प्रभु श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांचा आदर्श घेत कृती करणे महत्त्वाचे !

सध्या चालू असलेल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या निमित्ताने…

सध्या आतंकवाद्यांच्या विरोधात भारताने शस्त्र उपसले आहे. हे शस्त्र उपसले असले, तरी आपण नीतीशास्त्राच्या मर्यादेत राहून शस्त्राचार करत आहोत. आपला शत्रू हा उलट्या काळजाचा असून अत्यंत कपटी, कारस्थानी आहे. क्रौर्य हा त्याचा सहज स्वभाव आहे. अशा शत्रूशी लढतांना आपल्याला अत्यंत सावधता बाळगणे नितांत आवश्यक आहे; कारण शत्रूच्या हातात शस्त्र असले, तरी नीतीशास्त्र, न्यायशास्त्र आणि मानवता या गोष्टींशी त्याचा दुरान्वयेसुद्धा संबंध नाही. त्यामुळे नीतीशास्त्र, न्यायशास्त्र आणि मानवता यांना धाब्यावर बसवून हा दानव आपल्याशी कोणत्याही पातळीवर उतरून लढणार आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. सध्या आपण त्याचा अनुभव घेत आहोत.

प्रवासी विमानांचा आधार घेऊन तो आपल्याशी लढतो आहे. आपण सर्व नियमांच्या मर्यादेत राहून युद्ध लढत आहोत. हे नियम आपल्याला प्रवासी विमानांवर आक्रमण करण्याची अनुमती देत नाहीत, तसेच आपण सभ्यता आणि मानवता यांची कास धरून रणांगणात उतरलो आहोत. आपला शत्रू हा आपल्या सैनिकांशी लढण्याऐवजी नि:शस्त्र अशा नागरिकांच्या वस्त्यांवर आक्रमण करत आहे. याचाच अर्थ त्याने न्यायशास्त्र, नीतीशास्त्र आणि मानवता यांना बगल देऊन मानवतेच्या बुरख्याआड स्वतःची राक्षसी महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत या मर्यादेत राहून युद्ध करण्याचा आपण प्रयत्न केला, तर त्यात आपल्याला यश प्राप्त होईल, असे वाटत नाही.

१. पाकची मानसिकता आणि भारताने सर्व नीती नियमांपलीकडे जाऊन युद्ध करण्याची आवश्यकता

पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी त्यांच्या संसदेत स्पष्ट शब्दांत सांगितले, ‘‘भारतीय सैन्याशी युद्ध करण्यासाठी मदरसांमधील मुलांची संरक्षण फळी उभी करण्यात येईल.’’ याचा अर्थ स्पष्ट आहे तो असा, ‘पाकिस्तानचे लष्कर, सरकार, आतंकवादी संघटना, मदरसा आणि जिहादी संघटना यांची नावे वेगवेगळी असली, तरी हे सर्व जिहादीच आहेत, हे सिद्ध होते, तसेच मदरसांमधून दिले जाणारे शिक्षण हे जिहादी आहे’, हेसुद्धा या निमित्ताने स्पष्ट झाले.

पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांच्या विधानातून एक स्पष्ट झाले की, तेथे लष्कर असा कोणताही प्रकार नसून जे आहे ते सारे जिहादी आहेत आणि ते कधीही भारतीय सैन्याशी लढले नाहीत. त्यांनी नेहमीच नागरी वस्त्यांवर आक्रमणे केलेली आहेत. जिहादी उघड युद्ध करत नाहीत, ते छुपे युद्धच करतात. भारतीय सैन्याने युद्धाचे उघड आव्हान दिले; पण ते आव्हान न स्वीकारता जिहादी मानसिकतेप्रमाणे त्यांचे वर्तन चालू आहे; म्हणूनच सभ्य जगाच्या कोणत्याही बंधनात न रहाता सर्व सीमांचे उल्लंघन करून आपण लढले पाहिजे. हा सर्व प्रकार लक्षात घेता भारतीय सैन्य मानवी सैन्याशी लढत नाही, तर ते अमानवीय सैन्याशी लढत आहे. या अमानवीय सैन्याचा सभ्यतेशी कोणत्याही प्रकारचा संबंध येत नाही. त्यामुळे सभ्यतेच्या कक्षेत राहून असभ्य अमानवीय समाजाशी लढून विजय संपादन करता येणार नाही.

थोडक्यात आपल्यालाही सर्व प्रकारच्या नीती नियमांपलीकडे जाऊनच युद्ध करावे लागणार आहे. असे युद्ध करणे योग्य कि अयोग्य ? असा प्रश्न आपल्यासमोर नक्कीच उभा रहाणार आहे. या प्रश्नाचा विचार करून आपल्याला निर्णय घेणे आता क्रमप्राप्त आहे.

