‘मला वार्ताहर सेवा आणि संपर्क सेवा करण्यासाठी महाराष्ट्र विधीमंडळाच्या अधिवेशनात वर्षातून ३ वेळा जाण्याची संधी मिळते. गेली अनेक वर्षे ही सेवा श्रीगुरुदेवांच्या कृपेने होत आहे. त्या निमित्ताने राष्ट्र आणि धर्म यांच्या विषयाशी संबंधित विविध लोकप्रतिनिधींशी भेटता आले. या अनुषंगाने आलेले अनुभव येथे देत आहे.


१. महाराष्ट्र विधीमंडळातील सदस्यांमध्ये हिंदुत्वाविषयी आमूलाग्र परिवर्तन
प्रारंभी ही सेवा करतांना १० पैकी एक-दोन जणांकडून सकारात्मक आणि धर्माला अनुकूल असा प्रतिसाद मिळायचा, तसेच त्यांना धर्मावरील आघातांविषयी पुरावे देऊन सांगावे लागत असे. त्या वेळी ते धर्माच्या बाजूने काही प्रमाणात बोलायचे. बाकीच्या लोकांची भूमिका सावध आणि धर्मनिरपेक्ष असायची. आता महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर राज्यातील वातावरण पूर्णपणे पालटले आहे. अलीकडे नागपूर येथील महाराष्ट्र विधीमंडळाच्या डिसेंबर २०२४ मध्ये हिवाळी अधिवेशनासाठी जाण्याची संधी मिळाली. तेव्हा लक्षात आले की, आता अनेक लोकप्रतिनिधी धर्माच्या बाजूने बोलणारे झाले आहेत, तसेच आपण (प्रखर हिंदुत्वनिष्ठ संघटना) ज्या प्रखरपणे धर्माची बाजू घेऊन विषय मांडतो, तशीच भूमिका आता लोकप्रतिनिधी प्रखरपणे मांडू लागले आहेत.
तेलंगाणातील आमदार टी. राजासिंह ज्याप्रमाणे हिंदुत्वाची भूमिका मांडतात, तशी भूमिका घेणारे काही आमदार भेटले. ही सर्व केवळ गुरुदेवांची (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची) कृपा असल्याची प्रचीती आली. एवढा आमूलाग्र पालट आणि तोही इतक्या पुढच्या स्तरावरील ! हे केवळ ईश्वरी कृपेनेच शक्य आहे. अन्यथा हिंदुत्वाची भूमिका घेणारे पक्ष किंवा नेतेही बर्याचदा बचावात्मक भूमिकेत असतात आणि विरोध झाल्यावर धर्माला बाजूला ठेवून पूर्णपणे धर्मनिरपेक्ष भूमिकेत शिरतात. या वेळी तसे जाणवले नाही.
२. हिंदूंमध्ये धर्मजागृती होण्यासाठी सनातन संस्थेला श्रेय देणारे अग्रगण्य वृत्तपत्राचे माजी संपादक !
एका हिंदुत्वनिष्ठ पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना मंदिर महासंघाच्या कायर्र्क्रमाचे निमंत्रण दिले. त्यांनी ते त्यांच्या स्वीय साहाय्यकांकडे दिले. आम्ही त्या प्रसिद्धीप्रमुखांना कार्यक्रमाविषयी माहिती देत होतो. त्या वेळी राज्यातील एका अग्रगण्य वर्तमानपत्राच्या माजी संपादकाने पुढाकार घेऊन त्यांना सांगितले, ‘‘सनातन संस्थेचे कार्य मोठे आहे. आता जे यश मिळाले आहे, जी जागृती झाली आहे, ती करण्यात सनातनचा मोठा सहभाग आहे. सनातनला वगळून आपण पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांना त्यांच्या कार्यक्रमाला आणण्याच्या दृष्टीने नियोजन करा.’’ या प्रसंगानंतर त्या प्रसिद्धीप्रमुखांचा सनातनच्या साधकांकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटला.
वास्तविक आपण स्वत:हून हे काही न सांगता समाजातील अभ्यासकच सनातन संस्थेचे महत्त्व इतर लोकांना समजावून सांगू लागले आहेत. हे गुरुदेवांच्या कार्याला मिळत असलेले यशच म्हणावे लागेल. खरे पहाता यात आम्ही काही विशेष प्रयत्न केले आहेत, असेही नाही. श्रीगुरूंनी जे हिंदु राष्ट्राचे, तसेच राष्ट्र-धर्म जागृतीचे प्रखर कार्य प्रारंभ केले आहे, त्याची प्रचीती आता समाजातील धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्यासह अन्य लोकांनाही येऊ लागली आहे. या वेळी गुरुदेवांविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.
– श्री. अरविंद पानसरे, ‘सनातन प्रभात’चे पत्रकार, फोंडा, गोवा. (१९.१.२०२५)
लोकप्रतिनिधींसह समाजातील सर्वच वर्गांमध्ये हिंदुत्वाविषयी श्रद्धा निर्माण झाल्याची उदाहरणे
- अनेक आमदारांना भेटल्यावर सर्वांनी उत्स्फूर्तपणे सांगितले, ‘‘होय, आम्ही हिंदूंच्या मतांमुळेच निवडून आलो आहोत. यापुढे आम्ही हिंदूंसाठीच कार्य करण्याचे ठरवले आहे. आम्ही अन्य धर्मियांकडे मते मागण्यासाठी जाणार नाही. वर्षभर हिंदूंसाठीच कार्यक्रम राबवणार.’’
- प्रत्यक्षातही भाजप आणि शिवसेना पक्षाच्या आमदारांमध्येच नव्हे, तर अधिकारी, पत्रकार, तसेच समाजातील सर्वच वर्गात हिंदुत्वाची भूमिका पूर्वीपेक्षा वाढली असल्याचे लक्षात आले. पूर्वी सर्वच स्तरांमध्ये थोडी धर्मनिरपेक्ष भूमिका घेतली जात होती. आता मात्र ते प्रखर हिंदुत्वाच्या भूमिकेतून वावरतांना दिसत आहेत.
- एक हिंदुत्ववनिष्ठ विचारांचे लोकप्रतिनिधी मंत्री झाल्यावर त्यांच्या भेटीसाठी गेलो होतो. तेव्हा ते कार्यालयातून बाहेर चालले होते; पण आम्हाला पाहिल्यावर ते थांबले आणि आम्हाला घेऊन त्यांच्या कार्यालयात नेले. ते आत घेऊन गेल्यावर म्हणाले, ‘‘आता निवेदन वा विषय देण्यासाठी येण्याऐवजी आपली कोणती कामे करायची आहेत, ते सांगण्यासाठी तुम्ही यायचे. आजपासून हे कार्यालय तुमचे आहे. कधीही या आणि आम्हाला काय कराचये, ते सांगा. आपण सर्वांनी मिळून एवढे मोर्चे काढले. आता आम्ही लवकरच ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा करणार आहोत. इतर राष्ट्र-धर्माचा कोणताही विषय असेल, तरी माझ्याकडे घेऊन या. माझ्या खात्याचा विषय नसला, तरी अन्य संंबंधित मंत्र्यांकडून ते काम करवून घेऊ.’’
- अशाच प्रकारे दुसरे एक आमदार मंत्री झाल्यानंतर त्यांचाही प्रतिसाद चांगला जाणवला. या मंत्र्यांनी आम्हाला पाहिल्यानंतर स्वतःहून बोलावले. अन्य पत्रकारांसह इतरांना बाजूला व्हायला सांगितले आणि विषय ऐकून घेतला, तसेच निवेदन देतांनाची छायाचित्रे काढून झाल्यानंतर आम्हाला स्वत:सह नेले.
- एका जिल्ह्यातील हिंदुत्वनिष्ठ पक्षाचे आमदार प्रथमच निवडून आले. त्यांच्याशी ओळख नसतांना आम्ही त्यांना जाऊन भेटलो. त्यांना थोडक्यात परिचय करून दिल्यावर ते म्हणाले, ‘‘मी कट्टर हिंदुत्वनिष्ठ आहे. मी ‘लव्ह जिहाद’ची अनेक प्रकरणे हाताळली आहेत, तसेच अनेक गायींचे रक्षण केले आहे. एक तालुका हा गोहत्येसाठीचा मोठा ‘हब’ आहे. तो मला बंद करायचा आहे. मी आमदार झाल्यावर प्रथम येथील अनधिकृत बांधकामावर प्रशासनाकडून कारवाई करवून घेतली, जी पूर्वी अनेक वर्षे होत नव्हती. यापुढेही माझी भूमिका ही हिंदुत्वाचीच असणार असून त्याच सूत्रावर मी निवडणूक लढवून जिंकून येणार आहे. माझ्या मतदारसंघात पुढील ५ वर्षे मी ‘भागवत सप्ताहा’चे आयोजन करणार आहे. हिंदुत्वाच्या सूत्रावर काम करणे, हेच माझे ध्येय आहे.’’ या वेळी त्यांना राष्ट्र-धर्माविषयी आवाज उठवण्यासाठी सांगितल्यावर ते म्हणाले, ‘मला निवेदन आणून द्या. मी ते सभागृहात मांडतो.’
- अशाच प्रकारे मराठवाड्यातील हिंदुत्वनिष्ठ पक्षाचे एक आमदार म्हणाले, ‘‘तुम्ही सांगितलेले मंदिरांच्या भूमीवरील अतिक्रमणाचे सूत्र गंभीर आहे. मला याविषयीचे निवेदन आणून द्या. मी हा विषय विधानसभेत मांडीन.’’
- पूर्वी एका पक्षाचे ज्येष्ठ मंत्री आपल्याला भेटत नव्हते; मात्र या वेळी ते आपल्याला भेटले. त्यांनी एका कार्यक्रमाचे निमंत्रण भर गर्दीत थांबून स्वीकारले आणि विषय शांतपणे ऐकून घेतला. त्यांनी चांगला कार्यक्रम घेतल्याची प्रतिक्रियाही या भेटीत व्यक्त केली.
- एका कार्यक्रमासाठी शिवसेना आणि भाजप यांच्या ६० हून अधिक आमदारांना प्रत्यक्ष भेटून निमंत्रण देण्यात आले. या सर्वांचा अतिशय चांगला प्रतिसाद होता.
– श्री. अरविंद पानसरे, ‘सनातन प्रभात’चे पत्रकार, फोंडा, गोवा. (१९.१.२०२५)