रत्नागिरी – जिल्ह्यात महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त जिल्ह्यातील शिवमंदिरांतून भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. जिल्ह्यातील वातावरण शिवमय झालेले होते. गावागावांमधील शंकरांच्या मंदिरात ‘हर हर महादेव, ॐ नम: शिवाय ।’ असा जयघोष चालू होता.
देवरुख येथे महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वावर सप्तलिंगी नदीच्या काठावर भव्य सप्तलिंगी आरती करण्यात आली. काशी विश्वेश्वर घाटावर स्थानिक महिलांनी रांगोळी आणि पणत्या लावून आकर्षक रोषणाई केली होती. सप्तलिंगीच्या प्रवाहात जलदिव्यांची प्रतिबिंबे सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी काशी विश्वेश्वर देवस्थान (राजीवडा), परिसरातील नागरिक, तसेच क्रांती व्यापारी संघटनेचे सदस्य अन् पदाधिकारी यांनी विशेष श्रम घेतले.
संगमेश्वर तालुक्यातील पुरातन आणि चालुक्य राजवटीतील मंदिर, राजवाडीतील सोमेश्वर मंदिर, कसबा येथील चालुक्य राजवटीतील पुरातन कर्णेश्वर मंदिर, तसेच कळंबस्ते येथील रामेश्वर पंचायतन मंदिर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सपत्नीक श्री देव मार्लेश्वराचे दर्शन घेतले.
रत्नागिरी शहरातील सुप्रसिद्ध श्रीराम मंदिर, राजीवडा येथील सुप्रसिद्ध काशी विश्वेश्वर मंदिर, धोपेश्वर येथील श्री देव धूतपापेश्वर देवस्थान येथे महाशिवरात्री साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त विविध ठिकाणी सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन अन् विक्रीकक्ष लावण्यात आले होते.
सनातन संस्थेचे धर्मरक्षणाचे कार्य छान आहे ! – योगेश कदम, गृहराज्यमंत्री, महाराष्ट्र

सनातन संस्थेचे धर्मरक्षणाचे कार्य छान आहे. आज खरी आवश्यकता धर्मरक्षणाची आहे आणि संस्था तेच कार्य करत आहे. संस्थेच्या कार्याला पुष्कळ शुभेच्छा, अशा शब्दांत गृहराज्यंमत्री योगेश कदम यांनी सनातन संस्थेच्या कार्याचा गौरव केला. दापोली तालुक्यात विविध ठिकाणच्या महाशिवरात्री उत्सवात मंत्री कदम यांनी भेट देऊन दर्शन घेतले. या वेळी करजगाव, दापोली येथे श्री वेळेश्वर मंदिर येथे लावण्यात आलेल्या सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्या कक्षाला मंत्री कदम यांनी भेट दिली. संस्थेचे कार्य जाणून घेतले, तसेच विविध ग्रंथही पाहिले आणि ‘हलाल जिहाद’, ‘हिंदु राष्ट्र; आक्षेप आणि खंडण’ हे ग्रंथ, तसेच ‘शिव’, ‘गणेश अथर्वशीर्ष’, ‘देवीपूजनाचे शास्त्र’ हे लघुग्रंथ घेतले.