श्री. दुर्गेश परुळकर

२. शस्त्रधार्‍याला कंठस्नान घालणे हाच न्याय आणि नीती !

खरे पहाता असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होण्याचे कारण नाही. उद्धटाशी उद्धटाप्रमाणेच वागावे लागते. सभ्य माणसाशी सभ्यतेनेच वागावे लागते. असभ्य माणसाशी असभ्यतेनेच वागावे लागते. नियमांच्या बंधनात राहून वागणार्‍या माणसाला नियमांच्या बंधनात राहूनच उत्तर द्यावे लागते; पण नियमांचे बंधन झुगारून देऊन वागणार्‍याला नैतिकता, न्याय आणि मानवता यांच्या मर्यादेत न रहाता वर्तन करणार्‍याला नैतिकता न्याय अन् मानवता या मर्यादेत राहून शासन करता येत नाही. जो नैतिकता पाळत नाही, ज्याला न्याय माहिती नाही आणि जो मानवतेचाही विचार करत नाही, अशा प्रवृत्तीच्या लोकांशी आपण नैतिकता, न्याय अन् मानवतेचा विचार करून लढण्याचे ठरवले, तर आपला पराभव नक्की आहे. हा पराभव आपण स्वीकारणे, म्हणजे नैतिकता, न्यायशास्त्र आणि मानवता यांना आपणच आपल्या हाताने तिलांजली दिल्यासारखे आहे.

शस्त्रधारीसुद्धा शास्त्राचा विचार करून लढत नसेल, तर त्याच्या प्रतिस्पर्ध्यानेही शास्त्राचा विचार न करता आपल्या अंगावर चालून आलेल्या शस्त्रधार्‍याला कंठस्नान घालणे हाच न्याय, नीती आणि मानवता ठरते. आपण इतिहासात जरी डोकावून पाहिले, तरी आपला हा निर्णय चुकीचा ठरणार नाही, तसेच न्याय, नैतिकता आणि मानवता यांचा विचार करता आपला हा निर्णय अयोग्य ठरत नाही.

३. राक्षसी प्रवृत्तींचा नायनाट करणे, हाच न्याय !

आपल्याला आपल्या राष्ट्राचे रक्षण करायचे आहे. आपल्या जनतेचे रक्षण करायचे आहे. प्रवासी विमानांचा उपयोग करून जर आपल्यावर आपला शत्रू आक्रमण करणार असेल, तर आपल्याला प्रथम हा विचार करायला हवा की, त्या प्रवासी विमानातून खरोखरच सर्वसामान्य नागरिक प्रवास करत आहेत का ? त्या विमानात आतंकवादी अथवा जिहादी असणार नाहीत, याची आपल्याला खात्री आहे का ? नागरिकांना विमानात ठेवून जर ते आपल्यावर आक्रमण करून आपल्या नागरिकांना ते मारणार असतील, तर आपल्या नागरिकांचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या नागरिकांना मारून आणि नंतर त्या आतंकवाद्यांना मारूनही आपल्याला आपल्या नागरिकांचे रक्षण करावेच लागणार आहे. अन्यथा आपले सैनिकही मरतील आणि आपले नागरिकही मरतील. न्याय, नैतिकता आणि मानवता आत्मघातकीपणा करून पाळली पाहिजे, हे म्हणणे रानटीपणाचे आहे. वास्तविक पहाता न्याय, नैतिकता आणि मानवता यांच्या रक्षणासाठीच अशा कुप्रवृत्तीच्या, राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांचा नायनाट करणे, हाच न्याय, हीच नीती आणि हीच मानवता.

४. राष्ट्राचे रक्षण करणे, हा राष्ट्रधर्म आणि राष्ट्रीय कर्तव्य

केवळ कृती महत्त्वाची नसते, तर त्या कृतीमागचा हेतू महत्त्वाचा असतो. प्रवासी विमानांची ढाल करून आपल्या नागरिकांवर आक्रमण करण्याचा, आपल्या सैनिकांना मारण्याचा जर प्रयत्न जिहादी प्रवृत्ती करत असेल, तर त्यांचा हेतू आपल्याला नष्ट करणे हाच आहे. म्हणूनच आपल्याला आपले अस्तित्व टिकवण्याचा नैसर्गिक अधिकार आहे. त्याचप्रमाणे आपल्या राष्ट्राचे रक्षण करणे, हा आपला (भारतियांचा) राष्ट्रधर्म आहे आणि राष्ट्रीय कर्तव्य आहे. या कर्तव्याच्या आड जे जे येईल, त्याला नष्ट करून आपले कर्तव्य पार पाडणे, हेच प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्या कर्तव्यपूर्तीसाठी आपल्याला जिहादींनी सर्व नियम धाब्यावर बसवले असतील, तर आपल्यालाही सर्व नियम धाब्यावर बसवून आपले उद्दिष्ट साध्य करावेच लागेल. निरपराधी समाजावर अन्याय करणार्‍या समाजाला नष्ट करूनच आपल्याला न्याय प्रस्थापित करावा लागणार आहे. आपल्यावर अन्याय झाला आहे आणि आपल्यावर अन्याय करणारा हा कुणी धर्मात्मा नाही की, ज्याचे आपण रक्षण करावे.

५. जिहादींचा डाव ओळखून त्यांचा खात्मा करणे, हाच एकमेव मार्ग !

इतिहासात मुसलमान आणि हिंदु यांचा सामना रणांगणात जेव्हा होत असे, त्या वेळी हिंदूंच्या दृष्टीने माता असलेल्या गायींच्या कळपाला पुढे करून आपल्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला गेला. अशा वेळी मुसलमानांवर आक्रमण न करता आपण गप्प बसलो. त्यामुळे आपला पराभव झाला. हरिसिंग नलवाने मात्र गायींना मारले आणि नंतर गायींच्या मागे लपलेल्या मुसलमानांनाही मारले अन् विजय संपादन केला. जिहादींनी इथे गायींच्या ऐवजी नागरिकांना समोर करून आपल्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे. स्वतःचा बचाव करण्यासाठी हा कुटील डाव रचण्यात आला आहे. हा कुटील डाव उधळून लावण्यासाठी जिहादी आपल्यावर आक्रमण करतात. त्यांचा तो डाव प्रथम नष्ट करून जिहादींचा खात्मा करणे, हा एकमेव मार्ग आता आपल्यासाठी मोकळा आहे. अन्य सर्व मार्ग बंद आहेत.

६. युद्धात श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या रणनीतीनुसार प्रयत्न करणे महत्त्वाचे !

हे जिहादी केवळ भारतियांनाच तापदायक आहेत, असे नाही, तर जगातील सर्व सभ्य समाजासाठी हे जिहादी तापदायक आहेत. त्यामुळे या सर्वांच्या रक्षणार्थ या जिहादींना ठार मारण्याचा आपला हेतू आहे. जगातील नैतिकता, न्याय आणि मानवता यांच्या कल्याणार्थ, रक्षणार्थ आपण जे कृत्य करतो आहोत, ते नक्कीच समर्थनीय ठरते; कारण ‘गुड ॲक्शन्स विथ बॅड मोटीव्ह आर बॅड अँड बॅड ॲक्शन्स विथ गुड मोटिव्ह आर गुड’ (वाईट हेतूने केलेली चांगली कृती वाईट आणि चांगल्या हेतूने केलेली वाईट कृती चांगली असते), या जागतिक सिद्धांताचा विचार करता आपण काही चुकीचे करत आहोत, असे आपल्याला वाटता कामा नये.

थोडक्यात ‘शस्त्राचारी शास्त्राचा विचार न करता आपल्याशी युद्ध करत असेल, तर आपल्यासाठीसुद्धा शस्त्र हातात घेऊन शास्त्राला बाजूला सारून त्याचा नाश करणे’, हेच आपले कर्तव्य ठरते. या कृतीमागे आपल्याला आपल्या निष्पाप नागरिकांचे संरक्षण करण्याचा आणि आपल्या राष्ट्राचे रक्षण करण्याचा हेतू आहे. प्रभु श्रीरामानेसुद्धा वालीला लपून बाण मारला; कारण त्याने कृतीमागचा हेतू लक्षात घेऊन नैतिकता, न्याय आणि मानवता यांची तिलांजली दिली होती. भगवान श्रीकृष्णानेही कौरव-पांडव युद्धात कौरवांकडून जेव्हा सर्व प्रकारच्या नियमांचे उल्लंघन केले गेले, तेव्हा सर्व प्रकारच्या नियमांचे उल्लंघन करून कौरवांचा पराभव केला. इथेही आपल्याला ‘कृतीपेक्षा कृतीमागचा हेतू महत्त्वाचा आहे’, हेच लक्षात घेतले पाहिजे. हे लक्षात घेतले, तर आपल्याला कोणताही दोष लागत नाही. हे श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या रणनीतीवरून निश्चित होते.

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ लेखक आणि व्याख्याते, डोंबिवली. (१०.५.२०२५)