‘३०.३.२०२५ पासून हिंदु कालगणनेनुसार कलियुग वर्ष ५१२७ चा आरंभ होत आहे. या वर्षाचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे ? या काळात संधीकालाचे महत्त्व काय ? हे वर्ष हिंदुत्वाच्या दृष्टीने कसे राहील ? तसेच समाजाच्या संदर्भात काय प्रक्रिया होईल ? या संदर्भात मला मिळालेले सूक्ष्म ज्ञान येथे दिले आहे.
१. कलियुग वर्ष ५१२७ चे आध्यात्मिक वैशिष्ट्य !
१ अ. लयातून उत्पत्तीकडे नेणारे कालचक्र : कलियुग वर्ष ५१२७ चे काळचक्र हे सूक्ष्मातून ‘लयातून (नाशातून) उत्पत्ती’ या दिशेने मार्गक्रमण करणारे दिसते. यामुळे पूर्ण वर्षात ‘लय आणि उत्पत्ती’ या दोन्हींशी संबंधित विविध घडामोडी मोठ्या प्रमाणात घडतील.
१ आ. वायुतत्त्वप्रधान वर्ष : कलियुग वर्ष ५१२७ यात पंचतत्त्वांपैकी वायूतत्त्वाचे प्रमाण सर्वाधिक आहे. ‘सतत परिवर्तनशीलता (हालचाल)’ हा वायुतत्त्वाचा मूळ गुणधर्म आहे. यामुळे व्यक्ती, समाज, राष्ट्र आणि विश्व अशा सर्वच क्षेत्रांत नकारात्मक अन् सकारात्मक अशा पुष्कळ घटना या पूर्ण वर्षात घडणार आहेत.
१ इ. संधीकाल : समष्टी कालचक्राची ‘सनातन राष्ट्राच्या (रामराज्याच्या)’ दिशेने, म्हणजे कलियुगातील सत्ययुगाच्या दिशेने वाटचाल होत असून तीव्र पापयुक्त आणि पीडा देणारे कलियुगातील कलियुग संपुष्टात येत आहे. कलियुगातील कलियुग यातील अंतिम कालचक्रांपैकी वर्ष ५१२७ हे आहे. यामुळे साधना करणार्यांसाठी हे वर्ष संधीकाळ ठरणार आहे.
१ ई. दैवी ऊर्जायुक्त काळ : ज्या वेळी समष्टी कालचक्र कलियुगातील सत्ययुगाच्या दिशेने वाटचाल करते, त्या वेळी भूलोकात आध्यात्मिक राज्याच्या स्थापनेसाठी दैवी ऊर्जा कार्यरत होते. मागील ५ वर्षांच्या तुलनेत या वर्षात ही दैवी ऊर्जा अधिक प्रमाणात कार्यरत असणार आहे. त्यामुळे हे वर्ष शीघ्र आध्यात्मिक उन्नतीसाठीही पूरक आहे.

२. हिंदुत्वाच्या दृष्टीने कलियुग वर्ष ५१२७
२ अ. हिंदुत्वासाठी पूरक घटनांना तीव्र विरोध होणे; मात्र शेवटी हिंदुत्वाचा विजय होणे : या वर्षात हिंदुत्वाला पूरक अशा महत्त्वाच्या विविध घटना घडतील. हिंदुत्वनिष्ठांना आरंभी विविध प्रकारच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि वैधानिक (कायदेशीर) विरोधांना सामोरे जावे लागेल. या वेळी केवळ पुण्याई असलेल्या; मात्र साधनेचे पाठबळ नसलेल्या हिंदुत्वनिष्ठांना काही प्रसंगांत पराभवाला सामोरे जावे लागेल, तर साधना करणारे हिंदुत्वनिष्ठ यशस्वी होतील. यासाठी सूक्ष्मातून अनेक ऋषी-मुनी, देवगण आणि सात्त्विक जीव साधना करणार्या हिंदुत्वनिष्ठांना साहाय्य करतील. त्यामुळे शेवटी हिंदुत्वाचा विजय होईल.
२ आ. हिंदुत्वावर श्रद्धा वाढवणार्या विविध दैवी घटना घडणे : या वर्षात विविध ठिकाणी सुप्त स्वरूपात असणारी देवतेची शक्ती जागृत होईल. त्यामुळे आतापर्यंत अप्रगट असलेली विविध देवळे किंवा शक्तीपिठे सापडणे, आता जागृत स्वरूपात असलेल्या देवतांची उपासना केल्यावर स्थुलातील बुद्धीगम्य अनुभूती येणे, उदा. अनेक वर्षांपासून असलेला शारीरिक त्रास दूर होणे, सांसारिक अडचणी सुटणे इत्यादी अनुभूती समाजातील व्यक्तींना मोठ्या प्रमाणावर येणे, अशा प्रकारच्या हिंदुत्वावर श्रद्धा वाढवणार्या विविध दैवी घटना घडतील.
२ इ. विश्वात हिंदुत्वासाठी पूरक वायूमंडल निर्माण होणे : या वर्षात केवळ भारतात नाही, तर पूर्ण विश्वात हिंदुत्वासाठी पूरक वायूमंडल निर्माण होईल. त्यामुळे हिंदुत्वाची शिकवण देणार्या अनेक संस्थांची स्थापना होणे, हिंदुत्वाच्या शिकवणीविषयी विदेशी प्रसारमाध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा होणे, विदेशांमध्ये हिंदुत्वाशी निगडित सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जाणे, अशा घटना घडतील.
