भस्म आणि विभूती
हिंदु धर्मात पवित्र राखेचे दोन प्रकार सांगितले आहेत. एक आहे भस्म, जे स्मशानभूमीतून प्राप्त केले जाते. भस्माचा शंभोमहादेवाशी संबंध आहे. भस्म म्हटले की, आपल्या डोळ्यांसमोर अघोरी आले असतील; कारण ते संपूर्ण शरिराला भस्म लावतात.

‘हे शरीर नश्वर आहे आणि एक दिवस त्याचीही राख होणार आहे; म्हणून आपण देहाची आसक्ती बाळगता कामा नये’, याची आठवण भस्म करून देत असते. दुसरा प्रकार म्हणजे विभूती ! गायीचे सुकलेले शेण, तांदुळाचा भुसा, शमी, पिंपळ, वड यांचे लाकूड, तसेच अन्य पदार्थ एकत्र करून जाळले जातात. त्यावर योग्य तो मंत्रोच्चार केला जातो.
या वस्तू जाळल्यानंतर जी राख सिद्ध होते, ती कापडाने गाळली जाते. अशा प्रकारे पवित्र विभूती सिद्ध होते. विभूती म्हणजे गौरव आणि विभूती लावणार्यांना ती गौरव प्रदान करते, असे म्हणतात. योग्य पद्धतीने सिद्ध केलेल्या विभूतीमध्ये एक विशिष्ट गुण असतो, ज्यामुळे ऊर्जा हस्तांतरित किंवा प्रसारित होते. शिवपिंडावर त्रिपुंड्र लावलेले असते. यासाठी विभूतीचा उपयोग केला जातो.
भस्माचे महत्त्व
धार्मिक प्रसंगी आणि उपासनेत त्रिपुंड्राचे विशेष महत्त्व आहे. कपाळावर आणि दंडावर त्रिपुंड्र लावण्याची पद्धत आहे. आज्ञाचक्र जे कपाळाच्या मध्यभागी असते, तिथे त्रिपुंड्र लावले जाते म्हणजेच विभूती लावली जाते. यामुळे मनात कोणतेही वाईट विचार येत नाहीत. त्यासह नकारात्मकताही निघून जाते. मनात सात्त्विकता रहाते. विभूती आपल्यामध्ये सकारात्मकता वाढवते, तसेच आपल्या शरिरात असणार्या ७ चक्रांना नियंत्रित करते.
विभूती म्हणजे पवित्र राख !हिंदु धर्मात अनादि कालापासून विभूती कपाळाला लावत आहोत. विभूती ही मंत्रजपासह एखाद्या धुनी, होम अथवा यज्ञातील विशिष्ट लाकूड, तूप, औषधी वनस्पती आणि काही पवित्र गोष्टी यांपासून सिद्ध झालेली असते. आपल्या संस्कृतीमध्ये अशा प्रकारे सिद्ध केलेली पवित्र विभूती कपाळावर लावणे महत्त्वाचे मानले जाते. यासंदर्भात अधिक माहिती देणारा लेख ! |
विभूती लावण्याचे लाभ
१. दोन भुवयांच्या मधील भागावर भस्म अथवा विभूती लावल्याने कडक उन्हाळ्यामुळे होणारी डोकेदुखी न्यून होऊ शकते. तिसरा डोळा हा तुमच्या अंतर्मनाचे प्रतिनिधित्व करत असून तो तुमच्या मनातील विचारांच्या माध्यमातून कार्यरत असतो. तुमच्या शरिरातील या चक्रामध्ये नकारात्मक विचारांमधून नकारात्मक ऊर्जा शरिरात प्रवेश करत असते; मात्र तेथे विभूती लावल्यामुळे नकारात्मक ऊर्जेला शरिरात प्रवेश करण्यापासून रोखता येऊ शकते.
२. विभूती लावल्यामुळे शरिरातील अतिरिक्त आर्द्रता शोषून घेतली जाते आणि सर्दीपासूनसुद्धा संरक्षण होते.
३. जर तुमच्या शरिरात ऊर्जेचा स्रोत प्रवाहित होण्यामध्ये अडथळे येत असतील, तर विभूती लावल्याने शरिरात ऊर्जेचा स्रोत प्रवेश करणारी दारे उघडी होतात आणि नैसर्गिक ऊर्जेचा पुरवठा होतो.
४. मंदिर किंवा पवित्र स्थानी गेल्यावर प्रसाद म्हणून विभूती दिली जाते. हे एक प्रकारचे पवित्र भस्म आहे. ती विभूती दिल्यावर आपण आधी डोक्याला लावतो आणि त्यातील काही अंश जिभेवर ठेवतो, त्यामुळे विभूतीचे पवित्र कण आपल्या शरिरात जातात.
५. विभूती उजव्या हातात घ्यायला हवी, तिचा सन्मान करायला हवा. देशातील काही मंदिरांमध्ये प्रसाद म्हणून विभूती दिली जाते.
भारतात विभूती अंगाला लावणे, हे सामान्यपणे दिसून येते. एखाद्या धार्मिक स्थळी भेट दिल्यास त्या परिसरातील आध्यात्मिक मंडळींनी अंगाला विभूती लावल्याचे आपल्याला दिसते. विभूती अंगाला लावल्यामुळे माणसाचे वाईट आणि दुष्ट शक्तींपासून संरक्षण होते. भस्म आणि विभूती एक आहे, असे अनेक जणांचे म्हणणे आहे. यावर मतांतरे असू शकतात. |
भस्माचा डोंगर
श्री क्षेत्र गाणगापूर येथील भस्माचा डोंगर तुम्हाला ठाऊक आहे का ? भगवान परशुराम यांनी जगाच्या कल्याणासाठी येथे मोठा यज्ञ केला होता. त्या यज्ञातील विभूती साचून तिथे एक टेकडी सिद्ध झाली. अनेक वर्षे भक्तगण ही विभूती किंवा पवित्र राख घेऊन जातात; पण ती टेकडी आहे तशीच आहे. श्रीक्षेत्र गाणगापुरातील ही विभूती किंवा पवित्र भस्म हा तेथील मुख्य गुरुप्रसाद असतो. तुम्ही एकदा नक्की या ठिकाणी जाऊन त्याची अनुभूती घेऊ शकता. विभूती आपल्याला नकारात्मक ऊर्जेपासून दूर ठेवते, तसेच ‘आपले जीवन नश्वर असून अहंकार करू नका’, असे सांगत असते.
– श्री. यशवंत नाईक, मलेशिया
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |