भाषा संचालनालय मराठी भाषा अधिकार्यांना देणार मराठीचे धडे !
श्री. प्रीतम नाचणकर, विशेष प्रतिनिधी, सनातन प्रभात

मुंबई, ३ जून – ‘महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४’नुसार राज्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात मराठी भाषा अधिकारी असणे अनिवार्य आहे; पण राजभाषा समृद्ध करण्यासाठी कायद्याने निर्माण करण्यात आलेले हे पद अत्यंत दुर्लक्षित आहे. राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांत मराठी भाषाही दुर्लक्षितच आहे. हे लक्षात घेऊन ‘मराठी भाषा अधिकारी’ या पदाची केवळ नामधारी ओळख पुसण्यासाठी मराठी भाषा संचालनालयाकडून प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांतील सर्व मराठी भाषा अधिकार्यांना मराठीचे धडे देण्याचा स्तुत्य निर्णय मराठी भाषा संचालनालयाने घेतला आहे.

‘महाराष्ट्र राजभाषा अधिनियमा’नुसार प्रत्येक शासकीय कार्यालयांमध्ये मराठी भाषा अधिकारी हे पद अनिवार्य असले, तरी बहुतांश शासकीय कार्यालयांत पदाचा कार्यभार कुणाकडेच देण्यात आलेला नाही. ज्या कार्यालयांमध्ये पदभार देण्यात आला आहे, तोही केवळ औपचारिकतेचा सोपस्कार पार पाडण्यात आला आहे. प्रत्येक शासकीय कार्यालयात अशा प्रकारचे पद आहे, हे सामान्य नागरिकांना तर सोडून द्या; पण कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनाही ठाऊक नाही, ना कोणत्या कार्यालयात ‘मराठी भाषा अधिकारी’ या नावाने पाटी लावली जाते !

हे आहे मराठी भाषा अधिकार्यांचे काम !
शासकीय कार्यालयामध्ये मराठीचा वापर व्यवस्थित होत आहे, हे पहाणे मराठी भाषा अधिकार्यांचे काम आहे. या अंतर्गत कार्यालयात मराठीत बोलणे, मराठीत स्वाक्षरी करणे, मराठीत नामफलक लिहिणे, भ्रमणभाषवर मराठी भाषेत संदेश पाठवणे, धारिकांवर मराठी भाषेत शेरा लिहिणे, सूचना-पत्रव्यवहार या दिनक्रमाचे कामकाज मराठीत करणे आदी सूत्रांकडे लक्ष देणे अशी मराठी भाषा अधिकार्यांच्या कामकाजाची व्याप्ती आहे. संबंधित शासकीय कार्यालयात असे होत नसल्यास कार्यालयप्रमुखांच्या निदर्शनास आणून देणे, हे मराठी भाषा अधिकार्याचे काम आहे. प्रत्यक्षात मात्र अशा प्रकारे काम बाजूलाच राहिले. मराठी भाषा अधिकारी पदाचीच राज्यात वानवा आहे.
प्रत्येक जिल्ह्यात होणार मराठीची कार्यशाळा ! – मराठी भाषा संचालनालय
मराठी भाषा अधिकारी सक्षम असेल, तरच शासकीय कार्यालयांमध्ये मराठी भाषा सक्षम होऊ शकेल, हे लक्षात घेऊन हे पद सक्षम करण्याचा निर्णय मराठी भाषा संचालनालयाने घेतला आहे. याविषयी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला माहिती देतांना मराठी भाषा संचालनालयाचे संचालक अरुण गीते म्हणाले की, शासकीय कार्यालयात मराठी भाषेविषयी कार्यक्रम आयोजित करणे, तसेच मराठी भाषेविषयी तक्रार आल्यास त्याचे निवारण करणे, ही काम मराठी भाषा अधिकार्यांनी करणे अपेक्षित आहेत. यासाठी मराठी भाषा अधिकार्यांना त्यांचे कर्तव्य आणि अधिकार यांची जाणीव करून देण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कार्यशाळा घेण्यात येणार आहे. याविषयीचा आराखडा सिद्ध करण्यात आला असून लवकरच याविषयीचा मराठी भाषा विभागाला प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. विभागाची मान्यता आणि निधीचे प्रावधान झाल्यावर प्रत्यक्ष कार्यशाळेला प्रारंभ करण्यात येईल. |

प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
राज्यातील पोलीस ठाण्यांच्या आवारात महिला समुपदेशन केंद्रे स्थापन करणार !
शिर्डी येथे ७०० किलो भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे पेढे जप्त !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक