‘असे म्हटले जाते, या जगामध्ये एकच असा देव आहे की, ज्याने साक्षात् पृथ्वीतलावर आपले वास्तव्य राखले आहे; कारण पृथ्वीतल म्हणजेच माता दुर्गेचे वास्तव्य स्थान ! आपल्या पत्नीच्या प्रेमापोटी भगवान शिव या पृथ्वीतलावर वास्तव्य करतात.
भगवान महादेवाची पूजा पृथ्वीतलावर त्याच्या लिंगाच्या रूपात केली जाते; कारण त्यांना तसा शाप दिला होता. शापाचा परिणाम म्हणजे महादेवाचे ‘शिवलिंग’ त्याला ‘पिंडी’ असेही म्हणतात. शिवलिंग हे महादेवाच्या लिंगाचे आणि सृष्टीच्या योनीचे प्रतीक आहे. याच शिवलिंगातून संपूर्ण सृष्टीची पुन:पुन्हा निर्मिती होत रहाते. शिवलिंगाला पूजणे म्हणजे निसर्ग आणि देव यांना पूजणे होय ! यातूनच मनुष्याचे कल्याण साधले जाते.
विविध शिवलिंगांची माहिती आणि त्याच्या पूजनाच्या पद्धती

१. काळ्या पाषाणाचे शिवलिंग : सर्वांत अधिक प्रचलित शिवलिंग, म्हणजे ‘काळा पाषाण’ शिवलिंग ! हे शिवलिंग मुख्यतः आपणास शिवमंदिरात आढळते. या शिवलिंगाचे महत्त्व म्हणजे ज्या व्यक्तीस शनीचा कोप अधिक होत असेल, तिने या शिवलिंगाचे पूजन करावे. विवाह संपन्न न होणे, सतत अपघात होणे, जन्मास आलेली मुले न जगणे, शत्रूवर विजय मिळवण्यासाठी, मोठी कामगिरी पूर्ण करण्यासाठी, भूतबाधा दूर करण्यासाठी, झोप न लागणे, तसेच वाईट स्वप्ने न पडण्यासाठी काळ्या पाषाणाच्या शिवलिंगाची पूजा योग्य आहे. मुख्यतः काळ्या पाषाणाचे शिवलिंग स्वयंभू असते. हे इच्छापूर्ती शिवलिंग असते. हे शिवलिंग पितृदोष, नारायण नागबळी आणि कालसर्प दोष असे महादोष दूर करण्यासाठी योग्य आहे; पण असे शिवलिंग आपल्या घरात ठेवणे अयोग्य आहे. ते घरात ठेवल्यास घरात आकस्मिक मृत्यू, माणसाचे मानसिक संतुलन बिघडणे, मुले आई-वडिलांपासून दूर होणे, वारंवार अपघातात मृत्यू होणे इत्यादी संकटांना तोंड द्यावे लागते. या शिवलिंगावर योग्य प्रकारे पूजापाठ होणे आवश्यक आहे. हे शिवलिंग मुख्यतः मनुष्याचे महादोष नाहीसे करण्यास वापरले जाते.

२. संगमरवराचे (पांढरे) शिवलिंग : पांढरे शिवलिंगसुद्धा लोकांमध्ये पुष्कळ प्रचलित आहे. ‘शिवलिंग घरात ठेवायचे आहे, मग ते कुठलेही ठेवले, तर चालते’, असा बर्याच भक्तांचा भ्रम असतो. पांढरे शिवलिंग ठेवण्याचे उद्दिष्ट, म्हणजे आपल्या जीवनात जी वाईट घटना किंवा संकट आले आहे, ते नाहीसे करणे. आपल्या जीवनात भगवान ब्रह्मदेवाकडून जे अपेक्षित आहे, त्याच्या प्राप्तीसाठी आपण आपल्या घरात पांढरे शिवलिंग ठेवू शकतो आणि पूजन करू शकतो.

३. चांदीचे शिवलिंग : चांदीचे शिवलिंगसुद्धा बर्याच भक्तांमध्ये प्रचलित आहे. या शिवलिंगामध्ये बहुतेक वेळा एक मोठा दोष आढळतो. तो म्हणजे शिवलिंग पोकळ आढळणे. शिवलिंग कुठलेही असो, ते पोकळ कधीच नसावे. त्याचा कुठल्याही प्रकारे उपयोग होत नाही. चांदीच्या शिवलिंगाचा उपयोग आपल्या मनाची कमकुवत मानसिकता किंवा आजार दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. या शिवलिंगाचा एक कडक नियम आहे, या शिवलिंगाला नेहमी चमकदार आणि ओजस्वी ठेवावे लागते. चांदी काळी पडल्यास तो अशुभ संकेत समजावा. त्यासाठी त्याचे योग्य विधीही होणे आवश्यक असते.