३. समाजाच्या दृष्टीने कलियुग वर्ष ५१२७
३ अ. युवा पिढीने धर्माचरण केल्यास तिला विविध त्रासांवर मात करणे शक्य होणे : युवा पिढीत कार्य करण्याची शक्ती अधिक असते. त्यामुळे वायूतत्त्वप्रधान वर्षाचा सर्वाधिक परिणाम युवा पिढीवर होणार आहे. धर्माचरण करणार्या युवकांना सहजतेने यश आणि समाजात कीर्ती मिळेल, तर धर्माचरण न करणार्या युवकांना विविध प्रकारचे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक त्रास भोगावे लागतील; मात्र यांतून त्यांना धर्माचरणाचे महत्त्व लक्षात येऊन ते धर्माभिमानी होतील.
३ आ. पापनाश करणारा काळ : हे वर्ष वायूतत्त्वप्रधान असल्याने या काळात पापनाश होण्यासाठी सुप्त स्वरूपातील अनेक रोग (हृदयघात, ‘ब्रेन हॅमरेज’(मेंदूत रक्तस्त्राव), कर्करोग इत्यादी), नैसर्गिक आपत्ती (पूर, दुष्काळ, भूकंप इत्यादी), तसेच मानवाच्या निष्काळजीपणामुळे होणारे अपघात इत्यादींमध्ये वाढ होईल. असे असले, तरीही हा संधीकाळ असल्याने तो पापनाशासाठी सर्वाेत्तम काळ असतो. या काळात लोकांनी त्यांच्याकडून झालेले पाप नष्ट होण्यासाठी प्रायश्चित्त घेण्याला, म्हणजे साधना करायला प्राधान्य दिले, तर त्यांचे विविध संकटांपासून रक्षण होईल किंवा त्यांना मृत्यूनंतर चांगली गती मिळण्यास साहाय्य होईल.
याच प्रकारे आतंकवाद, अराजकता, अधर्माचरण इत्यादी पसरवणार्या मोठ्या संस्था नष्ट होणे किंवा अशा मोठ्या संस्थांच्या प्रमुखांचा नैसर्गिक मृत्यू होणे किंवा त्यांना ठार केले जाणे, अशा पापनाश करणार्या विविध घटना घडतील.
४. कृतज्ञता आणि प्रार्थना !
श्री गुरु म्हणजे ‘अनंत कोटी ब्रह्मांड नायक !’ अनंत कोटी ब्रह्मांडांचा काळ श्री गुरूंच्या अधीन असतो, म्हणजे ‘काळ’ हा श्री गुरूंनी शिष्याला घडवण्यासाठी केलेली लीला असते. ज्याच्यावर श्री गुरूंची कृपा, तो कोणत्याही काळाला हरवून यश गाठू शकतो. ‘अशा श्री गुरूंची कृपा सर्व साधकांना अनुभवायला मिळावी’, अशी त्यांच्या श्री चरणी कोटीशः प्रार्थना आहे.’
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
साधनेच्या दृष्टीने कलियुग वर्ष ५१२७ !
१. व्यष्टी साधनेच्या अंतर्गत ‘नामजप’ आणि ‘त्याग’ या सूत्रांना पूरक काळ : हा काळ ‘लय आणि उत्पत्ती’ यांच्याशी संबंधित आहे. त्यामुळे हा काळ व्यष्टी साधनेच्या अंतर्गत ‘नामजप आणि त्याग (तन, मन, धन, बुद्धी आणि अहं यांचा)’ या सूत्रांसाठी पूरक आहे. साधकाने ही सूत्रे आचरणात आणल्याने त्याला असलेला आध्यात्मिक त्रास आणि त्याच्यामधील अहं यांचा शीघ्र गतीने लय होतो अन् त्याच्यात गुण आणि आध्यात्मिक सामर्थ्य यांची उत्पत्ती होते. त्यामुळे साधकाची शीघ्र आध्यात्मिक उन्नती व्हायला साहाय्य होते.
२. समष्टी साधनेच्या अंतर्गत ‘सत्सेवे’साठी पूरक काळ : हे वर्ष दैवी ऊर्जायुक्त वर्ष असणार आहे. ही दैवी ऊर्जा समष्टी साधना करणार्यांना आणि त्यातही समष्टी साधनेच्या अंतर्गत कर्तव्यकर्म करणार्यांना मिळणार आहे. समष्टी साधनेच्या अंतर्गत ‘पूर्ण क्षमतेने, निष्काम, भावपूर्ण आणि परिपूर्ण सत्सेवा करणे’, हेच सर्वश्रेष्ठ कर्तव्यकर्म आहे. त्यामुळे या वर्षात कर्तव्यकर्म ठरणारी सत्सेवा करणार्यांना दैवी ऊर्जेचा लाभ होऊन इतरांच्या तुलनेत त्यांची शीघ्र आध्यात्मिक उन्नती होणार आहे.
३. ‘माया आणि देवत्व’ या दोन्हींची अनुभूती देणारा काळ : या वर्षात ‘लय आणि उत्पत्ती’ या दोन्हींशी संबंधित घटना घडतील. यामुळे मायेच्या प्रभावामुळे साधनेपासून परावृत्त करणारे प्रसंग, तर दैवी ऊर्जेमुळे देवाची कृपा होणारे प्रसंग साधक आणि समाज यांच्या जीवनात घडतील. यामुळे ‘वर्षातील काही दिवस साधना न होणे’, तर ‘काही दिवसांत अनेक दिवसांची साधना सहजतेने होणे’, असे दोन्ही प्रकारचे प्रसंग साधकांना अनुभवायला येतील. अशा स्थितीतही साधकांनी ‘स्वभावदोष आणि अहं यांची निर्मूलन प्रक्रिया राबवणे, नामजप, त्याग आणि सत्सेवा करणे’ यांना प्राधान्य दिल्यास त्यांना अखंड साधना करणे शक्य होईल.
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
|