७ मे २०२५ या दिवशी भारतीय वेळ रात्री १.०५ ते १.३० या २५ मिनिटांत भारतीय सशस्त्र सेनांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या अंतर्गत पाकिस्तानी पंजाब आणि पाकव्याप्त काश्मीर येथे क्षेपणास्त्र आक्रमण करून ९ ठिकाणांवरील आतंकवाद्यांचे तळ नष्ट केले. भारतीय सशस्त्र सैन्य दलांची अचूकपणे क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता भूमी, आकाश आणि समुद्र येथूनही आहे, हे जगाला ज्ञात आहे. भारताने पाकिस्तानच्या नागरी किंवा सैनिकी तळांवर आक्रमणे केलेली नाहीत. शत्रूच्या ‘एअर डिफेन्स सिस्टम्स्’ना (हवाई संरक्षण यंत्रणांना) चकवण्याचा सराव केल्याविना भारतीय सशस्त्र सेना क्षेपणास्त्रे कशी बरे डागतील ? ८ मे या दिवशी सर्वपक्षांची बैठक घेऊन भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’विषयी अवगत केले आणि ही मोहिम ‘अभी जारी है’ (अद्याप चालू आहे), हेही सांगितले. ‘आम्ही पुढे काय करणार?’, हे सांगायला ते काही पाकिस्तानी मंत्री नाहीत.
सुदैवाने भारताला अनेक दशकांनंतर प्रथमच पंतप्रधान मोदींसारखे कणखर नेतृत्व मिळाले आहे. २२ एप्रिल २०२५ या दिवशी पहलगाममध्ये इस्लामी आतंकवाद्यांनी २८ हिंदूंच्या केलेल्या निर्घृण नरसंहारानंतर मोदी यांनी ‘आम्ही सर्व आतंकवाद्यांचा आणि त्यांना पाठिंबा देणार्यांचा निःपात करू’, अशी घोषणा केली. ही घोषणा करून न थांबता पंतप्रधानांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या रूपाने त्या घोषणेचा पहिला चरण कार्यवाहीतही आणला. पुढील चरणात काय काय घडते, याकडे सगळ्यांचे डोळे लागलेले आहेत.
अशा वेळी विश्लेषण करणारे आणि सल्ले देणारे अनेक विशेषज्ञ पुढे आले आहेत. योग्य ते विश्लेषण केल्याविना आणि अयोग्य माहितीवर आधारित निष्कर्ष काढले, तर आडाखे चुकू शकतात. कोणत्याही नेतृत्वाला तसे करून चालत नाही.

१. भारताने आक्रमणासाठी निवडलेल्या ९ आतंकवादी तळांविषयीची माहिती
‘ऑपरेशन सिंदूर’साठी निवडलेल्या आतंकवादी तळांची माहिती व्यवस्थित समजून घेतली, तर कुणालाही समजेल की, तेच आतंकवादी तळ का निवडले ? त्यांपैकी ४ तळ पाकिस्तानी पंजाबात, तर ५ तळ पाकव्याप्त काश्मीरमध्ये होते. या तळांची सर्व माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे.
अ. मरकझ सुभान अल्ला, बहावलपूर, पंजाब, ‘जैश-ए-महंमद’चे मुख्यालय आणि प्रमुख आतंकवादी तळ : सरहद्दीपासून १०० कि.मी. अंतरावर हे ठिकाण असून आतंकवादी मसूद अझरचे वास्तव्य आहे. येथूनच वर्ष २०१९ च्या पुलवामा आक्रमणाचे सूत्रसंचालन केले होते. येथे ऑगस्ट २०२४ मध्ये मसूद अझर (जैश-ए-महंमद), बख्त-उल-झमीन (अल बद्र) आणि सय्यद सलाउद्दीन (हिजबूल मुजाहिदीन) यांची बैठक होऊन त्यामध्ये काश्मीरमध्ये आतंकवादी आक्रमण कसे आणि केव्हा करायचे, त्यासाठी निधी मिळवणे इत्यादींचे नियोजन केले होते. त्यातूनच सप्टेंबर २०२४ पासून २२ एप्रिल २०२५, म्हणजेच पहलगामपर्यंतचे काश्मीरमधील विविध आतंकवादी आक्रमणे केली गेली.

आ. मरकझ तय्यबा, मुरिदके, शेखपुरा, पंजाब, ‘लष्कर-ए-तोयबा’चे मुख्यालय आणि प्रमुख आतंकवादी तळ : सरहद्दीपासून २५ कि.मी.वर ८२ एकरात पसरलेले हे प्रचंड आतंकवादी प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी ओसामा बिन लादेन याने वर्ष २००० मध्ये पाकिस्तानी १० लाख रुपये दिले होते. तेथे लष्कर-ए-तोयबा आणि जमाल-उद-दावा या संघटनांच्या आतंकवाद्यांना प्रशिक्षण दिले जाते. २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी मुंबई आतंकवादी आक्रमणाच्या आतंकवाद्यांचे (अजमल कसाब, डेव्हिड कोलमन हेडली, तहव्वूर हुसेन राणा इत्यादी) प्रशिक्षण येथे झाले होते. आतंकवादी झकी-उर-रहमान याच्या सूचनेवरून अब्दुल रहमान सईद (पाशा), हारून आणि खुर्रम या आतंकवाद्यांचेही प्रशिक्षण येथे झाले होते.