४. पितळी शिवलिंग : सर्वांत अधिक वापरात येणारे शिवलिंग, म्हणजे पितळ या धातूचे शिवलिंग. पितळ्याचे शिवलिंग हे भगवान शंकराचे अवतार, म्हणजे भैरव या देवाचे नेतृत्व अधिक गाजवते. या शिवलिंगाची स्थापना आपल्या घरात करणे, म्हणजे आपल्या घरात आपल्या कुलदेवाची अथवा कुलदेवीची स्थापना करणे. जसे आपल्या घरामध्ये आपण आपल्या कुलदेवतांच्या टाकांची स्थापना करतो, तेवढ्याच योग्यतेच्या स्तराचे या पितळेच्या शिवलिंगाचे महत्त्व आहे. आपल्या घरात एकोपा ठेवण्याचे काम हे पितळेचे शिवलिंग करते. हे शिवलिंग योग्य मंत्रोच्चार (आपल्या कुलदेवांना स्मरून) आणि योग्य पूजाविधी करून अधिक योग्यता अन् फळ प्राप्त करून देऊ शकते.

५. स्फटिक शिवलिंग : सध्याच्या काळात सर्वाधिक उपयोगात येणारे शिवलिंग म्हणजे ‘स्फटिक शिवलिंग’. या शिवलिंगाचे महत्त्व आणि महती पुष्कळ विभिन्न आहे. या शिवलिंगाचे महत्त्व संपूर्ण त्या ‘स्फटिक’ या घटकावर अवलंबून आहे. हा एक पारदर्शी दगड किंवा रत्न आहे. शिवलिंगाचे संबंधित लाक्षणिक महत्त्व असे आहे की, वाईट अदृश्य शक्तींचा नाश करण्यासाठी मुख्यतः या शिवलिंगाचा वापर केला जातो. ग्रहांचा, त्यातही मुख्यत्वेकरून राहु आणि केतु यांचा वाईट प्रभाव नष्ट करण्यासाठी या शिवलिंगाचा वापर केला जातो. वाईट शक्तींचा त्रास होत असल्यास हे शिवलिंग त्यादृष्टीने पुष्कळ उपयुक्त होऊ शकते. जर या शिवलिंगाचे स्थान चुकले, तर आपल्या घरामध्ये पुष्कळ क्लेष किवा वादविसाद होतात. हे शिवलिंग घरात योग्य दिशेस आणि स्थानास ठेवून त्याच्यावर योग्य मंत्रोच्चार अन् पूजाविधी केल्यास, हे स्फटिक शिवलिंग पुष्कळ सकारात्मक ऊर्जा उत्पन्न करेल अन् ते अधिक मात्रेत लाभदायक ठरेल.

६. पारद शिवलिंग : पारद शिवलिंग हे भक्तांमध्ये अल्प प्रचलित शिवलिंग आहे; पण सत्य हे आहे की, हे पारद शिवलिंग वर नमूद केलेल्या सर्व शिवलिंगांपेक्षा सर्वांत अधिक लाभदायक आणि फलदायक असे शिवलिंग आहे. या शिवलिंगाची योग्य रितीने स्थापना आणि पूजापाठ केल्याने आपल्याला निश्चित फलप्राप्ती होते. या पृथ्वीतलावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद, प्रकृती आणि भगवान शंकराच्या माध्यमातून त्यांच्या भक्तांना प्राप्त व्हावा; म्हणून हे शिवलिंग या पृथ्वीतलावर प्रगट झाले आहे. पारद, म्हणजे बुध ग्रहाचे अस्तित्व या शिवलिंगात आले आहे. विशेष म्हणजे हे शिवलिंग एवढे फलदायी का आहे ? कारण पारद म्हणजे भगवान शिवाचे वीर्य. या कारणामुळे ते संपूर्णता फलप्राप्त करते. हे शिवलिंग म्हणजे उत्पत्तीचे प्रतीक आहे.’
(साभार : मासिक ‘स्वामी संकेत’)