शेतकर्‍यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !

सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त कार्यरत असलेले कासेगाव येथील साहाय्यक कृषी अधिकारी अमोल नामदेव देवकर यांच्याविरुद्ध शेतकर्‍यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी तक्रार प्रविष्ट केली होती. याची कृषी विभागाने तात्काळ नोंद घेऊन विभागीय कृषी सहसंचालक, पुणे विभाग, पुणे यांच्या कार्यालयाच्या वतीने प्राथमिक अन्वेषणानंतर अमोल नामदेव देवकर यांना २९ मे या दिवशी तात्काळ निलंबित केले. या प्रकरणी पुढील प्रशासकीय कार्यवाही नियमानुसार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी दिली आहे.

कासेगाव येथील शेतकरी अजित जाधव यांना दूरध्वनीवरून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप देवकर यांच्यावर करण्यात आला होता. या घटनेविषयी कासेगाव ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, तसेच मौजे गावातील शेतकर्‍यांच्या स्वाक्षरीसह २९ मे या दिवशी कृषी विभागाकडे लेखी तक्रार करण्यात आली होती.