इ. सर्जल/तेहरा कलान, शकरगढ तहसील, नारोवाल जिल्हा, सियालकोटजवळ, पंजाब : सरहद्दीपासून ६ कि.मी.वर असून पाकिस्तानी सैन्याच्या (‘आय.एस्.आय.’ गुप्तचर यंत्रणेच्या) साहाय्याने बनवलेल्या भूमीखालील बोगद्यांमधून जम्मू-काश्मीरमध्ये जैश-ए-महंमद आणि हिजबूल मुजाहिदीनचे आतंकवादी पाठवण्याचे लाँचिंग पॅड, हे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नावाखाली चालवले जाते. ४ भारतीय पोलिसांना मार्च २०२५ मध्ये मारण्याचे नियोजन येथून केले होते.
ई. मेहमूना जोया, कोटली भुट्टा, हेड मराला, सियालकोट, पंजाब : पाकिस्तानी सैन्याच्या ‘आय.एस्.आय.’ने विशेषतः जम्मू भागामध्ये आतंकवादी पाठवण्यासाठी सरहद्दीपासून १२ कि.मी.वरील हे लाँचिंग पॅड बनवले. २६ जानेवारी १९९५ या दिवशी जम्मूच्या मौलाना आझाद स्टेडियमवर हिजबूल मुजाहिदीनने केलेल्या आक्रमणाचे (८ जणांचा मृत्यू आणि ५० घायाळ) मारेकरी या आतंकवादी तळावरून पाठवले होते. पठाणकोटच्या वायूसेना तळावर केलेले कुप्रसिद्ध आक्रमण याच आतंकवादी तळावरून केलेले होते.
उ. मरकझ अहले हडिथ बर्नाला, भिमबेर जिल्हा, पाकव्याप्त जम्मू : नियंत्रण रेषेपासून ९ कि.मी. वरील हा आतंकवादी तळ प्रामुख्याने लष्कर-ए-तोयबाचे आतंकवादी जम्मूच्या पूंछ-राजोरी-रियासी या भागांत घुसवण्यासाठी वापरला जातो. लष्कर-ए-तोयबाचे कुख्यात आतंकवादी कासीम गुज्जर (उर्फ महारोरे), कासीम खांडा, अनास जरार, महंमद अमीन भट (उर्फ खुबेब) इत्यादी आतंकवादी नेहमी या तळावरून कार्यरत असतात. कासीम गुज्जर आणि खुबेब हे आतंकवादी भारतीय बेकायदेशीर प्रतिबंधक कायद्याखाली (‘यू.ए.पी.ए.’च्या अंतर्गत) गुन्हेगार म्हणून कुख्यात आहेत.
ऊ. मरकझ अब्बास, मोहल्ला रोली धारा, कोटली, पाकव्याप्त जम्मू : नियंत्रण रेषेपासून १३ कि.मी. वरील हा आतंकवादी तळ जैश-ए-महंमदच्या आत्मघाती बाँबर्सना प्रशिक्षण देण्यासाठी वापरला जातो. या आतंकवादी तळावर १२५ आतंकवादी रहाण्याची व्यवस्था आहे. या तळावर नेहमी जैश-ए-महंमदचे साधारण ४० ते ५० आतंकवादी उपस्थित असतात. हाफिज अब्दुल शकूर (उर्फ काझी झरार) हा आतंकवादी जैश-ए-महंमदच्या कौन्सिलचा (शूराचा) सदस्य असून या मरकजचा प्रमुख आहे. याखेरीज तो हरकत-उल-मुजाहिदीन या मूळ आतंकवादी संघटनेचा सदस्य होता. त्याने मसूर अझरसह हरकत-उल-मुजाहिदीन ही आतंकवादी संघटना सोडून जैश-ए-महंमद ही आतंकवादी संघटनेत विलीन केली.
ए. मरकझ राहील शहीद, गुलपुर, कोटली, पाकव्याप्त जम्मू : नियंत्रण रेषेपासून ३० कि.मी. (मीरपूर-कोटली रस्त्यावरील माहुली-पुलापासून २.५ कि.मी.) वरील हिजबूल मुजाहिदीनचा हा सर्वांत जुना आतंकवादी तळ असून प्रामुख्याने जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादी घुसवण्यासाठी वापरला जातो. २० एप्रिल २०२३ या दिवशी पूंछमधील आतंकवादी आक्रमण आणि ९ जून २०२३ या दिवशी यात्रेकरूंवरील आक्रमण करण्यासाठी या आतंकवादी तळाचा वापर केला होता. या तळावर १५० ते २०० आतंकवादी राहू शकतात. अबू माझ आणि अब्दुल रहमान हे दोघे आतंकवादी सध्या या आतंकवादी तळाचे प्रमुख असून ते हिजबूल मुजाहिदीनच्या सीमेवरील कृती पथकाला भारतीय सैन्याविरुद्ध ‘स्नायपर शूटिंग’चे प्रशिक्षण देत असतात.
(क्रमशः उद्याच्या दैनिकात)
– विंग कमांडर विनायक डावरे (निवृत्त), पुणे. (९.५.२०२५)
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !
मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !
ताजमहालच्या खाली दडवण्यात आलेले सत्य !
गोव्यातील मंदिरांवरील ब्राह्मणीकरणाचे आरोप हास्यास्पद !
मंदिर विश्वस्त आणि व्यवस्थापन यांची आचारसंहिता !
मध्यप्रदेशातील धार येथील ऐतिहासिक भोजशाळा मंदिरमुक्तीचा लढा !