रेल्वेमार्गाने येणार्‍या बांगलादेशी घुसखोरांचा बंदोबस्त करा ! – सकल हिंदु समाजाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

पोलीस अधीक्षक निलोत्पल यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

कोल्हापूर – बाहेरील अनेक राज्यात बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई होत असल्याने रेल्वेच्या मार्गाने बांगलादेशी घुसखोर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोल्हापूर येथे येत आहेत. यापूर्वीही आजरा, शाहूवाडी, गगनबावडा यांसारख्या भागात असे घुसखोर रहात असल्याचा संशय आहे. तरी रेल्वेमार्गाने येणार्‍या बांगलादेशी घुसखोरांचा बंदोबस्त करावा, तसेच कोल्हापूर येथील मशिदी, मदरसे यांचा त्या अनुषंगाने अन्वेषण करावे, या मागणीचे निवेदन सकल हिंदु समाज आणि सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने कोल्हापूर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांना देण्यात आले. (अशी मागणी का करावी लागते ? – संपादक) निवेदन स्वीकारल्यावर पोलीस अधीक्षकांनी यावर योग्य ती कारवाई चालू असल्याचे सांगितले. पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, या घुसखोरीच्या अनुषंगाने तात्काळ शोध मोहीम चालू करावी. यात प्रामुख्याने लाईन बझार, मणेर मळा, बिडी कामगार चाळ, औद्योगिक वसाहत, बांधकाम क्षेत्राशी संबंधित कामगारांची चौकशी करावी. कोल्हापूर जिल्ह्यात त्यांना साहाय्य करणारे कोण आहेत ? त्यांना आसरा देणारे कोण आहेत ? याचीही चौकशी करावी.

या प्रसंगी ‘महाराजा प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, उद्योजक श्री. प्रसन्न शिंदे, हिंदु महासभेचे उपाध्यक्ष श्री. विकास जाधव, शहराध्यक्ष श्री. प्रशांत पाटील, ‘मराठा तितुका मेळवावा’चे श्री. योगेश केरकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, ‘नमो नमो’चे जिल्हाध्यक्ष श्री. विक्रम जरग, श्री. कपिल कदम उपस्थित होते.