अजून पुढे जायचे आहे आणि एकत्रित हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्न करायचे आहेत.

सनातन राष्ट्राची मुहूर्तमेढ गोवा येथून होत आहे हा ऐतिहासिक क्षण ! – श्रीपाद नाईक, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री

श्री. श्रीपाद नाईक

सनातन राष्ट्राची मुहूर्तमेढ गोवा येथून होत आहे, हा ऐतिहासिक क्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने गोवा भूमी पावन झाली आहे. गोव्यात आक्रमकांनी लाखो हिंदूंच्या हत्या केल्या; मात्र तरीही येथील हिंदूंनी सनातन हिंदु संस्कृती अखंड ठेवण्याचे कार्य केले आहे. अशा पावन भूमीत सनातन राष्ट्रासाठी शंखनाद होणे, हा शुभसंकेत आहे. सनातन राष्ट्र निर्मितीच्या कार्यात गोव्यातील धर्मप्रेमी सनातन संस्थेसमवेत आहेत.

हिंदूंनी प्रत्येक वेळी संघर्ष केला, आता पुन्हा तशीच वेळ ! – दामू नाईक, गोवा राज्य भाजप प्रदेशाध्यक्ष

श्री. दामू नाईक

आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. येथे शंखनाद चालू झाला आहे. या कार्यात माझेही योगदान असेल. भारत देशात सोन्याचा धूर यायचा,  जागोजागी मंत्रपठण व्हायचे. त्यानंतर आलेल्या आक्रमणकर्त्यांनी सनातन संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तरी ती संस्कृती आजपर्यंत टिकून आहे. हिंदु राष्ट्राचा स्वाभिमान म्हणजे श्रीराममंदिर आहे. हिंदूंनी प्रत्येक वेळी संघर्ष केला, बलीदान दिले. आता पुन्हा हिंदूंची वेळ आली आहे. सर्व संत एकत्र येऊन सनातन राष्ट्र कार्यासाठी पुढे येत आहेत, आता आपण दायित्व घेऊन सक्रीय झाले पाहिजे.

गोवा ही ‘बीच’वर बसण्याची नव्हे, तर परशुरामाची उपासना करण्याची भूमी ! – पू. देवकीनंदन ठाकूर, प्रसिद्ध कथावाचक

पू. देवकीनंदन ठाकूर

गोवा ही ‘बीच’वर (समुद्रकिनारी) बसण्याची नाही, तर परशुरामाची उपासना करण्याची भूमी आहे. पाकिस्तानचे सरकार जे स्वत: भीक मागणारे आहे, ते आतंकवादी प्रशिक्षित करून इतरांची हानी करतात, तर दुसरीकडे भारतात मंदिरे, गोशाळा आणि वेदविद्यालय यांचे निर्मिती होत आहे.

त्यानंतर आमचे राष्ट्र हिंदु राष्ट्र होते आणि पुढेही रहाणार आहे.

महोत्सवाचे नोडल अधिकारी रोहित कदम यांचा सत्कार

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी गोवा सरकारचे विशेष आभार मानले. ते म्हणाले, “हा महोत्सव संपन्न होण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना विनंती केली होती की, एका चांगल्या नोडल (सूचना आणि निवेदन यांवर प्रभावी कार्यवाही करणारे) अधिकार्‍याची आवश्यकता आहे. त्यांनी आम्हाला नोडल अधिकारी श्री. रोहित कदम यांना कार्यक्रमासाठी जोडून दिले. या भव्य आयोजनात त्यांचा मोलाचा हातभार आहे.” सनातनचे पू. पृथ्वीराज हजारे यांच्या हस्ते श्री. रोहित कदम यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक, दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी आणि प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांचेही आभार मानण्यात आले.